आपल्याला मिळणाऱ्या विविध उत्पनांच्या संदर्भात आपण सक्रिय उत्पन्न (अॅक्टिव्ह इन्कम) आणि निष्क्रिय उत्पन्न (पॅसिव्ह इन्कम) असे शब्द ऐकले असतील; मिळणाऱ्या उत्पन्नाचे सक्रिय उत्पन्न आणि निष्क्रिय उत्पन्न या दोन प्रमुख प्रकारात केलेलं हे वर्गीकरण आहे. या दोन संकल्पना नेमक्या काय आहेत ते आज थोडक्यात समजून घेऊया.
1.सक्रिय उत्पन्न: कार्यात थेट सहभागी होऊन किंवा विशेष वैयक्तिक प्रयत्नांद्वारे हे उत्पन्न आपल्याला मिळतं, जसं की नोकरी करणं किंवा व्यवसाय चालवणं. यासाठी सातत्यानं, अधिक वेळ देऊन उत्पन्न मिळवण्यासाठी तसेच ते वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. उदाहरणार्थ-
- नोकरीतून पगार मिळतो, तो मिळवण्यासाठी वेळेत जावं लागतं आणि नेमून दिलेलं काम विशिष्ट वेळात पूर्ण करावं लागतं.
- फ्रीलान्सिंग किंवा सल्लागार म्हणून काम करण्याण्यासाठी आधी कौशल्य प्राप्त करून घ्यावं लागतं. गरजूंना योग्य सल्ला योग्य वेळेत आणि दरात द्यावा लागतो.
- सक्रियपणे व्यवस्थापित व्यवसायातून नफा मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, अनेक व्ययधाने सांभाळावी लागतात. व्यवसायाच्या रोखीच्या प्रवाहावर काटेकोर नियंत्रण ठेवावं लागतं.
वाचावे असे: मालमत्ता नामांकन आणि घोळ
सक्रिय उत्पनाचे फायदे :
- स्थिर आणि निश्चित उत्पन्न: यामधे निश्चित आणि स्थिर उत्पन्न नियमित मिळत राहतं. नोकरी असेल तर दर महिन्याच्या निश्चित तारखेला पगार मिळणार याची खात्री असते. तसंच जम बसलेला व्यवसाय असल्यास वैयक्तिक मोबदला म्हणून त्यातील काही भाग नियमित काढून घेऊन
सुरुवात करणं तुलनेनं सोपं असतं. किमान शैक्षणिक पात्रता, इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल तर नोकरी मिळवता येते, अनेक व्यवसाय करता येतात एकूणच एकदा नोकरीत अथवा व्यवसाय स्थिरस्थावर झालं की निश्चित यश मिळतं.
सक्रिय उत्पन्नाचे तोटे:
मर्यादित वाढ: यामधून मिळणारं उत्पन्न आणि त्याचं प्रमाण आपण देऊ शकत असलेला
वेळ आणि प्रयत्न यावर अवलंबून असल्यामुळे यामधली उत्पन्नाची वाढ ही मर्यादित राहते.
- निष्क्रीय उत्पन्न:
- हे उत्पन्न मिळवण्यासाठी कमी किंवा अजिबात प्रयत्न करण्याची जरुरी नसते. एकदा गुंतवणूक केली की त्याचा मोबदला म्हणून उत्पन्न आपोआप चालू होतं, जसं की घर/दुकान/ऑफिस-भाडं, लाभांश किंवा रॉयल्टी.
- यासाठी सुरुवातीला गुंतवणूक करावी लागते किंवा थोडीफार मेहनत करावी लागते, पण एकदा का ती गुंतवणूक मार्गी लागली की त्यातून त्याच्या प्रकारानुसार नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी फारसे कष्ट घ्यायची गरज नसते. उदाहरणार्थ-
- मालमत्तेच्या भाड्याचं मिळणारं उत्पन्न.
- स्टॉक गुंतवणुकीवरील लाभांश.
- पुस्तके, संगीत किंवा पेटंट्स यावर मिळणारं स्वामीत्वधन (रॉयल्टी).
- ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनेलवरून मिळणारं उत्पन्न.
- बचतखाते, मुदत ठेवी किंवा बाँड्सवर मिळणारं व्याज
निष्क्रिय उत्पनाचे फायदे:
- आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यास मदत.
- स्केलेबिलिटी आणि कंपाउंडिंगची संधी
निष्क्रीय उत्पन्नाचे तोटे:
- सुरुवातीला जास्त मेहनत किंवा गुंतवणूक करावी लागते.
- अधिक जोखीम (उदा. निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता आहे, पण भाडेकरू नाही, भांडवल बाजारातील तीव्र चढ-उतार)
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईवर मात करण्यासाठी सक्रिय आणि निष्क्रिय या दोन्ही प्रकारच्या उत्पन्नांची आपल्याला गरज आहे.
सक्रिय उत्पन्न: हे आपल्या नियमित आर्थिक गरजांसाठी आणि निष्क्रीय उत्पन्नासाठीच्या आवश्यक भांडवल उभारण्यासाठी महत्त्वाचं आहे. तर,
निष्क्रीय उत्पन्न: आर्थिक स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि दीर्घकालीन संपत्ती मिळवण्यासाठी मदत करतं, ज्यामुळे आपण सक्रिय उत्पन्नावर कमी अवलंबून राहतो.
माहितीपर: नवे वर्ष आणि महत्वाच्या तारखा
गुंतवणूकदारांनी दोन्ही उत्पन्नांचं संतुलन कसं करावं ?
- सक्रिय उत्पन्नासोबत सुरुवात करा:
सुरुवातीस कौशल्य वाढवा, ते इतके वाढवा की त्या जोरावर आपण नोकरी करून अथवा उत्तम व्यवसाय करून स्थिर उत्पन्नाचा स्रोत तयार करू शकू. यातील काही उत्पन्नाची
बचत करा म्हणजे त्यातून गुंतवणुक करण्यासाठी निधी तयार होण्यासाठी मदत होईल.
- निष्क्रीय उत्पन्न देणाऱ्या साधनांत गुंतवणूक करा:
सक्रिय उत्पन्नाचा काही भाग विविध मालमत्ता प्रकारात गुंतवा, जसं की समभाग, स्थावर मालमत्ता किंवा निष्क्रीय उत्पन्न देणारे इतर व्यवसाय इ. - विविधता आणा:
गुंतवणूक करताना त्यातील जोखीम कमी करण्यासाठी त्यात विविधता आणा आणि अनेक निष्क्रीय उत्पन्न स्रोतांमधे गुंतवणूक करा. ज्यातून सातत्यानं काहींना काही उत्पन्न मिळत राहील, आणि ते हाती येण्याऐवजी परत तिथेच गुंतवले गेल्यास त्याचा चक्रवाढ गतीने लाभ मिळेल का ते पहा. - उत्पन्न पुन्हा गुंतवा:
काही मालमत्तांमधून निष्क्रीय उत्पन्न मिळायला थोडीथोडी सुरवात झाली की ते खर्च करण्याऐवजी त्याची पुनर्गुंतवणूक करून आपल्या संपत्तीत वाढ करा. - लक्ष्य ठरवा:
जसजसं उत्पन्न वाढलं, की गरजा वाढतात आणि त्यामुळे थोडा सढळ हाताने पैसा वापरला जातो, परिणामी खर्च वाढल्याने मिळालेलं अधिकचं उत्पन्न बहुदा बाजूला रहात नाही. त्यामुळे “अधिक उत्पन्न, अधिक गरजा, अधिक खर्च” या चक्रात आपण अडकतो.
हे चक्र जाणीवपूर्वक तोडण्यासाठी आपल्या एकूणच सर्व गरजांची आवश्यक आणि अनावश्यक अशी विभागणी करणे जरुरीचे आहे. या काळात आपले मित्र नातेवाईक आपल्याला अधिक खर्च करण्यास प्रोत्साहन देतील, असा खर्च न केल्यास कंजूष समजतील. तेव्हा मोठेपणा मिळवायच्या नादात आपल्या उत्पन्नाहून खर्च वाढायची शक्यता असते. त्यामुळेच कदाचित जास्त व्याजदर असलेले कर्ज घेण्याची सवय लागू शकते.
सध्या बाजारात कर्ज सहज उपलब्ध असून ते कुणालाही कधीही सहज उपलब्ध होऊ शकतं. कर्ज रकमेच्या तुलनेत त्यासाठी सांगितलेला हप्ता नगण्य वाटू शकतो, तो एक सापळा आहे असं समजा.
सुरुवातीच्या काळात केवळ आवश्यक गरजांना प्राधान्य देऊन अधिकाधिक गुंतवणूक करा. या गुंतवणुकीचं नियोजन करून अश्या योजना तयार करा की भविष्यात केवळ निष्क्रीय उत्पन्नातूनच तुमच्या अत्यावश्यक गरजा भागतील आणि सक्रिय उत्पन्नाचा काही भाग उत्पन्न वाढीसाठी गुंतवणूक करण्यात तर काही भाग बदलत्या जीवनशैलीसाठी इच्छा आकांक्षासाठी वापरला जाईल. अशाप्रकारे सक्रिय आणि निष्क्रीय उत्पन्नाचं योग्य संतुलन साधता आल्यास जीवनात आर्थिक स्थिरता येईल, आकस्मित काही खर्च उद्भवल्यास आधीच केलेल्या गुंतवणुकीतून गरज भागत असल्याने त्यासाठी फारशी ओढाताण करावी लागणार नाही. त्यामुळे तुम्ही वर्तमानकाळ आनंदात घालवू शकता आणि आपला भविष्यकाळ अधिक सुरक्षित करू शकता.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)