Share Market
आजच्या भागात आपण शेअर बाजार (Share Market) गुंतवणुकीबद्दल काही मूलभूत माहिती घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने शेअर बाजारासंबंधी असणारे गैरसमज, सकारात्मक व नकारात्मक गोष्टी, इत्यादी महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत.
भारतात मागील वर्षी या कालावधीत कोरोना साथीचे दृश्य परिणाम दिसायला सुरवात झाली होती. भारतात लॉकडाऊन नावाच्या काहीशा नवीन प्रकारास सर्वसामान्य सामोरे जाऊ लागले होते. सुरवातीस आपल्या नेहमीच्या भारतीय मानसिकतेनुसार आपण जवळपास कोणताही नवीन प्रकार साजरा करू पाहतो.
हे नक्की वाचा: गेल्या वर्षाने दिली आर्थिक नियोजनाची महत्त्वाची शिकवण
Share Market: कोरोना आणि शेअर बाजार
- कोरोनाचे गांभीर्य तसं जगात सगळीकडे हलक्यानेच घेतलं जात होतं आणि तसंच काहीसं आपल्याकडे चाललं होतं.
- त्यातूनच मग थाळ्या वाजवणे, दिवे प्रज्वलित करणे वगैरे प्रकार केले गेले अर्थात त्यामागील उद्देश चांगलाच असेल, पण हा कोरोना नावाचा प्रकार येताना तो आपली स्वतःची एक्सपायरी घेऊन आलाय आणि काही दिवसांत ही लाट ओसरून हा रोग पूर्णपणे नाहीसा होईल असं पूर्वापार चालत आलेल्या आपल्या मानसिकतेतून आपल्याला वाटत होतं.
- हा प्रकार सार्स जातकुळीतला असला तरी हल्ली वर-वर उद्भवणाऱ्या स्वाइन फ्लू किंवा बर्ड फ्लू सारखा फक्त बातम्यांमधून अस्तिव दाखवणारा नसून, बराच काळ आपल्या सोबत राहणार आहे आणि काहीजणांना घेऊनही जाणार आहे हे आपल्या नंतर लक्षात आलं.
- मग दोन-अडीच महिन्यातच बेरोजगारी, आर्थिकतंगी असे लॉकडाऊनचे साइड इफेक्ट्स जाणवू लागले. सरकारी कर्मचारी वर्ग आणि काही क्षेत्र वगळता बहुतेक सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक झळा जाणवू लागल्या.
- अनेक खाजगी कार्यालये कट-ऑफ पर्यायाचा विचार करून तो अंमलात आणू लागली. हातावर पोट असणाऱ्यांची तर वाईट अवस्था होऊ लागली.
- अशा काळात नाईलाजाने घरी बसावं लागलेले आणि त्याबरोबर घराला आर्थिक हातभार लावण्याच्या विचारात असलेल्या अनेक गृहिणी असे सर्व अर्थाजनाच्या अशा पर्यायाच्या शोधात होते की ज्यात बाहेरच्या जगाशी थेट संपर्क टाळून घरातूनच काहीतरी असे करता येईल आणि ज्यातून उत्पन्न मिळू शकेल.
- अशा काळात मग शेअर मार्केट नावाच्या प्रकाराने त्यांचं लक्ष वेधलं नसतं तरच नवल. यामुळेच त्यानंतरच्या काळात नव्याने उघडल्या जाणाऱ्या डिमॅट खात्यांची मोठी लाट आली होती आणि याच दरम्यान शेअर मार्केटसुद्धा व्ही-शेपमध्ये भरपाई देत होतं.
- सेबीच्या आकडेवारीनुसार 2020 वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत देशात 63 लाख नवे डिमॅट (अन् अर्थात ट्रेडिंगही) खाती उघडली गेली. पुढे जानेवारी 2021 पर्यंत ही संख्या 1 कोटींच्याही पलीकडे गेली.
महत्वाचा लेख: शेअर बाजारात गुंतवणूक का, कधी आणि कशासाठी?
शेअर बाजार आणि जोखीम
- बरं हे सगळं सांगण्याचं प्रयोजन काय तर वेळ आली तर लोकं जोखीम घ्यायला तयार असतात पण ती जोखीम आंधळी नसावी. म्हणजे शेअर मार्केटसारख्या क्षेत्रात अगदी प्रत्येकाने यावं किंवा किमान या क्षेत्रातील रोजच्या घडामोडींची तरी आवर्जून नोंद घ्यावी.
- तसंच जसं बँकेतील बचत खातं तसचं प्रत्येकाचं डिमॅट खातं असावंच हे माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. कारण अगदी जुजबी माहिती असतानाही फक्त चांगल्या कंपन्यांत वेळोवेळी टप्प्यात केलेली अगदी छोटी गुंतवणूकसुद्धा तुम्हाला पुढील काळात बरंच काही साध्य करून देते. पण या लेखाचा विषय तो नाहीये तर तो आहे ” डिमॅट आणि ट्रेडिंग खाती उघडून पटकन घरच्या घरी पैसा कमावू शकू” या गैरसमजास दूर करण्याचा.
- डिमॅट आणि ट्रेडिंग खाती उघडून पटकन घरच्या घरी पैसा कमावू शकू, या विचारातून या भरघोस नव्या डिमॅट / ट्रेडिंग खात्याचं पिक आलं आणि त्याचा लाभ खुद्द या खातेदारांना न होता या क्षेत्रातील मोठ्या धेंडांनाच झाला.
- काहीही माहिती नसताना फक्त पटकन पैसा मिळू शकतो या धारणेतून अनेकांनी अगदी सुरवातीला आपली गंगाजळी मार्केटमध्ये ओतली आणि “शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग या प्रकारात संपत्ती निर्मिती न होता फक्त तिचे हस्तांतरण होते ” या नियमानुसार हा इथल्या चतुर लोकांकडे गेला.
- लक्षात घ्या की विदेशी गुंतवणूकदारांचा ओघ आपल्याकडे आहे पण त्यांचं स्वारस्य तो इथल्या उद्योगातील थेट गुंतवणुकीपेक्षा भांडवली बाजारात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नगदी परताव्यात जास्त आहे.
- त्याचबरोबर या शेअर मार्केटमधील काही भारतीय गुंतवणूकदारांची नावे जी नफेखोरी (?) करण्यात अप्रतिम सातत्य बाळगून असतात. तर मग अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदार किंबहुना ट्रेडर जे अगदी डोळ्यात तेल घालून या मार्केटवर नजर ठेवून असतात.रोजच्या व्यवहारांत विदेशी गुंतवणूकदारांची (FII / FPI) उमटणारी पाऊले ओळखण्यासोबत त्यास उत्तम मुलभूत व तांत्रिक विश्लेषणाची जोड देऊन वेळोवेळी येणाऱ्या रॅलीमध्ये आपला नफ्याचा हिस्सा निश्चित करतात.
- या सगळ्यात धुवून निघतात ते “न्यूकमर्स” अर्थात या क्षेत्रात आलेली नवीन मंडळी आणि काही टिप्सजीवी म्हणजे इकडे-तिकडे स्क्रीनशॉट पाहून मी सुद्धा कधी माझे स्क्रीन-शॉट टाकतोय या विचारात उतावळे होऊन कुणाच्याही टिप्सवर, त्यांची विश्वासाहर्ता, अनुभव वगैरे काहीही विचारात न घेता व्यवहार करून आपल्याजवळ आहे ती गंगाजळी स्वाहा करतात.
- यामध्ये सर्वाधिक भरणा असतो तो अगदी 18 – 25 वयोगटातील तरुणांचा. हे वय थोडं विचित्र असतं म्हणजे या वयात एखाद्या गोष्टीचा आनंद घेण्यापेक्षाही मी तो आनंद घेतोय हे दाखवण्यात आणि जाहीर करण्यासाठी त्यांना फार उत्सुकता असते आणि शेअर मार्केट हे क्षेत्र म्हणजे आधीच ग्लॅमरची गंगोत्री म्हणावी असं. म्हणजे सिगारेट ओढण्यात मजा वाटो न वाटो पण मी ती ओढतोय ते दाखवण्यात उगाचच मर्दानगी , रफ-टफपणा वाटतो तसच काहीसं.
- “मी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो” हे असं मित्रांमध्ये सांगणे म्हणजे फारच “कुल” वगैरे त्यांना वाटत असतं. त्यात नव्याने आलेला एखाद्या चित्रपट, वेबसिरीज यांचं उरलेलं काम फत्ते करतात.
- हे सांगण्याचा हेतू इतकाच की प्रत्यक्ष ट्रेडिंगला सुरवात करण्यापेक्षा सुरवातीची काही महिने फक्त प्राथमिक ज्ञान वाढवणे उत्तम.
- डिमॅट खाते उघडणे उत्तमच पण लगेच ट्रेडिंगच करायला हवी असा काहीच नियम नाहीये अगदीच वाटलं तर जेव्हा जमेल तेव्हा ब्लू चीप कंपनीचा घेतलेला एक – एक शेअर सुद्धा तुम्हाला शेअर मार्केटच्या बराच जवळ नेतो.
विशेष लेख: शेअर बाजार- गुंतवणूक करताना या मूलभूत चुका टाळा
डिमॅट खाती आणि प्रत्यक्ष व्यवहार
- मागील वर्षी 1 कोटींपेक्षा जास्त नवीन डिमॅट खाती उघडूनही भारतात आजही शेअरमार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्या लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 2% आसपास आहे जी अमेरिकेत 50% पेक्षा जास्त आणि चीनमध्ये 10% आसपास आहे, म्हणजे या क्षेत्रात वाव फार आहे पण दिशा नाही.
- आजही नवीन डिमॅट खाते उघडणाऱ्यांपैकी अनेकांना त्याचं नक्की प्रयोजन काय हे माहिती नसतं आणि बरेचजण तर ते विचारायची तसदी सुद्धा घेत नाहीत. मग पुढे हे क्षेत्रच समजून घ्यायचं राहिलं बाजूला.
- अगदी आयपीओ (IPO) म्हणजे काही दिवसांत पैसे दुप्पट वगैरे करणारा प्रकार काहींना वाटतो कारण असंच ओळखीच्या कुणाचे तरी दुप्पट झालेले असतात म्हणून, पण हा प्रकार काय आणि त्यामागची संकल्पना माहिती करून घ्यायची नसते.
महाविद्यालयीन तरुण वर्ग असो, गृहिणी असो किंवा निवृत्त पेन्शनर्स शेअरमार्केट हे क्षेत्र सर्वासाठी खुलं आहे आणि या क्षेत्रात येताना ते परत सोडून जाण्यासाठी येऊ नका. आपल्या रोजच्या पोटापाण्याचं मिळविण्यासाठी पर्याय म्हणून या क्षेत्राकडे कधीच पाहू नये, अर्थात योग्य मार्गक्रमणा कराल तर तुमच्या पुढच्या पिढीलाही पोटभर देईल असं क्षेत्र आहे हे पण तेच डोक्यात ठेवून न येता सुरवातीला फक्त आणि फक्त शिकण्याचं धोरण असू दे. इथला अभ्यासक्रम कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे जितकं शिकाल तितकं नव्याने समजेल आणि उमजेल.
धन्यवाद !
– शशांक एच.
8779302694
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Share Market Marathi, Share Market Marathi Mahiti, Share Market in Marathi, Share Market Mhanaje kay?