क्रेडिट कार्ड रकमेची परतफेड कशी कराल?

Reading Time: 2 minutes

क्रेडिट कार्ड रकमेची परतफेड कशी कराल?

क्रेडिट कार्डचा योग्य पद्धतीने वापर केल्यास तो खरेदीचा खूप सोयीस्कर मार्ग आहे. परंतु, वारेमाप खरेदी केल्यास क्रेडिट कार्ड रकमेची परतफेड कशी करायची हा प्रश्न उभा राहतो. क्रेडिट कार्डचा अति वापर म्हणजे कर्जात बुडण्यासारखेच आहे. कारण यामध्ये आपण नक्की किती व्याज भरत आहोत याचा हिशोब राखला जात नाही आणि प्रत्यक्ष मोजायला गेले, तर ती रक्कम कधीकधी मुद्दलाच्या आसपास होऊन बसते. हे टाळण्यासाठी क्रेडिट कार्डची वापरलेली रक्कम लवकरात लवकर परत केली गेली पाहिजे. आज आपण क्रेडिट कार्डवरील रक्कम लवकरात लवकर परत करण्यासाठीचे मार्ग पाहणार आहोत.

हे नक्की वाचा: क्रेडिट कार्ड की वैयक्तिक कर्ज, योग्य पर्याय कोणता? 

१. बॅलन्स ट्रान्सफर: 

 • एका बँकेच्या क्रेडिट कार्डवरील पैसे भरायचे असतील आणि तुमच्याकडे इतरही बँकांची क्रेडिट कार्ड्स असतील, तर बॅलन्स ट्रान्सफर सुविधा वापरून तुम्ही तुमच्याकडील इतर बँकांच्या कार्ड्सवरील बॅलन्स त्या एका कार्डवर ट्रान्सफर करू शकता.

२. ‘मिनिमम अमाऊंट ड्यू’ पेक्षा जास्त रक्कम भरावी: 

 • क्रेडिट कार्डवर घेतलेली रक्कम ठराविक दिवस बिनव्याजी वापरता येते, पण तेवढ्या दिवसात ती नाही भरता आली, तर बँकेने ठरवलेली ‘कमीत कमी’ (मिनिमम अमाऊंट ड्यू) रक्कम दिलेल्या वेळेच्या आत भरावीच लागते. 
 • अशा वेळी जर पूर्ण रक्कम भरणे  शक्य होत नसेल, तर पैसे भरताना ‘मिनिमम अमाऊंट ड्यू’पेक्षा जास्त भरावेत, जेणेकरून शक्य तितकी कर्जाची रक्कम फेडली जाईल.

इतर लेख: क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा

३. स्नो-बॉल पद्धत

 • जर एकाच वेळी तुमच्या एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्सवरचे पैसे देणे बाकी असेल, तर ही पद्धत तुम्हाला जास्त सोयीची होऊ शकते. 
 • यासाठी क्रेडिट कार्ड्सनुसार कमीत कमी देय रक्कमेपासून ते जास्तीत जास्त देय रक्कम अशी यादी तयारी करावी लागेल. 
 • या यादीतील सर्वांत कमी रक्कम ज्या   क्रेडिट कार्डवर देणे असेल, ती सर्वांत आधी द्यायची. 
 • ती पूर्ण झाली की त्यानंतरची सर्वांत कमी रक्कम पूर्ण फेडायची. 
 • अशा प्रकारे कमीत कमी रकमेपासून पैसे फेडायला सुरुवात केल्यास एकदम खर्चावर मर्यादा न येता ही छोटी छोटी दिसणारी, पण नंतर मोठं रूप घेऊ शकणारी देणी पूर्ण करता येतील. तोपर्यंत जास्त रक्कम देईपर्यंत बाकी काही देणी नसल्यामुळे ती रक्कम देणे सहज शक्य होऊ शकेल.
 • यावर आणखी एक पर्याय म्हणजे कोणत्या क्रेडिट कार्डचा व्याजदर सर्वांत जास्त आहे हे नीट तपासून घ्यावे. त्यानुसार सर्वांत जास्त व्याजदर असणाऱ्या कार्डवरील पैसे फेडण्याला प्राधान्य द्यावे. याचे कारण म्हणजे त्या कार्डवर जितके दिवस पैसे  भरणार नाही तोपर्यंत त्यावरील व्याजाचा बोजा वाढत जाईल.

४. ईएमआय पद्धत: 

 • रक्कम जास्त असल्यास बँकेशी बोलून मासिक ईएमआय च्या स्वरूपात पैसे घेण्याची सुविधा देण्याबद्दल बँकेशी बोलून घ्या. 
 • अर्थात यासाठी तुम्हाला त्या रकमेवर दर महिन्याला २-३ टक्के व्याज द्यावेच लागेल. शिवाय बँका १-२ टक्के प्रोसेसिंग फीदेखील घेतात. 
 • हे जास्तीचे खर्च द्यावे लागत असले तरीही यामुळे किमान तुमचे पैसे लवकरात लवकर फिटतील हे नक्की.

हे नक्की वाचा: क्रेडिट कार्ड कॅशबॅक एक भुलभुलैया

६. आपत्तीजनक परिस्थितीत बँकेशी बोला: 

 • एखाद्या क्रेडिट कार्डवरील रक्कम देणे बाकी असेल आणि काही कारणाने उदा. तुम्हाला काही वैद्यकीय समस्या उत्पन्न झाली किंवा तुमची नोकरी गेली, व्यवसाय बंद झाला वगैरे ज्यामुळे तुम्हाला आत्ता पैसे भरणे कठीण आहे. अशा परिस्थितीत बँकेशी जाऊन बोला, त्यांना तुमची अडचण सांगा. 
 • बँकेला तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री पटली तर बँक त्यावर नक्कीच काहीतरी तोडगा काढायला मदत करेल. 

हे काही असे पर्याय आहेत जे तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डवरील पैशांची परतफेड कमीत कमी वेळेत करण्यासाठी उपयोगी ठरतील. क्रेडिट कार्डवरील रकमेच्या लवकरात लवकर परतफेड करणे तुमच्या क्रेडिट स्कोअर चांगला राहण्यासाठी देखील अत्यंत महत्वाचे असते. पुढील लेखामध्ये आपण अजूनही काही पर्याय पाहणार आहोत ज्याद्वारे हे पैसे ऊभे करणे तुम्हाला शक्य होईल.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.