सुरेश आणि रमेश हे दोन जुळे भाऊ. ते सारे काम सारखेच आणि एकमेकांसोबतच करीत. त्या दोघांनाही एकाचवेळी, एकाच कंपनीमध्ये नोकरी लागली. दोघेही खूप खुश झालेत. दोघांचा पगारही सारखाच होता.
काही दिवसांनंतर सुरेश आणि रमेशला आपापले घर असावं असं वाटू लागलं. इथे मात्र प्रथमच सुरेश आणि रमेश यांचे विचार, त्यांची घरासंबंधित आर्थिक आखणी वेगळी झाली. सुरेशने ठरवलं की विकत घर घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहावं. त्याला सुरवातीलाच इतकी मोठी रक्कम घरात गुंतवणं योग्य वाटत नव्हतं.
रमेशला मात्र भाड्याच्या घरात राहायचं नव्हतं. त्याच्यावर पारंपरिक विचारांचा पगडा होता. स्वतःच्या मालकीचं घर असावं, असं पूर्वजांच्या म्हणण्यानुसार त्यालाही वाटत होतं. म्हणून रमेशने घर विकत घेण्यासाठी गृह कर्ज घेण्याचं ठरवलं. सुरेश मात्र भाड्याच्या घरांत राहायला गेला.
भाड्याच्या घर वि. विकत घेतलेलं घर:
- प्रक्रिया:-
- सध्याचा डिजिटल काळात अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. आपल्याला हवं तसं घर विकत अथवा भाडयाने घेणं एका क्लिकवर सहज शक्य आहे. परंतु भाड्याने घर घेण्याची प्रक्रिया तुलनेने खूप सोपी आहे.
- तसेच, यामध्ये ‘गुंतवणूक’ नसल्यामुळे त्यामध्ये फारसा धोका नाही व आपल्या सोईनुसार घर बदलता येते.
- सुरेशने आपल्या ऑफिसच्या जवळचं एक घर पसंत केलं व त्यासंदर्भात कायदेशीर करार करून तो त्या घरात रहायला गेला .
- घरभाडे व व्याज:-
- जर्मनी, इंग्लंड, अमेरिकेत भाड्याच्या घराचं भाडं हे गृहकर्जावरील व्याजापेक्षा जास्त असतं. त्यामुळे या देशांत भाडयाने राहणं परवडत नाही. परंतु भारतात अशी परिस्थिती नाही. भारतात भाड्याच्या घरात राहताना द्यावं लागणारं भाडं गृहकर्जावर भरावं लागणाऱ्या व्याजापेक्षा कमी आहे.
- सुरेशने भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतल्याने त्याचं गृहकर्जावरील मोठे मासिक हप्ते देणे वाचले.
- रमेशला मात्र नवीन घर घेतले व त्याला गृहकर्जावर ८.५ % व्याज द्यावं लागत होतं. त्यामानाने सुरेशचं भाड्याच्या घराचं मासिक भाडं मात्र खूप कमी होतं.
- गुंतवणूक:-
- घर ही मोठी मालमत्ता मानल्यास ती कायम मोठं रिटर्न्स, परतावा देईलच असं नसतं. कारण आपलं घर म्हणजे आपली मालमत्ता असं जरी असलं तरी व्यक्ती स्वतःसाठी वापरणार असते. रमेशने मोठं गृहकर्ज घेतल्याने त्याची भविष्यातील इतर गुंतवणूक होत नव्हती.
- भाड्याच्या घरांत राहून होणारी मोठी बचत ही म्युच्युअल फ़ंड्समध्ये गुंतवल्यास जास्त मिळकत प्राप्त होऊ शकते. सुरेशने गृहकर्ज न घेतल्याने, कर्जाचे हप्ते भरावे लागत नव्हते त्यामुळे, तो अतिरिक्त बचत करून तो ते पैसे म्युच्युअल फ़ंड्समध्ये टाकत होता.
- मेंटेनन्स:-
- स्वतःच्या मालकीचं घर म्हटलं की कर्ज हप्त्यांसोबत दरवर्षी भरावा लागणारा म्युनिसिपल / कॉर्पोरेशन टॅक्स, घराची डागडुजी,कलर, फर्निचर, इंटेरिअर यावर खर्च करणे क्रमप्राप्त असते.
- परंतु, भाड्याचे घर निवडताना जर ‘वेल फ़र्निश’ फ्लॅट निवडला तर हा सारा खर्च वाचतो. तसेच म्युनिसिपल / कॉर्पोरेशन टॅक्सही भरावा लागत नाही.
- नोकरीनिमित्त शहर किंवा जागा बदल:-
- त्यांनतर सुरेश आणि रमेश दोघांनीही नोकरी बदलली. रमेशला वेगळ्या भागांत असलेल्या ऑफिसमध्ये राहत्या घरापासून जाताना त्रास व्हायचा. परंतु सुरेशने मात्र त्याच्या ऑफिसच्या जवळपास भाड्याचं घर शोधून तो तिकडे राहायला गेला.
- सुरेशकडे घर बदलण्याची लवचिकता जास्त होती. रमेशने मात्र प्रचंड मोठी रक्कम स्वतःच्या घरांत गुंतवल्याने, घराचे हप्ते भरताना त्याला ते घर सोडून ऑफिसजवळील भाड्याच्या घरांत राहायला जाणं शक्य नव्हतं. कारण त्याचं वेगळं भाडं भरणं रमेशला परवडणारं नव्हतं.
- यामुळे हवं तेव्हा हवं तसं घर बदलण्याची सोय रमेशला नव्हती. याशिवाय ज्या शहरात घर घेतलं ते शहर सोडून दुसऱ्या शहरांत नोकरी करायला जाणं त्याच्यासाठी अडचणीचं होतं. सुरेशला मात्र कोणत्याही शहरात नोकरी करण्यात काहीच अडचण नव्हती.
- घरभाडे भत्ता (HRA):-
- स्वतःचं घर असल्याने रमेशला घरभाडे भत्ता सवलत मिळणार नव्हती.
- दुसरीकडे सुरेशला मात्र भाड्याच्या घरात राहिल्यामुळे घरभाडे भत्ता (HRA) मिळत होता.
- धोके:
- आजच्या काळात मंदी किंवा तत्सम आपत्ती उद्भवल्यास नोकरी जाण्याचीही शक्यता असते. अशावेळी गृहकर्जाचे मासिक हप्ते कसे भरायचे, ही टांगती तलवार व्यक्तीवर असते. दुसरीकडे भाड्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला अशावेळी कमी किंमतीच्या भाड्याच्या घरात शिफ्ट होण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
वरील तुलनेवरून “स्वतःच्या मालकीचं घर घेण्याचे काहीच फायदे नाहीत”, असं जरी वाटत असलं, तरी तसं अजिबात नाही. कुठल्याही गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्हीही असतात. त्यामुळे पुढील भागात आपण गृहखरेदीच्या फायद्यांबाबत विचार करू.
गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे,
होम लोनचं प्रीपेमेंट करताना ह्या बाबींचा विचार जरूर करा
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.