तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?

Reading Time: 4 minutes

सध्याचे जग हे झगमगीत, चंदेरी दुनियेने भारलेले, जाहिरातबाजीने व्यापून गेलेले आहे. जगातील सर्व कंपन्या भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून बघतात आणि या विश्वातील आपली ओळख ही केवळ एक खरेदीदार अशी उरली आहे. त्यामुळेच विविध क्लृप्ती वापरून, जाहिरातींचा मारा करून, किंवा आभासी कल्पना मनात भरवून विविध गोष्टी, किंवा सेवा खरेदी करण्यासाठी आपल्याला उद्युक्त केलं जातं. त्याचा नकळत होणार परिणाम म्हणजे हळूहळू महागडी होत जाणारी आपली जीवनशैली.

ज्याप्रमाणे एखाद्या कढईत पाणी भरून त्यात एक बेडूक ठेवला आणि खालून मंद विस्तव लावला असता हळूहळू पाण्याचे तापमान वाढते ते मरेपर्यंत बेडकाच्या लक्षात येत नाही. तसेच आपल्या मनातील कुठल्या वस्तू व सेवा चांगल्या याविषयीच्या संकल्पना कशा बदलत जातात आणि त्यातून आपण महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात कसे खेचले जातो ते आपल्याला कळत नाही. उच्च राहणीमानामागे पळताना नको ते खर्च मागे लागत जातात आणि त्यातून आपले आर्थिक नुकसान होत असते. यालाच ‘लाईफस्टाईल इन्फ्लेशन’ म्हटले जाते.

आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

 • बऱ्याचदा आपण ‘खर्च करू शकतो’च्या कैफात ‘खर्च करावा का’ हा प्रश्नच स्वतःला विचारत नाही. या ‘लाईफस्टाईल इन्फ्लेशन‘च्या जाळ्यात सामान्यतः तरुणवर्ग जास्त प्रमाणावर अडकताना दिसतो. पगार वाढला की घे नवीन गाडी, करा दर आठवड्याला पार्ट्या, घ्या महागड्या ब्रँडचे कपडे आणि बूट, वापरा उंची परफ्युम्स अशी ही न संपणारी यादी सुरु होते. 
 • आपण खर्च ‘करू शकतो’च्या कैफात खर्च ‘करावा का?’ हा प्रश्नच स्वतःला विचारत नाही. आपल्याला महागड्या वस्तू परवडत आहेत, म्हणजे आता त्याच घ्यायच्या असा चुकीचा अट्टाहास आपण धरतो. अमेरिकेतील एका पाहणीत असे दिसून आले की लॉटरी जिंकलेल्या लोकांमध्ये दिवाळखोरीचे प्रमाण फार जास्त आहे. एकदम मोठे घबाड मिळाल्याने अशा लोकांमध्ये अविचारी खर्च करण्याची प्रवृत्ती उफाळून आल्याचे आढळले. गेल्या १५-२० वर्षात भारतात जमिनींच्या किमती गगनाला भिडल्यामुळे सरकारी प्रकल्पांना किंवा बिल्डरांना जमिनी विकून रातोरात श्रीमंत झालेल्या लोकांमध्येही असाच प्रकार बघायला मिळतो.
 • आर्थिकदृष्ट्या खरा सुखी तोच ज्याने ‘आर्थिक स्वावलंबन’ मिळवलंय आणि जो नोकरी अथवा व्यवसायावर आपली जीवनशैली कायम ठेवण्यासाठी अवलंबून नाही.
 • ‘आर्थिक स्वातंत्र्य’ किंवा ‘आर्थिक स्वावलंबन’ आपल्याला तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपण आपल्या नोकरी किंवा व्यवसायावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणार नाही. पण उत्पन्न वाढले (किंवा न वाढता देखील) की खर्च वाढवून ठेवायचे अशा सवयीमुळे आपण आपल्या आर्थिक स्वावलंबनापासून स्वतःला दूर घेऊन जातो. जर आपल्याला अशी स्थिती गाठायची असेल की केवळ गुंतवणूक परताव्यातून आपले रोजचे खर्च भागतील तेव्हा एकीकडे आपण जास्तीत जास्त गुंतवणूक केली पाहिजे आणि दुसरीकडे आपल्या खर्चावर आळा घातला पाहिजे. 
 • केवळ तुमचे उत्पन्न किती आहे यावर तुम्ही आर्थिकदृष्ट्या यशस्वी होणार का ते ठरत नसते. तुम्ही तुमचे खर्च कसे कमीतकमी ठेवता आणि जास्तीत जास्त गुंतवणूक कशी करता ते उत्पन्नापेक्षाही जास्त महत्त्वाचे ठरते.

आर्थिक नियोजनाचे मूलमंत्र

या विषयी सर्वसामान्य लोक नसते खर्च वाढवून ठेवतात त्याची काही ठळक उदाहरणे:

आपले सामाजिक मूल्य जपण्यासाठी (स्टेटस सिम्बॉल) उगीचच खर्च वाढवणे:

आपले सामाजिक मूल्य जपण्यासाठी (स्टेटस सिम्बॉल), मित्रपरिवारात किंवा नातेवाईकांत भाव खाण्यासाठी किंवा इतर कोणी केले म्हणून आपणही केले पाहिजे या भावनेतून लोक अनेक वायफळ खर्च करत असतात. 

उदाहरणार्थ:

 • वार्षिक कौटुंबिक सहलीसाठी परदेशी जाणे, किंवा गरज नसताना महागड्या ब्रँडची गाडी घेणं
 • घरचे जेवण सोडून वारंवार हॉटेलिंग करणं.
 • जिम, पार्लर, सलून अशा सुविधांसाठी मोठमोठ्या ब्रॅण्ड्सच्या मागे लागणं.
 • कपडे, परफ्युम, शूज, घड्याळ, पेन, पर्स, बेल्ट, वॉलेट अशा वस्तूंसाठी महागडे ब्रॅण्ड्स धुंडाळणं.
 • गरज नसताना पब्लिक ट्रान्सपोर्ट सोडून स्वतःच्या गाडीने फिरणं किंवा रेल्वे सोडून विमानानं फिरणं.
 • कुटुंबातील प्रत्येक वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस वगैरे दिवस मोठ्या प्रमाणावर साजरे करणे. भरपूर पैसे खर्च झाले म्हणजेच असे क्षण ‘साजरे’ झाले अशी समजूत करून घेणे. खरेतर अशा प्रसंगी पैसे खर्च करण्यापेक्षा एकमेकांसोबत चांगला वेळ घालवणे गरजेचे असते.
 • लग्न समारंभावर अवास्तव खर्च करणे.
 • मुलांच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी महागड्या शाळांची निवड करणे. वास्तविक पाहता मुलांच्या शिक्षणासाठी सर्वात जास्त खर्च हा ग्रॅज्युएशन आणि पदव्युत्तर कॉलेज शिक्षणासाठी व्हायला हवा. पण शिशुवर्गापासूनच लाख-लाख रुपये फिया दरवर्षी भरून पालकांची तारांबळ उडालेली असते. कॉलेजमध्ये जायची वेळ येते तोपर्यंत महागाईमुळे तिथलाही खर्च वाढलेला असतो आणि मग धावपळ चालूच राहते.
 • न कमावलेले पैसे खर्च करणे. अनेक लोक कन्झ्युमर लोन्स काढून किंवा क्रेडिट कार्डावर खर्च करतच राहतात. कर्ज काढणं म्हणजे आपलेच भविष्यातील उत्पन्न लवकर वापरून टाकणे.
 • घर किंवा ऑफिसच्या अंतर्गत सजावटीवर वारेमाप खर्च करणे. 

बचत आणि आर्थिक शिस्तीचे ७ सोपे मार्ग,

पण मग उत्पन्न कितीही वाढले तरी जीवनशैली न बदलता तसेच राहायचे का? 

 • नाही. प्रत्येकाला आपले जीवनमान उंचावले पाहिजे असे वाटणे साहजिक आहे. फक्त वाढते उत्पन्न आणि वाढते खर्च यांचा व्यवस्थित मेळ घालता आला पाहिजे. त्यांचे प्रमाण १:१ असता कामा नये. 
 • आर्थिक नियोजन शास्त्रातील अनेक तज्ञांनी याविषयी एक ढोबळ अंदाज सांगितला आहे. त्यानुसार, जेव्हा आपली ऐपत ४ गोष्टी करायची होईल, तेव्हाच तो खर्च एकदा करावा. म्हणजे उदाहरणार्थ, आपले उत्पन्न एवढे झाले की आपण महिन्यातून ४ वेळा हॉटेलात जेवायला जाऊ शकतो, तेव्हा एकदाच जावे, किंवा जेव्हा उत्पन्न ४ गाड्या घेण्याइतके होईल तेव्हा १ गाडी घ्यावी, किंवा ४ परदेशवाऱ्या करता येतील एवढे पैसे साठले कि मगच पहिली परदेशवारी करावी.
 • यातील अध्याहृत तत्त्व हे आहे की आपली बदललेली जीवनशैली भविष्यात देखील आपण निभावून नेऊ शकू याची खात्री असली पाहिजे. खर्चांना जर आपण वेळीच आळा घातला नाही तर ते भसाभस वाढतात आणि उत्पन्नातील वृद्धी त्यासमोर तोकडी पडायला लागते. त्यामुळे असे जीवनशैलीतले खर्चिक बदल सावधानतेने केले पाहिजेत. 
 • वाढत्या उत्पन्नाचा एक भाग आपल्या भविष्यातील वाढत्या खर्चांसाठी म्हणून वेगळा काढून गुंतवायला विसरू नये. अशा वेळी दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचा आराखडा आपल्याला जास्त खर्च केल्यामुळे आर्थिक उद्दिष्टांवर होणारा दूरगामी परिणाम दाखवून देतो आणि महागड्या चुकांपासुन आपले संरक्षण करतो.
 • जास्त उत्पन्न असणारे, महागड्या गाड्या बाळगणारे किंवा गगनचुंबी इमारतीत राहणारे लोकच आर्थिकदृष्ट्या सुखी असतात असे नव्हे. बहुतेकदा ते कर्जाचे हप्ते भरण्याच्या विवंचनेत असतात आणि त्यामुळे नोकरी अथवा व्यवसाय यांवर पूर्णतः अवलंबून असतात. 

आर्थिकदृष्ट्या खरा सुखी तोच ज्याने ‘आर्थिक स्वावलंबन’ मिळवलंय आणि जो नोकरी अथवा व्यवसायावर आपली जीवनशैली कायम ठेवण्यासाठी अवलंबून नाही. तेव्हा प्रत्येकानेच ‘होऊ दे खर्च’ म्हणण्याचे टाळले पाहिजे.

बचत म्हणजे सन्मानाने जगायचा सोपा मार्ग

– प्राजक्ता कशेळकर

(प्राजक्ता या पुणेस्थित आर्थिक नियोजनतज्ञ आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा: http://pro-f.in/contact-us/ )

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Click to rate this post!
[Total: 4 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.