Cyber Crime
सायबर क्राईम (Cyber Crime) हा शब्द काही आता नवीन राहिलेला नाही. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम स्कुल, हा आपल्या दिनचर्येचा एक भाग बनला आहे. याचबरोबर ऑनलाईन पेमेन्टच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, मीटिंग्ज, ऑनलाइन चॅटिंग यासाठी विविध ॲप्स वारंवार वापरली जातात. पेटीएम, गूगल पे, भीम, फोनपे इत्यादी अॅप्सचा वापरही वाढला आहे. या टेक्नो सॅव्ही जमान्यात गुन्हेगारही मागे राहिलेले नाहीत. त्यांनीही टेक्नॉलॉजीचा फायदा आपल्या गुन्ह्यांसाठी करून घेत त्यामध्ये बरीच मजल मारली आहे. लॉकडाऊन दरम्यान व त्यानंतरही सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये वाढ दिसून आली आहे. सायबर गुन्हेगार ई-मेल, हॅकिंग, फिशिंग,पोर्नोग्राफी, इत्यादी माध्यमातून लोकांची फसवणूक करत आहेत
बहुराष्ट्रीय सायबर सिक्युरिटी कंपनी ‘चेक पॉईंट रिसर्चने’ (Check Point Research) कोरोना काळाती सायबर अटॅकविषयी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते मे या कालावधीत इंटरनेटवर २०,००० नवीन कोरोनाव्हायरस संबंधित वेबसाईट्स आढळून आल्या. यापैकी १७% वेबसाईट्स संशयास्पद होत्या, असे अहवालात म्हटले आहे. सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन, कोरोनासंबंधित माहिती मिळविण्याची उत्सुकता आणि या महामारीची भीती, या गोष्टी सायबर गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.
Cyber Crime- सायबर गुन्हेगारीचे प्रकार
बँकिंग फ्रॉड:
- या प्रकारात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यात येत आहे. कॉल करणारे पीडित व्यक्तीच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगून, बँक खात्यासंबंधित काही समस्या निर्माण झाल्याचे सांगून, त्याचे निराकरण करण्यासाठी काही वैयक्तिक माहिती मागतात. यामध्ये पीडिताची वैयक्तिक माहिती, बँक खाते क्रमांक, पिन आणि इतर माहिती घेऊन त्यांचे बँक अकाउंट हॅक केले जाते.
- काही वेळा एलआयसी किंवा तत्सम विमा कंपनीच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले जाते. “तुमची पॉलिसी मॅच्युअर झाली असून त्याची रक्कम (ही रक्कम अनेकदा लाखांच्या घरात असते) थेट बँक खात्यात जमा होईल”, असे सांगून, बँक खात्याबद्दल तसेच वैयक्तिक माहितीही मिळविली जाते.
- नवीन क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्स जारी करण्यात येणार आहे असे सांगून, त्यासाठी डेबिट / क्रेडिट कार्डची सर्व माहिती व सीव्हीव्ही क्रमांक (CVV) मागितला जातो. त्यानंतर बोलण्यात गुंगवून ओटीपीही मागितला जातो. एकदा का व्यक्तीने ओटीपी दिला की मग काही सेकंदात त्याच्या बँक खात्यातील पैसे गायब होतात. त्यानंतर तो फोन नंबर कायमसाठी बंद झालेला असतो.
- वरील प्रकरणांमध्ये ओटीपी शेअर केला असेल, तर त्या प्रकरणात फसवणुकीची रक्कम बँकेकडून रिफंड केली जात नाही. पैसे विविध मर्चंट वॉलेटमध्ये गेलेले असल्यास सायबर सेलकडून संबंधितांना तातडीने मेलद्वारे पत्रव्यवहार करुन अर्जदारांना रक्कम परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो.
टीप: बँक अथवा इंश्युरन्स कंपनी कधीही कोणत्याही व्यक्तीला फोन करून कधीही सीव्हीव्ही क्रमांक व ओटीपी विचारत नाही.
सोशल मीडिया फ्रॉड:
- फेसबुकवर (वा तत्सम सोशल मीडिया वेबसाइटवरून) मैत्री करून हजारो/लाखो रुपयांना गंडा घातला अशा प्रकारच्या बातम्या आजकाल आठवड्यतून किमान एकदा तरी वाचनात येतात.
- यामध्ये कुठल्या तरी परदेशी व्यक्तीचा फोटो व त्या धाटणीचे नाव घेऊन एक फेक अकाउंट बनविण्यात येते. यामध्ये परदेशातील अनेक फोटो अपलोड करण्यात येतात.
- यांनतर सावज हेरून ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ पाठविण्यात येते. हळूहळू मेसेंजरवर मेसेज करून सावज जाळ्यात अडकवलं जातं.
- भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करून आर्थिक अडचण, आरोग्यविषयक समस्या, इत्यादी अनेक कारणे सांगून पैसे भरण्यास सांगण्यात येतात.
- मेसेंजरमधला संवाद, शेअर केलेले वैयक्तिक फोटोज, व्हिडीओज अथवा वैयक्तिक गोष्टी व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार ब्लॅकमेल केले जाते व पैसे उकळले जातात.
टीप: सोशल मीडियावर अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना योग्य ती काळजी घ्या. शक्यतो अशी रिक्वेस्ट स्वीकारूच नका. अनोळखी व्यक्तींशी मेसेंजरवर तर अजिबात बोलू नका. आपली वैयक्तिक माहिती, घरगुती गोष्टी, फोटोज कोणाशीही शेअर करू नका.
नोकरीचे अमिष:
- सध्याच्या काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. काहींचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे नोकरीसाठी नामवंत कंपन्यांच्या वेबसाईटसारखी फेक वेबसाईट बनवून त्याद्वारे नोकरीचे आमिष दाखवून तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्याच्या घटनाही घडत आहेत.
- एखाद्या कंपनीच्या लेटर हेडची कॉपी करून त्यावर “फेक ऑफर लेटर” बनवून घेऊन ते मेल करण्यात येते. एकदा का व्यक्तीने संबंधित इमेलला उत्तर दिलं की मग हजारो रुपये भरायला सांगून फसवणूक करण्यात येते.
टीप: कुठलीही कंपनी इंटरव्ह्यू शिवाय नोकरी किंवा ट्रेनिंग देत नाही. तसेच ऑफर लेटरही मेल करत नाही. तेव्हा अशा प्रकारच्या इमेल्सना उत्तरे देणं टाळा.
इमेलद्वारे फसवणूक:
- इ-मेलवर रोज शेकडोच्या संख्येने ‘स्पॅम’च्या नावाखाली फसविणारे मेल येतात. या मेलला उत्तर दिल्यानंतर फोन येणे, किंवा मेलद्वारे चॅटिंग करून फसवणूक केली जाते.
- “अमुक एक रक्कम / क्रेडिट कार्ड/ परदेशी ट्रिप यासाठी तुमचा ईमेल आयडी निवडण्यात आला आहे”, अशा प्रकारच्या ईमेल्सना ‘स्पॅम’मध्ये टाकून द्या. कारण उत्तर दिल्यास तुम्ही त्यांच्या जाळयात अगदी सहज अडकत जाता.
- सॉफ्टवेअर कंपनी मॅकॅफी इंडियाने (McAfee India) जाहीर केलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोविडशी संबंधित स्पॅम मेलमध्ये ५००% वाढ झाली आहे.
टीप: कुठलीही कंपनी /बँक/ फायनान्शिअल संस्था विनाकारण कोणाला काहीही बक्षीस देत नाही. शक्यतो अशी इमेल्स स्पॅममध्ये आपोआपच टाकली जातात. परंतु शेवटी ती एक यंत्रणा आहे त्यामुळे साहजिकच त्याला मर्यादा असतात. आपण मात्र सावध राहणं आवश्यक आहे. उगाच लोभात अडकून अशा मेल्सना उत्तरे देण्याचं टाळावं.
सध्या सर्वत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल चर्चा चालू आहे. ही लाट येईल की नाही, आली तर काय होईल, अशा विविध प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देऊ शकतो. त्यामुळे जी परिस्थिती आहे तिचा स्वीकार करून, मन आणि डोकं शांत ठेवा. सायबर गुन्हेगारीपासून लांब राहायचं असेल तर, शांत मन व विचारी मेंदू दोन्हीची नितांत आवश्यकता आहे. तेव्हा शांत रहा पण सावध राहा.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies