आपत्कालीन निधी म्हणजे पैशांची बचत करून अडचणीच्या काळासाठी बाजूला ठेवलेला निधी. नैसर्गिक संकट, आजारपण, अपघात याप्रसंगी नोकरी किंवा व्यवसाय बंद राहिला तर इमर्जन्सी फंडचा उपयोग होतो.
आपत्कालीन निधी (Emergency Fund) कोणासाठी किती असावा हे तुमच्या गरजांनुसार ठरवले जाते.
आपत्कालीन निधी कसा जमा करावा?
आपत्कालीन निधी हा सहा ते आठ महिन्यांच्या खर्चाइतका जमा करून ठेवावा. आपत्कालीन निधी जमा करताना नियमीत बचतीची सवय होते.
खाली काही टप्पे दिले आहेत जे आपत्कालीन निधी जमा करण्यामध्ये तुम्हाला मदत करतील.
१. मासिक गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी.
- सर्वात प्रथम आपत्कालीन निधी तयार करताना ठराविक मासिक रकमेची गुंतवणूक करावी. मासिक रकमेतून खर्च आणि पगाराचा ताळमेळ करून बचतीस सुरुवात करता येते.
- बचत करण्यासाठी तुम्ही किती रक्कम गुंतवू शकता याकडे लक्ष द्यायला हवे. आपत्कालीन निधीचे उद्दिष्टय पूर्ण होईपर्यंत मासिक गुंतवणूक करत राहावे.
२. वेगळे खाते तयार करा
- तुम्हाला पैसे आपत्कालीन निधीतून खर्च होण्याची भीती वाटतं असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या नावाचे दुसरे बँक अकाउंट उघडायला हवे.
- तुम्ही तुमचा आपत्कालीन निधी ठेवण्यासाठी दुसरे खाते वापरू शकता. तुमची मासिक बचत आणि अतिरिक्त निधी या खात्यामध्ये बचत करून आपत्कालीन निधी तयार करू शकता.
नक्की वाचा – बचत करा, बचत करा ! – पैसे वाचवायच्या ११ महत्वपूर्ण टिप्स
३. योग्य गुंतवणूक करा
- तुम्ही जेव्हा आपत्कालीन निधीची गुंतवणूक करता तेव्हा त्याची बचत योग्य आणि सुरक्षित पद्धतीने होणे गरजेचे आहे. तो आपत्कालीन निधी तात्काळ उपलब्ध व्हायला हवा.
- आपत्कालीन निधी हा बाजारातील बदलांपासून स्थिर राहायला हवा. तुम्ही लिक्विड फंडामध्ये हा निधी ठेवल्यावर त्याच्यात वाढ होऊन जेव्हा गरज भासेल तेव्हा तो सहज सोप्यारितीने उपलब्ध होतो.
४. लक्ष्य तयार करा
- तुम्ही तुमचा आपत्कालीन निधी उभा करण्यासाठी एक लक्ष्य ठरवून घेऊ शकता. जेव्हा ते लक्ष्य तुम्ही ठरवून घ्याल तेव्हा त्यादृष्टीने वाटचाल सुरु होते.
- तुम्ही बचत लवकर करायला सुरुवात केली की आपत्कालीन निधी लवकर उभा करता येतो. त्यामुळे लक्ष्य ठेवून आपत्कालीन निधी उभा करणे कधीही चांगलेच ठरते.
नक्की वाचा : Emergency Fund: आपत्कालीन निधी किती असावा?
५. अतिरिक्त गुंतवणूक आपत्कालीन निधीत वळवा
- तुमच्याकडे आधीच काही गुंतवणूक असेल तर तिला तुम्ही आपत्कालीन निधीमध्ये गुंतवू शकता..
- तुमच्याकडे आपत्कालीन निधीमध्ये गुंतवायला पैसे नसतील तरी रोज थोडे थोडे करून पैशाची गुंतवणूक करू शकता.
६. खर्च कमी करा
- तुम्ही तुमचा अनावश्यक खर्च कमी केल्यावर बचतीमध्ये वाढ होऊ शकते. तुम्ही जेव्हा दररोज बाहेर जेवण, चित्रपट पाहणे यावरील खर्च कमी करता तेव्हा तीच रक्कम गुंतवणूक म्हणून आपत्कालीन निधीमध्ये करू शकता.
- आपत्कालीन निधीमध्ये बचत केल्यानंतर दुसरे खर्च आणि क्षणिक आनंद पुढे ढकलू शकता.
७. गुंतवणूक स्वयंचलित करा
- तुम्ही तुमच्या खात्यातून गुंतवणूक स्वयंचलित केली म्हणजे दरमहा काही रक्कम दुसऱ्या खात्यात वळते करायची सूचना बँकेला दिली तर तुम्हाला जास्त लक्ष ठेवण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे स्वयंचलित केलेली गुंतवणूक आपत्कालीन निधीमध्ये भर टाकत राहील.
- गुंतवणूक जर स्वयंचलित केली तर नियमितपणे निधी वाटप होतोय का नाही याची काळजी करण्याची गरज पडणार नाही.
८. गुंतवणुकीतील प्रगतीचा मागोवा घेत राहा
- तुम्ही गुंतवणुकीतून बचत करत असाल तर अशी पद्धत विकसित करा की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बचतीवर लक्ष ठेवता येईल.
- यामुळे तुम्ही गुंतवलेले पैसे किती वाढले आणि किती कमी झाले यानुसार तुम्हाला गुंतवणुकीचा आढावा घेणे सोपे राहील. या माध्यमातून गुंतवणुकीत कुठून किती पैसे येतात आणि कुठे किती जातात यावर लक्ष ठेवता येईल.
९. आपत्कालीन निधीतून विनाकारण पैसे खर्च करू नका
- तुमच्या आपत्कालीन निधीमधून विनाकारण जास्त पैसे खर्च करू नका. आपत्कालीन निधी हा जेव्हा गरज भासेल तेव्हा काढायचा निधी आहे. हा निधी अडचणीच्या वेळेस अचानक उपलब्ध होऊ शकतो.
- त्याच्यातील पैसे जर विनाकारण खर्च केले तर भविष्यासाठी आपत्कालीन निधी राहणारच नाही. त्यामुळे हा निधी साठवणूक करून ठेवा आणि गरज असेल तेव्हाच त्याच्यातील पैसे खर्च करा.
१०. अतिरिक्त रक्कमेची बचत करत राहा.
- वर्षाच्या शेवटी किंवा दिवाळीच्या सणाला भेटवस्तू म्हणून बोनस दिला जातो. त्या वेळेस गरजेपुरते पैसे बाजूला काढून उरलेली रक्कम आपत्कालीन निधीमध्ये गुंतवावी.
- तुम्ही अनपेक्षित रित्या पैसे जोडत राहिले तर आपत्कालीन निधी तयार होण्यातील प्रगतीच्या दृष्टीने लवकरच तुम्ही पोहचता.
कोरोना लॉकडाउनच्या काळात आपत्कालीन निधीची गरज सर्वानाच जाणवली होती. त्यामुळे अनावश्यक खर्चाला मुरड घालून ६ ते ८ महिन्याच्या कालावधीसाठी आपत्कालीन निधी उभारायला हवा.
(Emergency Fund Marathi information)
नक्की वाचा : कोविड महामारीने शिकवलेले पैसे वाचवण्याचे सहा धडे