Reading Time: 4 minutes

मागील कॅलेंडर वर्षांशी तुलना करता निफ्टी हा लोकप्रिय निर्देशांक अस्तित्वात आल्यापासून प्रथमच सलग आठ कॅलेंडर वर्षे (सन 2017 ते सन 2023) सकारात्मक परतावा देत आहे. यापूर्वीचा असा विक्रम सलग 5 वर्षांचा होता.

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला भारतीय भांडवल बाजारासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली होती. चलनवाढ, जागतिक भु राजकिय अस्थिरता, त्यामुळे खनिज तेलाच्या किमतीत होणारी वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली जोरदार विक्री यामुळे थोडा दबाव निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांच्या मनात सावध राहण्याची भावना निर्माण झाली होती. पण जसजसे काही दिवस गेले, गुंतवणूकदारांवरील दडपण कमी होत गेले, त्यामुळे निफ्टीमध्ये प्रतिकूल परिस्थितीतही वाढ होत गेली. विविध नियामकांनी योजलेले उपाय, सरकारी धोरणे यामुळे स्थिरता आणि सकारात्मकता निर्माण झाली.

  

यावर्षी जागतिक व्यापारातील अस्थिर स्थिती, चढते व्याजदर, वाढती महागाई आणि येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका अशी आव्हाने समोर असतानाही बाजारात सकारात्मकता असल्याने गुंतवणूकदारांना भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल खात्री वाटत असल्याने कोट्यवधी रुपयांची म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे बाजारात येत आहे. विदेशी गुंतवणूकदार परतून आल्याने बाजार नवनवे विक्रम निर्माण करीत आहे. ही स्थिती अशीच राहील का? कोणीच सांगू शकत नाही पण यातून काही बोध नक्कीच घेता येतील.

 

  1. आर्थिक साक्षरता:
  • आर्थिक यशासाठी सातत्य आणि चिकाटी याची आवश्यकता आहे. 
  • बाजारातील घडामोडींचा अभ्यास करणे, त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे.
  1. अनपेक्षित घटनांपासून सावधगिरी: 
  • जगातील ताणतणाव आणि विकसनशील देशापुढे पुन्हा उभे रहाताना निर्माण होणारी आव्हाने यांचा अंदाज घेणे शहाणपणाचे आहे.
  1. गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे: 
  • तेजीचा फायदा घेऊन अनेक प्रारंभिक भांडवल विक्रीचे इशू येत आहेत.  आता त्यावर अधिमूल्य किती आकारायचे त्यावर बंधन नसल्याने कंपनीची निवड अधिक काळजीपूर्वक करावी. 
  • यातून मिळणारा परतावा हा फक्त नोंदणी होण्याच्या दिवशी मिळणारा नसून तो सातत्याने वाढत जाणारा मिळायला हवा या दृष्टीने कंपन्यांनी आपल्या कोणत्या योजना सेबीकडे सादर केल्या त्यांची माहिती मिळवून बाजारभाव काय आहे यापेक्षा कंपनी आपल्या ध्येयानुसार वाटचाल करीत आहे का ते पाहावे. 
  1. निश्चित दृष्टीकोनाची गरज: 
  • काळाच्या कसोटीवर दीर्घकालीन गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करता येते आणि त्यातून जोखीम कमी कमी होत जाते हे सिद्ध झाले आहे. आता बाजारात असलेल्या अस्थिरतेमुळे आणि उपलब्ध नवनवीन अल्पकालीन गुंतवणूक संधी आहेत. 
  •  त्यात जोखीम अधिक असली तरी कमी वेळात होणाऱ्या फायद्याचे सुप्त आकर्षक अनेकांना आहे तरीही गुंतवणूकदारांनी आपण नेमके कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहोत हे जाणून घेऊन गुंतवणूक करावी.

नक्की वाचा : गुंतवणूकदारांचे प्रकार

  1. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीची गरज: 
  • गुंतवणूक ही संथ शिस्तबद्ध आणि संयमाने केल्यास वाढते आपण कोणत्याही प्रकारचे गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूक संचातील काही भाग तरी दीर्घकालीन गुंतवणूकीस राखून ठेवावा.
  1. पद्धतशीरपणे गुंतवणूक करा: 
  • आपल्याला खरेदी करायची आहे पण आता तेजी आहे लवकरच करेक्शन येईल किंवा मंदी येईल याची वाट पाहू नका कारण चोरपावलांनी आलेली मंदी नाहीशी होऊन पुन्हा तेजीस सुरुवात होईल आणि हातातील संधी जाईल. 
  • बाजाराचा कल कसाही असला तरी प्रत्येक प्रकारच्या बाजारात विविध संधी उपलब्ध आहेत. गुंतवणूक तज्ञ त्यामुळेच पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्याचा सल्ला सर्वाना देत असतात.
  1. मालमत्ता वाटपाचे महत्व ओळखा: 
  • आपली मालमत्ता विविध गुंतवणूक प्रकारात विभागलेली असावी म्हणजे मिळणारा सरासरी परतावा हा सातत्याने चांगला मिळून जोखीम विभागली जाईल. 
  • खर तर सन 2023 हा अत्यंत कठीण काळ होता. याकाळात शेअर बाजाराशिवाय बॉण्ड मार्केट आणि सोने यातही चांगली वाढ झाली प्रत्येक वेळी असे होईलच असे नाही.

 

नक्की वाचा : निफ्टीमध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या गोष्टी

  1. गुंतवणूक संचाचा नियमित आढावा घ्या: 
  • विविध मालमत्ता प्रकारात विभागलेला आपला गुंतवणूक संच योग्य प्रकारे परतावा देत आहे का याचा वेळोवेळी आढावा घ्या. जर एखादा मालमत्ता प्रकार त्या वेळच्या तुलनेत कमी परतावा देत असेल तर त्याची कारणे शोधा. 
  • आवश्यक असल्यास त्यात बदल करा. वर्षातून किमान दोन ते चार वेळा असा आढावा घेऊन आवश्यक असल्यास गुंतवणूक घोरणात बदल करावा लागेल.
  1. मालमत्ता प्रकार म्हणून भांडवल बाजाराचा विचार करा: 
  • अनेकजण अपुऱ्या माहितीमुळे भांडवल बाजाराकडे गुंतवणूक या दृष्टीने पहात नाहीत. गेली अनेक वर्षे या बाजाराने सर्व प्रकारच्या मालमत्ता प्रकारात उत्तम परतावा मिळवला आहे.
  •  या बाजारात आपण स्वतः शेअर्स घेऊन थेट किंवा म्युच्युअल फंड योजना घेऊन अप्रत्यक्ष गुंतवणूक करू शकतो.
  1. सरकारी बँकांतील गुंतवणूक फायदेशीर: 
  • गेल्या वर्षी निफ्टी मधील सरकारी बँकांचा निर्देशांकाने 23% परतावा दिला तर खाजगी बँकांनी 9% परतावा दिला अजूनही सरकारी बँका सुयोग्य मूल्यास उपलब्ध आहेत. 
  • तेव्हा बाजारभावाऐवजी शेअर्सचे आंतरिक मूल्य ओळखून त्यात गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर आहे.
  1. बाजार विदेशी गुंतवणूकदारांवर अवलंबून नाही: 
  • एक काळ असा होता की विदेशी गुंतवणूकदार बाहेर पडल्यावर बाजार डळमळीत होत असे. 
  •  गेल्यावर्षी प्रथमच विदेशी वित्तसंस्था आपली गुंतवणूक काढून घेत असताना बाजारात फारशी खळबळ माजली नाही.
  1. इंडेक्स फंड आणि इटीएफ मधील गुंतवणूक:
  • इंडेक्स या फंड योजनांतील गुंतवणूक योग्य परतावा देते असे अनेकांना पटले आहे. त्याचा व्यवस्थापन खर्च अत्यंत कमी आहे, तर इटीएफ हे म्युच्युअल फंड योजनेसारखे असून त्याचे खरेदी विक्री व्यवहार शेअर बाजारात होतात याची अनेकांना जाणीव झाली आहे. 
  • या वर्षीही या दोन मालमत्ता प्रकारात मोठी गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.
  1. अस्थिरतेवर मात करण्यासाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक :
  • बाजारातील अस्थिरतेवर म्युच्युअल फंड एसआयपी हा पर्याय असल्याचे गुंतवणूक दारांना पटल्याने दरमहा येणाऱ्या एसआयपी मध्ये वाढ होत असून बाजारातील तेजीमुळे त्यात सातत्याने वाढ होत आहे.
  1. वाईट बातमीनंतर गडबडीत विक्री करू नये: 
  • गेल्या वर्षी जेव्हा काही वाईट बातमी आली तेव्हा अनेकांनी आपले शेअर्स विकले पण काही चाणाक्ष गुंतवणूकदारांनी त्याच वेळी खरेदी केली आणि भरपूर नफा कमावला.
  1. तीव्र प्रतिक्रिया टाळा :
  • जगभरात बाजारावर प्रभाव पाडणाऱ्या अनेक घटना घडत असतात त्यावर गुंतवणूकदार लगेच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात. 
  • असं करण्यात आपलं अधिक नुकसान होण्याची शक्यता असते. हे टाळून काही कालावधी लोटल्यावर त्यावर साधकबाधक विचार करणं कधीही चांगलं.
  1. गुंतवणूक ही मॅरेथॉन आहे, लांब उडी नाही :
  • नेहमी हे लक्षात ठेवावं की गुंतवणूक ही मॅरेथॉन आहे ती दीर्घकाळ चालत राहील त्यात तुम्ही लांब उडी मारण्यासाठी प्रयत्न करू शकाल पण त्यात पाय मोडण्याची शक्यता अधिक असते.
  1. बाजाराचा कल पहा:
  • बाजारावर अनेक गोष्टींचा प्रभाव पडत असल्याने कल पाहून गुंतवणूक करणे अनेकदा योग्य असते. 
  • अनेकदा गुंतवणूक सल्लागार या बाजूने अथवा विरोधात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत असतात, त्यांच्या परिणामाचा अंदाज बांधून स्वतंत्र निर्णय घ्या.
  1. शोध थांबवू नका:
  •  बाजार कसाही असला तरी त्यात तुलनेने कमी भाव असलेले शेअर्स असतात त्याचा शोध घेणे आणि त्यात गुंतवणूक करणे थांबवू नका. 
  • वाजवी किमतीला उपलब्ध असलेले, वाढ होण्याची शक्यता असलेल्या शेअर्सचा शोध घ्या.

       

शेअरबाजारातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत त्यांची नोंद घेत रहा.  या अनुभवांचा आपल्याला आयुष्यभर उपयोग होत राहील.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…