तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

Reading Time: 4 minutes

आजकाल आपल्या अवतीभवती पैशांबद्दल काळजी करण्याचा मानसिक आजारच जडला आहे. अर्थप्राप्ती, उदरनिर्वाह, भविष्यातली तरतूद यांबद्दल केवळ विचार किंवा चिंता व्यक्त करत बसल्याने काहीही साध्य होणार नाही. या काळजीचा फक्त तुमच्यावरच नव्हे तर सभोवतालच्या वातावरणावरही वाईट व नकारात्मक परिणाम होत असतो. तर हा परिणाम कश्या पद्धतीने होतो, ते पाहूया. 

१. वेळेचा अपव्यय : 

 • चिंता माणसाला सतत पोखरत असते. सतत नकारात्मक गोष्टींचा विचार करत बसू नका. केवळ विचाराने काहीच साध्य होणार नाही. 
 • असा अनावश्यक विचार करण्यासाठी कमी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी जास्त वेळ खर्च करा. 
 • सतत चिंता केल्याने काहीच बदल घडून येत नाही. उलट यामुळे इतर कुठल्याच गोष्टीचा आनंद घेता येत नाही.

२. चिंता आनंदाला दूर ठेवते :

 • जेव्हा तुम्ही चिंतेत अथवा कसल्या तरी काळजीत असता, तेव्हा सहज मिळणारा, भोवतालच्या अनेक गोष्टींमधला आनंद तुम्ही गमावता. म्हणजे एका गोष्टीच्या काळजीपोटी बाकीच्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्षच की!
 • उदा. तुमचे महिन्याचे आर्थिक बजेट गडगडले आहे. तुम्ही विवंचनेत आहात. अशा वेळी काळजीत असताना तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत खेळणार नाही.
 • अशी काळजी करत राहिलात, तर कदाचित तुमची आर्थिक स्थिती थोडीफार सुधारेल किंवा तुम्हाला अपेक्षित असलेल्या टप्प्यात येईल. पण त्यामुळे तुमच्या मुलासोबत खेळण्याचा आनंद तुम्हाला मिळणार नाही. 
 • एक लक्षात घ्या, पैशांबरोबरच तुमचे कुटुंब, नातेवाईक, आरोग्य यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आहेत. अनावश्यक चिंता कमी कराल, तर अनेक नवनवीन योजना आखता येतील. तुम्हाला उत्साह येईल. नवीन नियोजन करता येईल. थोडक्यात, पैशांशिवाय प्राधान्य देण्यासारख्या इतरही बऱ्याच गोष्टी आहेत.

आर्थिक मंदीचा  सामना कसा कराल?

३. आरोग्यम धनसंपदा : 

 • दिवसभर सतत आर्थिक विवंचनेत असणं योग्य नव्हे, तितकंच लक्ष आरोग्याकडे ही द्यावं. सतत चिंता केल्याने डोकेदुखी, अल्सर, छातीत दुखणे, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक विकारांना नाईलाजाने बळी पडावे लागते. त्यामुळे चिंता कितपत करावी, हे ही ठरवा. 
 • चिंता करत आयुष्य जगण्यापेक्षा आरोग्यदायी  आयुष्य जगा.

४. दुरावलेली नाती :

 • आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की चिंता अथवा काळजी करण्याने साध्य काहीच होत नाही. सततच्या नकारात्मक मनस्थितीने भोवतालच्या घटकांवर मात्र तुम्ही परिणाम करता. यामुळे तुमचे कुटुंब, अनेक नाती-संबंध नकळत तुमच्यापासून दुरावली जातात, हे तुमच्या लक्षात ही येत नाही. 
 • उदा. आर्थिक व्यवहारांबाबत तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलत नाही अथवा त्याला कल्पना देत नाही. यामुळे तुमचा जोडीदार दुखावला जाऊ शकतो. 

अर्थसाक्षर कथा – संपत्ती आणि नातेसंबंध

५. वर्तनविषयक समस्या :

 • सततच्या काळजीने आलेले नैराश्य घालवण्यासाठी नेहमीच चुकीचा मार्ग शोधला जातो.
 • नैराश्यापासून सुटका होण्यासाठी धूम्रपान, मद्यपान यांचा आधार घेतला जातो. पण हे अतिशय चुकीचे आहे. यामुळे तुमची काळजी दूर होणार नाहीच, पण आरोग्यावर परिणाम मात्र होईल. 

तुमच्या विचारांचा प्रवाह किंवा मार्गच बदला.

तुमच्या आर्थिक चिंता दूर करण्यासाठी २ मुख्य मार्ग आहेत-

१.  तुमचे विचार बदला.

२. तुमची कृती बदला.

हे दोन्ही बदल जर तुम्ही आयुष्यात लागू केलेत तर, नक्कीच तुमच्या आयुष्यावर याचा चांगला परिणाम होईल, तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंदी आयुष्य व सुखी कुटुंब मिळेल.

पैशावरून तुमची जोडीदाराबरोबर भांडणे होतात का?

१. सकारात्मक बोला, विचार करा.

शब्दांमध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा किंवा ताकद असते. ती वापरा. सतत सकारात्मक विचार करा. अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी स्वतःला सतत बजावत रहा. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच खरेदी करा. म्हणजे साठवलेली, वाचवलेली रक्कम (सेव्हिंग) तुम्हाला उर्वरित आयुष्यासाठी उपयोगी पडेल.

२. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करा. आशा गमावू नका. आशा गमावल्याने तुमचा परिस्थितीवरचा ताबा सुटू शकतो. आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी तुम्हाला हे करायलाच हवं. तुमच्याजवळ असलेल्या इतर ही चांगल्या गोष्टींचा विचार करा. उदा. आरोग्य, तुमचे कुटुंब, मुले, नोकरीतील स्थिरता इत्यादी. 

३. वर्तमानात जगा.

भविष्याचा विचार करा, त्यासाठी तरतूद करा, पण वर्तमानात जगा. भविष्याचा अतिविचार करणं किंवा भूतकाळातल्या गोष्टी सतत आठवणं आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे वर्तमानात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा, घटनांचा आनंद घ्या. 

४. अपयशाचे विचार टाळा

अपयश हे कधीच अंतिम नसते. तो एक आपल्या प्रवासातील टप्पा आहे. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी असलेल्या लोकांनाही अपयशाचा सामना करावाच लागला आहे. त्यामुळे अपयशी ठरणारे तुम्ही जगातली पहिली व्यक्ती नाही, हे समजून घ्या. 

५. क्षणभर विश्रांती.

जेव्हा अपयशाचे किंवा नैराश्याचे विचार सतत डोक्यात येतील तेव्हा काही काळ रुटीन बाजूला ठेऊन मनोरंजन होईल, असे काही करा. जिम किंवा योगा क्लासला जा. यामुळे तुमचे मन ताजेतवाने व शरीर तंदुरुस्त होईल आणि तुमच्या आव्हानांचा सामना करायला तुम्ही पुन्हा एकदा सज्ज व्हाल. 

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

हे सगळे वैचारिक बदल झाले. आता वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात कशा प्रकारे बदल करायला हवेत, ते पाहू.

१. निश्चित वेळ-

जर तुम्ही आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक बाबी रोजच पाहत असाल, उदा. रोज बँकेतील शिल्लक तपासून पाहणे. तर हे टाळा. आठवड्यातली एखादा दिवस या सर्व बाबी तपासण्यासाठी फिक्स करा. रोज जर आर्थिक व्यवहार पाहत रहाल तर चिंता वाढतच जातील.

२. बजेट तयार करणे-

तुमचे नियमित होणारे खर्च, आरोग्य, इतर खर्च यांचं एक बजेट तयार करा. यामुळे अनावश्यक खर्चाची तुम्हाला कल्पना येईल. हे अनावश्यक खर्च टाळण्याने तुमचं बरचसं  सेव्हिंग ही होईल.

३. इमर्जन्सी फंड-

अचानक उद्भवणाऱ्या खर्चांसाठी, किंवा एखाद्या अत्यावश्यक वेळी वापरता यावी म्हणून एक ठराविक रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला काढत जा. हे ही सेव्हिंगच आहे.

‘आकस्मिक निधी’ हाताशी हवाच!

४. उत्पन्नाचे स्रोत वाढवा-

घरातील सर्व सदस्यांनी उत्पन्नाचे स्रोत वाढवणे हा चांगला उपाय आहे. उदा. पती जर नोकरी करत असेल व पत्नी गृहिणी असेल, तर ती घरबसल्या व्यवसाय सुरू करू शकते. अथवा अर्धवेळ नोकरी करू शकते. किंवा पत्नी जर पूर्णवेळ नोकरी करत असेल आणि तिचा पती व्यावसायिक असेल, तर तो आणखी एक नवा व्यवसाय सुरू करू शकतो. 

५. ऐशोआराम टाळा-

जर तुम्ही सतत भविष्याविषयी काळजी करत असाल, आर्थिक विवंचनेत असाल तर ही चिंता कमी करण्यासाठी ऐशोआरामात जगणे टाळा. तुम्ही सतत अनावश्यक खरेदी करत असाल, हॉटेल्स मध्ये सतत जात असाल, थोडक्यात लक्झरीयस आयुष्य जगत असाल तर हे बंद करा. या गोष्टींना योग्य पर्याय शोधा. गरज असेल तितकीच खरेदी करा. हॉटेल्स मध्ये जाण्याऐवजी आरोग्यदायी अन्न सोबत ठेवा.

तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?

६. गुंतवणूक व साठवणूक-

तुमच्या प्राप्तीच्या किमान १०% रक्कम योग्य ठिकाणी गुंतवा. अनावश्यक खर्च टाळत साठवलेली ही रक्कम तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल व तुमची चिंताही दूर होईल. 

रिच डॅड पुअर डॅड – श्रीमंतीचा प्रवास 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

टेलिग्राम ॲपवर आम्हाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आमचे @arthasakshar हे चॅनेल सबस्क्राइब करा-  

https://t.me/arthasakshar

Disclaimerhttps://arthasakshar.com/disclaimer/  

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *