कार्ड व्यवहाराची आधुनिक पद्धत – कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीम

Reading Time: 3 minutes

आपल्यापैकी काही लोकांनी  नव्याने मिळालेले आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे थोडेसे वेगळे असलेले डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / स्मार्ट कार्ड नीट पाहिलंय का? 

या पूर्वीचे कार्ड आणि सध्याचे कार्ड यात काही फरक आहे का? 

चित्रात दाखवल्याप्रमाणे जर त्यावर वाय फाय सारखे चिन्ह असेल तर हे कार्ड स्वाईप न करता आपण काही मर्यादेपर्यंत त्यावर व्यवहार करू शकतो.  या संदर्भात माहिती देणारे पत्र त्याबरोबर आले असेलच.

 • सर्वसाधारण कार्डवर असणारी चुंबकीय पट्टी / इलेक्ट्रॉनिक चिप असते ती आहेच याशिवाय त्यासोबत असलेली सिग्नल यंत्रणा RFID किंवा NFC या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपली ओळख सही किंवा पिन शिवाय करून देण्याचे काम करते. यामुळे छोटे  व्यवहार जलद गतीने होत आहेत. स्मार्टफोनचा वापर करून अँपच्या साहाय्याने असे व्यवहार करता येणे शक्य आहे.
 • वस्तू किंवा सेवा खरेदी केल्यावर तेथे असलेल्या POS उपकरणावर आपले कार्ड धरले /मोबाईल फोन धरला की, हिरवा दिवा लागतो अथवा बीप असा आवाज येतो आणि व्यवहार पूर्ण होतो. यासाठी पिन टाकावा लागत नाही. तुम्ही मागणी केल्यास व्यवहाराची छापील नोंद (Charged slip)  मिळते अन्यथा नाही.जगभरात कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या एकूण व्यवहारापैकी 33% व्यवहार या माध्यमातून केले जात आहेत. हे कार्ड ग्राहक स्वतः आपल्या हाताने कार्ड रिडरवर धरीत असल्याने तो निर्धास्त राहू शकतो.

काय आहे कार्ड सुरक्षा योजना?

 • हे व्यवहार रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञान वापरून होत असले, तरी ते पुरेशी काळजी घेऊन केले जात असल्याने आपण यापूर्वी करीत असलेल्या इलेक्ट्रॉनिक चिप/ मॅग्नेटिक टेप + पिन प्रमाणेच सुरक्षित आहेत. याद्वारे केला जाणारा व्यवहार क्षणार्धात होत असला तरी तो ठराविक रकमेच्या मर्यादेत करता येतो.
 • आपल्या येथे सध्या ही मर्यादा रु.२०००/- पर्यंतचा एक व्यवहार असे एका दिवसात जास्तीत जास्त ५ व्यवहार यापुरती मर्यादित असून त्यास भारतीय रिझर्व बँकेची परवानगी आहे. 
 • बँक आपल्या ग्राहकांना एक दिवसात याहून कमी रक्कम आणि कमी वेळा व्यवहार मर्यादा ठरवून देऊ शकते. त्यामुळे त्यात असलेली जोखीम मर्यादित आहे. 
 • जगभरात जेथे Mastercard, Visa या पैसे पाठवायच्या पद्धतीमार्फत व्यवहार होतात तेथून  कोठूनही हे व्यवहार करता येतात. 
 • वेगवेगळ्या ठिकाणी व्यवहार करण्याची तेथील लोकांची पद्धत वेगवेगळी असल्याने स्थानिक परिस्थितीनुसार एक व्यवहार किती रुपयांचा? आणि एकूण व्यवहार संख्या किती? याचे प्रमाण वेगवेगळ्या देशात वेगळे असते. .
 • जेथे अशी सोय आहे तेथे ती असल्याची सूचना परिचय चिन्हासह (Logo)  ग्राहकास सहज दिसेल अशा ठिकाणी लावलेली असते. हे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र निर्धारित रकमेहून अधिक रकमेचा व्यवहार करायचा असेल तेथे हेच कार्ड आपण वापरू शकाल. मात्र यासाठी हे कार्ड स्वाईप करून पिन टाकावा लागेल. 
 • कार्ड रीडर जवळून व्यक्ती गेल्याने त्यातून पैसे गेल्याचे अनेक व्हिडीओ प्रसारित झाले असून, ते सर्व बोगस आहेत. व्यवहार होण्यासाठी कॅशियर व्यवहाराची रक्कम टाकेल ती योग्य असल्याची खात्री करून कार्डधारकास आपल्याकडील कार्ड रीडर जवळ २ ते ५ सेमी अंतरावर धरावे लागते, तरच व्यवहार पूर्ण होतो. 
 • एका वेळी एकच व्यवहार होतो, जरी तुम्ही दोन वेळा कार्ड धरले तरी दोन वेळा पैसे वजा होत नाहीत. दोन वेगवेगळी कार्ड धरल्यास त्यातील कोणतेही एक निवडण्याचा संदेश येतो. कॅशियरकडून रक्कम टाकण्यास चूक झाल्यास त्याला आधी टाकलेली रक्कम रद्द करून नवीन रक्कम टाकता येते. कार्ड पाकिटात ठेवून व्यवहार करता येत नाही. हे कार्ड आपण कोणत्याही ठिकाणी निर्धास्तपणे वापरू शकतो.

क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

 • अशी सेवा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी हे कार्ड आपण पूर्वी व्यवहार करण्यास वापरत होतो त्याचप्रमाणे पिनचा वापर करून करता येईल, तर ऑनलाइन व्यवहारासाठी एकदाच वापरायचा संकेतांक (OTP) घेवून व्यवहार पूर्ण करता येईल.
 • आपल्या बँकेने आपणास दिलेली ही सवलत बंद करता येत नाही. परंतू आपली इच्छा नसल्यास कमी रकमेचे व्यवहार आपण पूर्वीप्रमाणे करू शकतो. त्याचप्रमाणे अशी सेवा कोणाला उपलब्ध करून द्यायची याचे सर्वाधिकार बँकेकडे असतात, सरसकट ही सेवा वित्तसंस्था सर्वाना देत नाहीत.
 • कार्ड हरवले असता इतर कोणत्याही प्रकारची जोखीम यामध्ये आहे फक्त या व्यवहाराना  मर्यादा असल्याने, तसेच असा व्यवहार झाल्याचा संदेश संबंधित बँकेकडून येत असल्याने ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून ते तात्काळ बंद करता येईल. 
 • कार्डावरील सीव्हीव्ही (CVV) लक्षात ठेवून तेथून खोडल्यास (गैरव्यवहार रोखण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे) अन्य व्यवहार कोणालाही करता येणार नाहीत. एकदा कार्ड हरवल्याची तक्रार केल्यावर त्या कार्डचा वापर करून केलेल्या कोणत्याही व्यवहाराची जबाबदारी ग्राहकाची नाही.  
 • सध्या बिगबाजार, सेन्ट्रल, कोस्ता कॉफी, मॅकडोनोल्डस, रिलायन्स डिजिटल, रिलायन्स फ्रेश, इनोक्स, पिझा हट, सहकारी भांडार, स्टारबक्स, ट्रेंड्स या ठिकाणी या कार्डनी व्यवहार करायची सोय उपलब्ध आहे आणि दिवसेंदिवस अशा ठिकाणांची संख्या वाढत आहे.

बँक व्यवहारांसाठी २७ महत्वाच्या टिप्स

असे कार्ड किंवा अन्य कोणते डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, स्मार्ट कार्ड घ्यावे का? 

घेतल्यास कोणती काळजी घ्यावी, त्याचा विमा घ्यावा का? 

त्याचे फायदे तोटे? 

यावर अनेक उलट सुलट चर्चा होत राहातीलच. त्यावर काय निर्णय घ्यायचा हे त्या  व्यक्तीवर अवलंबून आहे. याचे दुरूपयोग होऊ शकतात, खर्च वाढू शकतात, व्यक्ती कर्जाच्या सापळ्यात अडकू शकतात. असे असले तरी या कार्डमुळे, तसेच त्याचा योग्य वापर केल्यास आपले जीवन सुसह्य होऊ शकले आहे हे नाकारता येणार नाही. 

अनेक खाजगी बँकांबरोबर आता सरकारी क्षेत्रातील बँकांनी (SBI, BOI, PNB) आपल्या निवडक ग्राहकांना अशी कार्ड दिली आहेत. सन २००७ मध्ये युरोपमध्ये विकसित झालेले हे तंत्रज्ञान भारतात  पोहोचायला सन २०१५ उजाडावे लागले. अलीकडे यात झपाट्याने वाढ होत असून ज्याच्याकडे असे कार्ड आहे किंवा भविष्यात ज्यांना असे कार्ड मिळू शकेल त्यांना यासंबंधीची अधिक माहिती मिळावी म्हणून हा लेखनप्रपंच. 

क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

उदय पिंगळे

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *