Reading Time: 4 minutes
अर्थव्यवस्थेची प्रकृती तपासण्यासाठी जीडीपी, फॉरेक्स रिझर्व, पी एम आय इंडेक्स, जॉब डेटा आणि शेअर मार्केटचे निर्देशांक वगैरे वापरले जातात हे आपल्याला माहीत आहे. पण लिपस्टिक इंडेक्स आणि हेमलाईन (स्कर्टची लांबी) इंडेक्स वरून अर्थव्यवस्था जोखता येते? हे बघू , पण आता हा विषय ऐरणीवर का आला ती बातमी आधी पाहू.
- बुधवार 14 ऑगस्ट 2024 या दिवशी वॉरन बफे यांच्या बर्कशायर हॅथवे या कंपनीने सेकला माहिती देताना जाहीर केले, की 2024 च्या दुसऱ्या तिमाहीमधे त्यांनी अल्टा ब्युटी कंपनीचे 266 मिलिअन डॉलर्सचे (अंदाजे 2200 कोटी रुपये) 690106 शेअर्स खरेदी केले आहेत.
- अल्टा ब्युटी कंपनी अमेरिकेत 1385 ब्युटी प्रॉडक्ट स्टोअर्स चालवते आणि 600 प्रमुख ब्रॅंडस्ची 25000 पेक्षा जास्त उत्पादने विकते.
- वर्ष 2023 ची काही आकडेवारी पाहिली तर कंपनीने 11.20 बिलिअन डॉलर्सची विक्री केली. आणि 1.29 बिलिअन डॉलर्स इतका नफा कमावला होता.
- कंपनीच्या ‘ट्राय बीफोर यू बाय’ या विशेष सवलतीमुळे महिलांना या स्टोअर्समधून खरेदी करणे आवडते.
- या कंपनीच्या शेअरचा भाव मार्च 2020 मधे 148 डॉलर्स होता. तर मार्च 2024 मधे शेअर 550 डॉलर्स पर्यंत पोचला होता. पण त्यानंतर वॉल स्ट्रीट अर्निंग एक्सपेक्टेशन चुकल्यामुळे शेअरचा भाव घसरला आणि ऑगस्टमधे तो 325 डॉलर्स पर्यंत खाली आला.
- याचा फायदा घेत वॉरन बफे यांनी जोरदार खरेदी केली. ह्या घटनेचा आर्थिक मंदीशी काही संबंध आहे का ? काही जणांच्या मते याचे उत्तर हो असे आहे आणि म्हणून लिपस्टिक इंडेक्स आणि हेमलाईन इंडेक्स हे विषय पुन्हा चर्चेत आले आहे.
वाचावे असे :वॉरन बफे आणि बर्कशायर हॅथवे
लिपस्टिक इंडेक्स
- अर्थव्यवस्था घसरत असताना सौंदर्यप्रसाधनांची विक्री वाढते, असे ‘कॉस्मेटिक किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनार्ड लॉडर यांनी 2001-02 च्या दरम्यान म्हटले होते. त्यांनीच ‘लिपस्टिक इंडेक्स’ हा शब्द प्रचलित केला.
- एका अभ्यासाप्रमाणे, 2005 ते 2010 (2008 च्या मंदीचा काळ) ह्या काळात इंग्लंडमधे नेलपॉलीशची विक्री दुप्पट झाली होती, म्हणून काही जण याला ‘नेल पॉलिश इंडेक्स’ असं म्हणायला लागले.
- 2007 ते 2010 ह्या काळात (Essie) एसी या टॉप ब्रॅंडच्या नेल पॉलीशची विक्री 57% ने वाढली. लिओनार्ड लॉडरला त्याच्या या कॉस्मेटिक इंडेक्सचे लॉजिक विचारले तेव्हा त्यावर त्याने दिलेले उत्तर मजेशीर आहे. तो म्हणतो, ‘वी हॅव ऑब्झर्व दि कन्सेप्ट ऑफ स्मॉल लक्झरिअस दॅट कॅन गेट यू थ्रू हार्ड टाइम्स अँड गुड वन्स. अँड इट बिकम मोर इम्पॉर्टंट ड्यूरिंग हार्डर टाइम्स.”
- तो म्हणतो, 1930 च्या आर्थिक मंदीच्या काळातच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणाऱ्यांची संख्या वाढली.
- स्त्रियांना मंदीच्या काळात सलोनमधे जाऊन मेकअप करणे परवडत नाही. मग अश्यावेळी स्वतः आपणच लिपस्टिक, नेलपेंट खरेदी करून घरच्याघरी मेकअप केलेला बरा ! त्यामुळे लिपस्टिक आणि नेल पॉलीशची विक्री वाढते.
अस्थेटिक इंडेक्स
- मंदीच्या काळात महागडया वस्तू, डिझायनर ड्रेसेसची चैन परवडणारी नसते. मग महिला वर्ग अफॉर्डबल इन्डल्जन्स म्हणजे परवडणाऱ्या कॉस्मेटिकची खरेदी करतात.
- सप्टेंबर 11 च्या वर्ल्ड ट्रेड हल्ल्यानंतर झालेल्या आर्थिक आघातानंतरच्या काळातील ग्राहकांच्या वर्तणूकीवरून लिओनार्ड लॉडरच्या असे लक्षात आले की ‘लिपस्टिक्स प्रोव्हाइड गुड गॉग ऑफ इकॉनोमिक लँडस्केप.’
- आन्ट्रप्रनरीअल मार्केटिंग अँड कंझ्युमर बिहेवियर या विषयाच्या प्राध्यापिका झुबीन सेठना म्हणतात, ‘आर्थिक तणावाच्या काळात कॉस्मेटिक्ससारख्या तुलनेने कमी खर्चाच्या वस्तू खरेदी करून महिला एक तात्पुरती पळवाट शोधत असतात आणि त्यामुळे शरीरातल्या डोपामाईन (हॅपी हार्मोन्स)ची वृद्धी होऊन मनाला उभारी येते’.
- मंदीच्या काळात परवडणारी मजा म्हणून ब्युटी प्रॉडक्टसचा पर्याय पुढे येतो असे याचे तर्कशास्त्र आहे. “आर्थिक मंदीच्या काळात जॉब मार्केटमधे मंदी येते आणि मग काही महिला छान छान मेकअप करून आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करून जॉब पटकावतात – म्हणून कॉस्मेटिक्सची विक्री वाढते” असा जावई शोधही काही जणांनी लावला.
- मंदीच्या काळात आपल्या जोडीदाराचे नैराश्य घालवण्यासाठी आपण छान दिसावे म्हणूनही काही महिला कॉस्मेटिक्स जास्त खरेदी करतात, असेही काही मार्केटिंगवाल्यांचे म्हणणे आहे. कोणी कोणी याला अस्थेटिक इंडेक्स असेही म्हणतात. सीएनएनच्यामते, अशा प्रकारच्या इंडेक्सला फारसा तांत्रिक आधार नाही, गंमत म्हणून हे ठीक आहे. पण त्यामध्ये काहीच तथ्य नाही असेही म्हणता येणार नाही.
आर्थिक मंदीचे लक्षण?
- आता या तर्कावरून उलट सिद्धांत मांडला तर लिपस्टिक, नेल पॉलिश, कॉस्मेटिक्सची विक्री वाढणे हे आर्थिक मंदीचे लक्षण आहे का ?
- वॉरन बफे यांनी अल्टा ब्युटीच्या शेअर्सच्या केलेल्या खरेदीवरून काही लोकांनी मंदीचे तर्क मांडायला सुरुवात केली आहे. कदाचित लिपस्टिक, नेलपॉलिश, कॉस्मेटिक्सची विक्री वाढेल म्हणून बर्कशायर हॅथवेने शेअर्स खरेदी केले असतील आणि याचा अर्थ अमेरिकेत आर्थिक मंदी येऊ घातली आहे काय? काळच ठरवेल.
हेमलाईन इंडेक्स
- स्त्रियांच्या स्कर्टची लांबी (ऊंची) आणि अर्थव्यवस्था ह्यांचा काही संबंध असू शकतो का ? या संदर्भात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जॉर्ज टेलर यांनी हेमलाईन इंडेक्सची थिअरी मांडली.
- 1929 साली जॉर्ज टेलर यांनी पीएचडीसाठी ‘पोस्ट वॉर चेंजेस इन होजिअरी इंडस्ट्री ” या विषयावर एक प्रबंध लिहिला आणि त्यामधे त्यांनी स्कर्टच्या लांबीचा आणि 1920 सालच्या आर्थिक तेजीचा संबंध जोडला.
- या थेअरीप्रमाणे, स्कर्टची लांबी (हेमलाईन) शेअर बाजाराच्या इंडेक्सप्रमाणे कमी जास्त होते. म्हणजे अर्थव्यवस्था तेजीत असेल तेव्हा स्कर्टची लांबी कमी होते. आणि मंदीच्या काळात स्कर्टची लांबी वाढते.
- या मागचे तर्कशास्त्र असे की, आर्थिक तेजीच्या काळात ‘फील गुड वाइब्स ’ वाढतात आणि सहाजिकच स्त्रियांना जरा सौंदर्याच्या प्रदर्शनाचा मोह होतो आणि मग कमी लांबीचे स्कर्ट वापरायला सुरवात होते.
- मंदीच्या काळात नैराश्याचे आणि असुरक्षिततेचे वातावरण असते आणि मग अधिक लांबीचे स्कर्ट वापरण्याकडे स्त्रियांचा कल वाढतो. इटालियन फॅशन डिझायनर म्युशिया प्राडा यांनी 2021 मधे प्राडा आणि मीयू मीयू या ब्रॅंडचे अल्ट्रा मिनी स्कर्ट आणले, पण आता ते अधिक लांबीचे स्कर्ट आणत आहेत. यावरून काय समजायचे?
हे कितपत खरं असेल?
- फॅशन क्षेत्रातली मंडळी असं सांगतात की, 1920 सालच्या तेजीत स्कर्टची लांबी कमी झाली. मग 1929 च्या जागतिक मंदीच्या काळात स्कर्टची लांबी वाढली.
- 1930 ते 1940च्या काळात जसजशी आर्थिक उन्नती होऊ लागली तशी स्कर्टची लांबी गुडघ्याच्या वर सरकू लागली. 1947 साली डॉयर ब्रॅंडने अधिक लांबीचे स्कर्ट बाजारात आणले आणि 1949 सालची मंदी सुरू झाली.
- पुन्हा 1960 ते 1980 या आर्थिक बूमच्या काळात मिनी स्कर्टची जोरात फॅशन आली. नंतर 1987 सालच्या स्टॉक मार्केट क्रॅशच्या काळात पुन्हा मिडी स्कर्टची फॅशन आली.
- फोर्ट-वर्थ स्टार टेलिग्रामच्या अंकात एक मजेशीर बातमी छापून आली होती. ‘महिलांनो, एखादा मुलगा खिडकीतून तुमच्या स्कर्टकडे पहातोय असं दिसल्यावर लगेच त्याच्या मनात काही वाईट भावना असेल असं समजू नका, कदाचित तो चाणाक्षपणे त्याच्या आर्थिक भविष्याचा अंदाज बांधत असेल.’
लिटल बिलो दि नी क्लब
- काळानुरूप महिलांच्या विचारसरणीत बदल होत जातो आणि फॅशन बदलत जाते. त्यामुळे काहींच्या मते स्कर्टची लांबी मोजण्यात काही तथ्य नाही.
- 1947 साली टेक्सास मधे वॉरेन जे. वुडवार्ड नावाच्या महिलेने एक ग्रुप स्थापन केला, त्याचं नाव लिटल बिलो दि नी क्लब होतं, नंतर अमेरिकाभर असे अनेक ग्रुप स्थापन झाले.
- 1947 साली डॉयरनं अधिक लांबीचे स्कर्ट आणल्यावर काही महिला मंडळांनी निदर्शनं केली. त्यांचं म्हणणं होतं, “डॉयर महाशय, आम्ही तुमचे अधिक लांबीचे स्कर्ट फेकून देतो. आता पुन्हा आम्ही आजीच्या काळातील लांबड्या स्कर्टकडे वळणार नाही”.
- काही मंडळीना हेमलाईन इंडेक्स न पटण्याचं वेगळं तर्कशास्त्र आहे. त्यांच्या मते कमी लांबीचे स्कर्ट वापरून बचत होत असेल, तर मंदीच्या काळात स्कर्टची लांबी वाढवून खर्च कशाला वाढवला जाईल? त्यामुळे आर्थिक मंदीच्या काळात अधिक लांबीचे स्कर्ट वापरणं हे काटकसरीच्या धोरणाच्या विरुद्ध आहे.
हेमलाईन इंडेक्स आणि इकॉनॉमिक सायकल
- बार्डविक आणि फ्रॅन्सिस ह्या दोन अर्थशास्त्राच्या प्रोफेसर्सनी फॅशनच्या मासिकातल्या 1921 ते 2009 या कालावधीतील माहिती आणि नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च यांच्याकडचा इकॉनॉमिक सायकलचा डेटा यांची सांगड घालून अभ्यास केला.
- त्यांच्या पेपरमधे त्यांनी असा निष्कर्ष काढला की , “अर्बन लीजेंड हॅज इट दॅट द हेम लाईन इज को-रिलेटेड विथ इकॉनोमी. इन टाइम्स ऑफ डिक्लाइन, द हेमलाईन मूव्ह टुवर्ड्स द फ्लोअर अँड व्हेन द इकॉनॉमी इज बूमिंग, द स्कर्ट गेटस शॉर्टर. दि मेन फाइंडिंग इस दॅट द अर्बन लीजेंड होल्ड्स ट्रू बट विथ टाईम लॅग अबाउट थ्री इयर्स.”
- लिपस्टिकच्या विक्रीच्या आकड्यावरून एकवेळ लिपस्टिक इंडेक्स ठरवता येईल पण हेमलाईन इंडेक्स कसा मोजायचा ?
प्रदीप गोखले
Share this article on :