आयकर रिटर्नमध्ये जीएसटीची माहिती

Reading Time: 2 minutes

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, वर्ष २०१७-१८ आयकर रिटर्न दाखल करावयाची करदात्यांसाठी शेवटची तारीख ३१ जुलै आहे. या आयकर रिटर्नमध्ये जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे म्हणे. ती माहिती कशी द्यायची आहे ते सांग?

कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ३ महिने व्हॅट कायदा व ९ महिने जीएसटी कायदा लागू होेता. या आधी अप्रत्यक्ष कर कायद्याची उलाढाल व इतर माहिती आयकर रिटर्नमध्ये द्यावयाची गरज नव्हती, परंतु आता शासनाने आयकर रिटर्नमध्ये जीएसटीची माहिती नमूद करावयास सांगितले आहे.

अर्जुन : कोणत्या करदात्याला जीएसटीची माहिती द्यावी लागेल?

कृष्ण : ज्या व्यक्तीचे उत्पन्न व्यवसायापासून आहे व जो जीएसटीमध्ये नोंदणीकृत आहे, त्याला जीएसटीची माहिती द्यावी लागेल. ज्या व्यक्तीचे उत्पन्न नोकरीपासून व इतर उत्पन्न असेल, तर त्याला आयकराचा आयटीआर १ व आयटीआर २ दाखल करावा लागतो. त्यामध्ये जीएसटीच्या माहितीची गरज नाही. आयटीआर ३ ते ६ मध्ये जीएसटीची माहिती द्यावी लागेल. ज्या व्यवसायिक वैयक्तिक व एचयूएफ करदात्यांचे टॅक्स आॅडिट नाही, त्यांना आयटीआर-३ किंवा-४, ३१ जुलैआधी दाखल करावा लागेल.

अर्जुन : आयटीआर ३ मध्ये कोणती माहिती द्यावी लागेल?

कृष्ण : आयटीआर ३ मध्ये जीएसटीची द्यावी लागणारी माहिती खालील प्रमाणे :

१. करदात्याला विक्रीवरील सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटी किती आकारला, ती रक्कम नमूद करावी लागेल. ही माहिती करदात्याला जीएसटी पोर्टलवरील इलेक्ट्रॉनिक लायबलिटी रजिस्ट्ररसोबत जुळवून घ्यावी लागेल.

२. करदात्याला खरेदीवरील सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटीच्या क्रेडिटची माहिती द्यावी लागेल. ही माहिती करदात्याला जीएसटी पोर्टलवरील इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर रजिस्ट्ररसोबत जुळवून घ्यावी लागेल.

३. करदात्याला त्याने वर्षभरात जीएसटी भरल्याची माहिती नमूद करावी लागेल. ही माहिती जीएसटी पोर्टलवरील इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर रजिस्ट्ररसोबत जुळवून घ्यावी लागेल.

४. करदात्याला सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटीची ३१ मार्च २०१८ चे देय रक्कम रिटर्नमध्ये नमूद करावी लागेल.

५. जर शासनाकडून जीएसटीचा रिफंड येणे बाकी असेल, तर त्याची माहिती रिटर्नमध्ये द्यावी लागेल.

अर्जुन : काय बोध घ्यावा?

कृष्ण : जीएसटीचे हे पहिले वर्ष असल्यामुळे करदात्याच्या हातून रिटर्न भरताना अनेक चुका झाल्या. त्यामुळे रिटर्न व हिशेबाची वह्या-पुस्तके जुळवताना करदात्यांची कसरत आहे. परंतु करदात्याने आयकर रिटर्न भरण्याच्या आधी ते जुळवून घ्यावे.

अजुर्न : कृष्णा, आयटीआर ४ मध्ये जीएसटीची कोणती माहिती द्यावी लागणार आहे?

कृष्ण : अर्जुना, आयटीआर ४ मध्ये जीएसटीच्या रिटर्नमध्ये दाखविलेली उलाढालीची रक्कम नमूद करावी लागेल. करदात्याने दाखल केलेल्या जीएसटीआर १ रिटर्नमधून ती मिळेल, तसेच करदात्याचा जीएसटीचा नंबर या रिटर्नमध्ये नमूद करावा लागेल.

सी. ए. उमेश शर्मा

(आयकर रिटर्नमध्ये जीएसटीची माहिती मराठी अर्थसाक्षर| GST Details In IT Return Marathi Arthasakshar)

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *