Reading Time: 4 minutes

आपण देशाच्या अर्थसंकल्पाबद्दल खूप काही ऐकतो व बोलतोही. आपण आपल्या अर्थमंत्र्यांकडून खूप अपेक्षाही ठेवत असतो.  मात्र आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या अर्थसंकल्पाबाबत तेवढे सतर्क नसतो. आज आपण कुटुंबाच्या अर्थसंकल्पाबद्दल व ते किती महत्वाचे आहे त्याबाबत चर्चा करू.

कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजे काय?

 • कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजेच आपल्या सर्व खर्चांचे योग्य नियोजन. आपल्या नोकरीतील पगारातील उत्पन्न किंवा आपल्या व्यवसायातील उत्पन्न आपण किती प्रभावीपणे नियोजन करतो हे महत्वाचे. 
 • कौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार महत्वाच्या घटकांमध्ये विभागु शकतो. १) दैनंदिन गरजांसाठीचे खर्च २) अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठी खर्च ३) दैनंदिन खर्चांसाठी बचत ४) दीर्घकालीन स्वप्नांसाठी गुंतवणूक. या चार घटकांसाठी आपण योग्य नियोजन केले की आपण आपल्या अर्थसंकल्पात यशस्वी झालो असे समजायचे. 
 • आपली अल्पकालीन स्वप्ने किंवा दीर्घकालीन स्वप्ने अशी असावीत की ती आपल्या आर्थिक क्षमतेच्या आवाक्यात असतील व त्यासाठी आपल्या पूर्ण नियोजनावर कधीच ताण पडणार नाही. (नवीन गाडी, नवीन घर किंवा मोठे घर, मुलांचे शिक्षण, लग्न, तसेच निवृत्ती नियोजन वगैरे हे झाले अल्पकालीन किंवा दीर्घकालीन खर्च.) 
 • स्वप्नपूर्तीसाठी गुंतवणूक करताना आपण येणाऱ्या खर्चाचा बारकाईने अभ्यास करून नियोजन करावयास हवे. 
 • उदाहरणार्थ: आपल्याला ४ वर्षात नवीन गाडी घ्यायची झाल्यास फक्त गाडीच्या एक्स फॅक्टरी किमतीसाठी नियोजन करून चालणार नाही. आपल्याला गाडीचे डाउन पेमेन्ट, मासिक हप्ता, रेजिस्ट्रेशन, गाडीचा विमा, पेट्रोल, ड्रायव्हर ठेवायचा असल्यास त्याचा खर्च आणि नियमित गाडीची सर्व्हिसिंग या सर्व खर्चाचा आपल्या आर्थिक नियोजनात अंतर्भाव करावा लागेल. 
 • अशा पद्धतीने बारकाईने नियोजन केल्यास आपल्यावर घरी आपण पांढरा हत्ती पाळत आहोत का? ही भीती राहत नाहीत. नियोजनात आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ४-५ किंवा जास्त वर्षानंतरचे आपले जे स्वप्नपूर्तीसाठीचे खर्च आहेत, त्यावर मधल्या काळात होणार महागाईचा परिणाम. 
 • महागाईमुळे होणारी खर्चातील संभावित वाढ लक्षात नाही घेतली तर आपल्या कुटुंबाचा अर्थसंकल्प कोलमडू शकतो. गाडीचेच उदाहरण द्यायचे झाल्यास गाडी आणि त्याच्याशी संबंधित इतर खर्चातील पुढील ४-५ वर्षातील महागाई मुळे होणाऱ्या संभावित वाढीचा खर्च आपल्या नियोजनात समाविष्ट करायला हवा. अशा प्रकारे नियोजन केल्यास कोणताही ताण न घेता आपण ठरवलेल्या तारखेला आपली स्वप्नपूर्ती करू शकतो.

आपल्या दैनंदिन खर्चाचे प्रभावी नियोजन कसे करावे?

 • महिन्यातील खर्चाची यादी बनवावी. ज्यामध्ये नियमित खर्च (जसे विजेचे / टेलिफोन / गॅस बिल, वगैरे) व अनियमित खर्च (जसे मॉल शॉपिंग, उपहारगृह, सहल वगैरे) लिहावेत. हे खर्च भागवण्याकरिता आपल्याला बचतीची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण बँकेचे बचत खाते, आवर्ती जमा खाते किंवा म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडामध्ये बचत करू शकता. या खर्चाचे नियोजन करताना महागाईचाही विचार आवश्यक आहे. तसेच, शॉपिंगला जाताना आपली खरेदीची यादी जवळ बाळगावी जेणेकरून आपण आपल्याला आवश्यक सामानाचीच खरेदी करू. 
 • आजच्या मॉल संस्कृतीमध्ये बऱ्याच वेळा आपण अनावश्यक गोष्टी जास्त खरेदी करत असतो, ज्या आपण क्वचितच वापरतो किंवा पडून राहतात. आपल्या दैनंदिन खर्चाचा आढावा दर ३-४ महिन्यांनी घ्यावा त्यामुळे आपल्या खर्चावर योग्य नियंत्रण ठेवण्यास मदत होते. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपल्या दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठी गुंतवणूक करण्याकरिता ठराविक रक्कम बाजूला काढणे व उरलेल्या रकमेत आपले दैनंदिन खर्च भागविले पाहिजेत.

जीवन विमाआरोग्य विमा याची तरतूद किती महत्वाची आहे?

 • कुटुंबप्रमुखाचा मोठ्या रकमेचा मुदतीचा विमा असणे अतिशय महत्वाचे आहे. मुदतीच्या विम्यात कमी हप्त्यात जास्त विमा कवच मिळते त्यामुळे विमा हप्त्याची तरतूद अत्यावश्यक आहे. 
 • तसेच घरात कधी काही मोठे आजारपण आले तर आपल्या नियोजनावर त्याचा भार पडतो व आपले अर्थसंकल्प कोलमडू शकते. पूर्ण कुटुंबाच्या आरोग्य विमाची तरतूद केल्याने असे खर्च विमा कंपनी उचलते व आपल्या आर्थिक नियोजनाला कोणताही धक्का लागत नाही.

आपला कौटुंबिक अर्थ संकल्प आपल्याला योग्य गुंतवणुकीसाठी कशी मदत करतात ?

 • जेव्हा आपण अल्पकालीन तसेच दीर्घकालीन स्वप्ने किंवा ठराविक उद्दिष्टे ठरवितो तेव्हा त्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या प्रकारची गुंतवणूक योग्य ठरेल ते आपण आपल्या नियोजनातून ठरवू शकतो. आपले दैनंदिन खर्च भागविण्यासाठी आपण बँकेच्या बचत खात्याचा उपयोग करू शकतो. 
 • वेगवेगळ्या कालावधीच्या स्वप्नांसाठी आपण म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतो. 
 • उदाहरणार्थ:
  • एक वर्षानंतर नवीन टेलिव्हिजन संच घ्यायचा असेल तर म्युच्युअल फंडच्या ‘अल्ट्रा शॉर्ट टर्म कॅटेगरी’मध्ये गुंतवणूक करावी. 
  • ३-४ वर्षानंतर नवीन गाडी घ्यायची असेल तर त्यासाठी गुंतवणूक म्युच्युअल फंडच्या ‘हायब्रीड कॅटेगरी’मध्ये करावी. 
  • मुलांचे उच्चशिक्षण/ निवृत्तीजीवन यासारख्या १५-२० वर्षानंतरच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण म्युच्युअल फंडच्या ‘इक्विटी कॅटेगरी’मध्ये गुंतवणूक करावी.  
 • असे गुंतवणुकीचे वर्गीकरण करताना आपली गुंतवणूक क्षमता तसेच जोखीम घेण्याची तयारी याचा विचार करणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंड आपल्याला ३६ प्रकारच्या योजना देतात. योग्य योजनांचे संयोजन करण्यासाठी आपले आर्थिक सल्लागार आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात.

अर्थसंकल्पात एसआयपी कशी मदत करते?

 • म्युच्युअल फंडाची एसआयपी आपल्याला आपल्या कुटुंबाच्या अर्थसंकल्पात मदत करतात. दरमहा आपण आपल्या ‘एसआयपी’साठी ठराविक रक्कम बाजूला काढली की उरलेल्या रकमेत आपल्याला दैनंदिन खर्च भागवायचे असतात. 
 • त्यामुळे आपोआप आपण शिस्तबद्ध होतो व आपल्या वायफळ खर्चाला आळा बसतो. दरवर्षी आपले उत्पन्न हे वाढत असते अशावेळी म्युच्युअल फंडाच्या ‘स्टेप अप एसआयपी’  सुविधेद्वारे आपली ‘एसआयपी’ ही दरवर्षी वाढवू शकतो.

वेगवेगळ्या वयोगटासाठी अर्थसंकल्प वेगळा असतो का?

 • निश्चितच वेगळा असतो आपण तरुण असताना आपली स्वप्ने वेगळी असतात. तसेच जोखीम घेण्याची क्षमताही जास्त असते. या वयात चैनी वस्तूवर खर्च करण्यावर जास्त कल असतो. वाढत्या वयात कौटुंबिक जबाबदारी वाढली की जोखीम घेण्याची क्षमता कमी होते. तसेच या वयात सांसारिक खर्च जास्त असतात.
 • निवृत्तीपश्चात आपले नोकरी व्यवसायातील सक्रिय उत्पन्न कमी झालेले असते व आपण सर्वस्वी आपल्या गुंतवणुकीतील उत्पन्नावर अवलंबून असतो. निवृत्ती जीवनातील आपले खर्च हे पूर्णपणे वेगळे असतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपला कौटुंबिक अर्थ संकल्प हा बदलत जातो.

कुटुंबाच्या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कॅटेगरी कसे उपयुक्त ठरतात?

 • आपण पहिले की वयोमानानुसार आपला अर्थसंकल्प बदलत जातो. त्याच प्रमाणे वयोमानानुसार वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कॅटेगरी उपयुक्त ठरतात.
 • आपण तरुण असताना जोखीम घेण्याची क्षमता जास्त असते तसेच आपण आपल्या गुंतवणुकीस जास्त काळ देऊ शकतो. अशावेळी आपल्या गुंतवणुकीत ‘इक्विटी कॅटेगरीचा’ समावेश करू शकतो.
 • वाढत्या वयात सांसारिक जबादारी वाढली आणि आपली जोखीम क्षमता कमी झाली की आपण ‘हायब्रीड कॅटेगरी’मध्ये आपली गुंतवणूक करावी. निवृत्तीपश्चात जोखीम क्षमता पूर्ण कमी झालेली असते. अशावेळी किरकोळ गुंतवणूक ‘इक्विटी कॅटेगरी’मध्ये व जास्त गुंतवणूक स्थिर अशा ‘डेट कॅटेगरी’मध्ये करावी.

कौटुंबिक अर्थसंकल्पात आपत्कालीन संकटे किंवा खर्चाची तरतूद कशी करावी?

 • आपत्कालीन खर्च कधीही उभे राहू शकतात व आपले नियोजन पूर्णपणे बिघडू शकते. त्यासाठी आपण ‘आणीबाणी निधीची’ तरतूद करावी. आपल्या साधारण ६ ते १२ महिन्याचे एकंदर खर्च आहेत तेवढी रक्कम आपण आणीबाणी निधी म्हणून बाजूला काढून ठेवावी. 
 • यासाठी आपण म्युच्युअल फंडच्या ‘लिक्विड फंड’ कॅटेगरीची निवड करू शकतो. हे असे फंड असतात जे आपण कधीही काढू शकतो. अगदी सुट्टीच्या दिवशीही आपण रु. ५०,००० पर्यंतची रक्कम इन्स्टा रिडम्प्शनच्या सुविधेनुसार काढू शकतो. या कॅटेगरीमध्ये तरलता जास्त असते तसेच जोखीम नगण्य असते.

आपले कौटुंबिक अर्थसंकल्प मांडताना सर्व बाबींचा तपशीलवार आढावा घेऊन योग्य नियोजन करावे. त्याचे नियमित पुनरावलोकनही आवश्यक आहे त्यामुळे आपल्या वायफळ खर्चाना आळा बसेल व आपण आखलेली स्वप्ने आपण ठरवल्या दिवशी कोणताही ताण न घेता पूर्ण करू शकू.

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेच्या अधीन असते, योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

कौटुंबिक अर्थसंकल्पासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

– निलेश तावडे 

९३२४५४३८३२ 

nilesh0630@gmail.com

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्ष कार्यरत होते, सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत.)

घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स

डायरेक्ट वि. रेग्युलर म्युच्युअल फंड गुंतवणूक योजना

घरघुती अर्थसंकल्प आणि त्याची तयारी भाग १,

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प भाग ३

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.