भांडवल तंत्रज्ञान
https://bit.ly/3gsLwWp
Reading Time: 4 minutes

भांडवल, तंत्रज्ञान आणि झुनझुनवाला!

भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून राकेश झुनझुनवाला यांचे नाव आहे आणि त्यांच्या शेअर्सचे मूल्य सध्या १४ हजार कोटी रुपये इतके प्रचंड आहे. या घटनेकडे आपण कसे पाहणार आहोत? भांडवल आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने त्यांना संपत्तीत वेगाने वाढ करणे, शक्य होते आहे. पण मग याची दखल आपण कशी घेणार आहोत? 

हे नक्की वाचा: उद्योगपती आता बँक सुरू करणार? 

  • समजा एका लढाईत पहिल्या बाजूच्या सैन्याकडे तलवार हे शस्त्र आहे आणि दुसऱ्या बाजूच्या सैन्याकडे बंदुका आहेत, तर कोणती बाजू जिंकेल
  • या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. या लढाईत पराक्रमाचा काही थेट संबंध राहणार नाही. ज्यांच्याकडे बंदुका आहे, ते किती नेम धरून पहिल्या बाजूच्या सैन्याला लक्ष्य करतात, एवढेच महत्वाचे ठरेल. म्हणजे ज्यांच्याकडे बंदुका आहेत, ते दुरूनच नेम धरून तलवारीने लढणाऱ्याचे बळी घेऊ शकतील. अर्थातच, दुसरी बाजू जिंकेल. 
  • याचा दुसरा अर्थ असा की या लढाईत पराक्रमापेक्षा तंत्रज्ञान महत्वाचे ठरेल. 
  • इंग्रजांनी भारतावर कब्जा केला, त्या सुरवातीच्या लढायांमध्ये असेच झाले होते. जगाच्या आर्थिक क्षेत्रात सध्या अशीच लढाई सुरु असून ज्यांच्याकडे भांडवल आणि तंत्रज्ञान आहे, तो वर्ग भांडवल आणि तंत्रज्ञान नसणाऱ्यावर मात करताना दिसत आहे. 
  • अर्थात, हा लढा अगदी अलीकडचा आहे, असे मानण्याचे कारण नाही. पण त्याची तीव्रता आधुनिक काळात अधिकच वाढली आहे. 

भांडवल आणि तंत्रज्ञान 

  • भांडवलाचा मुद्दा कार्ल मार्क्सने उपस्थित केला होता. त्यावरून जगात मोठे रणकंदन झाले आणि विचारसरणीच्या डाव्या उजव्या अशा सीमारेषा तयार झाल्या. 
  • कोण बरोबर आणि कोण चुकीचे, याचा निकाल कधी लागणार नाही. म्हणजे हा संघर्ष दीर्घकाळ सुरूच राहील. 
  • हा संघर्ष काल होता, आज चालू आहे आणि उद्याही चालू राहणार आहे. अशा या संघर्षात आपल्याकडे भांडवल असावे आणि तंत्रज्ञानही असावे, असे वाटणे, अगदी साहजिक आहे.
  • एकप्रकारे त्यातूनच जगाचा व्यवहार उभा राहतो, असेही म्हणता येईल. पण ज्यांच्याकडे या दोन्हीही गोष्टी आहेत आणि ज्यांच्याकडे या दोन्हीही गोष्टी नाहीत, यातून आर्थिक दरी किती वाढू शकते, याचे चित्र आजच्या जगात पाहायला मिळते. 
  • सर्व व्यवहार पूर्ण करण्यासाठी जो पैसा लागतो, तो आपल्याला अधिकाधिक मिळावा, असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळेच तो मिळविण्याचे वेगवेगळे मार्ग माणसाने शोधून काढले आहेत.
  • जगभरात बहुतेक देशांत भांडवली बाजार किंवा शेअर बाजार आहे, त्याचेही कारण हेच आहे. 
  • शेअर बाजारातून पैसा कमावण्याचा मार्ग जगाने मान्य केलेला मार्ग असून त्यात भाग घेणाऱ्यांची संख्या जगभर वाढत चालली आहे. 

विशेष लेख: भांडवल आणि तंत्रज्ञान: भांडवल आणि तंत्रज्ञानाची मशागतच देईल बरकत!  

तलवार की बंदूक ?

  • भारतातील शेअर बाजार १४५ वर्षे जुना असला, त्याचे मूल्य दोन ट्रीलीयन डॉलरपेक्षा अधिक असल्याने, तो जगातील १० वा सर्वात अधिक उलाढाल असलेला बाजार मानला जात असला तरी त्यात भारतीय गुंतवणूकदारांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळेच भारतीय बाजारातील चढउतार वर्षानुवर्षे परकीय गुंतवणूकदार ठरवितात. 
  • कोरोनापूर्वी ही संख्या चार कोटींच्या घरात होती. कोरोनाच्या काळात तीत सुमारे ३० लाखांच्या घरात वाढ झाली. 
  • कोरोनात घराबाहेर पडण्याचे मार्ग बंद झाल्याने अनेक भारतीयांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा मार्ग निवडला. 
  • इतक्या कमी कालावधीत डीमॅट खातेधारकांची संख्या इतक्या वेगाने कधी वाढली नव्हती. 
  • एक गुंतवणूक म्हणूनच या सर्व बदलाकडे पाहिले तर त्याचे स्वागत केले पाहिजे. पण शेअर बाजार हा श्रीमंतांचा खेळ आहे, सट्टाबाजार आहे, असे म्हणून पाहिले की त्यातील सर्व गोष्टी चुकीच्या कशा आहेत, ते सिद्ध करता येईल. अर्थात, यात यातील कोणाला कोणती बाजू आवडेल, हा ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचा विषय आहे. गुंतवणुकीचे शस्त्र कोणते वापरायचे, तलवार की बंदूक, याचा संबंध येथे येतो, तो अधिक स्पष्ट करण्यासाठी पुढील उदाहरण चपखल ठरेल. 

१४ हजार कोटींची संपत्ती !

  • भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून राकेश झुनझुनवाला यांचे नाव आहे. कोरोनाच्या संकटाने गंभीर रूप धारण केले तेव्हा बाजार पडल्यापासून झुनझुनवाला यांची संपत्ती आधी किती कमी झाली आणि नंतर ती किती वाढली, अशी एक आकडेवारी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. 
  • ती थोडक्यात अशी. त्यांच्याकडे जे शेअर आहेत, त्यांची आजच्या बाजारमुल्यानुसार संपत्ती १४ हजार कोटी रुपये एवढी प्रचंड आहे! 
  • त्यांनी जोखीम घेतली हे खरेच आहे, पण केवळ अशा व्यवहारातून एवढे पैसे कमावले जावू शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे. 
  • टायटन, इस्कोर्ट, क्रिसिल, जुब्लीयंट फूड, ल्युपिन, रॅलीज इंडिया अशा आघाडीच्या कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांनी काय केले पहा. 
  • डिसेंबर २०१९ मध्ये इस्कोर्टचे शेअर त्यांनी ६२९ रुपयांना खरेदी केले, त्यांची किंमत आज १४०० च्या घरात आहे. म्हणजे ती संपत्ती ११ महिन्यात १२१ पट वाढली. 
  • जोखीम आणि त्यांचा अनुभव याचा तर हा परिणाम आहेच, पण एकाच वेळी काही कोटींचे शेअर घेणे, त्यांना भांडवलामुळे शक्य झाले आणि त्या त्या वेळी खरेदी विक्री करणे, त्यांना तंत्रज्ञानामुळे शक्य झाले. 
  • सर्व जग बंद असताना हे व्यवहार मात्र चालू होते. त्याचा फायदा घेवून त्यांनी इतका प्रचंड पैसा कमावला आणि तो कायदेशीर असल्यामुळे कोणीच त्याविषयी आक्षेप घेऊ शकत नाही. 

महत्वाचा लेख: अर्थसाक्षर नागरिकांची संख्या का वाढली पाहिजे?  

आर्थिक साक्षरतेचे महत्व 

  • मूळ मुद्दा असा आहे की आर्थिक क्षेत्रात आपल्याच आजूबाजूचे काही नागरिक असे गुंतवणुकीचे एके ४७हातात घेवून बसले आहेत. 
  • अशा स्थितीत आपण तलवार घेऊन त्यांच्याशी लढू शकतो का? किंवा त्यांची बरोबरी करू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच नाही’, असे आहे. 
  • त्याचा आपल्या आयुष्यावर जो अपरिहार्य परिणाम होतो, तो आपण टाळू शकत नाही. 
  • जेव्हा आपण बाजारात जातो तेव्हा अशा पद्धतीने आर्थिक साक्षर होऊन कमाई करणारी मंडळी आपल्या स्पर्धेत असतात. 
  • अगदी शेअर बाजारच नाही, पण गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग (प्लॉटिंग, सोने, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स) अनुसरून पैशाला पैसा जोडणारयांची संख्या वाढत चालली आहे. त्याची दखल घ्यावी लागणार आहे. 
  • राकेश झुनझुनवाला यांचे उदाहरण केवळ मुद्दा लक्षात येण्यासाठी येथे घेतले. कायदा परवानगी देतो, तोपर्यंत असा पैसा कमवण्याचा त्यांना १०० टक्के अधिकार आहे. 

भांडवली बाजाराची पद्धतच नको, अशी आंदोलने (ऑक्यूपाय वॉल स्ट्रीट) भांडवलशाहीची राजधानी असलेल्या अमेरिकेत २०११ झाली आहेत, पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून शकले नाही. याचा अर्थ या व्यवस्थेत आपल्याला जगावे लागणार आहे. त्यामुळे आर्थिक साक्षरतेचे महत्व अधिकच वाढते. आता आपल्याकडे भांडवल नाही आणि तेवढे तंत्रज्ञान नाही, ही आपली अडचण आहे. ती  कशी पूर्ण करता येईल, याचा विचार आपणच केला पाहिजे. 

– यमाजी मालकर 

[email protected] 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…