कोरोना – लॉकडाऊनच्या काळात या ८ आर्थिक गोष्टी अवश्य करा

Reading Time: 3 minutes

कोव्हिड-१९ या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांच लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा लक्षात घेता, हे लॉकडाऊन अजून वाढवण्यात आले आहे. हा वेळ म्हटलं तर सक्तीचा आणि कंटाळवाणा वाटू शकतो आणि म्हटलं तर याचा सदुपयोगही करता येऊ शकतो. वेबसिरीज, सिनेमे यामुळे वेळ छान जातही असेल, पण या काळात काही आर्थिक नियोजन करता येतं का? याकडेही लक्ष देऊ या. 

या लॉकडाऊनच्या काळात, कोणत्या आर्थिक बाबी पहायला हव्यात, याबाबत या लेखातून जाणून घेऊ. 

१. कागदपत्रांचा आढावा घ्या. 

 • वसंत ऋतू आला की घरातील स्वच्छता केली जाते, जुनी कपाटं साफ केली जातात. जुन्या वह्या, हिशोब यांची पहाणी सुद्धा या साफसफाईच्या निमित्ताने होऊन जाते. 
 • आता वेळ मिळालाच आहे तर, तुमची आर्थिक मालमत्ता म्हणजे बँकांची खाती, डिमॅट खाती, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या नोंदी, विमा पॉलिसी यांचा आढावा घ्या. 
 • सर्व महत्वाची कागदपत्रे एकत्र व्यवस्थित ठेवा. बिनकामाच्या जुन्या फायलींची विल्हेवाट लावा. 
 • आवश्यक असणारे पासवर्ड्स व ऑनलाईन व्यवहारासाठी लागणारी इतर गोपनीय माहिती तुमच्या पर्सनल डायरीत लिहून ठेवा.

  बाजारातील अस्थिरता व जेष्ठ नागरिक

२. रोजचा होणारा खर्च तपासून पहा. 

 • कोरोनामुळे भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाले आहेत. यामुळे ब-याच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नोकरी ही गमवावी लागली आहे.काही कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात येत आहे.आर्थिक तज्ज्ञांच्या मते ही जागतिक मंदी २००९ च्या मंदीपेक्षाही मोठी आहे. 
 • या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी व आकस्मिक तयारीसाठी किमान तीन महिन्याच्या खर्चासाठी पुरेल एवढा पैसा खात्यात आहे का हे तपासून पहा, त्यानुसार तुमचं बजेट ठरवा. 
 • जीवनावश्यक गोष्टींचा खर्च सोडून करमणुकीचे खर्च किंवा अन्य कोणते खर्च आपण टाळू शकतो याचे नियोजन करा. 

कर्जाच्या हप्त्याला स्थगिती दयावी का?

३. नवीन विमा योजनेचा विचार करा किंवा असलेल्या विम्याची पडताळणी करून पहा. 

 • या लॉकडाऊनचे मुख्य कारण तो संसर्गजन्य रोग आहे, अशा परिस्थितीत आपली व कुटुंबियांच्या आरोग्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. या वेळेत आपण आरोग्य विमा (Health Policy) घेणे उचित ठरेल. 
 • बहुतांशी लोक, कंपनीद्वारे देण्यात येणाऱ्या विम्यावर अवलंबून असतात, म्हणून ते इतर वैयक्तिक विमा घेण्याचा विचार करत नाही पण उद्या नोकरी गेली किंवा अन्य बिकट परिस्थितीत त्या विम्याचा फायदा होईलच असे नाही म्हणून वैयक्तिक व कुटुंबाच्या आरोग्य सुरक्षेसाठी विमा योजनेचा विचार करा. 

कोरोना – अस्थिर शेअर बाजारात आपली एस.आय.पी सशक्त कशी कराल?

४. बँकेचे स्टेटमेंट्स, आयकर, कार्डवरील ऑनलाईन व्यवहार इत्यादी तपशील तपासून पहा. 

 • हल्ली सर्वच बँका डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहेत, बऱ्याच बँकांचे मासिक स्टेटमेंट आपल्या मेलद्वारे मिळते, तसेच आयकर विभागाने सुद्धा ऑनलाईन सेवांना प्राधान्य दिले आहे. 
 • या लॉकडाऊनच्या काळात, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी नेट बँकिंग वापरून अपडेट करून घ्या, डेबिट व क्रेडिट कार्डच्या व्यवहारांची खातरजमा करा काही त्रुटी आढळल्यास बँकेशी संपर्क करा. खात्यातून होणारी कर वजावट यांचे हिशोब ठेवा. 
 • आपल्या हातात वेळ असल्याने यावर्षीच्या आर्थिक बजेटमधील करप्रणाली समजून घ्या, कर बचतीसाठी गुंतवणूक केली नसेल तर तुमच्याकडे ३०जून पर्यंत वेळ आहे. पॅन नंबर आधारशी जोडलेला आहे का ते तपासून पहा. 
 • महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पासवर्ड्स वगैरे पुन्हा सुनिश्चित करा. 

५. स्टॉक मार्केटकडे दुर्लक्ष करणे सोयीचे 

 • कोरोनामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कोलमडून पडली आहे. सर्वत्र गोंधळ उडाला आहे.
 • पश्चिमेकडील देशात हा रोग वणव्यासारखा पसरला आहे, अशा परिस्थितीत शेअर बाजार पूर्णपणे कोसळलेला आहे. त्यामुळे यातून बाहेर पडेपर्यंत स्टॉक मार्केटच्या चढ-उताराचा  विचार न केलेलाच बरा. 

मानवजातीला केवळ अस्तित्वाच्या पातळीवर आणणारे संकट ! 

६. तुमच्या आर्थिक गोष्टींची माहिती तुमच्या जोडीदारालाही सांगा. 

 • रोजच्या गडबडीत बऱ्याचदा आपल्या जोडीदाराशी आपला नीटसा संवाद होते नसतो. अशावेळी आपल्या पगाराबाबतीतल्या किंवा गुंतवणूकीच्या ही बऱ्याच गोष्टी एकमेकांना सांगणे राहून जाते. 
 • आता वेळ मिळालाच आहे तर, तुमच्या जोडीदाराला बँकेचे स्टेटमेंट्स, गुंतवणूक, क्रेडिट कार्डचे व्यवहार या गोष्टींबाबत कल्पना द्या. आर्थिक गोष्टींबाबतीत जोडीदारासोबत चर्चा करून पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. 

७. आर्थिक ध्येये सुनिश्चित करा. 

 • या महामारीच्या संकटामुळे सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातही बराच फरक पडला आहे. संकटाच्या वेळी आर्थिक ध्येयांवर पुनर्विचार करणे महत्त्वाचे आहे. 
 • यानंतरही, भविष्यातील आर्थिक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणता बदल करायला हवा याचं नियोजन करा. या चर्चेत जोडीदाराला समाविष्ट करून घ्या, याबाबत तिचा /त्याचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

कोरोना – रिझर्व्ह बँकेचे महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याचे परिणाम

८. इतर समाजोपयोगी गोष्टी 

 • कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून सरकारला मदत करणे हे देशाचा एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.  
 • त्याशिवाय नजीकच्या ब्लड बँकमध्ये जाऊन रक्तदान करणे, शक्य झाल्यास अवयव दान करणे अशा सामाजिक गोष्टी करून लोकांना मदत करू शकतो. 

कोरोना – “देवाची करणी” आणि विमा योजना

वरीलप्रमाणे लॉकडाऊनच्या वेळेत,तुमच्या आर्थिक बाबींच नियोजन करा. कोरोनाचं संकट संपल्यावर काय नवीन करता येईल याचा विचार करा, मित्र, कुंटुबियांसोबत एकत्र सुट्टीची योजना करा. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!