आर्थिक नियोजन
Reading Time: 3 minutes

आर्थिक नियोजन – कौटुंबिक का वैयक्तिक?

आजची कथा आहे स्वतंत्रपणे उत्तम आर्थिक नियोजन करणाऱ्या सोहा आणि राजीव या जोडप्याची.

सोहा आणि राजीव यांचा प्रेमविवाह. कॉलेजमध्ये असणाऱ्या प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं आणि दोघांचा संसार सुरु झाला. राजीवच्या घरून या लग्नाला प्रचंड विरोध. पण त्याला न जुमानता दोघांनी लग्न केलं. दोघंही सॉफ्टवेअर इंजिनिअर. दोघांनाही लाखाच्या वर पगार. दोघांनाही आर्थिक नियोजनाचे उत्तम ज्ञान. स्वतःच्या कमाईच्या पैशाचे नियोजन दोघेही स्वतंत्रपणे करत असत. तरीही एकमेकांच्या स्वप्नपूर्तीसाठी दोघेही आनंदाने खर्च करत असत. व्यवस्थित आर्थिक नियोजन करून दोघांनी त्यांचे एक महत्वाचे स्वप्न पूर्ण केले. शहरातील मध्यवस्तीत तीन बेडरूमचा एक मोठा फ्लॅट घेतला. यथावकाश तिथे गृहप्रवेशही केला. त्यानंतर काहीच दिवसात राजीवला प्रमोशन मिळाले.  

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

सगळ्या गोष्टी अगदी मनाप्रमाणे होत होत्या. स्वतःचा मोठा फ्लॅट व सेडान क्लास गाडी सारं काही होतं. कमी होती ती फक्त एका चिमुकल्या पाहुण्याची. लग्नाला तीन वर्ष होऊन गेली होती. आता त्यांचं नातं राजीवच्या आई वडिलांनी पण स्वीकारलं होतं. एकमेकांच्या घरी जाणं येणं सुरु झालं होतं. अशातच सोहाने ती गोड बातमी दिली. त्यामुळे राजीवच्या आईच्या मनातला सोहाबद्दलचा राग काहीसा कमी झाला. सगळं मजेत चाललं होतं. काही दिवसांतच राजीव सोहाच्या घरी एका चिमुकल्या परीचं आगमन झालं. मुलगी झाली कळल्यावर राजीवच्या आई वडिलांनी पुन्हा नाक मुरडलं. पण राजीव मात्र खुश होता. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या संगोपनासाठी सोहाने स्वखुशीने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. दोन वर्ष व्यवस्थित गेली. पण हसत्या खेळत्या घराला दृष्ट लागावी तसं घडलं. राजीवला गाडीला जबरदस्त अपघात झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.  

स्वतंत्रपणे आर्थिक नियोजन करणाऱ्या सोहाला पतीच्या आर्थिक गुंतवणुकींची व व्यवहारांची फारशी कल्पना नव्हती. राजीवच्या विमा पॉलिसी लग्नापूर्वीच घेतलेल्या असल्यामुळे त्यावर नॉमिनी म्हणून त्याच्या आईचे नाव होते. तसेच त्याच्या काही गुंतवणुका लग्नापूर्वीच केलेल्या असल्यामुळे त्यावरही नॉमिनी म्हणून आईचेच नाव होते. 

कुटुंबाचा अर्थसंकल्प कसा तयार कराल?

सोहाबद्दल सुरुवातीपासूनच आकस मनात असणाऱ्या राजीवच्या आईने राजीवच्या विम्याच्या पैशांपैकी एकही पैसा सोहाला दिला नाही. अर्थात स्वाभिमानी सोहाने स्वतःहून तो मागितलादेखील नाही. राजीव सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याने त्याने त्याच्या गुंतवणुकींची सर्व माहिती त्याने एका फाईलमध्ये सेव्ह केली होती. पण ती फाईल “पासवर्ड प्रोटेक्टेड होती. त्याचे पासवर्ड सोहाला तर सोडाच पण हॅकरलाही हॅक करता येत नव्हता. 

राजीवचे बॅंक खाते, पीएफ, इत्यादीचा पैसा फारफार तर दोन वर्षांसाठी कर्जाचे हप्ते व दैनंदिन आयुष्य जगायला पुरला असता. पण पुढे काय? दोन वर्ष घरीच असल्यामुळे पुन्हा नोकरी करायची तर तिला काही हजार पगारापासून सुरुवात करावी लागणार होती. उच्चभ्रू जीवनशैलीची सवय झालेल्या सोहाला एवढ्या कमी पैशात जगणं खूप कठीण जाणार होतं. याशिवाय तिच्यावर तिच्या बाळाचीही जबाबदारी होती. राजीवच्या जाण्याने ती मनातून खूप खचली होती. त्यामुळे अजून काही वेगळा विचार करण्याची तिची मनस्थितीत नव्हती. अखेर राहतं घर विकून सोहाने शहराबाहेरच्या वस्तीत एक फ्लॅट विकत घेतला. आपलं घर विकताना सोहाच्या मनाला अनंत यातना झाल्या. पण परिस्थिती अशी होती की तिच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. 

परिस्थिती कधी सांगून येत नाही त्यामुळे त्याला काही इलाज नसतो. पण आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक असतं. 

अर्थसाक्षर कथा – संपत्ती आणि नातेसंबंध

कोणती काळजी घ्याल?

  • आजकाल पती व पत्नी दोघेही उच्चशिक्षित असतात. स्वतंत्र विचारसरणीचे असतात. बहुतांश वेळा दोघेही कमावते असतात. पण तरीही काही साध्या चुका त्यांच्याकडून होतात की संपूर्ण आर्थिक नियोजनाचा पायाच डळमळीत होतो. 
  • काही कुटुंबांमध्ये आजही पतीचा पगारही पत्नीला माहिती नसतो, तर त्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती कुठून असणार?
  • परिस्थिती कोणतीही असो आजही बहुतांश कुटुंबात पतीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती पत्नीला नसते ही वस्तुस्थिती आहे.
  • या कथेमध्ये सोहा पुन्हा नव्याने उभी राहू शकत होती. परंतु प्रत्येकीची परिस्थिती सोहासारखी नसते. 
  • लग्नानंतर विमा पॉलिसींचे व इतर गुंतवणुकींचे नॉमिनेशन बदलणे राजीवला आवश्यक वाटलं नाही की त्याच्याकडून राहून गेलं? या प्रश्नाचं उत्तर आजही सोहाजवळ नाही 
  • पती पत्नीची स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र उत्पन्न, स्वतंत्र आर्थिक नियोजन या साऱ्यामध्ये काहीच चूक नाही. चूक आहे ते परस्परांना याबद्दल कल्पना न देणे. 
  • पती पत्नी एकाच रथाची दोन चाके असतात. त्यामुळे आपले विचार, समस्या, आर्थिक गोष्टी एकमेकांना सांगणे अत्यंत आवश्यक आहे. 

राजीवने जर आपल्या गुंतवणुकींची कल्पना सोहाला दिली असती तर? 

त्याने किमान एका विमा पॉलिसीवर नॉमिनी म्हणून सोहाचे नाव असते तर?  

राजीवच्या आर्थिक नियोजनाच्या फाईलचा पासवर्ड सोहाला अथवा त्याच्या विश्वासातल्या किमान एका तरी व्यक्तीला माहिती असता तर? 

या साऱ्या जर तरच्या प्रश्नांना खरंतर काहीच अर्थ नाही. पण एक मात्र नक्की जर दोघांनी जसे एकमेकांचे  स्वातंत्र्य जपले, त्याचा मान ठेवला तसंच एकमेकांना आपआपल्या आर्थिक नियोजनाची कल्पनाही दिली असती तर, बरेच प्रश्न आज सुटले असते. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

बी.एस.सी. नंतरचे ७ करिअर पर्याय 

Reading Time: 4 minutes बी.एस.सी. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात या लेखमालेच्या…