Retention ratio
आजच्या भागात आपण धारणा प्रमाण (Retention ratio) या संकल्पनेबद्दल माहिती घेणार आहोत. सर्वसाधारणपणे एखाद्या व्यवसायात होणाऱ्या निव्वळ नफ्याची वाटणी दोन प्रकारे केली जाते, लाभांश (Dividend) देऊन आणि धारणा (Retention) निधीकडे वर्ग करून. लाभांश दिल्याने गुंतवणूकदारांना त्याच्या गुंतवणुकीवर काही मोबदला मिळतो, कंपनीबद्धल सकारात्मक वातावरण तयार झाल्याने त्यातील उलाढाल वाढते बाजारभाव वाढण्यास मदत होते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा लाभांश आणि मूल्यवृद्धी अशा दुहेरी फायदा होतो. कंपनीस स्पर्धात्मक दराने कर्ज मिळू शकते.
इतर लेख: Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?
- कंपनी कायद्यानुसार डिव्हिडंड देण्यावर कोणतेही बंधन नाही. व्यवस्थापनाची इच्छा असेल तर मिळालेला निव्वळ नफा ते पूर्णपणे भागधारकांना वाटू शकतात, काहीही लाभांश न देता अथवा अल्प लाभांश देऊन उरलेली रक्कम व्यवसाय वाढीसाठी वर्ग केली जाऊन त्यासाठीच वापरता येते. अपवादात्मक परिस्थितीत अशी शिल्लक रक्कम ही लाभांश म्हणून देता येते.
- एखाद्या कंपनीने निव्वळ नफ्याच्या (net income) तुलनेत किती टक्के भाग लाभांश म्हणून वाटला त्यावरून लाभांश प्रमाण मिळेल तर बाकी रक्कम ही धारणा प्रमाण समजली जाईल.
- ही दोन्ही प्रमाणे टक्केवारीत दर्शवितात. धारणा प्रमाणाचा वापर कंपनीच्या व्यवसायवृद्धीसाठी वापरला जात असल्याने त्यास plowback ratio (plowback म्हणजे नांगर, शेत नांगरून घेण्याचा, पीक चांगले येण्याशी असलेला संबंध लक्षात घेऊन, बहूदा हे नाव आले असावे) असेही म्हटले जाते.
- धारणा प्रमाण काढण्यासाठी धारणा निधी किती ते शोधावे लागेल.
- निव्वळ नफ्यातून लाभांश म्हणून दिलेली रक्कम वजा करून उरलेली रक्कम म्हणजे धारणा निधी, यास शंभरने गुणून आलेल्या संख्येस निव्वळ नफ्याने भागून काढता येईल.
- धारणा प्रमाण हे कंपनीच्या फायद्यात वाढ व्हावी म्हणून तर लाभांश प्रमाण हे भागधारकांना देण्यासाठी वापरले जात असून ही दोन्हीही प्रमाणे कंपनीच्या निव्वळ उत्पन्नाचे भाग आहेत.
- जरी धारणा निधीचा वापर कंपनीच्या व्यवसायवृद्धीसाठी केला जात असेल तरी तरी असे जास्त प्रमाण असणाऱ्या कंपन्या म्हणजे चांगल्या कंपन्या असे ठामपणे म्हणता येणार नाही. व्यवसायासाठी आवश्यक पण कमीतकमी दराने भांडवल उभारणी करून अधिक लाभ मिळवणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापन प्रगल्भ आहे असे समजले जाते.
महत्वाचे लेख:स्टॉक मार्केट – पी /बी प्रमाण म्हणजे काय?
Retention ratio: धारणा प्रमाणावर परिणाम करणारे घटक-
- मालमत्ता (Asset) निर्माण करून, स्वतःचे व्यापार चिन्ह (Brand) निर्माण करून, वितरक साखळी (Marketing supply chain), जाहिरात (Advertisement) यांचा वापर करून व्यवसाय वृद्धी करणाऱ्या नवीन कंपन्यांना अधिक पैशाची गरज असल्याने त्याचे धारणा प्रमाण हे साधारणतः अधिक असते.
- ज्या कंपन्या आपल्या मुख्य उद्योगास पूरक, असा कच्चा माल व उत्पादित वस्तूवर आधारीत उद्योग अशा अनेक व्यवसायात गुंतवणूक करतात त्यांना अधिक भांडवलाची गरज असते त्यांचे धारणा प्रमाण अधिक असते.
- कंपनीच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार, फायदा कमी अधिक होण्याची शक्यता आणि लाभांश देण्याचे व्यवस्थापनाचे धोरण यांचाही धारणा प्रमाणावर परिणाम होतो. लाभांश देणे किंवा वाढवणे या ऐवजी अनेकजण जोखीम (Risk) कमी करणे यावर जास्त भर देतात.
- पायाभूत (Infrastructure) उद्योगात सुरुवातीस मोठी गुंतवणूक करावी लागते त्यातून मिळणारा फायदा वाढण्यास दीर्घकाळ लागू शकतो.
- काही उद्योगात सातत्याने बदल होत असतात असे व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान (Technology) वापरावे लागते, संशोधन (Research) करण्याची आवश्यकता असते यासाठी अधिक पैशांची आवश्यकता असल्याने अशा कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली तरी त्यांचा कल हा लाभांश स्थिर ठेवण्याकडे असतो.
इतर लेख: किंमत-उत्पन्न प्रमाण (P/E Ratio) म्हणजे काय?
Retention ratio: धारणा प्रमाणावरून कंपनीची आर्थिक स्थिती समजू शकेल का?
- व्यक्ती ज्याप्रमाणे आपल्या बचतीचा वापर अडचणी दूर करण्यासाठी करेल त्याचप्रमाणे धारणा निधीचा वापर कंपनीच्या भल्यासाठी केला जात असतो.
- त्याप्रमाणे एखादया वर्षी तोटा किंवा कमी फायदा झाल्यास लाभांश देण्यासाठी करता येऊ शकतो त्यामुळेच यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यावरून कंपनीबाबत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. सर्वसाधारण नवे उद्योग, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान उद्योग यात धारणा प्रमाण अधिक असू शकते, तर अशाच प्रकारच्या प्रस्थापित उद्यागात ते कमी असून त्यांचा कल भागधारकांना अधिक लाभांश, बक्षीसभाग (Bonus shares) देण्याकडे असतो.
- याशिवाय उच्च धारणा प्रमाण असले तरी या निधीचा वापर व्यवस्थापन व्यवसाय वृद्धीसाठी किती प्रभावीपणे करणार? सातत्याने करू शकणार का? आणि आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणार का? अशा अनेक गोष्टींवर ते अवलंबून आहे त्यामुळेच व्यवसायाचे स्वरूप, उद्योगाचे कालचक्र, सरकारी धोरण, व्यावसायिक व्यवस्थापन, कंपनीचा ताळेबंद, अन्य समान उद्योगातील नफ्याचे तुलनात्मक प्रमाण, या सर्वांचा एकत्रित विचार यासंदर्भात करावा लागेल.
-उदय पिंगळे
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies