बी.एस.सी. नंतरचे करिअर पर्याय
ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात या लेखमालेच्या अंतिम भागात आपण बी.एस.सी. नंतरचे उपलब्ध करिअर पर्याय कोणते आहेत, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण ‘बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय’ कोणते आहेत, याबद्दल माहिती घेतली. तर, दुसऱ्या लेखात ‘बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय‘ कोणते, याबद्दल सविस्तर माहिती घेतली होती.
हे नक्की वाचा: बी.कॉम. नंतरचे करिअर
आजचा काळ हा पूर्वीसारखा टिपीकल बी.एस.सी आणि एम.एस.सी च्या पदव्या घेऊन मिळेल ती छोटी-मोठी नोकरी करण्याचा राहिलेला नाही. बारावी नंतर बी.एस.सी करुन काय होणार म्हणून केवळ इंजिनिअरिंग किंवा मेडिकललाच जायला हवे, अशी देखील आज परिस्थिती नाही. मात्र आपण पाहतो की, बहुतांश विद्यार्थी हे बारावी नंतर इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचाच विचार करताना आजही दिसतात. त्यामुळेच ते बारावीला सायन्स निवडतात. मात्र अकरावीच्या अर्ध्या वर्षापासूनच ते इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या पूर्व परीक्षांची कसून तयारी सुरू करतात. बारावीची परीक्षा केवळ नाममात्रच उरते. पण मग पुढे जाऊन ज्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कोणत्याही शाखांमध्ये प्रवेश मिळत नाही तेच विद्यार्थी नाईलाजाने मग पदवी असावी यासाठी बी.एस.सी कडे वळतात.
परंतु गेल्या काही वर्षात जर आपण पाहिले तर हा ट्रेंड थोडा बदलताना दिसतोय. एखाद्या विशिष्ठ विषयात बी.एस.सी ची पदवी घ्यायची आणि त्यातच पुढे उच्च शिक्षण घेऊन नोकरी किंवा बिजनेस करावा असा दृष्टीकोन ठेऊन मुले-मुली सायन्स कडे वळताना दिसत आहेत. जर प्रामुख्याने पाहिले तर संगणकीय अभ्यासक्रमाच्या सर्व शाखा, बायोटेक्नॉलॉजी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण शास्त्र, भौतिकशास्त्र, सांख्यिकी इ. या विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करुन प्रत्यक्ष फिल्डवर्क आणि लॅब मध्ये संशोधनाच्या अनेक संधी आता उपलब्ध आहेत. ज्याद्वारे चांगला पगार देखील मिळवता येणे शक्य आहे.
हे नक्की वाचा: बी.ए. नंतरचे करिअर पर्याय
या लेखात विशेष करुन काही अशा संधींवर प्रकाशझोत टाकला आहे जेणेकरून नेहमीच्या संधीपेक्षा थोड्या वेगळ्या आणि नव्या काळानुरूप बदलणाऱ्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते आपणाला जाणून घेता येईल.
बी.एस.सी. नंतरचे ७ करिअर पर्याय
१. मास्टर्स / एम.एस.सी.:
- एम.एस.सी. साठी तुम्ही पुढील विषय निवडू शकता -भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोबायोलॉजी, पर्यावरण विज्ञान, प्राणीशास्त्र, अन्न व जैव तंत्रज्ञान,अप्लाइड मॅथेमॅटिक्स, वनस्पती शास्त्र, फलोत्पादन (हॉर्टिकल्चर), शेतीशास्त्र, नर्सिंग आणि संगणकीय सर्व शाखा.
- एम.एस.सी ही पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर नेट-सेट या परीक्षा उत्तीर्ण होवून शिक्षकी पेशात देखील पूर्णवेळ आणि चांगले करिअर होऊ शकते. तसेच महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
- नेट-सेटच्या परीक्षांसोबतच तुमचे वय 26 पेक्षा कमी असल्यास, ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळवू शकता. यातूनच पुढे डॉक्टरेट करण्याची संधी मिळू शकेल.
२. डेटा सायन्स –
- आज एकविसाव्या शतकात डेटा आणि डेटाबेस ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची बाब झाली आहे. याच्याशिवाय प्रत्येक फिल्ड आज अपूर्ण आहे. त्यामुळे करिअरमध्ये देखील याला आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
- सध्या करिअरच्या अनेक पर्यायांमध्ये अगदी शिखरावर असलेला पर्याय म्हणजे डेटा सायन्स.
- अगदी लहानात लहान संस्थेपासून ते मोठ्या आस्थापनांपर्यंत आणि मल्टिनॅशनल स्तरावरील सर्व कंपन्यांना कुशल आणि प्रमाणित डेटा विज्ञान तत्रज्ञांची गरज आहे.
- ही मागणी वेगाने वाढत असल्याने डेटा सायन्स सर्टिफिकेशन प्रोग्राम्स आणि कोर्सेसची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
- डेटा सायन्स प्रमाणपत्र अभ्यासक्रम ही तीन महिन्यांपासून ते अठरा महिने इतक्या कालावधीचा असू शकतो. यामुळे आपले गणित आणि सांख्यिकीय ज्ञान दृढ होते.
- यानंतर सुरुवातीला इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. त्याद्वारे विविध वास्तविक प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळते. मात्र यामध्ये सतत अपग्रेडेशन होत असल्याने तुम्हाला तुमचे ज्ञान देखील सतत अपडेट करावे लागते.
- अभ्यासक्रमाची उपलब्धता पुढीलप्रमाणे..
- बिजनेस अँनालिटिक्स सर्टिफिकेशन प्रोग्राम – 3 महिने
- पदव्युत्तर सर्टिफिकेशन इन डेटा सायन्स – 5 महिने
- पदव्युत्तर डिप्लोमा इन डेटा सायन्स – 12 महिने
- डेटा सायन्स इन मास्टर – 18 महिने
महत्वाचा लेख: भारतीय युवकांसाठी उपलब्ध असणारे करिअरचे १५ आधुनिक पर्याय
३. मशिन लर्निंग –
- सध्या नव्याने उदयास येत असलेले 2 प्रमुख विषय म्हणजे डेटा सायन्स आणि मशिन लर्निंग.
- डेटा सायन्सप्रमाणेच मशिन लर्निंग हा देखील सध्या नोकरीच्या बाजारात ट्रेंड होत असलेला एक मोठा करिअरचा पर्याय आहे.
- सॉफ्टवेअर पासून आयटी ते आरोग्य सेवा आणि शिक्षणापर्यंत मशिन लर्निंग ॲप्लिकेशन्स आधुनिक उद्योगातील सर्व क्षेत्रावर राज्य करत आहेत. त्यामुळे प्रशिक्षित आणि पात्र तज्ञांची मागणी सर्वकाळ उच्च पातळीवर आहे.
- दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेटा सायन्स आणि मशिन लर्निंग हे दोन्ही अभ्यासक्रम आता ऑनलाईन पद्धतीने शिकण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोना काळातही या कोर्सेसना मागणी वाढताना दिसत आहे.
- यात विद्यार्थी पुढील अभ्यासक्रमांची निवड करू शकतात..
- शॉर्ट-टर्म मशीन लर्निंग सर्टिफिकेशन – 6 महिने
- पी.जी. सर्टिफिकेशन इन मशीन लर्निंग – 6 महिने
- यामध्ये तुम्ही सांख्यिकी, आकडेवारी, न्यूरल नेटवर्क, क्लस्टरिंग अल्गोरिदम, रिग्रेशन, ऑब्जेक्ट डिटेक्शन, कॉम्प्युटर व्हिजन, जेश्चर रिकग्निशन, हिडन मार्कोव्ह मॉडेल, योग्य डेटा एलिमेंटच्या माध्यमातून आवश्यक माहिती वेगळी करणे.. आदी विषयांचा अभ्यास करू शकता.
४. पर्यावरण शास्त्र –
- यातील पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला विविध सरकारी योजना जसे की, स्वच्छ भारत अभियान, यूएनडीपी प्रकल्प आणि इतर शाश्वत युवा विकास कार्यक्रमांमध्ये नोकरी करता येते.
- आता यामध्ये पर्यावरणीय लेखापरिक्षक आणि विविध संस्था, आस्थापने, शाळा आणि मोठ्या कंपन्यांना ओल्या व सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन शिकवणे आणि ते आंमलात आणणे ही मोठी जबाबदारी आहे. अशा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
५. अन्न तंत्रज्ञान उद्योग – (फूड टेक्नॉलॉजी)
- हा आणखी एक आकर्षक करिअरचा पर्याय आहे. चहा-कॉफीचे मळे, वाईनरीज तसेच सरकारचे अन्न व औषध प्रशासन आदी ठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
- यातून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील करिअरचा मार्ग खुला होतो. यातील पदव्युत्तर पदवी जर पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाल्यास आणि एखादी परदेशी भाषा शिकल्यास परदेशात उत्तम नोकरीच्या संधी आहेत. विशेषतः युरोपियन देशांमध्ये अशा संधी असतात.
- सोबत मायक्रोबायोलॉजीची पदवी असल्यास विविध खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंट या विभागात नोकरीची संधी मिळते.
६. वनीकरण (फॉरेस्ट्री)
- वनीकरण आणि त्यासंबंधित क्षेत्रातील उच्च शिक्षणाद्वारे, देशातील अनेक राज्य वन विभागात वन रेंजर (श्रेणी अधिकारी) म्हणून काम करता येते.
- वनीकरणात नोकरी मिळवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे भारतीय वन सेवा परिक्षा उत्तीर्ण होणे. मात्र त्यासाठी वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्राची पदवी असल्यास उत्तम. मात्र तशी अट नाही.
७. सामाजिक आरोग्य (पब्लिक हेल्थ)
- सार्वजनिक आरोग्य, विकास आणि प्रशासन, विशेष करुन रुग्णालयातील प्रशासकीय कारभार यासाठी सामाजिक स्वास्थ्य कार्यक्रम सरकारतर्फे राबवला जातो.
- सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल यांना अशाप्रकारे विभाग तयार करुन कार्यक्रम राबवणे अनिवार्य आहे. त्यासाठी टाटा सामाजिक शास्त्र संस्थेचा (TISS) अभ्यासक्रम खुपच उपयुक्त आहे.
- याशिवाय वैद्यकिय क्षेत्रातही विविध आणि समांतर विभागांमध्ये सायन्स विषयांतून पदवी घेऊन तुम्ही चांगले करिअर करू शकता. उदाहरणार्थ.. पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, एक्स-रे तज्ञ, लॅब सहाय्यक आणि संशोधक म्हणून काम करू शकता. यासंबंधीचे अभ्यासक्रम विविध विद्यापिठांमध्ये उपलब्ध आहेत.
या लेखामध्ये विशेष करुन बी.एस.सी आणि एम.एस.सी पदवी नंतरचे महत्वाचे करिअर पर्याय कोणते आहेत याबद्दल माहिती घेतली. मात्र सायन्स विषयातील पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करुन तुम्ही कायदा, मानव संसाधन, ट्रॅव्हल-टुरिझम, पत्रकारिता, विविध भाषा, इत्यादी विषयांमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Career after BSC in Marathi, Career after BSC Marathi Mahiti, Career after BSC Marathi