डिजिटल माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणं फसव्या जाहिरातीद्वारे ग्राहकाला आकर्षित करणं, फिशिंग मेसेजेस आणि बनावट लिंक्स पाठवून ग्राहकांच्या बँकेच्या खात्यांची माहिती मिळवणे हे सर्व म्हणजे डिजिटल युगाची एक काळी बाजू म्हणता येईल.
आजकाल फसव्या जाहिरातींसंदर्भात वृत्तपत्रामधे रोज तरी एक बातमी तरी असतेच. यात ऑनलाइन फसवेगीरी, शेअर मार्केटशी निगडीत फसवेगीरी यात वाढ झाल्याचे दिसून येते. यात जश्या वयोवृध्द व्यक्तीं फसवल्या जाण्याचे प्रमाण वाढत आहे तसेच अगदी तरुण मंडळी सुद्धा याला अपवाद नाही.याची काही उदाहरण बघायची म्हंटली तर काही अशी आहे –
- अर्थात फसवणूक करणारे लोक हे फसवणूक करताना व्यक्तीच्या वयोगटानुसार कारणं बदलतात असं दिसून येतं. म्हणजे तरुण मंडळीसाठी मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळवण्याच्या अमिषानं म्हणा किंवा वर्क फ्रॉम होमच्या अमिषानं नोकरी मिळवा अशा आशयाच्या जाहिराती ई-मेल, मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्स ॲपला पाठवले जातात. या सर्वाला गरजू आणि बेसावध तरुण मंडळी कायम बळी पडताना दिसतात.
महत्वाचे : हे आहेत 10 कारणं ,जिथे क्रेडिट कार्ड वापरणे असू शकते धोक्याचे !
- नोकरदार मंडळींना, इन्कमटॅक्स रिफंडसाठी तुम्ही अजून दावा केला नाही, रिफंड मिळवण्यासाठी ईमेल चेक करा किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करून रिफंडची रक्कम जाणून घ्या. असे विषय असणारे मेसेजेस पाठवले जातात. तेव्हा साहजिकच लिंकवर क्लिक करणे आले आणि बनावट वेबसाईटवर रक्कम पहिली की नेक्स्ट नेक्स्ट क्लिक करणं ही ओघाने आलंच ! आणि तिथेच या लोकांची फसवणूक होते.
- ऑनलाईन शॉपिंगचा चाहता वर्ग म्हणजे महिला देखील याला चुकल्या नाही. अमुक एक पार्सल अमुक एका ठिकाणी अडकले आहे, पत्ता सापडत नाही आणि एरिया पिन नंबर लिहिला नाही असे खोटे सांगण्यात येते. तुमचा एरिया पिन नंबर मॅप करण्यासाठी दिलेल्या नंबरवर Rs.1 ट्रान्स्फर करा, मॅप झाले की पार्सल मिळेल. किंवा इंटरनॅशनल पार्सल असेल तर तुमच्या पार्सलमधे ड्रग्स सापडले असून पार्सल कस्टम डिपार्टमेंटमधे अडकले आहे, बदनामी होऊ नये यासाठी अमुक एक रक्कम खात्यात जमा करा अश्या प्रकारे देखील लोकांची फसवणूक होत आहे आणि विशेष म्हणजे ही रक्कम समोरच्या व्यक्तीच्या खात्यात पाठवली पण जाते !
- शेअर मार्केटमधे होणारी फसवणूक म्हणजे फसवणूकीचा आजकाल सर्वात सोपा मार्ग झाला आहे. कमी गुंतवणुकीत जास्त नफा कमवा ! किंवा शेअर मार्केटमधे पैसे गुंतवा आणि खात्रीशीर दुप्पट पैसा मिळवा !! यासारख्या गोष्टीमधे अडकून अनेक लोक कमी वेळात जास्त पैसा मिळविण्यासाठी पैसे गुंतवताना दिसतात.आजूबाजूला घडणाऱ्या फसवणुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून अनोळखी लोकांवर विश्वास ठेवतात आणि स्वतः जवळचे लाखो रुपये वाया घालवतात. खरंतर शेअर मार्केटमधे अशी खात्री कुणी देऊ शकत नाही हे आपल्याकडच्या समजूतदार लोकांना कळणं आवश्यक आहे.
जाणून घ्या : डार्क पॅटर्न म्हणजे काय ?
फसवणूक टाळण्यासाठी काय करावं?
- अनोळखी व्यक्तीला फोनवर तुमच्या बँक खात्यांची माहिती देऊ नका. तसेच सार्वजनिक ठिकाणी क्रेडिट कार्ड /डेबिट कार्ड/एटीएम कार्ड यांच्या पिन नंबरचा उल्लेख करू नका.
- ईमेलवर आलेल्या कुठल्याही संदिग्ध लिंकवर क्लिक करू नका.
- मोबाईलवर आलेले जाहिरातींचे मेसेज उघडून बेसावधपणे स्वतःची कुठलीही महत्वाची माहिती देऊ नका.
- बँक किंवा वर म्हंटल्याप्रमाणे इन्कमटॅक्ससाठी मोबाईलवर मेसेज आला तर स्वतः शाखेच्या संबंधित अधिकारी व्यक्तीला फोनवरून विचारणा करा. बँक किंवा इन्कमटॅक्स डिपार्टमेंटमधून मोबाईल मेसेजवरून खात्याची माहिती मागवली जात नाही हे कृपया लक्षात असू द्या.
- मोबाइलवर आलेला ओटीपी अनोळखी व्यक्तीला पाठवू नका. तसेच ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी खात्री केल्याशिवाय स्कॅनरवर पैसे पाठवू नका.
- आपण फसवले गेले असाल तर लवकरात लवकर सायबर क्राईम डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रारीची नोंद करा.
- सामाजिक आणि आर्थिक बाबतीत सदैव जागरूक राहणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि समाजात जागरूकता वाढणं गरजेचं आहे. तरच फसवणूकीला काही प्रमाणात तरी आळा बसेल.
#आर्थिक फसवणूक , #बनावट वेबसाईट , #फसव्या जाहिरातीं, #fraud , #digital#awareness
#बनावट लिंक्स, #फिशिंग मेसेजेस