Financial Stress: अर्थकारण, स्वप्ने आणि जबाबदारी
आयुष्यात सर्व जबाबदाऱ्या पार पार पडता पाडता माणूस थकून जातो. शिक्षण पूर्ण होता होता, क्वचितप्रसंगी अगोदरच आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव होऊ लागते. नोकरी, लग्न, मुलांचा जन्म, त्यांचं शिक्षण, लग्न असं करत करत आपला वृद्धापकाळ जवळ येऊन ठेपतो आणि निवृत्तीपश्चात आयुष्याची जुळवाजुळव सुरु होते. जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत. आयुष्यभर आपण आर्थिक जबाबदारीचे ओझे (Financial Stress) डोक्यावर घेऊन जगत असतो. खरंतर हे ओझे हलके करणं मात्र आपल्याच हातात असतं. हे ओझं कसं हलकं करायचं याबद्दलची माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत.
हे नक्की वाचा: विवाहानंतरचे आर्थिक नियोजन
उत्पन्न आणि खर्च
- सर्वसामान्यपणे पैसे हातात येण्याआधी खर्चाचे विभाजन कुठेतरी डोक्यामध्ये चालू झालेले असते. उदा. पगार झाल्यानंतर अथवा दिवाळीचा बोनस मिळाल्यावर मला ही वस्तू घ्यायची आहे.
- “इथे झाले काय? तर पैसे येण्याआधीच त्या पैशांचा खर्च समोर उभा राहिला. याचे कारण आहे स्वतःकडून असणाऱ्या अपेक्षा. यातील काही अपेक्षा अवास्तव आणि खर्चिक वृत्तीला खतपाणी घालणाऱ्याही असू शकतात.
- पैसे हातात येण्याआधीच पैशांच्या वाटण्या मेंदूमध्ये झालेल्या असतात आणि सुरुवात होते मानसिक आणि बौद्धिक खर्चीकरणाला.
- काही खर्च आवश्यक व न टाळता येण्यासारखे असतात, ते बौद्धिक खर्च आणि जे खर्च आपण आपल्या इच्छा व स्वप्ने पूर्ण करण्यासाठीकरतो ते मानसिक खर्च.
- मग मानसिक खर्च करायचेच नाहीत का? नेहमी इच्छा मारूनच जगायचं का? तर तसं अजिबातच नाही.
- “थेंबे थेंबे तळे साचे” या लहानपणीपासून वाचलेल्या म्हणीचा प्रत्यक्ष आयुष्यात प्रयोग करायला सुरुवात केल्यास आपण खर्चाचे व्यवस्थापन करू शकतो.
Financial Stress: अर्थकारण, स्वप्ने आणि जबाबदारी
- आर्थिक जबाबदाऱ्यांचा सर्वात जास्त मानसिक ताण केव्हा येतो? जेव्हा आपण त्या जबाबदाऱ्यांचे स्वप्नात रूपांतर करतो. हे रूपांतर तेव्हा होते जेव्हा आपण स्पर्धा करायला लागतो.
- उदा. माझ्या भावाचा, मैत्रिणीचा, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांची मुले अमुक एका महागड्या शाळेत जातात, म्हणून मी देखील मुलांना त्याच शाळेत घालणार, किंवा माझे सर्व मित्र, मैत्रिणी, नातेवाईक अमुक एका ब्रँडच्या वस्तू वापरतात म्हणून मी पण त्याच ब्रँडच्या वस्तू वापरणार.
- ब्रँडेड किंवा महाग तेच चांगलं हा समज संपूर्णतः चुकीचा आहे. आपली गरज काय? आपल्यासाठी काय योग्य आहे, आपल्याला काय परवडेल या विचार करणे सुज्ञपणाचे लक्षण आहे. आपल्या इच्छांपेक्षा जास्त गरजेचं विचार करा.
- गरज आणि इच्छा यामधला फरक कसा ओळखायचा? एक सोपं उदाहरण बघूया -रु. ५००/- चा पिझ्झा तुमची इच्छा पूर्ण करू शकतो, गरज नाही. कारण तुमच्या शरीराला आवश्यक असणारी कोणतीही सकस गोष्ट त्यामधून मिळत नाही.
- तुमच्या मुलांचे हट्ट पूर्ण करणं, त्याला महागड्या शाळेत शिकवणं, त्यांना ब्रँडेड वस्तू घेऊन देणं ही तुमची आर्थिक जबाबदारी नाही. तुमच्या मुलाला उत्तम शिक्षण देणं, त्याला सुज्ञ नागरिक बनवणं ही तुमची आर्थिक जबाबदारी आहे.
- मुलांचे अनाठायी हट्ट पूर्ण करून एकप्रकारे तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत असता, मुलांच्या हौसेसाठी त्यांना कधीतरी पिझ्झा देणं ठीक आहे पण त्याचवेळी आपल्या मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव करून दिल्यास मुलंही समजुदार होतील.
संबंधित लेख: आर्थिक नियोजनासाठी पारंपरिक जपानी पद्धत ‘काकेइबो’!
२. अवास्तव स्वप्न :
- आर्थिक व्यवस्थापन करताना अवास्तव स्वप्न हा मोठा अडथळा असू शकतो म्हणूनच स्वप्न पाहताना वास्तववादी खर्चाचा विचार करा.
- अनेक वेळा सद्यस्थितीत असलेल्या आर्थिक परिस्थितीचा विचार न केल्यामुळे अवास्तव गोष्टींची खरेदी केली जाते.
- अवास्तव स्वप्नपूर्तीचा खर्च करण्यासाठी जर क्रेडिट कार्ड वापरले, तर तो न दिसणारा आर्थिक ताण वेताळासारखा मानगुटीवर बसू शकतो.
- याचा परिणाम आर्थिक घडी विस्कटण्यात जास्त होतो. म्हणूनच वास्तववादी विचारसरणी आणि आवश्यक जबाबदाऱ्यांचे खर्च यांचा पुरेपूर विचार करणे आवश्यक आहे.
- आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या व आपली स्वप्ने यामध्ये निश्चितच आपल्या जबाबदाऱ्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वात आधी जबाबदाऱ्यांसाठी आर्थिक तरतूद करून मगच स्वप्नांचा विचार करा.
३. दैनंदिन खर्चाचे व्यवस्थापन :
- दर महिन्याचे लाईट बिल, ईएमआय, शाळेचा खर्च, इत्यादी न चुकणाऱ्या खर्चाचे वेळापत्रक आपल्या समोर असेल, तर आर्थिक व्यवस्थापनामध्ये मदत होते. दैनंदिन खर्च वगळता काही पैशांचा भाग हा आपल्या शिदोरी मध्ये गेला पाहिजे ,ज्या शिदोरीला आपण हात लावणार नाही.
- बहुतेक वेळा पैसे बाजूला न ठेवण्याची अनेक कारण आसतात त्यातले एक कारण म्हणजे मुबलक पैसे आले की आपण बाजूला काढून ठेवू ही आशा.
- उदा. बोनस मिळाला की तो बाजूला ठेवू. पण वर सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात तो मिळाल्यावर खरंतर मिळायचे निश्चित झाल्यावर त्याच्या खर्चाची योजना निश्चित झालेली असते.
- दैनंदिन खर्चाचे व्यवस्थापन करतानाही काही गोष्टी आपण टाळू शकतो. यासाठी सर्वात आधी आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
४. बचत व्यवस्थापन :
- दैनंदिन खर्चाचे व्यवस्थापन झाल्यावर नियमित बचतीची सवय आपोआपच लागेल.
- अगदी लहान मुलांच्या पिगी बँक पासून ते गृहिणींपर्यंत सगळे जणं कळत नकळत काही रक्कमेची बचत करत असतात. परंतु हे जाणीवपूर्वक करणेआवश्यक आहे.
- आपल्या दैनंदिन खर्चाचे व्यवस्थापन केल्यास ही गोष्ट आपल्याला सहज शक्य आहे.
- सुरुवातीला बचतीचा ताण न घेता शक्य तेवढी रक्कम नित्यनियमाने बाजूला काढून ठेवायची. कमीत कमी रकमेपासून सुरुवात केल्यास आर्थिक घडीवर फारसा परिणाम होणार नाही.
हे नक्की वाचा: आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब.
५. गुंतवणूक व विमा :
- दैनंदिन खर्चाचे व्यवस्थापन जमल्यावर तुम्हाला बचतीची सवय लागेल. ठरविक रक्कम जमा झाल्यावर आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांची क्रमवारी लक्षात घेऊन त्याप्रमाणे गुंतवणूक सुरु करा.
- सुरुवातीला अगदी छोट्या रकमेपासून सुरु केलेली गुंतवणूक हळूहळू वाढवत चला. हे सर्व करताना कोणताही ताण येणार नाही याची काळजी घ्या.
- गुंतवणुकीसाठी सुरुवातीला म्युच्युअल फंडाच्या एस.आय.पी. योजनेसारखी छोट्या रकमेची गुंतवणूक सुरु करा. एकदम मोठी उडी घ्यायला जाऊ नका. आवश्यकत वाटल्यास गुंतवणूक नियोजकाचा सल्ला घ्या.
- गुंतवणुकीबरोबरच मुदतीचा विमा, आरोग्य विमा आणि आयुर्विमा या तीन प्रकारच्या विमा पॉलिसी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
- विमा म्हणजे भविष्यातील आर्थिक अडचणींची तरतूद असते. त्यामुळे विमा खरेदी करणं हे इतर कोणत्याही ब्रँडेड वस्तू खरेदी कारण्याइतकंच आवश्यक आहे.
पूर्वीच्या काळी आर्थिक व्यवस्थापन आज सारखे प्रगत नसतानाही चांगल्या आर्थिक सवयींचे संस्कार होते. लहानपणापासून आपण आजीच्या अनुभवाच्या ठेव्यातल्या काही गोष्टी ऐकत आलो आहोत. बस! आजी-आजोबा, आई-बाबा यांच्या दैनंदिन खर्चाचा व खर्चाच्या मानसिकतेचा विचार केल्यास तुमच्या लक्षात येईल ते जे करत होते त्यापेक्षा फार काही वेगळं करायचं नाहीये. आपल्या संस्कृतीमधील संस्कारांचे अनुसरण करायचे आहे आणि त्याला आधुनिक गुंतवणुकीची जोड द्यायची आहे. हे केल्यास निश्चितच आपल्या जबाबदारीचे ओझे होईल.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Financial Stress Marathi Mahiti, How to Manage Financial Stress Marathi Mahiti, Financial Stress in Marathi