प्रेम हे “कर” मुक्त आहे का ?

Reading Time: 3 minutes

श्रीकृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, प्रेम हे सर्व कर्माचे मूळ आहे. जसे पती-पत्नी, आई-वडील व मुले मित्रमंडळी, नवयुवक-युवती यांच्या संबंधाचा पाया प्रेमच आहे. परंतु प्रेमाच्या भावनेसोबत इतर भावना उदा:-लोभ, राग, द्वेष इत्यादी मिसळल्यास सर्व गडबड होते व संबंध बिघडतात. निखळ प्रेम आजकाल क्वचितच पहायला मिळते. व्यवहारात प्रेमापायी वा आपुलकी पायी काही पैशाची देवाण घेवाण करताना आयकर लागू शकतो. म्हणून ते तपासून घ्यावे. तसेच काही ठराविक व्यक्तीसोबत केलेले प्रेमाचे व्यवहारच कर मुक्त आहे

अर्जुन: चला मनुष्याच्या जीवनातील प्रेमाच्या घटनांसोबत आयकराची चर्चा करूया. सर्वात अगोदर जेव्हा लग्न ठरण्यापूर्वीचा काळ म्हणजेच नवीन युवक-युवती याचे प्रेम सबंध जुळत असताना, एक दुसऱ्यास भेटवस्तू  किंवा पैशाची देणगी दिल्यास आयकराचे काय होईल? 

श्रीकृष्ण: लग्नाअगोदरचा काळ नवयुवतीसाठी सुवर्ण काळ असतो. परंतु आयकर व इतर कायद्यानुसार लग्न झाल्यानंतर पती पत्नीला मान्यता मिळते. म्हणूनच लग्नापूर्वी गिफ्ट दिल्यास व त्याचे मूल्य रू.५० हजारापेक्षा जास्त असल्यास गिफ्ट घेणाऱ्यास टॅक्स लागू शकतो. म्हणूनच या सुवर्णकाळात सांभाळूनच व्यवहार करावे. प्रेमाच्या प्लॅनींग सोबत टॅक्स प्लॅनिंग सांभाळूनच करावी. या सुवर्णकाळात उत्साहापायी अप्रिय घटना घडू नये याची काळजी घ्यावी. या काळात मोबाईल, भेटीगाठी, इत्यादीवर जास्त खर्च होतो. तसेच आजकालचे युवक युवती प्रेमासोबत पैशालाही महत्त्व देतात, म्हणूनच करिअर आणि प्रेमाची निवड करणे अवघड होते.

अर्जुन: हे श्रीकृष्णा, या सुवर्ण काळानंतर येते लग्नाची घटका, तसेच नवयुवक-युवतीचे लग्नामध्ये पैसे वा गिफ्ट, घर-संसार खर्च, इत्यादीच्या व्यवहाराचे काय?

श्रीकृष्ण: अर्जुना,  नवयुवक-युवतीच्या आयुष्यातील व दोन कुटुंबाच्या मनोमिलनाची वेळ लग्नाद्वारे येते. सर्वत्र आनंदी आनंद असते व प्रेमाच्या पुढील सुखद प्रवासाची सुरवात याद्वारे मनुष्याच्या जीवनात होते. लग्न समारंभात मिळालेले सर्व गिफ्टस व ते कुणाकडून ही मिळाल्यास, कितीही किमतीचे मिळाल्यास करमाफ आहे. परंतु ते कुणाकडून मिळाले याची यादी ठेवावी. तसेच लग्नाचा खर्च, हनिमून टूर, इत्यादीचा खर्च नीट हिशोब करून ठेवावा. पती-पत्नीतील मधुर संबंधात पैशाचा वा संपत्तीचा खोडा निर्माण सुरवातीलाच होऊ देऊ नये. पत्नीला मिळालेल्या दागिन्यांचा पती-पत्नीने नीट सांभाळ करावा. कारण लग्नामध्ये माहेरच्यांकडून मिळालेल्या वस्तूंवर “स्त्रीधन” म्हणून पत्नीचे अधिक प्रेम असते. त्या भावनेचा सांभाळ करावा. पती-पत्नीने आर्थिक नियोजन सुरूवातीपासूनच केल्यास त्यांच्या प्रेमसंबंधावर आर्थिक अडचण येणार नाही व जीवन सुखकर होईल. शक्यतो गुंतवणूक जॉईट नावावर करावी. तसेच पतीने पत्नीस गिफ्ट दिल्यास, त्या गिफ्टवरील उत्पन्न क्लबींग तरतुदीद्वारे ते आयकरात पतीच्या उत्पन्नात गृहीत धरले जाते. पती-पत्नी स्वतंत्र नोकरी अथवा व्यवसाय करत असल्यास आयकराचे नियम वेगवेगळे लागू होतील व त्यानुसार दोघांनाही स्वतंत्र आयकर रिटर्न भरावे लागेल.

अर्जुन: लग्नानंतरच्या जीवनात मूल-बाळ झाल्यावर पती-पत्नीने आर्थिक व्यवहार प्रेमळपणे कसे सांभाळावे ?

श्रीकृष्ण: मूल-बाळ झाल्यानंतर खऱ्या आयुष्याची म्हणजेच कौटुंबिक प्रेम व वात्सल्याची सुरवात होते . पती-पत्नीने आपापल्या उत्पन्नावर आयकर भरून आर्थिक पूंजी जमा करावी. तसेच मुलांच्या शिक्षणाचा  खर्च, गृह, कर्ज, विमा पॉलिसी, आरोग्य विमा तसेच आरोग्यावरील खर्च,  भविष्य निर्वाह निधी  इत्यादी खर्च व सवलत आयकरानुसार घेऊन मुलांनाही त्याचा फायदा होईल असे नियोजन करावे. मुलांना आई वडिलांचे प्रेम तर हवेच. परंतु आई-वडिलांनी त्यांना आर्थिक पाया घडवून दिल्यास शिक्षणासोबत व संस्कारासोबत त्यांचे जीवन उज्ज्वल होईल. तसेच मूल-बाळ झाल्यानंतर पती-पत्नीत थोडीफार कुरबूर होतच राहते. परंतु आर्थिक भांडण होणार नाहीत व घर खर्च चालेल असे नियोजन करावे. आयकर कायद्यानुसार मुलांच्या टयूशन फीची वजावट मिळते व शैक्षणिक कर्जाचीही वजावट मिळते. पती-पत्नी आपल्या स्वतःच्या उत्पन्नातून खर्च झाल्यास ती वजावट घेऊ शकतात. तसेच आई-वडिलांनी मुलांना गिफ्ट दिल्यास मुलांना ते करमाफ होईल.

अर्जुन: मूलं-बाळं मोठी झाल्यानंतर म्हातारपणाची सोय पती-पत्नीने कशी करावी ?

श्रीकृष्ण: हे बघ अर्जुना, आई वडिलांच्या प्रेमाद्वारे मुले मोठी होतील व स्वतंत्र होऊन स्वतःच्या प्रेमाच्या शोधात स्वतःचे कुटुंब वसवतील. यालाच जीवनचक्र म्हणतात. पती-पत्नीने स्वतःच्या म्हातारपणाचे नियोजन स्वास्थ्य उत्तम ठेवण्याकडे व आर्थिक सुलभतेकडे लक्ष द्यावे. कारण म्हातारपणात कोणाला पैसे मागणे चांगले वाटत नाही. म्हणून बचत करून बँकेत डिपॉझीट, जमीन, घर, इत्यादी पती-पत्नीने जॉईन्ट नावाने करून आनंदाने राहावे. कारण वयोमानाने म्हातारपणात एकमेकांची साथ फार लागते. पती-पत्नीच्या प्रेमापायीच व नातवाच्या प्रेम-हट्टा पायीच जीवन या वयात सुखकर होते. सिनियर सिटीझन्सचा लाभ आयकरात ६० वर्षाच्या वर असल्यास मिळतो, तसेच स्वतःचे घर “रिव्हर्स मॉर्टगेज” स्कीम मध्ये बँकेकडे ठेवल्यास म्हातारपणात पैसा तर मिळेलच व पती-पत्नी प्रेमाने व आनंदाने स्वतःचा खर्च ही भागवू शकतात.

अर्जुन: जीवनात प्रेमाचे संबंध पती-पत्नीसोबत नंतर मित्र मंडळी व नातेवाईकांसोबतही असतात. त्यांच्यासोबत केलेल्या व्यवहाराचे काय ?

श्रीकृष्ण: आयकरात नातेवाईकांची व्याख्या दिलेली आहे परंतु मित्राची व्याख्या कोणत्याही कायद्यात नाही. नातेवाईकांची निवड मनुष्य करू शकत नाही. परंतु मित्राची निवड तो स्वतः करू शकतो. मित्र हा प्रेमळ व्यक्ती असतोच आणि तो अडीअडचणीत फार कामाला येतो. नातेवाईकांसोबत प्रेमाचे संबंध सदैव असावेत, परंतु पैशाची देवाण-घेवाण, गिफ्ट इत्यादी जपून करावे. ठराविक नमूद केलेल्या नातेवाईकांकडून मिळालेल्या गिफ्टवर कर लागत नाही. तसेच वडिलोपार्जीत संपत्ती इत्यादींचे व्यवहार कायद्यानुसारच करावे. मित्र मंडळीच्या प्रेमाच्या सबंधात पैसा मध्ये आणू नये. पैशाचे व्यवहार मित्रांसोबत झाल्यास आयकरानुसार ते करपात्र होतील. म्हणजेच प्रेमापायी हॅन्ड लोन, ऍडव्हान्स म्हणून मित्रांना मदत केल्यास व्यवहारीक दृष्टीकोनातून व्याजाचे उत्पन्न इत्यादी दाखवावे. अन्यथा आयकर कायद्यानुसार अडचण निर्माण होऊ शकते. मित्राकडून गिफ्ट रू. ५० हजाराच्यावर मिळाल्यास करपात्र होईल.

अर्जुन:  व्हॅलंटाईन डे निमित्त्त मनुष्याने प्रेमासोबत पैसाचा संबंध कसा सांभाळावा ?

श्रीकृष्ण: व्हॅलंटाईन डे निमीत्त प्रेमाचे प्रतीक म्हणून गिफ्ट इत्यादी आपल्या व्यक्तींना जरूर द्यावे,परंतु प्रेमाचे मूल्य पैशाद्वारे मोजू नये. म्हणजेच गिफ्टच्या मूल्याद्वारे मनुष्याने प्रेमाचे संबंध ठेऊ नये. कारण पैशामुळे लोभ निर्माण होऊन प्रेमसंबंध खराब होतात. प्रेमाचे नियोजन हृद्याद्वारे होते, तर पैशाचे नियोजन डोक्याद्वारे करावे. मनुष्याने प्रेमापायी केलेले कार्य कधीही पैशासाठी केलेल्या कार्यापेक्षा जास्त फायद्याचे असते. परंतु नेमके येथेच चुकते व मनुष्य पैशासाठी प्रेमसंबंध विसरून काहीही करावयास तयार होतो. हे जग प्रेमाखातीरंच चालत आहे. नुसता ज्याच्याकडे पैसा नाही, त्यांचे जीवन कधीच लोप पावले असते. सरते शेवटी मनुष्याला त्याने किती कमविले हे स्मरणात ठेवण्यापेक्षा त्या मनुष्याने त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे किती लोकांचे जीवन सुखकर केले हेच यादगार राहते. म्हणूनच पैशाला प्रेमासमोर कधीच जिंकता आले नाही. पैशावर प्रेम आणि प्रेमसाठी पैसा यात फार मोठा फरक आहे. पैसे कमवणे चुकीचे नाही, परंतु त्यावरच प्रेम असणे चुकीचे होय. प्रेम हे कर मुक्त आहे, परंतु पैशासाठी प्रेम केल्यास तसे नव्हे.

(चित्र सौजन्य- https://timesofindia.indiatimes.com/photo/62789611.cms )

Leave a Reply

Your email address will not be published.