गेले अनेक वर्षे विविध समाज माध्यमातून, त्याची गरज असो अथवा नसो, जोखीम व्यवस्थापनाचा भाग म्हणून प्रत्येकाने टर्म इन्शुरन्स आणि आरोग्यविमा घ्यावा याबद्दल मी आग्रही आहे. कारण सामाजिक सुरक्षेचा भाग म्हणून भारतात सर्वांसाठी कोणतीही आरोग्यविमा योजना नाही. आपल्या आरोग्यसेवेसाठी होणारा खर्च हा अर्थसंकल्प व सकल राष्ट्रीय उत्पन्न यांच्या तुलनेत अत्यल्प आहे. जे दारिद्ररेषेखाली आहेत त्यांच्यासाठी आयुष्यमान भारत ही सरकारी योजना आहे. उच्चमध्यम व उच्च वर्ग याबाबत जागरूक आहेच. शिवाय त्याचे यावाचून फारसे अडत नाही. या सर्वांमधील तुटपुंजे उत्पन्न मिळवणारा या दोघांमधील दारिद्य्ररेषेवरील बराच मोठा मध्यमवर्ग येतो. आरोग्य विषयक समस्येने यातील 3% हून थोडे जास्त लोक दरवर्षी दारिद्र्य रेषेखाली ढकलले जात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सन 2017 रोजी एका अहवालात म्हटले आहे. आपला आरोग्यविषयक खर्च अंशतः अथवा पूर्णतः ज्या योजनेने भागवला जातो त्यास आरोग्यविमा असे म्हटले जाते. तो वेगवेगळ्या प्रकारे घेता येतो-
1 स्वतःसाठी (वैयक्तिक)
2 आपल्या कुटूंबाकरिता (पती, पत्नी, मुले)
3 घरातील जेष्ठ नागरिकांसाठी (आई, वडील, सासू ,सासरे)
4 आपल्या मालकाने दिल्याने (स्वतः, कुटुंब, पालकांना)
5 विशिष्ठ गंभीर आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी (मोठे गंभीर आजार)
6 आजारी पडून दवाखान्यात राहावे लागल्यास भरपाई मिळवण्यासाठी (प्रतिदिन विशिष्ठ रकमेची भरपाई)
हेही वाचा – आरोग्य विमा घेताना लक्षात ठेवा या ११ महत्वाच्या टिप्स
नोकरीचा आरोग्य विमा बेभरवशाचा
आस्थापनेकडून मिळणारा आरोग्य विमा कायम स्वरूपी नाही, आजकाल नोकऱ्या बेभरवशाचा झाल्या आहेत. आरोग्यविमा आपण जितका लवकर घेऊ तेवढे चांगले त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. यासाठी भरलेल्या रकमेमुळे करात बचत होते. बहुतेक आरोग्यविषयक समस्या या जसजसे वय वाढेल त्या प्रमाणात वाढत असल्याने आरोग्यविमा मिळवण्यात मर्यादा येतात. गेले काही दिवस आरोग्यावर करायला लागणाऱ्या खर्चात सातत्याने वाढ होत आहे ही वाढ महागाईच्या दोन ते तीन पट असल्याने नेमक्या किती रकमेचा आरोग्यविमा घ्यावा हा प्रश्न पडू शकतो. सुदैवाने मूळ विमा पॉलीसीवर थोडा अधिक प्रीमियम भरून टॉप अप करता येते तेव्हा आशा पर्यायांचा जरूर विचार करावा.
माझा कुटुंबासाठीचा (म्हणजे मी आणि माझी पत्नी यांच्यासाठी) असलेला आरोग्यविमा ₹ 5 लाख आहे. सन 2016 पासून विनाखंड चालू असलेल्या या पॉलिसी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पोर्ट केले होते तरीही प्रिमियमवरील खर्चात तिप्पट वाढ झाली आहे. या पॉलिसीचा उपयोग मला करायला लागला नाही आणि तो कुणालाही करावा लागू नये असेच माझे मत आहे. एका अत्याधुनिक तांत्रिक क्रियेसाठी याचा वापर करायचे ठरवले त्यावेळी आलेला अनुभव असा.
- सदर उपचारांसाठी कॅशलेस सुविधा घ्यायचे मी ठरवले.
- यासाठी कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी प्रोसिजर तारीख ठरल्याशिवाय क्लेम फॉर्म घेण्यास नकार दिला.
- डॉ कडून तारीख ठरावल्यानंतर काही रिपोर्ट मागवून घेतले.
- प्रत्यक्ष पेशंट ऍडमिट झाल्यावर आधीचा आजार आहे, पॉलिसिस तीन वर्षे न झाल्याने दावा अमान्य केला.
- कस्टमर केअरशी संपर्क साधून सदर पॉलीसी आपल्याकडे एप्रिल 2019 ला पोर्ट केली म्हणजे ती आधीच्या वर्षी अस्तीत्वात होती. यापुढे झालेली 2 वर्ष अशी तीन पूर्ण होत असल्याचे सांगितले तरी त्यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. पॉलीसी पोर्ट केल्याचा पुरावा असेल तरच तक्रार घेऊ सांगितले.
- यातून तक्रार करणारी व्यक्ती तक्रार घेत नसेल तर त्यांची तक्रार कुठे करावी? हा प्रश्न निर्माण झाला.
- माझ्या सुदैवाने, रिलेशनशिप मॅनेजरने मला तत्परतेने जुन्या पॉलिसीची सॉफ्ट कॉपी मिळवून दिली.
हेही वाचा – Health Insurance Renewal: आरोग्य विमा नुतनीकरण करताना लक्षात ठेवा या ९ गोष्टी..
मधल्या काळात विविध माध्यमातून मी माझे म्हणणे कंपनीपर्यंत पोहोचवले, कस्टमर केअरचा विचित्र अनुभव कथन केला. त्यामध्ये त्याचबरोबर त्याचे संकेतस्थळ, अँप, व्हाट्सअप्प नंबर यात कोणत्या सुधारणा अपेक्षित आहे. ते कळवले याचा पाठपुरावा केल्याने माझा कॅशलेस क्लेम मंजूर झाला. यामधील कालावधीत माझ्याकडे जुन्या पॉलिसीची कॉपी आल्याने माझ्या म्हणण्यास बळकटी मिळाली, म्हणूनच-
आरोग्यविमा घेताना लक्षात घेण्याच्या गोष्टी-
1.करारातील नियम अटी त्याचे नेमके शब्द आणि त्याचे अर्थ, कंपनीचे दावे मंजूर करण्याचे प्रमाण, प्रीमियम रक्कम इतर कंपन्यांचा तुलनात्मक प्रीमियम मिळणाऱ्या विविध सोई सुविधा जसे ओ पी डी खर्च, विविध तपासण्या, रुग्णालयात भरतीचा किमान कालावधी, डे केअर सुविधा, रोजचा राहण्याचा खर्च, रुग्णवाहिकेचा खर्च, कोणते आजार समाविष्ट आहेत कोणते नाहीत, आजारावरील खर्चाची मर्यादा, मोतीबिंदू सारख्या विशिष्ट आजाराची पात्रता, काही उपचार घरातून करता येत असतील तर त्या खर्चाची भरपाई, विशेष उपचारांची सोय, पर्यायी उपचार पद्धतीची सोय, आधुनिक तंत्रज्ञान वापरायची सोय, वर्षभरात दावा दाखल न झाल्यास पात्र बोनस सुरक्षा कवचात वाढ करून मिळणार की प्रीमियम मध्ये सूट देऊन, दुसऱ्या तज्ञांचा सल्ला व मत घेण्याची सुविधा, रुग्णालयात भरती होण्यापूर्वी व सोडल्यावर किती दिवसापर्यतचा मंजूर होणारा खर्च, कोणते खर्च नाकारले जातात उदा. बँडेज, निडल्स, ग्लोज, कॅठेतर, बाळंतपणाचा खर्च, काही योजनांत असे खर्च नाकारले जातात. जवळपास कॅशलेस हॉस्पिटलची सोय कारण तुम्ही खर्च करून क्लेम केला तरी त्यात काटछाट आणि दिरंगाई बरीच होते. याशिवाय हे लक्षात ठेवावे की कॅशलेस सुविधा 100% कॅशलेस नसते, हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे काही डिपॉझिट तेथे ठेवावे लागते (साधारण 20%) जे आपल्याला फायनल बिलिंग झाल्यावर मिळेल. तेव्हा ही सुविधा कॅशलेस नसून लेसकॅश असते. आजारानुसार एकूण खर्च मर्यादा, को पेमेंटची गरज. या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते.
याचबरोबर शक्यतो सर्व कुटूंबाची एकच पॉलिसी घेऊन बरोबर रायडर घेणे अधिक फायद्याचे, जरूर तर विशेष योजना वेगळी घ्यावी, आजाराचा पूर्वेतिहास असल्यासत्याची भरपाई पात्रता कधी ते माहिती करून घ्यावे. हा कालावधी 24 ते 48 महिने एवढा कमीजास्त असतो, आरोग्य तपासणीची सुविधा, गरजेनुसार सुरक्षा कवच वाढवण्याची सोय, पॉलिसी पोर्ट करण्याची म्हणजेच इन्शुरंस देणारी विमाकंपनी बदलण्याची सोय, तक्रार निवारण यंत्रणा तसेच पॉलिसी मंजूर नसल्यास लगेच अथवा काही कालावधीनंतर परत करण्याची सोय त्यामधून मिळणाऱ्या परताव्यात होणारी घट याचे प्रमाण हेही मुद्दे लक्षात घ्यावे.
या गोष्टींची काळजी घ्या…
1आर्थिक स्थिरता
2 सर्वोत्तम उपचार
3 योजना निवडीचा पर्याय
4 विशेष योजनांची उपलब्धता यासारखे लाभ आपणास होऊ शकतात.
आरोग्यविमा घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने-
इन्शुरंस नियामकांच्या या संकेतस्थळास भेट देऊन त्यातील ग्राहक शिक्षण विभागात दिलेली माहिती वाचावी.
- आरोग्य विमा पुस्तिका डाउनलोड करावी.
- अर्ज स्वतः भरावा आणि सही करावी.
- ऑनलाईन पॉलिसी खरेदी करणाऱ्यांनी तसेच जर योग्य वाटत असलेल्या सर्वानीच इन्शुरंस रेपोजेटरी खाते उघडून आपल्या सर्व पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात घ्याव्यात
- आपल्या मृत्यूनंतर खात्यावरील पॉलिसीचे दावे दाखल करण्यासाठी अधिकृत प्रतिनिधी नेमावा, आपला वारसाची अधिकृत प्रतिनिधी म्हणून नेमणूक करता येते. हे खाते उघडणे चालू ठेवणे यासाठी कोणताही व्यवस्थापन खर्च नाही.
- आपल्या विमा कंपनीचा तसेच IRDA च्या कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक 155255 व Mail ID [email protected] योग्य ठिकाणी ठेवावा.
- कंपनीकडून आलेले सदस्यता पत्र, पॉलिसी कागदी स्वरूपात असल्यास ते करारपत्र याशिवाय सहज मिळेल अशा ठिकाणी आपली ओळख पटवून देणारे कागदपत्र वेळेवर व सहज मिळतील अशा ठिकाणी ठेवावेत. म्हणजे आयत्या वेळी या सर्व गोष्टी शोधण्यात वेळ न गेल्याने मनस्ताप होणार नाही. पॉलीसी डिजीलॉकर किंवा उमंग या सरकारी अँपमध्ये साठवून ठेवता येते. पॉलीसी पोर्ट केली असल्यास त्या संबंधातील पुरावे जपून ठेवावेत.
- रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास लवकरात लवकर 24 तासात कंपनीस माहिती द्यावी जर पूर्वनियोजित शस्त्रक्रिया असेल तर नियोजित तारखेपूर्वी कंपनीस माहिती द्यावी.
ज्यांना आवश्यकता असेल अशाच लोकांनी बाळंतपणाच्या खर्चाची भरपाई मिळू शकते अशा योजनेचा विचार करावा. - भरपाई दावे त्वरित सादर करावेत मुदत निघून गेल्यास योग्य ते स्पष्टीकरण करणारे टिपण सोबत जोडावे. रुग्णालयातून सोडल्यावर 30 दिवसांत सादर केलेल्या मागणीस काही अडचण शक्यतो येत नाही.
- मुदत संपल्यावर 30 दिवसात तो पुन्हा वाढवून घेता येतो तरीही मुदतपूर्ती आधी त्याचे नूतनीकरण जरूर करावे. विमा नविनीकरण करण्याच्या कालावधीत काही उपचार घ्यावे लागल्यास त्याचा खर्च आपल्याला करावा लागतो.
- याशिवाय काही गरज लागल्यास जाणकारांचे मार्गदर्शन घ्यावे.
हेही वाचा – आरोग्य विमा: आरोग्य विम्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी
आकस्मित संकट सोडून जर काही पूर्वनियोजित उपचार करायचे असतील तर ते कॅशलेस पद्धतीने कसे होतील ते पहावे यात थोडे ताटकळावे लागले तरी बहुतांशी क्लेम जवळपास पूर्णत्वाने मंजूर होतात. त्यामुळे अशा उपचारांसाठी ही योजना एक वरदानच आहे. कोणतेही उपचार घेताना जर ही योजना नसती तर आपण हॉस्पिटलमध्ये कोणता क्लास स्वीकारला असता याचा विचार करावा कारण हॉस्पिटलमध्ये औषधांच्या किमती सोडून इतर सर्व खर्च हे तुमच्या क्लासशी निगडित असतात आपण अधिक वरचा क्लास स्वीकारला तर खर्च वाढतो त्यामुळे नंतर काही कारण उद्भवल्यास अडचण येऊ शकते, म्हणूनच मिळू शकणारी भरपाई ही वसुली न समजता तिचा मर्यादित वापर करावा.सर्वाना उपयोगी पडेल, परवडेल आणि सर्वसाधारण आरोग्यविषयक गरज भागावू शकेल अशी आरोग्यविमा योजना ‘आरोग्य संजीवनी योजना’ या नावाने स्वस्त मस्त योजना बहुतेक सर्व जनरल विमा कंपन्यांकडे उपलब्ध असून त्यातून 1 ते 5 लाखांचे कव्हर मिळू शकते मात्र या पॉलिसीमध्ये 5% कोपेमेंट करण्याची अट आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies