मुदत ठेव हा बचतीचा लोकप्रिय प्रकार आहे. अल्प आणि मध्यम मुदतीच्या गरजांसाठी त्याचा निश्चित उपयोग होतो. रोख रकमेस पर्याय या दृष्टीने अडीअडचणीसाठी पैसे लागतात म्हणून सर्वच व्यक्ती सर्वप्रथम मुदत ठेवीस पसंती देतात. याची सुरक्षितता आणि निश्चित परतावा मिळण्याची खात्री यामुळे 95% लोक काहींना काही रक्कम मुदत ठेवीत ठेव म्हणून ठेवतातच.
याला अन्य गुंतवणूक पर्याय असले तरी आपल्याकडे पैसे असतील तर ते बँक किंवा पोस्टात ठेवावेत असे पारंपरिक विचार करणाऱ्या लोकांना वाटते तर गुंतवणूक करण्यास बीजभांडवल म्हणून थोडी जास्त रक्कम हाताशी असेल तर चांगला उपयोग होतो.
मुदत ठेवींचे वेगवेगळे प्रकार असून आपण त्या पोस्ट, बँक, वित्तीय संस्था, फायनान्स कंपन्या, इतर कंपन्या, बिगर बँकिंग संस्था, पतपेढ्या यात ठेऊ शकतो. ग्राहकांच्या सोयीसाठी अशा योजनांना कल्पकतेची जोड देऊन त्या अधिक आकर्षित केल्या जातात.
यातील बँक, पोस्ट, पतपेढी यांची विनिमयक्षमता अतिशय चांगली असून गरज पडल्यास काही अटींवर किंवा अटींशिवाय पैसे त्वरित उपलब्ध होऊ शकतात. कर्ज उपलब्ध होऊ शकते. कंपन्यामध्ये ठेवलेले पैसेही गरजेनुसार मिळू शकतात पण त्याला थोडा जास्त कालावधी लागतो.
योजनांचे प्रकार-
१. मुदत ठेव Fixed Deposite –
- नावाप्रमाणेच त्यास ठराविक मुदत असते. ती 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत असू शकते. कालावधीनुसार हे दर कमी, अधिक असतात.
- अत्यंत दीर्घ मुदतीच्चे सरकारी बॉण्ड उपलब्ध आहेत. त्यांची मुदत 10 वर्षाहून अधिक ते 40 वर्षेपर्यत कितीही असू शकते. याचे व्यवहार दुय्यम बाजारात होत असले तरी विनिमय क्षमता कमी असते.
- अशा योजनांतील सर्वसाधारण व्याजाचा विचार करता, पोस्टात ते बँकेच्या तुलनेत जास्त असतात. काही ठिकाणी ते बाजारसापेक्ष आहेत.
- सरकारी बँकांहून सहकारी बँका, पतपेढ्या, इतर वित्तसंस्था, बिगर बँकिंग कंपन्या, सर्वसाधारण कंपन्या अधिक व्याज देऊ करतात, याशिवाय जेष्ठ नागरिक, महिला, शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती यांना नियमित दरापेक्षा थोडे अधिक व्याज देण्यात येते.
- एकरकमी रक्कम ठेवून ठराविक काळाने व्याज घेता येथे अथवा तिमाही वार्षिक व्याजाची अथवा वार्षिक व्याजाची पुनर्गवणूक करता येते आणि एकदम घेता येते.
२. रिकरिंग डिपॉजिट –
- एक रकमी पैसे भरणे अनेकांना शक्य नसते तेव्हा हा पर्याय निवडला जातो. याची मुदत 12 महिने ते 120 असू शकते. यामुळे दीर्घ काळात एकरकमी पैसे उपलब्ध होतात. यावर मिळणारे व्याज मुदत ठेवींवरील दराएवढे असते.
- त्याचप्रमाणे बँकेत / पोस्टात ठेवलेली मुदत ठेव आपल्या गरजेनुसार कधीही मोडता येते.
- असे मुदतपूर्व विमोचन करताना काही दंड आकाराला जातो. अधिक दराने दिलेले व्याज कापून घेतले जाते.
नक्की वाचा : मुदत ठेव गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी नक्की विचारात घ्या
३. बदलत्या व्याजदाराच्या ठेवी–
- यावरील व्याजदर हे एका मार्गदर्शक व्याजदाराच्या प्रमाणात ठराविक अंतराने कमी/ अधिक होत असतात.
४. टॅक्स सेव्हिंग डिपॉझिट–
- कर वाचवा यासाठी मुदत ठेव पाच वर्षे मुदतीने रक्कम ठेवता येते. यावर सर्वसाधारण व्याजदाराहून थोडे अधिक व्याज मिळते. हे व्याज नियमित अथवा एकरकमी घेण्याचे पर्याय ग्राहकांना आहेत.
नक्की वाचा : प्रत्येक गुंतवणूकदाराला जोखमीबद्दल काय माहित असायला हवे?
सर्वसाधारणपणे ठेव ठेवतांना-
- उपलब्ध पर्याय, त्यांची सुरक्षितता यातील बँकेतील ठेवी 5 लाख रुपयांपर्यंत सुरक्षित आहेत तर अल्पबचत योजनांना सरकारी हमी असल्याने त्या अधिक सुरक्षित आहेत.
- कंपनी ठेवी तारणासह किंवा ताराणांशिवाय उपलब्ध असल्या तरी जर त्यांनी ठेव परत करण्यास नकार दिला तर ते परत मिळवून देणारी प्रभावी यंत्रणा नाही.
- व्याजदर, किमान रक्कम, मुदत
- व्याज /व्याजावर व्याज देण्याची पद्धत
- पैसे मुदतपूर्ती पूर्वी अंशतः किंवा पूर्ण काढल्यास होणारे परिणाम,
- करदेयता
- मिळणाऱ्या अन्य सुविधा
- मुदत ठेवींचा सुरक्षितता यादृष्टीने उतरता क्रम लावायचा असल्यास पोस्ट ऑफिस, बँक, (येथील ठेवी 5 लाख रुपयांपर्यंत सुरक्षित आहेत) वित्तीय संस्था, उत्पादन कंपन्या, बिगर बँकिंग संस्था, पतपेढ्या असा क्रम लावता येईल. असे असले तरी पोस्ट, बँक आणि पतसंस्था यांच्याकडे ठेव ठेवायचा लोकांचा कल आहे.
- सरकारी, सहकारी आणि खाजगी बँकांनी अधिकाधिक ग्राहक आपल्याकडे यावेत यासाठी काही मूल्यवर्धित सवलती दिल्या आहेत.
- विशिष्ट रक्कम जमा झाल्यावर आपोआप मुदत ठेव निर्माण होणे.
- मुदत ठेवीत असणारी रक्कम सर्वसाधारण खात्यात शिल्लक दाखवणे.
- यातील 1 रुपयाच्या पटीत वापलेली रक्कम ही अंशतः मोडलेले डिपॉझिट समजून उरलेल्या रकमेवर देयदराने व्याज देणे. काही ठिकाणी अशी सोय नसते अशा ठिकाणी एकच मोठे डिपॉझिट न घेता ते विभागून घेतल्यास गरज लागल्यास आपल्याला आवश्यक तेवढी रक्कम काढून घेता येईल.
- बँक / पोस्ट येथे जेष्ठ नागरिकांना ठेवींवर आणि बचत खात्यावरील व्याज 50 हजार रुपयांपर्यंत करमुक्त आहे. तर अन्य व्यक्तींना फक्त बचत खात्यावरील 10 हजार रुपयांचे व्याज करमुक्त आहे. सर्वसाधारण व्यक्तींच्या बाबतीत 40 हजार तर जेष्ठ नागरिकांना मिळणारे व्याज 50 हजाराहून जास्त असल्यास मुळातून करकपात केली जाते. अन्य ठिकाणी 5 हजाराहून अधिक व्याज मिळत असल्यास मुळातून करकपात केली जाते. आवश्यकतेनुसार 15 जी किंवा एच फॉर्म देऊन ती टाळता येईल.
- एकेकाळी सर्वोच्चदराने मुदत ठेवींवर परतावा मिळत होता आणि एकंदरीत खर्चाच्या दृष्टीने विचार करता हे दर कमी असावेत अशी उद्योगांची मागणी होती.
- सरकारलाही हे दर कमी असावेत असे वाटत असल्याने ते टप्याटप्याने खाली आणण्यात आले. कोविड 19 चा फायदा घेऊन अर्थव्यवस्थेस चालना मिळावी या हेतूने ते मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले.
- ते जवळपास किमान पातळीवर आले असताना गेले काही दिवस मात्र उलट अनुभव येत आहे. महागाईत वाढ होत असल्याने आणि जगभरातील बँका व्याजदर वाढवत असल्याने अपरिहार्य परिस्थिती म्हणून रिझर्व बँकेकडून कर्जावरील दर वाढवले जात आहेत.
- गेल्या वर्षभरात जवळपास 2% वाढ झाली. साहजिकच ठेवींवरील दर वाढण्याच्या अपेक्षा निर्माण झाल्या. वित्तसंस्था ज्या तत्परतेने कर्जावरील व्याजदर वाढवतात त्या प्रमाणात ठेवींवरील व्याजदर वाढवत नाहीत.
- कर्जावरील दर कमी झाल्यास ठेवींवरील व्याजदर तत्परतेने कमी करतात असे करणे हे त्यांच्या दृष्टीने अधिक फायद्याचे असते. हे दर किती असावेत याबाबत वित्तसंस्थांना स्वातंत्र्य असल्याने, असमान परिस्थिती काही काळ दिसून येते.
- हे फार काळ चालत नाही. कुणीतरी एकाने व्याजदर वाढवण्यात पुढाकार घेतला की नाईलाजाने सर्वांना त्याची री ओढावी वाटते.
- या सर्व गोष्टींचा विचार करून व्याजदर आता वाढतच राहतील असे वाटते.
- 15 ऑगस्टपासून सध्या अनेकजण विविध नावाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विशेष ठेव यासारख्या योजना राबवत असून त्यामध्ये ठेव ठेवल्यास नियमित व्याजदाराहून अर्धा ते एक टक्का अधिक व्याजदर देऊ करीत आहेत आणि अनेकजण त्याचा लाभ घेत आहेत या सर्वांनीच काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
- आपल्याला मिळणारे ठेवींवरील व्याज करपात्र असल्याने, तसेच हा व्याजदर महागाईवर मात करणारा परतावा देऊ शकणार नाही. यासाठी असलेल्या विविध पर्यायांचा विचार करायाला हवा.
- प्रत्येक पर्याय कमी अधिक प्रमाणात धोकादायक आहे आपली जोखीम स्वीकारण्याची पात्रता लक्षात घेऊन त्याप्रमाणे योग्य पर्यायाची निवड करावी.
- रकमेची सुयोग्य विभागणी करावी ताबडतोब रोख रकमेत रूपांतर करणाऱ्या पर्यायात, त्यावरील परताव्याचा विचार न करता आपल्या जरुरीएवढी रक्कम हवीच.
- बाजार जोखिमीशी संबंधित असलेले पर्याय टाळता येणे कठीण आहे जरी ते धोकादायक असले तरी त्यातून मिळू शकणारा परतावा महागाईवर मात करणारा आहे. याशिवाय अशा योजनांना करामध्ये असलेल्या सवलती पहाता त्या अधिक आकर्षक आहेत.
- अशा सर्व योजनांतील मूल्यांकन (Credit Ratings) आणि व्याजदर महत्वाचे असून त्याची निवड करताना रेट आणि रेटिंग विचारात घ्यावे.
©उदय पिंगळे
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेले मते अर्थ अभ्यासक म्हणून वैयक्तिक आहेत)