भारतीय संस्कृतीमधे कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करणं किंवा नवीन खरेदी करणं यासाठी साडेतीन मुहूर्तांची वाट पहिली जाते; मग ते घर खरेदी असो, गाडी असो किंवा सोने असो. सोन्यातली गुंतवणूक ही जशी वेगवेगळ्या कारणांसाठी केली जाते तसेच तंत्रज्ञानामुळे सोने खरेदी करण्याच्या वाढत्या पर्यायांचा वापरही अगदी सर्रासपणे होताना दिसतो. बरेच लोक सोने पारंपरिक पद्धतीने खरेदी करतात तर कोणी थोडं पुढे जाऊन गोल्ड म्युच्युअल फंड, डिजिटल गोल्ड, ई गोल्ड ,सॉवरिन गोल्ड बाँडमधे गुंतवणूक करतात. पण आता मात्र यातील सॉवरिन गोल्ड बाँडचा पर्याय गुंतवणुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
तुम्ही अगदी बरोबर वाचलं ! केंद्र सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली सॉवरिन गोल्ड बाँड ही योजना आता बंद करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही योजना बंद करण्याची कुठलीही अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार या योजनेचा खर्च वाढत चालला असून सरकार गुंतवणूकदारांना जवळपास 85 हजार कोटी रुपये देणे लागत आहे. जाणून घेऊ सॉवरिन गोल्ड बाँडबद्दल काही महत्वाचे मुद्दे !
- सॉवरिन गोल्ड बाँडच्या आतापर्यंत एकूण 67 मालिका बाजारात आल्या. याचे वैशिष्ट म्हणजे बाजारभावापेक्षा कमी दराने गुंतवणूकदाराला या योजनेत गुंतवणूकीसाठी सोने उपलब्ध करून दिले. त्यातही जे गुंतवणूकदार ऑनलाइन पद्धतीचा वापर करून या याजनेत पैसे गुंतवतील, त्यांना सवलत म्हणून प्रत्येक ग्राममागे Rs. 50 कमी भरण्याचा पर्याय उपलब्ध होता.
- सॉवरिन गोल्ड बाँड या योजनेचा कालावधी 8 वर्षांचा आहे, म्हणजे गुंतवणूकदाराला 8 वर्षांनंतर सध्याच्या किमतीनुसार पैसे दिले जातात.
- योजनेचा कालावधी आठ वर्षांचा असला तरी गुंतवणूकदार मुदतीच्या आधीही पैसे काढू शकतात. बाँडच्या कालावधीची सुरुवात झालेल्या तारखेपासून पाच वर्षानंतर पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
- आतापर्यंत गुंतवणूकदारांनी या योजनेच्या माध्यमातून जवळपास Rs.72,200 करोड इतक्या रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. यावरून या योजनेला मिळालेल्या प्रतिसादाची कल्पना येते.
- सॉवरिन गोल्ड बाँड योजनेतील गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला वार्षिक अडीच टक्के व्याज मिळते.
- या योजनेत गुंतवणूकदारासाठी, सोन्यामधे असलेली गुंतवणुकीची वार्षिक कमाल मर्यादा 4 किलो इतकी आहे.
- तर हिंदू अनडिवायडेड फॅमिली (HUF) साठी सोन्यामधे असलेली गुंतवणुकीची वार्षिक कमाल मर्यादा 20 किलो इतकी आहे.
- वर्ष 2015 ला योजनेची सुरुवात झाली, तेव्हा 1 ग्राम सोन्याचा भाव Rs.2684 इतका होता. 8 वर्षांनंतर म्हणजे वर्ष 2023 मधे 1 ग्राम सोने Rs. 6132 होता.
- त्यामुळे पहिल्या मालिकेतील गुंतवणूकदार चांगल्याच फायद्यात आले. टक्केवारीत पहिलं तर जवळपास 128 पट इतका भरघोस परतावा गुंतवणूकदारांना मिळाला. आतापर्यंत 4 योजनांची मुदतपूर्ती झालेली आहे; ज्यात गुंतवणूकदारांना छान परतावा मिळाला आहे.
- कर बचतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत गुंतवलेल्या गुंतवणुकीवर करबचतही मिळते.
- त्यामुळे गुंतवणुकीवर मिळणारे अडीच टक्के व्याज आणि करबचत असा दुहेरी फायदा गुंतवणूकदाराला होतो.शिवाय सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणुकीवरील परतावा देखील उत्तम मिळतो.
योजना : स्वेच्छा भविष्यनिर्वाह निधी
आजकालच्या शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड हे अधिक परतावा मिळण्याचे पर्याय उपलब्ध असताना देखील कमी परतावा आणि व्याजाचा विचार न करता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा भारतीयांचा कल इथे दिसून येतो. तसेच सोन्यामधली गुंतवणूक सामान्य गुंतवणूकदारांमध्ये अजूनही लोकप्रिय आहे, याची प्रचिती येते.
#हिंदू अनडिवायडेड फॅमिली
#सॉवरिन गोल्ड बाँड
#सॉवरिन गोल्ड बाँड योजना समाप्ती?