बी.ए. नंतरचे करिअर पर्याय
ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती आपण या लेखमालेतून घेणार आहोत. या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण ‘बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय’ कोणते आहेत, याबद्दल माहिती घेतली. आजच्या दुसऱ्या लेखात बी.ए. नंतरच्या सर्वोत्तम करिअर पर्यायांची विस्तृतपणे माहिती घेऊया. बी.ए. ची पदवी घेतल्यानंतर पुढे काय करावे हा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु त्यातही उच्च शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
हे नक्की वाचा: बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय
बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय
१. एम. ए. (तुमच्या आवडीच्या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम):
- बी.ए. ची पदवी घेतल्यानंतर ज्या विषयात बी.ए. पूर्ण केले असेल तोच विषय पुढे पुदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवडता येतो. तसेच द्वितीय वर्ष बी.ए चा विषय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवडता येतो.
- त्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विषयात तुम्हाला एम.ए ची पदवी घेता येते. एम.ए चा अभ्यासक्रम किमान 2 वर्षांचा आहे.
बी.ए. नंतर एम.ए ला पुढील विषय निवडू शकता.
भाषा-
- कोणतीही भारतीय किंवा परदेशी भाषा
- भाषाशास्त्र (लिंग्विस्टिक)
- मास्टर्स पदवी आणि सोबत एम.फिल. पास झाल्यानंतर भाषातज्ज्ञ होऊन वैयक्तिक क्लासेस घेता येतील तसेच महाविद्यालयांतून भाषा प्राध्यापक म्हणून शिकविता येते.
इतिहास
- या विषयात संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध असून, पुरातत्त्व खात्यात देखील नोकरीच्या उत्तम संधी असतात.
मानसशास्त्र
- या विषयात प्राध्यापकी करणे सोबत वैयक्तिक आणि संस्थांत्मक स्तरावर कॉन्सिलिंगच्या संधी उपलब्ध आहेत.
भूगोल
- या विषयामध्ये बऱ्याच संधी उपलब्ध असतात. तसेच सरकारी नोकरीबरोबरच नामांकित खाजगी कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
- यामध्ये प्रामुख्याने शहरी व प्रादेशिक नियोजन, नगररचना, माध्यमिक शिक्षक, कृषी व वन विभाग, जलविज्ञान, पर्यावरणशास्त्रज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ, हवामानशास्त्रज्ञ, इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये नोकरी मिळू शकते.
अर्थशास्त्र
- अर्थशास्त्र या विषयामधून एमए ची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी तसेच व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध असतात.
- यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ, आर्थिक जोखीम विश्लेषक, डेटा विश्लेषक (बँकिंग क्षेत्र), वित्तीय नियोजक (बँकिंग क्षेत्र), वित्तीय नियंत्रक / वित्तीय अर्थशास्त्रज्ञ, इक्विटी विश्लेषक, खर्च लेखापाल, आर्थिक संशोधक, इ अनेक संधी उपलब्ध आहेत.
इतर
- वरील विषयांबरोबरच बी.ए. ला तुम्ही खालील विषयही निवडू शकता व सर्व विषयांमध्ये उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध असतात.
- राज्यशास्त्र
- फाईन आर्ट
- पत्रकारिता
- समाजशास्त्र (सोशल वर्क)
- ट्रॅव्हल आणि टुरिझम
महत्वाचा लेख: भारतीय युवकांसाठी उपलब्ध असणारे करिअरचे १५ आधुनिक पर्याय
२. एम.फिल करुन शाळा अथवा महाविद्यालयात शिक्षक, प्राध्यापक:
- एम.ए झाल्यानंतर एम.फिल तसेच नेट-सेट परीक्षा पास झाल्यास शाळा तसेच महाविद्यालयातून तुम्हाला शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून पूर्णवेळ नोकरी करता येते.
- एम.ए साठी जो विषय निवडला असेल, त्याच विषयाशी निगडीत एखादी संकल्पना घेऊन त्यावर शोधनिबंध सादर करावा लागतो. त्यानंतर एम.फिल ही पदवी मिळते.
- एम.फिल चा कालावधी साधारणपणे 1 वर्षांचा असतो. लेखी परीक्षेसोबत प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाते. मात्र काही अभ्यासक्रमांमध्ये दोन वर्षांच्या एम.ए अंतर्गतच शोधनिबंध सादर करणे अनिवार्य असते. त्याला एम.ए विथ एम.फिल अशी संलग्न पदवी म्हणतात.
- नेट-सेट ची परीक्षा देताना देखील एम.ए ज्या विषयात पूर्ण केले असेल तोच विषय निवडणे अनिवार्य आहे.
- या दोन्ही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अंतर्गत पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नोकरी करता येते.
३. पी.एच.डी – डॉक्टरेट पदवी:
- पूर्वी एम.फिल ही पदवी प्राप्त केल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना डॉक्टरेटच्या अभ्यासक्रमासाठी रजिस्टर करणे शक्य होते. मात्र काही वर्षांपूर्वी हा नियम बदलला आहे.
- आता एम.ए विषयात किमान 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण होऊन डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी सर्व मान्यताप्राप्त विद्यापीठे एन्ट्रन्स परीक्षा घेतात.
- ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत होते आणि नंतर संबंधित उमेदवाराची डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी निवड होते. तसेच त्याला गाईड संबंधित विद्यापीठाकडून दिला जातो.
- याचा किमान कालावधी साडे तीन वर्षांचा तर जास्तीत जास्त 5 वर्षे असतो.
४. बी.एड आणि एम.एड:
- बी.ए नंतर शिक्षणशास्त्र विषयात पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यास तुम्ही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ भरपगारी शिक्षक म्हणून नोकरी करू शकता.
- या सर्व जागा राज्य नियंत्रण बोर्ड किंवा तत्सम शैक्षणिक महामंडळाकडून भरल्या जातात.
- हे सर्व राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. या परीक्षांचा किमान कालावधी सध्या 2 वर्षांचा आहे.
- याअंतर्गत वर्ग शिक्षणासोबतच प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव घेण्यासाठी विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जाऊन किमान तासिका शिकवाव्या लागतात.
इतर लेख: नोकरी करू की व्यवसाय?
५. कायदेतज्ज्ञ (एलएल.बी.):
- बी.ए. नंतर सर्वसाधारणपणे निवडला जाणारा हा प्रचलित करिअरचा उत्तम पर्याय आहे. अर्थात त्यासाठी राज्यशास्त्र किंवा समाजशास्त्र हा विषय विद्यार्थी बी.ए. ला घेतात. मात्र अशी काही अट नसून कोणत्याही विषयात बी.ए. पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही कायद्याचा अभ्यास करू शकता.
- बारावी नंतर ५ वर्ष आणि ग्रॅज्युएशन नंतर ३ वर्षांचा अभ्यासक्रम असतो.
- कोणत्याही फॅकल्टी मधून ग्रॅज्युएट झाल्यावर एलएल.बी. करता येते. मात्र आता एन्ट्रन्स परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
- महाराष्ट्रात तुम्ही मराठी भाषेतूनही संपूर्ण कायद्याचा अभ्यास करू शकता. म्हणजे उत्तरपत्रिकेत तुम्ही मराठीतून उत्तरे लिहू शकता.
- याची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही वकिलीची सनद घेऊ शकता आणि कोर्टात प्रॅक्टिस करू शकता.
- न्यायव्यवस्थेमध्ये रस असणार्या लोकांसाठी हे एक अतिशय विशाल क्षेत्र आहे. एलएलबीमुळे आपण संस्था आणि कंपन्यांचे कायदेशीर सल्लागार होऊ शकता. तसेच न्यायिक सेवा परीक्षेची तयारी देखील करू शकता आणि न्यायाधीश बनू शकता.
- कोणत्या विभागांमध्ये वकील म्हणून प्रॅक्टीस करता येते ….
- फाैजदारी खटले
- कौटुंबिक व घटस्फोटाशी संबंधित खटले
- कंपनी आणि संस्था तसेच विविध आस्थापनांशी संबंधित खटले
- मानवाधिकार
- जमीन-जुमल्याचे व्यवहार
- भारतीय डिफेन्स खात्यातील अंतर्गत खटले
- कॉपीराईट, पेटंट आदींशी निगडित बाबी
- विविध संस्थांमध्ये कायदेविषयक सल्लागार
६. मानव संसाधन विकास व्यवस्थापन (ह्युमन रिसोर्स):
- बी.ए. पदवी प्राप्त करुन तुम्ही मानव संसाधन व्यवस्थापनात (एच.आर. मॅनेजमेंट) पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकता.
- विविध संस्था, कंपन्या, आस्थापने, बँका आदी सर्वच ठिकाणी मनुष्यबळ विकास अधिकाऱ्यांची गरज असते.
- बी.ए. ला अर्थशास्त्र किंवा सामाजिक शास्त्र हे विषय घेतलेले विद्यार्थी मानव संसाधन विकास विषयात उच्च शिक्षण घेऊ शकतात.
- या अभ्यासक्रमानंतर पुढील विविध करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.
- प्रशासकीय सेवा व्यवस्थापक
- राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS, IPS, IFS अधिकारी म्हणून काम करण्याची संधी
- स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या परीक्षांच्या माध्यमातून विविध सरकारी व निमसरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या संधी
- कामगार संबंध विशेषज्ञ
- मानव संसाधन विशेषज्ञ
- प्रशिक्षण आणि विकास व्यवस्थापक
- केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्यातील विविध पदांवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.
संबंधित लेख: शैक्षणिक कर्ज घेताय? या गोष्टींचाही विचार करा
आजच्या लेखाचा विषय ‘बी.ए. नंतरचे करिअर पर्याय’ असा असल्याने विषयाशी निगडित महत्वाचे पर्याय लेखात नमूद केले आहेत. या पर्यायांव्यतिरिक्त करिअरसाठी उत्तम पर्यायही उपलब्ध आहेत. या लेखामध्ये विशेष करुन बी.ए आणि एम.ए उत्तीर्ण झालेल्यांसाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत यावर प्रकाश टाकला आहे. कॉमर्स किंवा सायन्स, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट आदी विषयांमध्ये पदवी घेतल्यानंतर देखील कायदा, मानव संसाधन, ट्रॅव्हल-टुरिझम, पत्रकारिता, विविध भाषा यामध्ये एम.ए ही पदव्युत्तर पदवी मिळवता येते.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: career after B.A. Marathi Mahiti, career options After B.A. Marathi Mahiti, career after B.A. in Marathi, career options After B.A. in Marathi