Reading Time: 2 minutes
- भारतीय शेअर बाजाराने 8 एप्रिल 2024 रोजी नवा विक्रम गाठला. बाजारात नोंदणी झालेल्या भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य प्रथमच 400 लाख कोटींवर पोचले.
- भारतीय शेअर बाजारात अगदी अलीकडे निवडणुका आणि जागतिक घडामोडीमुळे मोठी वधघट दिसत असली तर बाजार पडला की गुंतवणूकदार पुन्हा जोमाने खरेदी करतात, असे चित्र गेले काही महिने पाहायला मिळते आहे. गेल्या 9 महिन्यात भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य तब्बल 100 लाख कोटी रुपयांनी वाढले, यावरून शेअर बाजारातील घौडदौड लक्षात येते.
- गेल्या वर्षभरात आयपीओंना मिळालेला उत्तम प्रतिसाद आणि गुंतवणुकीचे पारंपरिक मार्ग सोडून भारतीय गुंतवणूकदार शेअर बाजारात करत असलेली गुंतवणूक यामुळे शेअर बाजाराची गेल्या वर्षभरातील वाटचाल लक्ष वेधून घेणारी झाली आहे. 8 एप्रिल 2023 रोजी 60 हजारांच्या घरात असलेला सेन्सेक्स एका वर्षात 75 हजारांना गवसणी घालतो आहे. याचा अर्थ तो वर्षात 15 हजार अंशांनी वाढला आहे!
- गेल्या वर्षी 5 जुलै रोजी भारतीय बाजाराचे एकूण मूल्य 300 लाख कोटी झाले होते. त्यानंतर त्यात तब्बल 16 टक्के वाढ झाली आहे. (निफ्टी 19,400 वरून 22,623) या तेजीचे वैशिष्ट्य म्हणजे छोट्या आणि मध्यम कंपन्यांच्या बाजारभावात अतिशय वेगाने वाढ होताना पाहायला मिळते आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून तिचा परिणाम या वाढीत होताना दिसतो आहे.
- भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य वाढीचा गेल्या काही वर्षातील प्रवास पाहिला तर या तेजीचे महत्व आणखीच अधोरेखित होते. 2007 मध्ये हे बाजारमूल्य 50 लाख कोटी रुपये होते, ते 2014 मध्ये 100 लाख कोटी झाले आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये ते २०० लाख कोटी रुपये झाले. आणि तेव्हापासून ते दुप्पट झाले आहे!
- गेल्या वर्षभरातील तेजीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे सरकारी कंपन्यांचे वाढलेले बाजारमूल्य. सरकारने सरकारी उद्यागांना बळ दिल्याने त्यातील काही कंपन्यानी खासगी कंपन्यांपेक्षाही अधिक परतावा दिला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे निफ्टी पीएसई आणि निफ्टी सीपीएसई या दोन्ही इंडेक्सनी गेल्या वर्षभरात दुप्पट परतावा दिला आहे. विशेष म्हणजे गेले काही वर्षे मागे पडलेल्या सरकारी बँकांनीही 95 टक्के वाढ दिली आहे. याच काळात निफ्टी मायक्रोकॅप 250 इंडेक्सने 93 टक्के, निफ्टी स्मॉलकॅप 100 इंडेक्सने 80 टक्के तर निफ्टी मिडकॅप 1000 इंडेक्सने 66 टक्के वाढ नोंदविली आहे.
- कंपन्यांचे तिमाही ताळेबंद जाहीर होण्यास सुरवात झाली असून तेही चांगले असल्याने ही तेजी थांबण्याची शक्यता नाही. अर्थात निवडणूक निकालापर्यंत त्यात मोठे चढउतार पाहण्यास मिळतील. अमेरिकेतील अर्थव्यवस्था कशी आहे, याचे भारतासह सर्व जगातील शेअर बाजारावर परिणाम होतात, मात्र गेले काही महिने तो भारतीय अर्थव्यवस्थेवरच अधिक अवलंबून असल्याचे दिसून येते आहे.
- भारतीय शेअर बाजारात सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारांची गुंतवणूक वेगाने वाढत चालली असून त्याचाही हा परिणाम म्हणावा लागेल. 2019 च्या मार्चमध्ये तीन कोटी 60 लाख भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करत होते, त्यांची संख्या मार्च 2024 मध्ये 15 कोटींवर गेली आहे.
- बाजारातील तेजी आणखी काही कारणांनी सुदृढ मानली जात आहे, ती म्हणजे गेल्या पाच वर्षात भारतीय गुंतवणूकदारांनी विक्रमी 92.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी बाहेर पडूनही बाजारावर आता त्याचा मोठा परिणाम होत नाही. दुसरे म्हणजे याच पाच वर्षांत भारतीय कंपन्यानी आयपीओद्वारे 92.9 अब्ज डॉलर इतके विक्रमी भांडवल उभे केले आहे.
- विशेष म्हणजे यातील अनेक आयपीओनी गुंतवणूकदारांना अनेक पटीनी परतावा देऊन मालामाल केले आहे. गेल्या काही वर्षात भारतात वेगाने झालेल्या डीजीटलायझेशनचाही या वाटचालीत मोठा वाटा आहे.
- गेल्या वर्षभरातील तेजीत लार्ज कॅप कंपन्याचा वाटा कमी असल्याने यापुढील काळात त्यांच्यामधील गुंतवणूक वाढविण्याचा सल्ला सध्या तज्ञ देत आहेत.
लेखक – यमाजी मालकर
Share this article on :