digitization
Reading Time: 4 minutes

डिजिटलायझेशन (Digitization)-  

भारतातील डिजिटलायझेशनचा (Digitization) गेल्या दशकातील प्रवास उत्साहवर्धक राहिला आहे. त्याची सुरवात झाली तेव्हा त्याच्या सर्व टप्प्यांवर त्याविषयी शंका घेतल्या गेल्या, पण आता त्या शंकाकुशंका ओलांडून आपण बरेच पुढे निघून आलो आहोत, असे आकडेवारी सांगते. या संक्रमणातून भारताने आणि पर्यायाने भारतीय नागरिक या नात्याने आपण मिळविलेला आत्मविश्वास पुढील प्रवासासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. 

नव्या काळानुसार होणारे बदल सुरवातीला अनेकांच्या टीकेचे धनी होत असले तरी ते जर व्यवहार्य आणि नागरिकांच्या हिताचे असतील, तर ते कसे पुढे जातात, याची प्रचीती भारतातील डिजिटल व्यवहारांनी दिली आहे.  भारताची लोकसंख्या सध्या १३७ कोटींच्या घरात आहे तर आकारमानानेही मोठ्या असलेल्या आपल्या देशात सहा लाखांवर गावे आहेत. शिवाय, सरकारी कारभारात इंग्रजीचा बोलबाला असल्याने आणि अनेक गावे दुर्गम असल्याने या लोकसंख्येपैकी अनेकांपर्यंत सरकार पोचण्यास मर्यादा आहेत. अशा या स्थितीत भारताने गेले एक दशक डिजिटल व्यवहारांसाठीच्या ज्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या, त्या आता उपयोगी पडू लागल्या आहेत. एवढा मोठा बदल भारतासारखे वैविध्य असलेल्या देशात कसा होणार, असा प्रश्न सुरवातीला विचारला जात होता, पण आता डिजिटल व्यवहार सर्वानीच मान्य केले असून त्यांचा वापर वेगाने वाढला आहे. एवढेच नव्हे तर शेजारी देश आणि विकसनशील देशांना भारताच्या अनुभवाचा लाभ हवा आहे. 

हे नक्की वाचा: सर्व नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच का आहे?

Digitization: डिजिटलायझेशनचा प्रवास 

डिजिटलायझेशन नावाचा हा बदल कोणत्या दिशेने आणि किती वेगाने चालला आहे, या संबंधीची नवी आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली असून ती अतिशय उत्साहवर्धक आहे. त्यातील काही ठळक आकडेवारी अशी- 

 1. डिजिटल व्यवहारांचा पाया ठरला, अशा आधार कार्ड धारकांची नोंद १२६ कोटी झाली आहे. म्हणजे फक्त ११ कोटी नागरिक अशी नोंद करण्याचे राहिले आहेत. 
 2. जनधन बँक खाते, आधार कार्ड  आणि मोबाईल यांच्या जोडण्याला जॅम असे नाव देण्यात आले असून या मार्फत ३१७ सरकारी योजनांचा लाभ थेट पोचविणे शक्य झाले आहे. 
 3. अगदी चालू आर्थिक वर्षाचा विचार करावयाचा तर जॅमचा वापर करून २६० कोटी व्यवहार झाले असून त्यातून तीन लाख २२ हजार कोटी रुपयांचे वितरण झाले आहे.
 4. एका दशकापूर्वी ५० टक्के नागरिकांपर्यंतच बँकिंग पोचले होते, ते आता ८० टक्के नागरिकांपर्यंत पोचले आहे. 
 5. युनायटेड पेमेंट इंटरफेस (युपीआय), भारत क्यूआर, भारत बिल पे सिस्टीम (बीबीपीएस) आणि रूपे कार्ड या मार्गाने हे डिजिटलायझेशन शक्य झाले आहे. 
 6. संपूर्ण भारतीय असलेली कार्ड म्हणजे रूपे कार्ड. अशी साठ कोटी रुपे कार्ड आतापर्यंत दिली गेली असून, कार्डद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांचा ३० टक्के वाटा रूपे कार्डने मिळविला आहे. रूपे कार्ड भारताबाहेरही चालावेत, यासाठीचे प्रयत्न सुरु असून आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, बहारीन, भूतान, मालदीव, म्यानमार, सौदी अरेबिया, सिंगापूर आणि दक्षिण कोरियामध्ये त्याचा वापर करता येवू लागला आहे.
 7. आधार कार्डचा वापर करून डीजीलॉक सारख्या पच्या माध्यमातून महत्वाची लायसन्स, प्रमाणपत्रे, एलआयसी पॉलिसीसारखी कागदपत्रे डिजिटली ठेवण्याची सोय झाली आहे. 
 8. कोरोनासारख्या साथीच्या काळात डिजिटलायझेशनचा अतिशय चांगला उपयोग भारताला झाला आहे. या आजाराच्या रुग्णांचे विलीगिकरण करणे, त्यांच्यावरील उपचारांवर लक्ष ठेवणे आणि भारतात सुरु असलेल्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाचे व्यवस्थापन त्यामुळेच शक्य होते आहे. 
 9. ज्या मोबाईल फोनच्या माध्यमातून हे सर्व केले जाऊ लागले आहे, ते वापरणाऱ्यांची संख्याही आता १२६ कोटींच्या घरात गेली आहे. 
 10. काही वर्षापूर्वी अशक्य वाटणारे फास्टटॅगसारखे बदल आता होताना दिसत आहेत. त्याचाच पुढील भाग म्हणजे स्मार्ट कार्डसारखे बदल आता दृष्टीपथात आले आहेत. प्रवासासाठी एकच कार्ड सर्वत्र वापरले जाईल, असे दिवस फार दूर राहिलेले नाहीत. 

विशेष लेख: रोख व्यवहार निर्बंध आणि आयकर कायदा

Digitization: सर्व समूहांना लाभ 

 • डिजिटलायझेशन सुरु झाले तेव्हा, त्याचा लाभ काही मोजके समूह घेतील असे म्हटले जात होते. 
 • अगदी सुरवातीच्या काळात ते तसेच झाले असले तरी आता दहा वर्षानी हे तंत्रज्ञान सर्वत्र पोचू लागले असून त्याचा लाभ गरीबांना होऊ लागला आहे, असे लक्षात येते. 
 • आधारचा वापर करून कोरोना साथीमध्ये देण्यात आलेली आर्थिक मदत असेल किंवा शेतकऱ्यांना दिली जात असलेली मदत ही त्याची उदाहरणे आहेत. 
 • एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे व्यवस्थापन होऊ शकत नाही, ही मोठीच अडचण होती. कारण माणसांकरवी केल्या जाणाऱ्या व्यवहारांमध्ये गैरव्यवहार, अडवणूक आणि कालापव्यय हा त्रासाचा विषय आहे. 
 • हा जो अडचणीचा मानवी हस्तक्षेप आहे, तो डिजिटलायझेशनमुळे टाळला गेला आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जागतिक कटाचा भाग आहे, असे मानणारे नागरिक आपल्यात आहेत, पण त्यांच्याकडे आता लक्ष देण्याची गरज नाही. 
 • पूर्वीची मुजोर आणि भ्रष्ट व्यवस्था चांगली होती, हे त्यांनी सिद्ध करून दाखवावे किंवा आपल्या घरातील पुढील पिढीला पूर्वीसारख्या कंटाळवाण्या रांगांत उभे राहण्यास सांगावे, म्हणजे त्यांना आपल्याच घरात त्याचे उत्तर मिळेल. 

धोरण सलगता आणि आत्मविश्वास 

 • डिजिटलायझेशनच्या या प्रवासात आणखी दोन गोष्टी आपण देश म्हणून साध्य केल्या आहेत. त्यातील पहिली, म्हणजे राजकीय सत्तापरिवर्तन झाले तरी धोरण सलगता राहून तिचा लाभ आपण घेऊ शकतो, असे लक्षात आले. 
 • उदा. आधार कार्डची सुरवात मनमोहनसिंग यांच्या कारकीर्दीत २००९ मध्ये झाली. इन्फोसिसचे नंदन निलकेणी यांनी त्या प्रकल्पाचे नेतृत्व केले. आणि २०१४ ला जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले, तेव्हा त्यांनी त्यालाच गती दिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारत हा केवळ परकीय तंत्रज्ञान किंवा कल्पना स्वीकारणारा देश आहे, अशी जी प्रतिमा होती, ती पुसून काढण्यास आपल्याला यश आहे. 
 • उदा. आधार कार्डचे तंत्रज्ञान असेल किंवा रूपे कार्डचे, पण इतर देश आता त्या तंत्रज्ञानाची आणि संकल्पनेची मागणी करू लागले आहे. एवढेच नव्हे तर जगाला तंत्रज्ञान पुरविणाऱ्या बिल गेट्ससारख्या व्यक्तीने भारतातल्या डिजिटलायझेशनचे कौतुक केले. देशाचा आत्मविश्वास यातून निश्चितच वाढला आहे. 

महत्वाचा लेख: Economy: अर्थव्यवस्था – रोखीची की डिजिटल?

रूळच नसतील तर गाडी चालविणार कशी? 

 • जगात सध्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचाही बोलबाला आहे. डिजिटलायझेशन आणि ब्लॉकचेन हे या शतकातील मोठे बदल भारतासारख्या मोठ्या आकाराच्या आणि प्रचंड लोकसंख्येच्या देशाला वरदान ठरणार आहेत. 
 • वाढत्या लोकसंख्येचे व्यवस्थापन करावयाचे म्हणजे नैसर्गिक साधने आणि संपत्तीच्या वितरणाचे त्यातल्या त्यात न्याय्य मार्ग शोधून त्याचा व्यवहारात अवलंब करावयाचा. केवळ राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाच्या चांगुलपणावर ते होणे नाही. कारण या दोन्ही संपत्तीची ओढाताण भविष्यात अपरिहार्य आहे. 
 • त्या स्थितीत निरपेक्ष व्यवस्था बसविणे, याला विशेष महत्व आहे. वेगळ्या शब्दांत सांगावयाचे तर तंत्रज्ञान हे रेल्वेच्या दोन रूळासारखे आहे. 
 • रुळावर जी गाडी चालते, त्या गाडीत ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार सुखसोयी मिळू शकतात. त्यातील विषमता कमी केली पाहिजे, याविषयी दुमत नाही. पण ती गाडी ज्या रुळावर चालू शकते, तेच जर टाकलेले नसतील तर कोणत्याच वर्गातील माणसाला प्रवास करता येणार नाही. थोडक्यात, असे अत्यावश्यक असलेले रेल्वेचे रूळ म्हणजे डिजिटलायझेशन आणि ब्लॉकचेन होय. 

Digitization: डिजिटलायझेशनचा लाभ मी कसा घेणार?

 • डिजिटल व्यवहारांमुळे अनेक कामे सोपी आणि वेळेची बचत करणारी झाली आहेत, त्यामुळे तसे व्यवहार करण्याची भीती मनातून काढून टाकून ती शिकून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 • गावाला जाताना घराचे कुलूप लागले की नाही, हे आपण दोनदा तपासतो. डिजिटल व्यवहार करताना पासवर्ड सांभाळणे आणि लक्षात ठेवणे, हे अगदी तसेच आहे. ते आपल्याला सवयीचे करून घ्यावे लागेल, एवढेच.
 • गुंतवणुकीचे आणि सामाजिक सुरक्षिततेचे सर्व मार्ग डिजिटलायझेशनच्या दिशेने जात असल्याने त्यात आपल्याला जगासोबत राहायचे असेल तर त्याचा स्वीकार करण्याशिवाय पर्याय नाही.
 • आपल्या डिजिटल माहितीची चोरी होते आणि त्यात आपल्याला मोठा फटका बसू शकतो, अशी अतिरंजित माहिती अनेकदा प्रसिद्ध होत असते. त्या प्रत्येक माहितीचा संबंध स्वत:शी लावू नये. यात होत असलेल्या गैरप्रकारांना आटोक्यात आणण्यासाठी संबंधित संस्था प्रयत्नशील आहेत.
 • डिजिटल व्यवहारांचा आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत अधिक खबरदारी घ्यावी. ऐकीव माहितीवर अजिबात विश्वास ठेवू नये.

– यमाजी मालकर 

[email protected] 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Digitization Marathi, Digitization in Marathi, Digitization Marathi Mahiti, Digitization after demonetization in Marathi, Digitization after demonetization  Marathi, Digitization and demonetization Marathi Mahiti. Digitization and demonetization in Marathi, Digitization and demonetization detail info in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

नोटाबंदीपासून ठप्प नागपूरातील लाकूड व्यापाराच्या संकटात भर

Reading Time: < 1 minute लाकडावर १८ टक्के वस्तू व सेवा कर लावण्यात आला असला तरी सरकारने…

सोने खरेदीविक्रीवर पॅनकार्ड अनिवार्य

Reading Time: < 1 minute सद्य परिस्थितीत दोन लाख रुपयांच्यावरील सोने खरेदीसाठी पॅनकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.…

जागतिक बचत दिन – जगा सन्मानाने…

Reading Time: 2 minutes आज ३० ऑकटोबर! भारतमध्ये आजचा दिवस ‘जागतिक बचत दिन’ (world saving day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ३१ ऑक्टोबर १९२४ रोजी मिलानो, इटली येथील पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय कॉंग्रेस बचत बँक (बचत बँकांच्या जागतिक सोसायटी)’ दरम्यान स्थापित करण्यात आला. इटालियन प्राध्यापक ‘फिलिपो रॅव्हिझाने’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बचत दिन’ म्हणून जाहीर केला. जगभर, ‘जागतिक बचत दिन’ दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारतामध्येही पूर्वी हा दिवस ३१ ऑक्टोबरलाच साजरा होत असे. परंतु १९८४ साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ३१ ऑक्टोबरला निधन झाल्यामुळे त्यानंतर भारतामध्ये ‘जागतिक बचत दिन’ हा ३० ऑक्टोबरला साजरा केला जातो.

आजचा अर्थविचार

Reading Time: < 1 minute Share this article on :