Sweep-in Account
बचत खाते तर प्रत्येकजण वापरतो पण किती जणांना स्वीप-इन (Sweep-in Account) खाते ही संकल्पना माहिती आहे? भारतामध्ये बँकिंगचा इतिहास तसा ३०० वर्षाहून अधिक खूप जुना आहे. सन १७७० मध्ये भारतात बँकिंग प्रणालीची सुरवात झाली. अर्थात ती आजच्याइतकी सुसूत्रित नव्हती. तरीही इतक्या वर्षात बँक म्हणजे आपले पैसे ठेवण्याची व कर्ज घेण्याची जागा ही बँकेबद्दल रूढ झालेली सर्वसामान्य संकल्पना काही बदलत नाही. बँकेचे कार्यक्षेत्र खूप विस्तारित आहे. आपल्या ग्राहकांना बँक विविध सुविधा देत असते. अशाच एका महत्वाच्या सुविधेबद्दल म्हणजेच स्वीप-इन या संकल्पनेबद्दल अनेकजण अनभिज्ञ आहेत. आजच्या लेखात या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
हे नक्की वाचा: बँकेतील ठेवींना सुरक्षित पर्याय
बचत खाते आणि व्याजदर
- तुमच्या बँक बचत खात्यातील पैसे तुलनेने खूपच कमी व्याज देतात. बहुतेक आघाडीच्या बँकांमधील बचत खात्याचा व्याजदर साधारणत: २.७% ते ४% च्या दरम्यान आहेत.
- काही बँका ठरविक रक्कम मर्यादेपेक्षा जास्त रक्कम बचत खात्यामध्ये ठेवल्यास त्यावर साधारणतः ६% पर्यंत व्याज देतात.
- बचत खात्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गरजेच्या वेळी आपण आवश्यक ती रक्कम खात्यामधून काढू शकतो.
- समजा तुम्ही बँकेच्या बचत खात्यामधील पैसे मुदत ठेव योजनेमध्ये (FD) जमा केले असतील आणि तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल, तर मुदत ठेव योजना बंद करून मग पैसे काढावे लागतील. पर्यायाने यामध्ये तुमचे नुकसान होऊ शकते. मग यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे बँकेमध्ये स्वीप-इन खाते उघडणे.
Sweep-in Account: स्वीप-इन खाते म्हणजे काय?
- स्वीप-इन खाते हा मुदत ठेव योजनेचाच एक वेगळा प्रकार आहे.
- समजा तुमच्या बचत खात्यात २.५ लाख रुपये आहेत आणि तुम्हाला इतक्या मोठ्या रकमेची सद्य परिस्थितीमध्ये आवश्यकता भासणार नसेल, तर बचत खात्यामध्ये तुम्ही ५०,००० रुपये ठेवून उर्वरित २ लाख रुपये स्वीप-इन खात्यामध्ये मध्ये ठेवू शकता.
- जेव्हा तुम्हाला ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेची परंतु, २ लाखांपेक्षा कमी रकमेची गरज असेल, तेव्हा तुम्ही शिल्लक रकमेवरील व्याज न गमावता आवश्यक ती रक्कम स्वीप-इन खात्यामधून काढू शकता.
Sweep-in Account: स्वीप-इन खात्याचे फायदे
- बहुतेक सर्व बँकांमध्ये बचत खात्याच्या व्याजदरापेक्षा मुदत ठेव योजनेचा व्याजदर जास्त असतो. स्वीप-इन खात्याचा व्याजदर मुदत ठेव योजनेच्या व्याजदराइतकाच असतो.
- स्वीप-इन खात्यामध्ये गुंतवलेल्या पैशांवर मुदत ठेव योजनेइतकेच व्याज आणि बचत खात्याची तरलता (liquidity) ही दोन्ही वैशीष्ट्ये सामावलेली आहेत.
- बचत खात्यामध्ये ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा असल्यास ही सुविधा ग्राहकांना दिली जाते.
- अर्थात सर्वच बँका आपल्या ग्राहकांना ही सुविधा देत नाहीत. ज्या बँका ही सुविधा देतात त्यांनी स्वीप-इन खात्यासाठी काही नियम व अटी निश्चित केलेल्या असतात त्याबद्दल माहिती करून घेणं आवश्यक आहे.
- काही बँक नेटबँकिंग द्वारे स्वीप-इन खात्यात पैसे ठेवण्याची सुविधा ग्राहकांना देतात.
विशेष लेख: काय आहे मुदत ठेवींचे गणित?
Sweep-in Account: स्वीप-इन खाते उघडताना कोणती काळजी घ्याल?
- स्वीप-इन खाते उघडताना दोन गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे किमान सरासरी शिल्लक व दुसरी एफडी थ्रेशहोल्ड (FD threshold).
- या दोन्हींची रक्कम मर्यादा बँकेपरत्वे बदलू शकते. तसेच शहर, गाव व महानगर अशा प्रत्येक ठिकाणासाठी नियम वेगवेगळे असू शकतात.
- जर तुम्ही स्वीप-इन खात्यामधून वारंवार पैसे काढले तर तुमचे व्याज कमी होईल आणि तुम्हाला फार काही फायदा होणार नाही.
- स्वीप-इन एफडीमध्ये असणारी रक्कम किती दिवस जमा होती याचा विचार करून व्याज मोजले जाते. त्यामुळे अगदीच निकड असेल तरच त्यामधून पैसे काढा. नाहीतर तुम्हाला स्वीप-इन सुविधेचा काहीच फायदा मिळणार नाही.
- समजा तुमची स्वीप-इन एफडी एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल, परंतु तुम्ही ४५ दिवसांत स्वीप-इन बंद केली तर फक्त ४५ दिवसांचे व्याज तुम्हाला मिळेल.
- समजा ४५ दिवसांच्या आत त्यातील काही रक्कम काढली, तर काढलेल्या रकमेवर ४५ दिवसांचे व उर्वरित रकमेवर पूर्ण व्याज मिळेल. अर्थात ही उर्वरित रक्कम बँकेच्या स्वीप-इन नियमांनुसार असणे आवश्यक आहे.
- तसेच, जर स्वीप-इन खात्यात किमान ३० दिवस पैसे ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा एफडीवर कमी व्याज मिळू शकते. थोडक्यात आपला कालावधी ३० दिवसांपेक्षा जास्त असेल तरच स्वीप इन आपल्याला फायदेशीर आहे. अन्यथा बचत खात्यामध्येच पैसे ठेवणं उत्तम.
स्वीप इन सुविधा आपल्याला बचतीची सवय लावू शकते. तसेच ही योजना मुदत ठेव योजनेपेक्षा जास्त फायदेशीर आहे. परंतु यामध्ये पैसे ठेवताना त्यासंदर्भातील नियम व अटी समजून घेऊन मगच पैसे ठेवा.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies