१५ ऑगस्ट २०१४ रोजी भारताच्या पंतप्रधानांनी “प्रधानमंत्री जन-धन योजना” नामक भारतातील सर्वात गहन आर्थिक समावेशनाचे उद्घाटन केले.
MyGov या नाविन्य पूर्ण व्यासपीठावर एक ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आली, ज्यात ६००० हून अधिक भारतीय नागरिकांकडून या योजनेसाठी अनेक नावे सुचवण्यात आली. जन-धन’ हे त्यातून मूल्यांकनानंतर ज्यूरीने निवडण्यात आलेले नाव आहे. म्हणेज, ‘जन-धन’ या लोकांसाठी असलेल्या या योजनेचे नाव देखील लोकांनीच दिलेले आहे. या योजनेचे बोध वाक्य “मेरा खाता-भाग्य विधाता” असे आहे, थोडक्यात, “माझे बँक खाते-माझ्या भाविष्यचे निर्माते.”
योजनेची पार्श्वभूमी:
- आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांना बँकांशी आणि डेबिट कार्ड व तत्सम बँकिंग संस्थेशी जोडणे हे जन-धन योजनेचे प्राथमिक उद्दीष्ट आहे.तसेच, कॅशलेस अर्थव्यवस्थेचा पाया आणि डिजिटल इंडिया योजनेला पूरक प्रोत्साहन देण्याचे काम ही योजना करते.
- प्रत्येक घरात दोन बँक खाते या हिशोबाने देशात एकूण १५ कोटीहून अधिक बँक खाती उघडणे, तसेच बँक क्षेत्रापासून वंचित असलेल्या ७.५ कोटी कुटुंबांना भारताच्या बँकिंग व्यवस्थेत आणण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवून ही योजना तयार करण्यात आली.
- जन-धन योजना व्यावसायिकांना भांडवल निर्मितीसाठी प्रोत्साहन देते एवढंच नाही तर बँकिंग प्रतिनिधीना ५००० रुपयांचा किमान मासिक भत्ता देऊन प्रोत्साहन देते. बचत करणारा खातेदार आणि बँक यांच्यातील मैलचा दुवा म्हणून हे दोन्ही घटक काम करतात.
- या योजनेअंतर्गत केवळ एका आठवड्यात १८,०९६,१३० इतके बँक खाती उघडली गेली. त्यामुळे या योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंदवली गेली व “भारत सरकारच्या आर्थिक सेवा विभागाकडून जाहीर झालेल्या वित्तीय सर्वसमावेशकता मोहिमेचा हा विजय आहे”, असे प्रमाणित करण्यात आले आहे.
- २०१५ पर्यंत ७.५ करोड खाती उघडणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते, पण वास्तवात जानेवारी २०१५ पर्यंत १२.५६ करोड खाती उघडली गेली. उघडलेल्या खात्यांपैकी ६०% ग्रामीण भागातील आहेत आणि ४०% शहरी भागातील आहेत. एकूण खात्यापैकी ५१% महिला खातेधारकांची संख्या आहे.
योजनेचे स्वरूप:
- वित्तीय सेवा: आर्थिक कल्याणकारी योजना असल्याने ही मुख्यतः सरकारी बँक, खाजगी क्षेत्रातील काही बँक आणि व्यावसायिक प्रतिनिधी (बँक मित्र) या मार्गाने पुरवली जाते. वित्तीय सेवांचा लाभ घेण्यास अक्षम असणाऱ्या व योजनांपासून अनेक वर्ष वंचित राहिलेल्या समाजासाठी ही योजना आहे. या योजनेचा उद्देश ज्यांच्याकडे बँक खाते नाहीत अशा जनतेला सुलभपणे आर्थिक सुविधा पुरविणे हा आहे. या वित्तीय सेवांमध्ये पुढील गोष्टीचा समावेश होतो:
१. बँकिंग, बचत आणि ठेव सेवा
२. रेमिटन्सेस
३. पत/कर्ज
४. विमा योजना
५. सेवानिवृत्ती निधी
- शून्य रक्कम बॅलन्स: या योजनेअंतर्गत कोणत्याही बँक शाखेत किंवा व्यावसायिक प्रतिनिधी (बँक मित्र) मध्ये शून्य रकमेवर खाते उघडले जाऊ शकते. तसेच, आधीच दुसरे बचत खाते असले तरीही जन-धन बँक खाते उघडू शकता किंवा आपले जुने खाते जन-धन खात्यामध्ये रुपांतरीत करू शकता.
- डेबिट कार्ड: तसेच, उघडण्यात आलेल्या सर्व बँक खात्यांना ‘रूपे’ डेबिट कार्ड जारी केले जाते.
- वयोमर्यादा: हे खाते उघडण्यासाठी कोणतीही वय मर्यादा नाही. १० वर्ष वयापुढील कोणतीही व्यक्ती हे खाते उघडू शकतो. खातेधारक अल्पवयीन असेल, तर अजाणत्या मुलाच्या/मुलीच्या वतीने खात्याची जबाबदारी कायदेशीर पालकांकडे असते.
- मोबाइल बँकिंग: या योजनेअंतर्गत उघडल्या जाणाऱ्या खात्याना यूएसएसडी सुविधा वापरुन मोबाइल बँकिंगची सेवादेखील उपलब्ध आहे. देशभरात कॉल सेंटर आणि टोल फ्री नंबरची सुविधा उपलब्ध आहे.
प्रधानमंत्री जन-धन योजनेचे लाभ:
- कर्ज: खाते उघडून ६ महिने पूर्ण झाल्यावर या योजनेअंतर्गत ५००० रुपयांपर्यंत कर्ज सुविधा मिळते.
- विमा फायदे: या योजनेत खातेधारकाच्या कुटुंबास विमा भरपाई देण्याची ग्वाही ही योजना देते. व्यक्तीच्या अपघाती मृत्यूसाठी रू ३०,००० पर्यंत विमासंरक्षण मिळते. तसेच केवळ १२ रुपये वार्षिक विमा हप्ता भरून मृत्यू किंवा शारीरिक अपंगत्वासाठी २ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. तसेच खातेदारास रूपे डेबिट कार्डवर रू.१ लाख पर्यंत अपघात विमा संरक्षण मिळते.
- ओव्हरड्राफ्ट: सलग ६ महिने सक्रिय असणाऱ्या आणि खातेधारकाच्या आधार कार्डशी जोडले गेलेल्या खात्यावर खातेधारकाला १०००० रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते.
आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय? , सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये
काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना? , प्रधानमंत्री वय वंदन योजना (PMVVY)
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.