अपघाती मृत्यूला दहापट नुकसानभरपाई?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त असेल. गेले काही दिवस “अपघाती मृत्यूला मिळणाऱ्या नुकसानभरपाई” संदर्भात एक मेसेज वेगवेगळ्या पद्धतीने आणि विविध भाषांमधून व्हायरल होतोय.
काय आहे व्हायरल मेसेज?
“मित्रहो..
बऱ्याच सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना हे माहीत नाही की, मोटार वाहन कायदा, १९८८ (सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नागरी दावा क्र.९८५९, सन २०१३) अन्वये जर एखाद्या कर्मचा-याचे अपघाती निधन झाले आणि त्याने त्यापूर्वी सलग ३ वर्षांचा आयकर भरलेला असेल तर त्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पेन्शन रमकेच्या १० पट रक्कम त्याच्या वारसदारास मिळते. उदा.एखाद्या कर्मचा-यास रु.२५०००/- मासिक सेवानिवृत्ती वेतन मिळत असेल आणि त्याच्या अपघाती निधनापूर्वि त्याने सलग ३ वर्षे आयकर भरलेला असेल, तर त्याला त्याचे वार्षिक सेवानिवृत्ती वेतनाची रक्कम रु.२५०००×१२=३,००,०००/- च्या १० पट म्हणजे रु.३०,००,०००/- त्याच्या वारसदारास मिळणार. यासाठी अट एकच आहे की त्याने मागिल सलग ३ वर्षांचा आयकर भरलेला असावा. म्हणून सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे IT Returns वेळेवर भरावेत. सदर माहिती आपल्या ओळखीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी, ही विनंती.”
असाच एक इंग्रजी भाषेतील मेसेज व्हायरल होत आहे तो म्हणजे-
अपघाती मृत्यूला दहापट नुकसानभरपाई?
- वर नमूद केलेले मेसेजेस हे संपूर्णपणे चुकीचे आणि खोटे आहेत. मोटार वाहन अधिनियम, १९८८ मध्ये अशी कोणतीही तरतूद केलेली नाही.
- या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलेला “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नागरी दावा क्र.९८५९, सन २०१३” या दाव्यासंदर्भात देण्यात आलेला निकाल नीट वाचल्यास या मेसेजमधला फोलपणा लक्षात येईल.
- आयकर रिटर्न वेळेवर भरणे अत्यंत आवश्यक आहे. एक सुजाण नागरिक म्हणून आयकर रिटर्न भरणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आयकर रिटर्न वेळेवर भराच. पण अशाप्रकारच्या मेसेजेस मधून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका.
- नियम, कायदा या सगळ्या गोष्टी क्षणभर विसरून जा आणि जरा शांतपणे विचार करा, रोजच्या वर्तमानपत्रामध्ये अपघाती निधनाची किमान एक तरी बातमी असतेच.
- सन २०१९ मध्ये रस्ता अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा आकडा ४१०३२ एवढा होता. सन २०२० मध्ये सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये असलेल्या लॉकडाऊनमुळे अपघातांचे प्रमाण जवळपास ५०% ने कमी आले आणि हा आकडा होता २०७३२.
- आता विचार करा, एवढ्या सगळ्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या दहापट नुकसान भरपाई द्यायची असं ठरवलं, तर सरकारची तिजोरी काही दिवसातच रिकामी होणार नाही का?
मोटार वाहन अधिनियम, १९८८ कलम १६६
मोटार वाहन अधिनियम, १९८८ कलम १६६ नुसार
- अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाने नुकसानभरपाईसाठी करायचा अर्ज,
- त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे
- अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया
या संदर्भातील तरतुदी नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये कुठेही सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
मोटार वाहन अधिनियम, १९८८ कलम १६६ – महत्वाच्या तरतुदी
- या कलमानुसार, वाहन अपघातामध्ये एखाद्या व्यक्तीचा अथवा व्यक्तींचा मृत्यू झाल्यास अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास; अपघातास कारणीभूत असलेलल्या वाहनाच्या मालकाने; अपघातग्रस्त व्यक्तीच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे.
- सदर प्रकरणामध्ये नुकसानभरपाईची किंमत मोटार दुर्घटना दावा न्यायाधिकरणाद्वारे निश्चित केली जाते.
- यामध्ये सरकारकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईचा कुठेही उल्लेख केलेला नाही. अथवा आयकर रिटर्न भरण्याबद्दल किंवा न भरण्याबद्दलही कुठलाही उल्लेख केलेला नाही. मुळात या गोष्टींचा परस्परांशी काहीही संबंध नाही.
आमच्या काही सुजाण वाचकांनी सदर मेसेज पाठवून या मेसेजबद्दल विचारणा केली. तसेच, यावर एक लेख लिहावा अशी विनंतीही केली. अर्थसाक्षर.कॉम वर यापूर्वीही अशाच प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या मेसेज संदर्भात लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. हाच मेसेज पुढच्या वर्षी कोणत्यातरी नवीन पद्धतीने व्हायरल होईल. अशा प्रकारचे मेसेज हे अनेकदा ‘इंटरनेट व्हायरस’ प्रमाणे काम करतात. काहीवेळा अशा मेसेजेस बरोबर लिंक्स दिलेल्या असतात. त्या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईलमध्येही व्हायरस शिरु शकतो. तेव्हा असे मेसेज आल्यास सावध व्हा. त्यामधील सत्यता पडताळून पहा आणि खात्री झाली तरच पुढे पाठवा. आणि हो मेसेज ‘फेक’ असला तरी १० तारखेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, त्यामुळे आपले आयकर रिटर्न भरले नसतील तर ते मात्र आठवणीने भरा.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
web search: Fact check accidental death compensation, fact check viral message, fact check ten times compensation for accidental death