कोरोना व्हायरसच्या साथीने जगाचे किती आर्थिक नुकसान झाले, याचे काही अंदाज प्रसिद्ध होत आहेत. संकटाच्या काळातही आर्थिक संधी पाहणारे अर्थतज्ञ त्यात आघाडीवर आहेत. त्यांना आपली गुंतवणूक सुरक्षित करावयाची आहे किंवा नवी गुंतवणूक करून त्यातून भरभक्कम नफा पदरात पाडून घ्यायचा आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणून त्यांना तो अधिकार आहे. मात्र ही साथ जेव्हा आटोक्यात येईल आणि जगाची चाके पुन्हा फिरू लागतील, तेव्हा एक वेगळेच जग आपल्यासमोर असेल. त्यामुळे त्या जगाकडे खूप वेगळ्या दृष्टीने पाहावे लागणार आहे. तुम्ही कितीही संकुचित कोंडाळी करून जगा, हे जग काल परस्परावलंबी होते, आजही परस्परावलंबी आहे आणि उद्याही ते तसेच राहणार आहे, याची जाणीव कोरोनाच्या साथीने माणसाला नव्याने करून दिली आहे.
आर्थिक आणीबाणी जाहीर होणार का?
कोरोना आणि अर्थशास्त्रीय निकष
- कोरोना साथीचे हे संकट आणखी लांबले तर जग गेली तीनशे चारशे वर्षे अर्थशास्त्राची जी भाषा वापरते, विकासाचे जे निकष त्याने निश्चित केले आहेत, भौतिक प्रगती असे नाव त्याने ज्या प्रगतीला दिले आहे आणि कागदी चलनाच्या आधारे त्याने नैसर्गिक संसाधनांचा सत्यानाश करून त्याने जे इमले बांधले आहेत, अशा सर्व पारंपारिक निकषांचा त्याला पुनर्विचार करावा लागेल. कारण या सर्व निकषांवर जगाने जी भरारी मारली आहे, तिचा फुगाच या साथीने फोडला आहे.
- माणसाला एकविसाव्या शतकात एक विषाणू अशा निव्वळ अस्तित्वाच्या पातळीवर आणून ठेवतो, हा आजचा वर्तमान त्यासाठी पुरेसा आहे. आणि अस्तित्व म्हणजे सर्वांचे अस्तित्व, मोजक्या समूह किंवा व्यक्तींचे नव्हे, हेही त्याने खूप स्पष्टपणे लक्षात आणून दिले आहे.
- याचा थेट धडा असा की जगा आणि जगू द्या, हाच मंत्र माणसाला मान्य करावा लागेल आणि त्यानुसार जगाचे पुढील धोरण ठरवावे लागेल.
- ‘आपला आणि समाजाचा फारसा संबंध नाही’, मी आपले विश्व कष्टाने उभे केले आहे’, ‘मी कमावले तर ते मी माझ्याच पद्धतीने खर्च करेन’, ‘निसर्गावर माणसाने मात करून एवढी प्रचंड प्रगती केली आहे आणि तिचा उपभोग घेण्यात काहीच चुकीचे नाही’ ही जी माणसाची उर्मट भाषा होती, तिला या संकटाने चांगलीच चपराक मारली आहे. त्यामुळे हे संकट काहीसे दूर झाल्यानंतर माणसाला वेगळा विचार करावाच लागेल.
- या संकटाने केलेली प्रचंड आर्थिक हानी, वाढणारी प्रचंड बेरोजगारी, संकटात सापडलेली गरीब, असंघटीत माणसे, एकटे ज्येष्ठ नागरिक, भविष्याच्या चिंतेने ग्रासलेली तरुण पिढी.. अशा अनेक समूहांना, त्यांच्या पाठीशी समाज आणि सरकार ठामपणे उभे आहे, असा विश्वास निर्माण करावा लागेल.
- असा विश्वास केवळ शाब्दिक कसरतीनी मिळणार नाही. त्यासाठी आतापर्यंतच्या गृहीतकांचा नव्याने विचार करावा लागेल. हे विचार केवळ चर्चेपुरते न राहता ते धोरण बदलाच्या दिशेने न्यावे लागतील.
कोरोना व्हायरसचे पृथ्वीवर झालेले परिणाम
कोरोना व आर्थिक संकट –
- थोडक्यात, या अभूतपूर्व संकटाने अनेक संधींचा संकोच केला आहे. अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यामुळे अनेक रोजगार संधी हिरावून घेतल्या जाणार आहेत.
- असंघटीत मजूर पुढील काही काळ कामाअभावी रस्त्यावर येणार आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्यासमोर भीतीदायक भविष्यकाळ उभा आहे.
- बेरोजगार झाल्यामुळे मध्यमवर्गही अडचणीत आला आहे. असे चहूबाजूने जेव्हा संकट येते, तेव्हा देशातील सरकार काय करते, यावरच सर्वांची भिस्त असते. त्यामुळे सरकारने काय काय केले पाहिजे, याच्या अपेक्षांची एक मोठी यादीच तयार झाली आहे. पण कधीही पुरेसा पब्लिक फायनान्स जमा न करू शकणारी सरकारी व्यवस्था या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकणार आहे काय?
धोरणात्मक बदल –
- कोरोना साथीचे संकट आले नव्हते, तेव्हा जगात आणि भारतात काही आदर्श स्थिती नव्हती.
- त्यावेळीही या प्रस्तावांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज होती. पण वेगवेगळ्या कारणांनी त्या प्रस्तावांवर समाजाने आणि सरकारने संवेदनशीलता दाखविली नाही.
- आता या अभूतपूर्व संकटाने तेवढेच अभूतपूर्व धोरणात्मक बदल करण्याची धोरणकर्त्यांना संधी दिली आहे.
- ते ही संधी घेतात की मानवी आयुष्याची विटंबना पाहण्याची वेळ समाजावर येते, हे नजीकचा भविष्यकाळ ठरविणार आहे.
समस्या एवढ्या जटील होत असताना नेमके काय केले पाहिजे?
कोणते असे आमुलाग्र बदल केले तर या संकटावर माणसाने मात केली, असे आपल्याला म्हणता येईल?
असे काही धोरणात्मक बदल आहेत, जे संकटातील अधिकाधिक नागरिकांना मानाने जगण्याची संधी देतील?
समाज आणि सरकारविषयीचा विश्वास पुन्हा दृढ कसा करता येईल?
कोरोना – लॉकडाऊनच्या काळात या ८ आर्थिक गोष्टी अवश्य करा
असे अनेक प्रश्न समोर येतात तेव्हा अर्थक्रांतीच्या तीन प्रस्तावांची आठवण होते. इतक्या मोठ्या संकटात धोरणात्मक बदल करण्यात मार्गदर्शक ठरतील, असे अर्थक्रांतीचे तीन प्रस्ताव असे आहेत.
- सर्व करांना सक्षम आणि सोपा सुटसुटीत पर्याय म्हणून बँक व्यवहार कर, हा एकच कर घेतला जावा, (आयात – निर्यात कर वगळून) अशी मांडणी अर्थक्रांती गेली २० वर्षे करते आहे. गेल्या २० वर्षांत बदललेले तंत्रज्ञान, डिजिटल व्यवहारांत झालेली प्रचंड वाढ, भारतात वाढलेले बँकिंग आणि कोरोनाचे संकट.. यात बँक व्यवहार कर – हा आता अतिशय व्यवहार्य आणि आदर्श असा कर ठरू शकतो. ज्याद्वारे सरकारकडे पुरेसा महसूल जमा झाला पाहिजे, ही गरज अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने पूर्ण होते.
- अर्थक्रांतीच्या दुसऱ्या प्रस्तावानुसार सहा तासांच्या किमान दोन शिफ्टमध्ये देश चालला पाहिजे. संघटीत क्षेत्रातील रोजगारात कमीत कमी काळात मोठी वाढ करण्याचा याशिवाय दुसरा मार्ग नाही. संघटीत क्षेत्रातील रोजगार आज आहे एवढाच मर्यादित राहिला (आणि आता तर तो आणखी कमी होणार आहे.) तर भारतीय अर्थव्यवस्था चालूच शकणार नाही, कारण तेवढा सक्षम ग्राहकच बाजारात नसेल. काही प्रमाणात वेतनांत कपात केली तरी चालेल, पण बेरोजगारांच्या हाताला काम देणे, हे सर्वाधिक महत्वाचे आहे, जे केवळ रोजगार संधीचे न्याय्य वाटप करूनच शक्य आहे. संघटीत क्षेत्रातील रोजगार दुप्पट झाला की त्याद्वारे जे नवे ग्राहक तयार होतील, त्यातून अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल आणि आपल्या देशात सर्वाधिक संख्येने असलेल्या असंघटित वर्गाच्या हातांना काम मिळेल.
- अर्थक्रांतीच्या तिसरा प्रस्ताव असा आहे – ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा देणे आणि त्यांच्यात कोणताही भेदभाव न करता महिन्याला १० हजार रुपये मानधन देणे. कोरोनाच्या संकटापूर्वी असे मानधन देणे, कसे शक्य नाही, अशी चर्चा केली जात होती. पण आता तसे काही करण्याची अपरिहार्यता या संकटाने सिद्ध केली आहे. साठीपर्यंत या ना त्या भूमिकेत कुटुंब, समाज आणि देशासाठीच काम करणाऱ्या नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून स्वीकारले पाहिजे आणि त्यांना केवळ द्याबुद्धीने नव्हे तर आपल्या देशातील एक चांगला ग्राहक म्हणून त्याला मान्यता दिली पाहिजे. आज संख्येने सुमारे १४ कोटीच्या घरात असलेले ज्येष्ठ नागरिक जर ग्राहक नसतील तर अर्थव्यवस्था, त्यांना टाळून कशी पुढे नेणार, या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हा प्रस्ताव होय.
बाजारातील अस्थिरता व जेष्ठ नागरिक
(सर्व प्रस्ताव येथे थोडक्यात मांडले असून अधिक चर्चेसाठी त्याच्या सर्व बाजू लक्षात घेतल्या पाहिजेत. ती सर्व मांडणी अर्थक्रांतीने वेगवेगळ्या माध्यमांतून यापूर्वी केलेली आहेच.)
– यमाजी मालकर
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/