https://bit.ly/3mXAY2W
Reading Time: 3 minutes

कोव्हिड-१९ आणि आर्थिक बदल 

कोव्हीड -१९ च्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी तो अजूनही संपलेला नाही. आजच्या भागात आपण कोव्हिड-१९ नंतर भारतात कसे आणि कोणते आर्थिक बदल झाले याबद्दल माहिती घेऊया. 

कोव्हिड-१९ – एक भयानक वास्तव 

  • कोव्हिड-१९ नावाच्या महामारीने फेब्रुवारीच्या मध्यानंतर भारतामध्ये शिरकाव केला. मार्चच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि बघता बघता याचा फैलाव वाढतच गेला. 
  • अखेरीस २३ मार्च रोजी भारतमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. 
  • मार्च, एप्रिल मध्ये कोव्हिड-१९ चा जगभर वेगाने फैलाव झाला होता त्यामुळे केवळ भारताच्याच नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा नकारात्मक परिणाम झाला. 
  • कोव्हिड-१९ ला जागतिक महामारी घोषित करून १० महिने होऊन गेले. या रोगावर खात्रीशीर औषध मिळाले नसले तरी आता भारतात  परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे. 
  • सर्वसामान्य नागरिकांमध्ये लसीची बातमीने काहीशी सकारात्मही मानसिकता निर्माण झाली आहे. तसेच, त्यांनी हळूहळू आपले दैनंदिन आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. 
  • अर्थात लसीकरण, त्याचे फायदे किंवा साईड इफेक्टस एकूणच या विषाणूच्या बाबतीत अजूनही अंधारात तीर मारण्यासारखी परिस्थिती आहे. 

हे नक्की वाचा: नकारात्मक आकडेवारी का आवडे सर्वांना ?  

कोव्हिड-१९ – भारतात झालेले ५ आर्थिक बदल 

१.  आर्थिक नियोजनाचा धडा मिळाला 

  • अर्थसाक्षर व्हा! अनेक आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक तज्ज्ञ ज्या आर्थिक नियोजनाचं महत्व वारंवार सांगत असतात त्या आर्थिक नियोजनाचा धडा अखेरीस, या कोव्हीड-१९ नामक महामारीने दिला. 
  • नियमित बचत, गुंतवणूक व इमर्जन्सी फंडाची तरतूद करून योग्य प्रकारे आर्थिक नियोजन केल्यास, अशा प्रकारच्या अभूतपूर्व संकटांचा सामना सहज करता येतो. 
  • कित्येक नागरिकांनी पर्यायी उत्पन्नाचा मार्ग शोधून उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ लावायचा प्रयत्न केला. अनेकांना पर्यायी उत्पन्नातून उत्तम पैसे मिळवले व त्याचा वापर करून आपली गुंतवणूक वाढवली. पर्यायी उत्पन्नाचे महत्व सगळ्यांना चांगलेच पटले असेल.
  • याच कालावधीत कित्येकांनी खास करून तरुणाईने शेअर बाजारामध्ये चांगली गुंतवणूक केल्यामुळे मार्चमधल्या पडझडीनंतरही  बाजाराने चांगलीच वृद्धी अनुभवली. 

२. ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पनेचा उदय 

  • कोरोनामुळे झालेला आर्थिक जगतातील एक मोठा बदल म्हणजे अनेक कंपन्यांनी सुरु केलेली ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना!
  • कोरोनाच्या काळात जमावबंदी, लॉकडाऊन, मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा अनेक नियमांमुळे कंपन्यांना त्यांच्या कामकाजात मोठा बदल करावा लागला. 
  • बहुतांश क्षेत्रांमध्ये नोकरी म्हणजे प्रत्यक्ष ऑफिसमध्ये जाऊन काम करायचे, या वर्षानुवर्षे चालत आलेल्या पद्धतीची सवय असल्याने, कोव्हिड-१९ पूर्वी ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेचा फारसा विचारच करण्यात आला नव्हता. 
  • वर्क फ्रॉम होमची संकल्पना कंपन्या आणि कर्मचारी या दोघांसाठीही लाभदायक ठरली. कंपन्यांचा खर्चात झालेली कपात आणि कर्मचाऱ्यांचा प्रवासातील वाचलेला वेळ, यामुळे या संकल्पनेला खुल्या मनाने स्वीकारण्यात आले.  
  • कर्मचारी घरातूनच काम करत असल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक खर्चाचे आकडेही कमी झाले, तर दुसरीकडे कंपन्यांना भाडे किंवा इतर सेवांसाठीचा खर्चात कपात करता आला.
  • हीच संकल्पना कायम राहिल्यास छोट्या शहरांमधील (टायर ३ आणि ४) तरुणांना नोकरीसाठी स्थलांतर करण्याची गरज नाही. कारण त्यांची कंपनी दुसऱ्या शहरात असली तरी त्यांना आपल्या घरी राहूनच काम करणे सहज शक्य आहे. 

महत्वाचा लेख: Corona and Economy: भारतीय ग्राहकशक्तीचा विजय असो !

३. ऑनलाईन व्यवहारांना चालना आणि आरोग्य क्षेत्राचे डिजिटलायझेशन

  • कोरोनाच्या काळात खरेदी करताना ग्राहकांनी होम डिलिव्हरी आणि ऑनलाईन व्यवहार या दोन गोष्टींना प्राधान्य दिलं.
  • या कालावधीत आर्थिक नियोजनासोबत अजून एका गोष्टीचा गांभीर्याने विचार केला गेला, तो म्हणजे फिटनेस! जिम बंद असल्या तरी ऑनलाईन फिटनेस क्लासेस, कन्सल्टन्सी या संकल्पनांनी एक नवीन क्रांती अनुभवली.  
  • आरोग्य क्षेत्राने या कालावधीत आसू आणि हसू या दोन्हीचा अनुभव घेतला. फार्म कंपन्यांनी या कालावधीत सॅनिटायझर, मास्क, फिटनेस साहित्य, इ. वस्तूंच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा कमावला. यामुळे आरोग्य व फार्मा क्षेत्रातील शेअर्सच्या किंमतीतही मोठी वाढ दिसून आली. 
  • या कालावधीमध्ये नागरिकांनी ‘ऑनलाईन’ संकल्पनेला पसंती दिल्याने फिटनेस सोबतच इतर आरोग्य सेवा व फार्मा क्षेत्राने कन्सल्टेशन, उपचार, औषध खरेदी आदी गोष्टींसाठी ऑनलाईन सुविधा पुरवायला सुरुवात केली. 
  • अर्थात कोरोनाच्या प्रसारापूर्वीही या क्षेत्राने डिजिटल युगात पाऊल ठेवले होतेच, पण कोव्हीड-१९ दरम्यान याचा खऱ्या अर्थाने प्रसार आणि प्रचार झाला.

४. लॉकडाऊन आणि अनलॉक 

  • मार्चमध्ये कोव्हिड-१९ विषाणूचा वेगाने प्रसार सुरु झाल्यावर भारतामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले. याचदरम्यान भारतातील आर्थिक असमतोल प्रकर्षाने जाणवला. काही कुटुंबांनी एकत्रित वेळ घालवला, तर काही ठिकाणी एका वेळच्या खाण्याचीही भ्रांत आहे, अशी परिस्थिती होती.
  • भारतातील बहुसंख्य रोजगार असंघटित क्षेत्रातीलअसल्यामुळे याच दरम्यान  लाखो मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतावे लागले.  
  • कोरोना आणि लॉकडाउनचा सर्वात मोठा परिणाम सेवा क्षेत्रावर झाला. अनेक उद्योगधंदे ठप्प झाल्याने बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली. सर्वात जास्त परिणाम झाला तो पर्यटन, हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल क्षेत्रावर! परंतु, लॉकडाऊन नंतर सुरु झालेल्या अनलॉक प्रक्रियेमुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले.
  • आता परिस्थिती बऱ्यापैकी बदलली असून या क्षेत्रांत पुन्हा एकदा मागणीत चांगलीच वाढ होताना दिसत आहे. दिवाळीनंतर पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्र तर अनपेक्षित वृद्धी अनुभवत आहे. 

विशेष लेख: अर्थव्यवस्था संघटीत होते आहे, म्हणजे नेमके काय होते आहे ? 

५. परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा (FII) प्रवाह वाढला

  • कोव्हिड-१९ चा प्रसार, लॉकडाऊन या परिस्थितीमध्ये सरकारने प्रोत्साहनपर आर्थिक पॅकेज जाहीर केल्यामुळे, तसेच आत्मनिर्भर भारत संकल्पनेमुळे भारतामध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा (FII) ओघ वाढला.
  • भारतात २०२१ या आर्थिक वर्षासाठी २ लाख कोटीं रुपयांची गुंतवणूक झाली. 
  • या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे स्टॉक मार्केटमध्येही मजबूत ‘बूलरन’ दिसली आणि गुंतवणुकदारांनी या संधीचा लाभ घेतला. परिणामी बाजारात रिटेल भागीदारांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली. 

कोव्हिड-१९ हे सन २०२० मधले एक भयानक वास्तव आहे. यामुळे संपूर्ण जगाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. २०२० हे वर्ष आता संपेल आणि ते परतून पुन्हा कधीही येणार नाही.या सरत्या वर्षाबरोबर कोरोनाही कायमचा जाऊदे हीच इच्छा प्रत्येकाच्या मनात असेल. पुढे काय होईल ते सांगता येणं कठीण असलं, तरी झालेले आर्थिक बदल पाहता कोरोनानंतरचं जग वेगळं असेल यात शंकाच नाही.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Changes in Indian economy in marathi, corona and economical changes Marathi Mahiti, 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

“झूम ॲप” संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutesकोविड-१९ कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अनेक उद्योग- व्यवसाय बंद आहेत. शक्य ते व्यवसाय घरून ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. नोकरदार वर्गालाही घरून ऑनलाईन काम करावे लागत आहे (Work From Home). याच वर्क फ्रॉम होम मध्ये सर्वांत जास्त गाजलेले मोबाईल ॲप आणि सॉफ्टवेअर म्हणजे ‘झूम ॲप. झूमचा वापर करून मिटींग कशी घ्यायची? झूम सायबर सुरक्षेच्या दृष्टीने नापास का ठरते ? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया –

आर्थिक आणीबाणी म्हणजे काय? 

Reading Time: 3 minutesआर्थिक आणीबाणी यावर सध्या प्रसार माध्यमातून विविध बातम्या येत आहेत. प्रत्यक्षात ही तरतूद आर्थिक (Economic) संबंधात नसून वित्तीय (Financial) संबंधात आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी एक जनहित याचिकाही प्रलंबीत आहे. भारतीय राज्यघटनेत असलेल्या विविध  तरतुदींनुसार कलम ३५२, ३५६ आणि ३६० यानुसार भारताच्या राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार आहे.

नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

Reading Time: 3 minutesकोविड-१९ मुळे सध्या सर्व कामकाज ठप्प आहे, अनेक लोक आपापल्या घरी गेल्याने, तसेच त्यातील काही पुन्हा न येण्याच्या शक्यतेने, तात्पुरत्या कंत्राटी / कायम स्वरुपात अनेक रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या प्रकारातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याविषयी संस्थेच्या कार्यकर्तीला आलेल्या अनुभवातून काळजी कशी घ्यावी व फसलो तर काय करावे याविषयी थोडे मार्गदर्शन. 

लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल

Reading Time: 5 minutesलॉकडाऊन मध्ये अनेकांना नोकरी, व्यवसाय, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, बचत याची काळजी आणि एकंदरीतच कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे येणाऱ्या नैराश्याने ग्रासलं आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसिद्ध बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर “चकोर गांधी” यांनी लॉक डाऊन मध्ये  बदललेल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आर्थिक नियोजन व गुंतवणुकी संदर्भात मार्गदर्शन करणारा ऑडिओ आम्ही ऑडिओ आणि लिखित अशा दोन्ही स्वरूपात प्रकाशित करत आहोत.