Reading Time: 6 minutes

फसव्या आर्थिक योजना ‘पॉन्झी योजना’ म्हणून चार्ल्स पॉन्झीमुळे ओळखल्या जातात. १९२० साली गुंतवणूकदारांना ४५ दिवसांत ५०% आणि ९० दिवसांत १००% परतावा देण्याचे फसवे आश्वासन देणाऱ्या चार्ल्स पॉन्झीमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. गेल्या १०० वर्षांमध्ये एका पेक्षा एक मोठे आर्थिक भामटे आपापला काळ गाजवून गेले. पण या सर्व गुन्हेगारांचा शिरोमणी शोभेल असा आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भामट्याची कथा आणि आपल्यासाठीची शिकवण या लेखातून आपण बघणार आहोत.

हेही वाचा – फसव्या आर्थिक योजना कशा ओळखाव्यात?

● बर्नी मेडॉफ म्हणजेच बर्नार्ड लॉरेन्स मेडॉफचा जन्म पूर्व युरोपातून अमेरिकेत स्थलांतर केलेल्या ज्यू कुटुंबात १९३८ मध्ये झाला. तो न्यूयॉर्कच्या क्वीन्स या मुख्यतः ज्यू बहुल परिसरात मोठा झाला.

● काही स्थलांतरित लोक स्थानिकांपेक्षा जास्त कष्ट करून धनसंपत्ती कमावतात आणि नावारूपाला पोहोचतात असा बऱ्यापैकी ट्रेंड अमेरिकेत आहे. इथे तेच झाले, बर्नी लहानपणापासून हुशार आणि मेहनती होता. कुठे लाईफ गार्ड म्हणून काम कर तर कुठे माळी काम कर अशी त्याची करिअरची सुरुवात होती. १९६० चे दशक म्हणजे अमेरिकन शेअर बाजाराचे तेजीचे दशक होते. बर्नीने आपल्या हुशारीला मेहनतीची जोड दिली आणि शेअर बाजारातून रग्गड पैसा कमावला.

● आपल्या भावाबरोबर त्याने ‘बर्नार्ड एल. मेडॉफ इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटीज’ या नावाची शेअर ब्रोकींग फर्म सुरू केली. पेनी स्टॉक्स किंवा मोठ्या स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध नसलेल्या छोट्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री करून त्यांनी नफा कमावला.

● तेव्हा कायदेशीर असलेला मेडॉफचा व्यवसाय भरभराटीस आला. तसेच त्याची फर्म वॉल स्ट्रीटच्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनली. शेअर बाजारात बर्नीचे नाव वाढत गेले.

● ‘निवडक लोकांचेच पैसे मी सांभाळतो‘ असे वलय त्याने स्वतःभोवती तयार केले. बर्नीच्या गुंतवणूकदारांमध्ये मोठं मोठी नावे होती. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग, अभिनेते केविन बेव्हन, जॉन माल्कोविच, टीव्ही होस्ट लॅरी किंग आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते एली विसेल यांचा त्याच्या सेलेब्रिटी गुंतवणूकदारांमध्ये समावेश होता.

● नावाजलेले लोक जर विश्वासाने बर्नीकडे गुंतवत असतील तर आपण कशाला विचार करत बसायचा म्हणून बाकी इतर सामान्य लोकही मोठया प्रमाणात त्याच्याकडे आकृष्ट होत गेले. शेअर बाजारातील त्याच्या वाढत्या प्रभावामुळे बर्नी मेडॉफ हे नाव सतत मोठे होत होते. लोकांसाठी तो आता ‘फायनान्स गुरु’ बनला होता.

हेही वाचा – Key Ratios Of Banking Finance Sector : काय आहेत बँकिंग फायनान्स क्षेत्राची गुणोत्तरे ?

बर्नी अमेरिकेत एक मोठे प्रस्थ म्हणून ओळखला जाऊ लागला. बर्नीची तत्कालीन ताकद म्हणजे
काय ते आपण आता समजून घेऊ –

● सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन (SEC) च्या अनेक कमिट्यांवर मानाचे स्थान
● शेअर्सचे ट्रेडिंग कसे व्हावे याबाबतचा सल्ला तो नियमकांना वेळोवेळी देत असे.
● नॅसडॅक या नावाजलेल्या स्टॉक एक्स्चेंजच्या स्थापनेत सक्रिय सहभाग
● नॅसडॅकचा ३ वर्षे संचालक व एक वर्ष अध्यक्ष
● नॅशनल सिक्युरिटीज डीलर्स असोसिएशनचा संचालक, अध्यक्ष
● अनेक श्रीमंत ज्यू धर्मदाय संस्था, हॉस्पिटल्सचा ट्रस्टी व आर्थिक सल्लागार
● शेअर मार्केट निर्देशांकापेक्षा जास्त परतावा देणाऱ्या फंड मॅनेजरचे कौतुक होत असते. बर्नी मात्र
निर्देशांकापेक्षा खूप जास्त परतावा देण्याऐवजी नियमितपणे दोन आकडी चांगला परतावा
आपल्या गुंतवणूकदारांना देत होता.
● अनेक धनाढ्य ज्यू लोक 'आपला' माणूस म्हणून अगदी डोळे झाकून विश्वासाने बर्नीकडे कित्येक वर्षे पैसे गुंतवत गेले. सगळे कसे छान सुरू होते. त्याची दोन्ही मुले व काही कुटुंबीय त्याच कंपनीत
काम करत होती.
● २००८ मार्च मध्ये आपल्या कंपनीतील काही उच्च पदस्थ लोकांना बर्नी बोनस वाटत होता. दोन्ही मुलांना वाटले की आपले बाबा नक्की बरे आहेत ना? या मागचे कारणही तसेच होते. १९२९ च्या महामंदीनंतर अमेरिकेत प्रथमच सब-प्राईम घोटाळ्यामुळे खूप मोठी मंदी यायला सुरुवात झाली होती. जगभरातले शेअर बाजार धडाधड कोसळत होते. लेहमन ब्रदर्स सारखी बलाढ्य कंपनी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती.
● मुलांच्या प्रश्नांना बर्नी उडवा उडविची उत्तरे देत होता. शेवटी प्रश्नांच्या माऱ्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि त्याने मुलांना जे सांगितले त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
● बर्नी म्हणाला की हे सगळ काही एक खूप मोठ्ठं खोट आहे!, मी इतक्या वर्षांपासून पाँझी स्कीम चालवत आहे. पण इथून पुढे ते काही शक्य होईल असे वाटत नाही. सरकारला शरण जायच्या आत मी तुमच्या सर्वांसाठी काही पैसे बाजूला काढून बोनसच्या रूपाने देतो आहे.
● मुलांना काय करावे ते सुचत नव्हते कारण त्यांना या पॉन्झी योजनेबाबत काहीही माहिती नव्हती. मुलांनी त्यांच्या वकिलांनी सल्ला दिला की तुम्ही स्वतःच बर्नीच्याही आधी सरकारला शरण जा. त्यांनी तो सल्ला ऐकला. दुसऱ्या दिवशी सकाळी फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (FBI) चे अधिकारी बर्नीच्या घरी पोहोचले.
● या महाकाय घोटाळ्याने समग्र अमेरिकन अर्थविश्व हादरले. बर्नीच्या हजारो गुंतवणूकदारांना हा प्रचंड मोठा मानसिक व आर्थिक धक्का होता.

बर्नीने नेमके काय केले होते?
○ अगदी सुरुवातीला बर्नीची कंपनी गुंतवणूकदारांना खरोखर नफा कमवून देत होती. शेअर बाजार म्हंटल की त्यात चढ उतार आलेच. काहीही करून मी कायम नफाच कमवतो अशी प्रतिमा बर्नीने त्याच्या गुंतवणूकदारांसमोर तयार केली होती.
○ या प्रतिमेला छेद जाऊ नये म्हणून त्याने लोभीपणे प्रत्यक्षात नफा नसतानाही नफा झाला असे गुंतवणूकदारांना सतत सांगितले आणि अधिकाधिक पैसे गोळा केले.
○ “मुझे हारना मंजूर नही था” असा काहीतरी डायलॉग म्हणून आपल्या दे-मार हिंदी सिनेमातला नायक खूप मार खाल्लेला असतांनाही उठून डझनभर गुंडांना लोळवतो. तसेच शेअर बाजार कितीही वर खाली होऊ देत, बर्नी लोकांना खोटा का होईना पण नियमितपणे चांगला परतावा देण्याचे काही सोडत नव्हता.
○ बर्नीने अनेक वर्षे आपला बनावट व्यवसाय सुरुच ठेवला होता. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग इतकी वर्षे तो गुंतवणूकदारांना कसे काय परतावा आणि मुद्दल रकमेचे पैसे परत देत होता?
○ कृपया समजून घ्या. नवीन गुंतवणूकदार आल्यावर जुन्या गुंतवणूकदारांचे पैसे लवकरात लवकर परत करणे ही त्याच्या व्यवसायाची खासियत होती. जुन्या लोकांना पैसे देण्यासाठी नवीन गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करण्याचे काम तो राजरोसपणे करत होता.
○ यासाठी नेहेमी गुंतवणूकदारांची संख्या वाढवत नेणे आवश्यक होते. बर्नीच्या लौकिकामुळे नवीन गुंतवणूकदारांची त्याला कमी नव्हती.
○ जास्त प्रश्न विचारणाऱ्या लोकांना तो पैसे परत देऊन टाकत असे. माझे पैसे तुमच्याकडेच गुंतवायचे आहेत असे म्हणत गुंतवणूकदार त्याच्या मागे लागत.
○ सगळेच गुंतवणूकदार एकाच वेळेस पैसे मागायला आले असते तर हे भांडे केव्हाच फुटले असते. परंतु अशी वेळ बर्नीवर 2008 पर्यंत कधीच आली नव्हती.
○ बर्नीने केलेल्या घोटाळ्याची व्याप्ती ६५ बिलियन डॉलर्स म्हणजे आजच्या हिशोबाने सुमारे ५ लाख कोटी रुपये इतकी अगडबंब होती.
○ २००८ मध्ये सगळीकडेच भांडवलाचे स्त्रोत आक्रसत गेले. जवळपास ३ बिलियन डॉलर्स गुंतवणूकदारांना परत द्यायचे असताना त्याच्याकडे फक्त २०० ते ३०० मिलियन डॉलर्सच शिल्लक होते.

○ जगातल्या सर्वच पाँझी योजना कधीतरी उघड्या पडतातच. किती काळ लोकांना मूर्ख बनवता येते हे योजना चालवणाऱ्यावर, त्याच्यावर भाळून जाणाऱ्या किंवा अंधविश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांवर आणि सजग सरकारी नियामक यंत्रणांवर अवलंबून असते.
○ इथे अब्राहम लिंकन यांचे एक वचन चपखलपणे लागू पडते – “You can fool some of the people all of the time, and all of the people some of the time, but you can not fool all of the people all of the time.”

सरकारी नियंत्रक यंत्रणांची भूमिका
● बर्नी मेडॉफचे हे कांड सिक्युरिटीज एक्स्चेंज कमिशन (SEC) म्हणजे अमेरिकन भांडवल बाजार नियमकासाठी खूप मोठी नामुष्की होती. असे काही चक्क अमेरिकेत होऊ शकेल यावर कोणाचाही विश्वास तोपर्यंत बसत नव्हता.
● विविध नियामक यंत्रणा म्हणजे एस.इ.सी., स्टॉक एक्सचेंजेस, अमेरिकन आयकर खाते म्हणजे आय.आर.एस., हिशोब तपासनीस अशा कोणाच्याच नजरेतून इतकी वर्षे हा घोटाळा कसा सुटला याचे सर्वांना आश्चर्य वाटत होते.
● तपासनीस अधिकारी आल्यावर “मी कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का?”, “असे प्रश्न तुम्ही मला विचारूच कसे शकता?”, “तुमचे नियम मीच तयार केले आहेत” असे बोलून बर्नी त्यांना पळवून लावत असे.
● हॅरी मार्कोपोल्स स्टॉक ट्रेडर म्हणून काम करत होता. बर्नीने गुंतवणूकदारांना दिलेले परताव्याचे आकडे त्याने बारकाईने अभ्यासले होते.
● बर्नी एकतर पॉन्झी स्कीम चालवत आहे किंवा कंपन्यांची अंतर्गत माहिती बेकायदेशीररित्या मिळवून इन्सायडर ट्रेडिंग करत नफा मिळवतो अशी त्याची खात्री होती.
● सिक्युरिटीज एक्स्चेंज कमिशनला मरकोपोल्सने वेळोवेळी तक्रारी दाखल करूनही त्यांनी कुठलीही गंभीर कारवाई बर्नीवर केली नव्हती.

○ बर्नी मेडोफच्या अटकेनंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. २००९ मध्ये त्याला शेअर फसवणूक, चोरी, खोटी साक्ष देणे आणि मनी लॉन्ड्रिंगसह 11 फेडरल गुन्ह्यांसाठी दोषी ठरविले गेले. त्याला १५० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि त्याची सर्व मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांना रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. मेडॉफ व्यतिरिक्त २०१४ मध्ये या पॉन्झी योजनेतील त्याचे पाच कर्मचारीही दोषी आढळले होते.
○ वर्षभर चाललेल्या या प्रकरणामध्ये मेडॉफच्या एका मुलाने आत्महत्या केली, तर दुसऱ्या मुलाचा कॅन्सरने मृत्यू झाला. २०२१ मध्ये बर्नी मेडॉफचाही तुरुंगात वयाच्या ८२व्या वर्षी मृत्यू झाला. बर्नीच्या आजारपणाचे कारण देत त्याच्या वकिलांनी बर्नीच्या मृत्यूपूर्वी अनेकदा सुटकेची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने ही मागणी प्रत्येकवेळेस फेटाळून लावली होती.
○ २०१७ मध्ये बर्नीचा घोटाळा, सामान्यांचे बुडालेले पैसे, त्याचे कुटुंबीय, सरकारी तपास यंत्रणांचा हलगर्जीपणा यावर परखड भाष्य करणारा ‘विझर्ड ऑफ लाईज’ हा सिनेमा आला होता. प्रसिद्ध अभिनेते रॉबर्ट डी नेरो यांनी थंड डोक्याने काम करणाऱ्या पाताळयंत्री बर्नीची भूमिका यात प्रभावीपणे साकारली आहे.

हेही वाचा – One Person Company: सर्वसामान्यांचे व्यावसायिक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारी एकल कंपनी

आपण काय शिकलो ?
●शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक" या मथळ्याखाली
आपल्याकडे आठवड्यातून किमान एकदा तरी जवळपास सर्वच प्रमुख वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रकाशित होत असते. शारदा चिट फ़ंड, रोज व्हॅली समूह, पीएसीएल लिमिटेड, स्पिक एशिया अशी भारतातील प्रसिद्ध पाँझी स्कीम्सची उदाहरणे आहेत.
● शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करून किमान १०% दराने मासिक परतावा देणारे अनेक महान स्थानिक सेलिब्रिटी ट्रेडर्स गावोगाव निर्माण झाले आहेत आणि अर्थसाक्षरतेच्या अभावाने नजीकच्या भविष्यातही निर्माण होत असणार आहेत.
● साक्षात वॉरेन बफे यांचा सरासरी वार्षिक परतावा १८% दराच्या जवळपास आहे. फक्त हा परतावा सात दशकांपेक्षा जास्त कालावधीसाठी आहे हे कृपया लक्षात ठेवा.
● १०% दराने मासिक परतावा म्हणजे वार्षिक १२०% दराने परतावा होतो. दिग्गज गुंतवणूकदार, गुंतवणुकीबाबत सर्वोच्च शिक्षण, अनुभव, संसाधने हाताशी असलेले नावाजलेले म्युच्युअल फंड व्यवस्थापक यांचा वार्षिक परतावा सरासरी ८% ते १८% दरांच्या घरात असतो. अशावेळेस, “कसा काय कुणी १२०% वार्षिक दराने परतावा देऊ शकतो?” हा प्रश्न सर्वसाधारण बुद्धिमत्तेच्या कोणत्याही व्यक्तीस पडायला हवा.
● पाँझी योजनांना बळी पडणारे लोक समाजातील सर्वच आर्थिक स्तरांमधले असतात. अशिक्षित लोकांच्या तुलनेत यामध्ये चिकित्सक पांढरपेशी नोकरदार मंडळी आणि हुशार शेठजींचा समावेश बऱ्यापैकी असतो. याचे सर्वात महत्वाचे आणि मोठे कारण म्हणजे ‘लालची मनोवृत्ती व स्व- अभ्यासाचा अभाव’!
● दीर्घकाळात चक्रवाढ व्याजदर परताव्याच्या बाबतीत काय जादू करू शकतो हे समजण्याऐवजी अल्पकाळात किती जास्तीत जास्त दराने परतावा मिळवता येईल याचाच लोक शोध घेत असतात आणि अलगदपणे फसतात.
● एकाच ठिकाणी खूप मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी वेगवेगळ्या उत्तम पर्यायांमध्ये तुमच्या आर्थिक
सल्लागाराशी सल्लामसलत करून अभ्यासपूर्वक निर्णय तुम्ही घ्यायला हवा.

● पैसे बुडल्यावर पश्चाताप करण्याऐवजी गुंतवणूक करण्यापूर्वीच पुरेसा विचार करा. कारण पॉन्झी योजनांमध्ये बुडालेली रक्कम कदाचितच परत मिळते.

तुमच्या अभ्यासपूर्वक आर्थिक नियोजनासाठी शुभेच्छा !

सीए अभिजीत कोळपकर – “अर्थसाक्षर व्हा!” या पुस्तकाचे लेखक आहेत

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.