Reading Time: 5 minutes

मेहनतीचा पैसा वाचवण्यासोबतच तो वाढवायलाही हवा. संपत्ती निर्मिती ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाची बाब आहे. संपत्ती ही फक्त वर्तमानातील आयुष्य जगण्यासाठी नव्हे, तर वाढत जाणाऱ्या गरजा, महागाई, पुढे बदलत जाणारी आपली आर्थिक उद्दिष्टे या सर्व गोष्टींचा विचार करता, भविष्यातील आयुष्य जगण्यासाठी देखील संपत्ती आवश्यक आहे.

कारण संपत्ती म्हणजे जीवनाचा पूर्णपणे अनुभव घेण्याची क्षमता !

 

या संपती निर्मितीसाठी लागणारी  महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूक (Investment). गुंतवणूक म्हणजे तुमच्या भविष्यासाठीचे आर्थिक नियोजन. योग्य तो परतावा मिळवण्याच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करायला हवी. 

 

या लेखामध्ये, गुंतवणुक का महत्त्वाची असते, गुंतवणूक कुठे करावी (Investment Options), यांसारखी गुंतवणुकीची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. 

 

गुंतवणूक का करावी ?

 • वाढत चाललेली महागाई व त्यांमुळे वाढत चाललेल्या आर्थिक गरजा लक्षात घेता, प्रत्येकाला त्यांच्या बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. कारण जितके जास्त पैसे तुम्ही बचत कराल तितकेच जास्त आत्मविश्वासाने तुम्ही आर्थिक अडचणींना सामोरे जाल. 
 • बचत करण्याबरोबरच तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी  गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कारण तुमचे भविष्य सुखी व समाधानी  असण्यासाठी गुंतवणूक हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे.   
 • नियमित गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही नियमितपणे एक रक्कम बाजूला ठेवायला हवी. 

 

महागाईचा प्रभाव आणि गुंतवणुकीचे महत्त्व –

 • आजकाल महागाई म्हणजे भाववाढीमुळे तुमच्याकडील पैशांची किंमत कमी होते.
 • जेव्हा महागाई दर वाढतो, तेव्हा तेवढ्याच किमतीमध्ये कमी वस्तू खरेदी केल्या जातात. महागाई दरावर तुमचे नियंत्रण नसते. 
 • जर तुम्हाला या महागाईच्या जगात सुखी समाधानाने राहायचे असेल, तर तुम्ही बचत करणे व बचतीतून मिळणाऱ्या परताव्याव्दारे ‘पैशाने पैसा वाढवणे’ आवश्यक आहे. 
 • जर तुम्हाला पैसा वाढवायचा असेल, तर अधिक परतावा मिळवावा लागेल. अधिक परतावा मिळविण्यासाठी, तुम्हाला गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्यामुळे महागाईचा सामना करण्यासाठी गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. 

 

गुंतवणुकीचे प्रकार –

 • गुंतवणूकीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्याही विशिष्ट गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या गरजांचे आकलन करावे लागेल. 
 • गुंतवणुकीची स्थूलमानाने सक्रिय गुंतवणूक आणि निष्क्रिय गुंतवणूक अशी विभागणी केली जाते – 

 

1) सक्रीय गुंतवणूक म्हणजे काय ?

 • सक्रीय गुंतवणूक म्हणजे गुंतवणूकीची वारंवार खरेदी, विक्री करणे व त्यातील हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवणे. 
 • या गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ व गुंतवणुकीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 • इक्विटी ट्रेडिंग हे सक्रिय गुंतवणुकीचे उत्तम उदाहरण आहे.

 

2) निष्क्रिय गुंतवणुक म्हणजे काय ?

 • इथे गुंतवणूकदार दीर्घ काळापासून गुंतवणुकीतून नफा कमावण्याचा प्रयत्न करतात.
 • निष्क्रिय गुंतवणूक हा जगभरात लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे. 
 • किमान विक्री आणि खरेदीसह जास्तीत जास्त परतावा मिळवणे हे या गुंतवणुकीचे उद्दिष्ट आहे. 
 •  दीर्घकालीन शेअर्स खरेदी, स्थावर मालमत्ता खरेदी, मुदत ठेवी ही काही निष्क्रिय गुंतवणुकीची उदाहरणे आहेत. 

 

गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याल ?

गुंतवणूक करताना पैसे कोठे गुंतवावेत याची योग्य निवड करणे महत्त्वाचे आहे. कारण, चुकीची गुंतवणूक निवड केल्याने तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

तुमचे गुंतवणूक पर्याय निवडताना खाली दिलेल्या मुद्द्यांचा विचार करा –

 

1) वय –

  • शक्यतो, तरुण गुंतवणूकदारांकडे कमी जबाबदाऱ्या असतात व गुंतवणुकीची क्षमता जास्त असते. 
  • जेव्हा तुमच्यासमोर दीर्घ व्यावसायिक जीवन असते, तेव्हा तुम्ही दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवणूक करू शकता आणि वेळोवेळी तुमचे उत्पन्न वाढते. त्यामुळे तुम्ही तुमची गुंतवणूक वाढवत राहू शकता. 
  • म्हणूनच, तरुण गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवींपेक्षा इक्विटी म्युच्युअल फंडासारखा गुंतवणूकीचा हा उत्तम पर्याय असेल. 
  • दुसरीकडे, वयस्कर  गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी एफडी सारख्या सुरक्षित मार्गांची निवड करू शकतात. 
  • जसजसे तुमचे वय वाढत जाईल तसतसे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत बदल करावे लागतील

तुम्ही कधी निवृत्त होणार, यापेक्षा किती पैसे जवळ असताना निवृत्त होणार, हे अधिक महत्त्वाचे असते.


2) ध्येय –

 • तुम्ही अल्प-मुदतीच्या उद्दिष्टासाठी, सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायंची निवड केली पाहिजे व दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी, इक्विटी सारख्या उच्च परतावा देणाऱ्या पर्यायांचा  तुमच्या उत्पन्न क्षमतेचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे.
 • मुलांचे शिक्षण किंवा घरासाठी डाउन पेमेंट यांसारख्या आवश्यक गरजांसाठी मुदत ठेवी  हा एक चांगला पर्याय असेल. 

 

3) प्रोफाइल –

 •  गुंतवणुकीचा पर्याय निवडताना आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे तुमची प्रोफाइल. तुम्ही किती कमावत आहात व भविष्यात कितीजण तुमच्यावर अवलंबून आहेत यांसारखे घटक देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. 
 • कोणीही आश्रित नसलेले किंवा स्थिर उत्पन्नाचे स्रोत नसलेली एखादी वृद्ध व्यक्ती जास्त परतावा मिळविण्यासाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे निवडू शकते. 
 • गुंतवणुकीचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी काळजीपूर्वक आणि योग्य ते नियोजन कारण आवश्यक आहे.

 

मी माझ्या गुंतवणुकीचे नियोजन कसे करावे ?

तुमच्‍या गुंतवणुकीचे नियोजन करण्‍याची पहिली पायरी म्हणजे तुमच्‍या प्रोफाईल व गरजांनुसार योग्य गुंतवणूक पर्याय शोधणे. तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करताना खालील काही गोष्टी लक्षात ठेवा- 

 

 • पुरेसे संशोधन केल्यानंतर काळजीपूर्वक गुंतवणूक पर्याय निवडा.
 • कमी कालावधीमध्ये उच्च परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या ‘ त्वरित श्रीमंत’ बनवण्याचे दावे करणाऱ्या भामट्या योजनांना बळी पडू नका.
 • तुमच्या स्टॉक आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकींचे वेळोवेळी पुनरावलोकन करा.
 • तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर मिळवलेल्या परताव्यावरील प्राप्तीकर परिणामांचा विचार करा.
 • तुम्हाला समजत नसलेली गुंतागुंतीची गुंतवणूक करणे शक्यतो टाळा.

 

जितक्या लवकर तुम्ही गुंतवणुकीस सुरुवात कराल तितके चांगले..

 

 • तुम्ही गुंतवणूक करण्यास लवकरात लवकर सुरुवात करावी. गुंतवणुकीचा विचार केला, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ म्हणजे पैसा आहे. 
 • तुम्ही जितक्या लवकर गुंतवणुकीस सुरुवात कराल, जास्त वेळ गुंतवणुकीत राहाल, तितके जास्त परतावे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर मिळवू शकाल. 
 • समजा, तुम्ही जर ३५ वर्षांचे असाल आणि तुम्ही दरमहा रू. ८,००० म्युच्युअल फंडात एसायपी द्वारे गुंतवले तर तुम्ही ५८ वर्षांचे होईपर्यंत, तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास १ कोटी १८ लाख रुपये होऊ शकेल.  

 

एक रुपयांची बचत म्हणजे एक रुपया कमावणे होय !

 

भारतातील लोकप्रिय गुंतवणूक पर्याय –

 

1) थेट शेअर्स गुंतवणूक (डायरेक्ट इक्विटी)

 • जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा स्टॉक खरेदी करता, तेव्हा तुम्ही त्या कंपनीची आंशिक मालकी खरेदी करता. म्हणजेच तुम्ही त्या कंपनीच्या वाढीमध्ये व विकासामध्ये थेट गुंतवणूक करता. 
 • तुमच्या गुंतवणुकीचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असणे व त्या विषयीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ते ज्ञान तुमच्याकडे नसेल तर थेट इक्विटी द्वारे गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फ़ंडात गुंतवणूक करणे हे अधिक सोयीस्कर आहे. 

 

2) म्युच्युअल फंड

 • कोणतीही व्यक्ती म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकते. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमची गुंतवणूक सुरू ठेऊ शकता किंवा ती थांबवूही शकता. 
 • म्युच्युअल फंड मोठ्या प्रमाणात इक्विटी, डेट आणि हायब्रीड फंडमध्ये विभागलेले आहेत. 
 • इक्विटी म्युच्युअल फंड, स्टॉक आणि इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात, तर डेट म्युच्युअल फंड, बाँड्स आणि पेपर्समध्ये गुंतवणूक करतात.
 • यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे वेळ किंवा त्याविषयीचे ज्ञान असण्याचीही काही गरज नाही. हे काम म्युच्यअल फ़ंड कंपनीचे एक्सपर्ट मॅनेजर्स करतात.  

 

3) मुदत ठेवी –

 • मुदत ठेवी हा बँका किंवा विविध वित्तीय संस्थांद्वारे ऑफर केला जाणारा गुंतवणूक पर्याय आहे ज्याअंतर्गत तुम्ही ठराविक कालावधीसाठी एकरकमी रक्कम जमा करता व त्यावर पूर्वनिर्धारित दराने व्याज मिळवता. 
 • म्युच्युअल फंड व स्टॉक्सच्या व्यतिरिक्त, मुदत ठेवी ही संपूर्ण भांडवली संरक्षण तसेच हमी परतावा देते.
 • मुदत ठेवींद्वारे दिले जाणारे व्याज निश्चित असते. मुदत ठेवी या शक्यतो लॉक-इन गुंतवणूक असतात, परंतु गुंतवणूकदारांना त्यांच्या विरुद्ध कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट यांसारख्या सुविधा मिळवण्याची परवानगी दिली जाते. 

 

4) आवर्ती ठेवी –

 • आवर्ती ठेव (Recurring Deposits) ही एक निश्चित कालावधीसाठीची गुंतवणूक आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार एका ठराविक काळासाठी दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवू शकतात व त्यावर निश्चित व्याज मिळवू शकतात. 
 • बँका आणि पोस्ट ऑफिस शाखा हा आवर्ती ठेवी हा पर्याय ऑफर करतात. 
 • हा पर्याय गुंतवणूकदारांना पूर्ण भांडवल संरक्षण तसेच हमी परतावा देतात. मुदत ठेवींप्रमाणे, विना जोखीम गुंतवणूक पर्याय आहे. 

 

5) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) –

 • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) हा एक दीर्घकालीन कर-बचत गुंतवणूक पर्याय आहे ज्यामध्ये १५ वर्षांच्या लॉक-इन कालावधी असतो. 
 • यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर, गुंतवणूकदारांनी १५ वर्षांच्या शेवटी काढलेला निधी हा पूर्णपणे करमुक्त असतो तसेच यावर मिळणारे व्याजही करमुक्त असते. 
 • यामध्ये गुंतवणूकदारांना काही अटी पूर्ण केल्यानंतर कर्ज व गरजेच्या वेळेस आंशिक पैसे देखील काढता येतात.
 • हा भारत सरकारद्वारे ऑफर केला जाणारा गुंतवणूक पर्याय आहे जो तुमच्या गुंतवणुकीसाठी शंभर टक्के सुरक्षेतीततेची हमी देतो.

 

6) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी

 • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) हा एक सेवानिवृत्ती-केंद्रित गुंतवणूक पर्याय आहे ज्यामध्ये पगारदार व्यक्तींना प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम ८०सी च्या तरतुदींनुसार कर सूट मिळविण्यात मदत होऊ शकते.
 • EPF मधील कपात ही कर्मचाऱ्याच्या मासिक पगाराची टक्केवारी असते. तसेच, मॅच्युरिटी झाल्यावर, EPF मधून काढलेला कॉर्पस हा देखील पूर्णपणे करमुक्त असतो.
 • या पर्यायामध्ये तुम्ही भविष्य निर्वाह निधी (PPF) अंतर्गत किमान निर्धारित रकमेपेक्षा जास्त योगदान देऊ शकता.

 

7) नॅशनल पेन्शन स्कीम –

 • नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) हा तुलनेने नवीन कर-बचत गुंतवणूक पर्याय आहे. या योजनेंतर्गत सदस्यता घेणारे गुंतवणूकदार त्यांच्या निवृत्तीपर्यंत लॉक-इन राहतील व PPF किंवा EPF पेक्षा जास्त परतावा मिळवू शकतात. याचे कारण म्हणजे NPS योजनेअंतर्गत गुंतवणूक इक्विटीमध्ये देखील गुंतवणूक करतात. 
 • यामधील मॅच्युरिटी कॉर्पस हा पूर्णपणे करमुक्त नसतो व त्यातील काही भाग गुंतवणूकदारांना नियमित पेन्शन देण्यासाठी वापरावा लागतो. 

 

अशाप्रकारे गुतंवणूकीचे विविध पर्याय आहेत. 

लक्षात ठेवा – तुम्ही बचत करत असाल तर तुम्ही नेहेमी यशाच्या मार्गावर आहात ! आजच बचतीला सुरुवात करा आणि तुमची दीर्घकालीन स्वप्ने साकार करायची तरतूद करा ! अर्थसाक्षर तर्फे तुम्हाला या पुण्यकार्यासाठी शुभेच्छा !!

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…