शेअर बाजाराच्या अनेक बातम्यांमधे, बऱ्याच वेळा अमुक एका कंपनीने 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले आहे, अशी बातमी वाचण्यात येते. म्हणजे नक्की काय होतं ? तर कुठलीही कंपनी त्यांच्या विद्यमान शेअरधारकांना (असे शेअरधारक, ज्यांच्याकडे पूर्वीपासूनच कंपनीचे शेअर्स आहे.) अतिरिक्त शेअर्स देते तेव्हा याला बोनस शेअर्स असं म्हणतात.
आणि 1:1 म्हणजे ज्या शेअरधारकाकडे कंपनीचा एक शेअर आहे, त्या व्यक्तीला अजून एक शेअर बोनस म्हणून दिला जातो. म्हणजेच एखाद्या शेअरधारकाकडे सदर कंपनीचे 50 शेअर्स असतील, तर त्या व्यक्तीला अतिरिक्त 50 शेअर्स बोनस म्हणून मिळतील.
आजच्या लेखांमधून एखादी कंपनी बोनस शेअर्स का देते? बोनस शेअर्स कश्याच्या प्रमाणात दिले जातात? बोनस शेअर्स दिल्याने शेअरधारकांना नेमका काय फायदा होतो? या सगळ्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
1. एखादी कंपनी बोनस शेअर्स का देते?
- एखादी कंपनी बोनस शेअर्स का देते? त्याचा कंपनीला आणि शेअर धारकांना काय फायदा आहे ? हे बघू.
- कंपनीच्या समभागाची म्हणजेच शेअरची किंमत जास्त असेल तर लहान गुंतवणूकदारांना कंपनीमधे गुंतवणूक करणं अशक्य वाटतं. बोनस शेअर दिल्यामुळे कंपनी शेअरची किंमत कमी करू शकते. याचा फायदा नवीन किंवा लहान गुंतवणूकदारांना होतो आणि कंपनीच्या गुंतवणुकीमधे त्यांचाही सहभाग वाढतो.
- बोनस शेअर जारी करणं हे कंपनीची प्रतिमा उंच करण्यास फायदेशीर ठरते.
- ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीला नफा झाल्यास ते शेअरधारकांना लाभांश वाटप करते तसेच बोनस शेअर्स देणं ही देखील कंपनीच्या फायद्याशी निगडित असल्यामुळे याला डिव्हिडंट बोनस असेही म्हणतात.
- बोनस शेअर्स देताना कंपनी कुठलीही अतिरिक्त शुल्क लावत नाही. यामुळे शेअरधारकांना बोनस शेअर्स विनामूल्य मिळतात.
- शेअरधारकांना लाभांश मिळताना बोनस शेअर्सचा फायदा होतो. एखादी कंपनी प्रत्येक शेअर मागे लाभांश देत असते आणि बोनस शेअर्समुळे शेअरधारकांकडे असलेली शेअर्सची संख्या वाढते.
माहीत करून घ्या : सुवर्ण तारण कर्ज
2. रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट :
- एखादी कंपनी जेव्हा बोनस शेअर्स देण्याचे जाहीर करते तेव्हा रेकॉर्ड आणि एक्स डेट महत्त्वाच्या तारखा असतात.
- रेकॉर्ड डेट : कंपनीने निश्चित केलेल्या तारखेला ज्या भागधारकाच्या डिमॅट अकाउंटमधे सदर कंपनीचे शेअर्स असतील त्याच भागधारकांना कंपनी बोनस शेअर्स देते. ही तारीख म्हणजे रेकॉर्ड डेट म्हटली जाते.
- एक्स डेट : भागधारकांना बोनस शेअर मिळवायचे असतील तर एक्स डेटपर्यंत ( रेकॉर्ड डेटच्या साधारण एक किंवा दोन दिवस आधीची तारीख) सदर कंपनीचे शेअर्स विकत घेऊ शकतात.
उदाहरणार्थ:
एबीसी या कंपनीने 11 सप्टेंबर या दिवशी बोनस शेअरची घोषणा केली. आणि रेकॉर्ड डेट 28 सप्टेंबर निश्चित केली.
आता या उदाहरणात, 27 सप्टेंबर ही एक्स तारीख झाली. यामुळे भागधारक 27 सप्टेंबरपर्यंत कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकतात.
कंपनीच्या रेकॉर्ड डेट नुसार 28 सप्टेंबर या तारखेला ज्या ज्या शेअर होल्डर्सच्या डिमॅट अकाउंटमध्ये कंपनीचे शेअर्स असतील त्या सर्व भागधारकांना बोनस शेअर्स मिळतील.
- एक्स डेट ही रेकॉर्ड डेटच्या एक किंवा दोन दिवस आधीचीच का असते ? असा सामान्य प्रश्न मनात येऊ शकतो. तर शेअर बाजारात T +1 सेटलमेंट असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने शेअर खरेदी केला असेल तर त्याच्या डिमॅट अकाउंटमधे शेअर दिसण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागतो. सुट्टी आल्यास हा कालावधी वाढू शकतो. यामुळे एक्स डेट ही रेकॉर्ड डेटच्या एक किंवा दोन दिवस आधीची तारीख असते.
माहितीपर : यूपीआय हे साथमे, तो दुनिया मेरे हाथोमें
3. बोनस शेअर जाहीर करण्यासाठी कंपनीने कुठल्या अटी मान्य करणं अपेक्षित आहे?
- कुठलीही कंपनी वाटेल तेव्हा बोनस जाहीर करु शकते का ? तर नाही. बोनस जाहीर करण्यासाठी कंपनीला सुद्धा काही अटी मान्य कराव्या लागतात.
- आर्टिकल ऑफ असोसिएशनकडून बोनस शेअर देण्यासाठी कंपनीला मान्यता असेल तरच एखादी कंपनी बोनस शेअर जाहीर करू शकते. आणि असं झालं नाही, तर कंपनीच्या संचालक मंडळाकडून एक विशेष ठराव पास केला जातो, ज्यामधे संचालक मंडळातील सभासदांनी बोनस जाहीर करण्यासाठी मान्यता दिली, तर सदर कंपनी बोनस जाहीर करू शकते.
- बोनस जाहीर करताना, बोनस शेअरसोबत कंपनीचे एकूण भांडवल (कंपनीची किंमत म्हणजे कंपनीचे एकूण भांडवल ) हे कंपनीच्या नोंदणी करतानाच्या भांडवलाइतके किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
- बोनस शेअरसाठी शेअरधारकांची सुद्धा मंजुरी असावी लागते.