One Person Company: सर्वसामान्यांचे व्यावसायिक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारी एकल कंपनी

Reading Time: 3 minutes

एकल कंपनी (One Person Company)

यापूर्वी आपण कंपनी म्हणजे काय? याची माहिती करून घेतली असून कंपन्यांचे विविध प्रकार पाहिले आहेत. आज आपण एकल कंपनी (One Person Company) म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

कंपनी ही स्वतंत्र अस्तीत्व असलेली आणि कायद्याने निर्माण केलेली संस्था आहे हे आपल्याला माहिती आहेच. कंपनीतील सभासदांची संख्या, त्यांचे उत्तरदायित्व, विशेष हेतूने स्थापन झालेल्या कंपन्या, त्यावर नियंत्रण यावरून अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. एखादा व्यवसाय व्यक्तीने करणे आणि कंपनीने करणे यात फरक असून तो कंपनीने करणे हे व्यावसायिक दृष्टीने अधिक फायदेशीर असते. खाजगी मर्यादित कंपनी स्थापन करण्यास किमान दोन व्यक्तींची गरज असते. यासाठी व्यवसायात आपल्या मनाप्रमाणे भागीदार मिळणे हे सुयोग्य जीवनसाथी मिळण्याएवढे कठीण आहे. एकल कंपनीचे स्वतंत्र आणि कायदेशीर अस्तित्व मान्य  केल्याने त्यानुसार उपलब्ध सोई सवलती यांचा लाभ घेता येतो. व्यवसायवृद्धीकरिता याचा फायदा होतो. कराचा बोजा कमी होतो.

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था

 • नवा कंपनी कायदा सन २०१३ मध्ये २८ ऑगस्टला मंजूर होऊन १३ सप्टेंबरपासून अस्तित्वात आला. मोठे महत्वपूर्ण बदल त्यात करण्यात येऊन आले, या कायद्याने पूर्वीच्या कंपनी कायद्याची जागा आता घेतली आहे. 
 • यापूर्वी सन २००९ मध्ये सरकारकडून अशा प्रकारे कंपनी स्थापन करता येऊ शकेल, अशी संकल्पना मांडण्यात आली होती. याची पूर्तता या कायद्यात करण्यात आली आहे. 
 • यामुळे ज्यांच्याकडे कल्पकता आहे अशा व्यक्तींना किमान भांडवलात (एक लाख रुपये) कंपनी स्थापन करता येऊन त्यामुळे मिळणाऱ्या फायद्याचा लाभ घेता येईल. 
 • प्रोप्रायटर फर्म स्थापन करून व्यवसाय करण्यापेक्षा ते अधिक फायदेशीर ठरेल. यातील आपली जबाबदारी मर्यादित ठेवता येईल, भांडवल उभारणी  सुलभतेने निर्माण करून व्यवसाय वाढवता येऊ शकेल. यातून मिळणाऱ्या नफ्यावर कमी दराने करआकारणी होईल.

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग २

One Person Company: एकल कंपनीची ठळक वैशिष्ट्ये-

 1. यांमध्ये नावाप्रमाणे फक्त एकच सभासद असतो. तोच भागधारक आणि संचालक असतो. जर त्याचे काही बरेवाईट झाले तरी कंपनीचे अस्तित्व तसेच राहाते म्हणून आपल्या पश्चात  कामकाज पाहण्यासाठी त्यास आपला उत्तराधिकारी नेमावा लागतो.
 2. कंपनीची स्वतंत्र अशी ओळख निर्माण होते त्यामुळे स्वतःचे व्यापारचिन्ह (Brand) निर्माण करता येते. यामुळे ग्राहक, पुरवठादार, वितरक, गुंतवणूकदार यांचा विश्वास वाढीस लागतो.
 3. वैयक्तिक आणि व्यापारी मालमत्ता निर्माण होते. व्यवसाय करायचा म्हणजे चांगल्यात चांगले करण्याची इच्छा असेल तरी वाईटात वाईट असे काहीही होऊ शकते. यात भागधारकाची जबाबदारी मर्यादित असल्याने त्याचा वैयक्तिक मालकीचे संरक्षण होते.
 4. स्वतःच स्वतः चे प्रमुख असल्याने भांडण होणे, अहंकार दुखावणे, जुळवून घेणे या गोष्टी सहन कराव्या लागत नाहीत. व्यवसायावर नियंत्रण राहते, आपल्या मर्जीनुसार निर्णय घेता येऊन गरजेनुसार तज्ञ विश्वासू माणसांचे सहकार्य घेता येते. भविष्यात संचालकांची संख्या १५ पर्यंत वाढवता येते.
 5. सर्वसाधारण संकेत पाळावे लागत नाहीत. कंपनी कायद्यात असलेल्या आणि इतर सर्व प्रकारच्या कंपन्यांना त्या चालवण्यासाठी जे संकेत पाळावे लागतात अशा अनेक तरतुदी यातून एकल कंपन्यांना वगळण्यात आल्या आहेत.
 6. करदायित्व कमी होते. स्वतंत्र व्यावसायिक अथवा  भागीदारी यापेक्षा भांडवल उभारणी करणे सुलभ आहे. याशिवाय संचालक म्हणून पगार घेऊन, तसेच व्यवसायास स्वताची जागा वापरत असेल तर त्याचे भाडे घेऊन, आपल्या वैयक्तिक गुंतवणुकीवर व्याज देऊन, तसेच इतर खर्च यांच्या वजावटी घेऊन करदेयता कमी करता येते.
 7. याशिवाय अशा तऱ्हेने एकल कंपनी निर्माण करून स्वताचे व्यावसायिक कौशल्य सिध्द करता येते त्यायोगे भविष्यात धाडसी गुंतवणूकदार मिळू शकतात पुढे याच कंपनीचे खाजगी मर्यादित व त्यानंतर सार्वजनिक मर्यादित कंपनीत रूपांतर होण्याची शक्यता वाढते.
 8. अशी कंपनी स्थापण्यास १ लाख रुपये किमान भांडवल लागते. कंपनी नोदणी करण्याची पद्धत सुलभ असून अत्यंत कमी प्रमाणात कागदपत्रांची जरुरी असते.

नोकरी करू की व्यवसाय?

यातील फायदे लक्षात घेऊन, ज्यांना शक्य आहे त्यांनी एकल स्वामित्व कंपनी स्थापन करून आपले खाजगी व्यवसाय त्या कंपनीमार्फत करावेत. अशा प्रकारे कंपनी स्थापन करण्याचा अर्ज आणि सविस्तर माहीती www.mca.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनेक व्यक्ती/संस्था अश्या प्रकारे कंपनी स्थापन करण्यास, नाव नोंदणी करण्यास फी आकारून मदत करतात.

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel: CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: One Person Company in Marathi, One Person Company  Marathi Mahiti, One Person Company  Marathi, One Person Company  mhanaje kay, ekal company mhnaje kay