क्रेडिट कार्ड – ६ महत्वाच्या गोष्टी
तुम्ही क्रेडिट कार्ड घेतले आहे का? किंवा घेण्याचा विचार करत आहात का? मग थांबा.. आधी या क्रेडिट जगताशी पूर्ण ओळख करुन घ्या. त्याची संपूर्ण सखोल माहिती करुन घ्या आणि मगच क्रेडिट कार्डासाठी अर्ज भरा. आजच्या लेखात आपण क्रेडिट कार्ड घेतानाआवश्यक असणाऱ्या ६ महत्वाच्या गोष्टी कोणत्या याबद्दल माहिती करून घेऊया.
हे नक्की वाचा: क्रेडिट कार्ड की वैयक्तिक कर्ज, योग्य पर्याय कोणता?
बहुतांश वेळा आपल्याला क्रेडिट कार्डची खरोखर गरज आहे का हेच माहित नसते. केवळ मित्र, ओळखीचे, नातेवाईक, ऑफिसमधले सहकारी यांच्याकडे आहे म्हणून आपणही घ्यावे या हेतूने क्रेडिट कार्डचा हव्यास धरला जातो. मात्र त्याच्याशी निगडीत अनेक बाजू आहेत, ज्याची पडताळणी करणे गरजेचे आहे. तसेच त्याची आपल्याला किती गरज आहे आणि खरोखर त्याच्या वापरातून आपल्या पैशांची बचत होणार आहे की आणखी भुर्दंड बसणार आहे याची खातरजमा करुन मगच क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावा.
क्रेडिट कार्ड: ६ महत्वाच्या गोष्टी
1. क्रेडिट कार्डसाठी उत्पन्न हा महत्वाचा मापदंड आहे
- जेव्हा पण तुम्ही कोणत्याही बँकेच्या वेबसाईटवर क्रेडिट कार्डासाठी अर्ज करता, त्याचा ऑनलाईन फॉर्म भरता, तेव्हा पहिल्यांदा तीन प्रश्न विचारले जातात.
- आपले वय
- दरमहा उत्पन्न
- कोणत्या शहरात राहता, पूर्ण पत्ता (मेट्रो सिटी अथवा छोटे शहर याची शहानिशा)
- त्यापैकी आपले उत्पन्न हेच एक महत्त्वपूर्ण पॅरामीटर आहे. कारण हीच मुख्य गोष्ट जी तुम्ही क्रेडिट कार्डवर खरेदी केलेली रक्कम वेळेवर भरू शकता की नाही याची खात्री देऊ शकते.
2. संबंधित बँकेसोबत असलेले तुमचे हितसंबंध (ग्राहक हितसंबंध)
- ज्या बँकेत तुमचे दरमहा पगाराचे खाते आहे किंवा एक बचत खाते आणि चालू खाते आहे तसेच मुदत ठेवींसारख्या (फिक्स डिपॉझिट) अन्य काही धोरणांमध्ये तुमची आर्थिक गुंतवणूक असेल तर, सदर बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळणे तुलनेने सोपे असते.
- तुमची खाती कशी हाताळली जातात, किती नियमितपणा त्यात आहे, तुमच्या खात्यांमध्ये महिनाअखेरीस किती शिल्लक असते, पैशाची आवक-जावक या सगळ्यावर बँकेचे लक्ष असल्याने आणि ग्राहक म्हणून तुमच्या विषयी खात्री असल्यास कमीत कमी वेळात आणि काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करून बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देते आणि त्यावर विशेष सवलती देखील देऊ शकते. अर्थात याचे नियम वेळोवेळी बदलू शकतात.
महत्वाचा लेख: क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा
3. ग्राहकाचा क्रेडिट इतिहास (Credit history)
- क्रेडिट अर्थातच उधारी. त्यामुळे तुम्हाला असे कार्ड म्हणजेच विशेष सवलत आणि महत्त्वाची सुविधा उपलब्ध करुन देताना बँक तुमच्या अगोदरच्या आर्थिक व्यवहारांच्या इतिहासाची पडताळणी करते.
- उदाहरणार्थ, जर याआधी तुम्ही काही वैयक्तिक कर्ज, शिक्षण कर्ज किंवा गृह कर्ज घेतले असेल आणि आता आपण क्रेडिट कार्डसाठी अर्ज करत असाल, तर आपला क्रेडिट इतिहास कसा आहे हे बँक शोधून काढते.
- यामध्ये प्रामुख्याने आपण आधी घेतलेली सर्व कर्जे वेळेत आणि कोणत्याही थकबाकीशिवाय अदा केली आहेत की नाही, याची शहानिशा केली जाते.
4. क्रेडिट कार्ड घेण्यामागचा तुमचा नक्की उद्देश स्पष्ट असावा
- बँकेत अनेक प्रकारची क्रेडिट कार्ड्स उपलब्ध असतात. मात्र तुम्हाला कोणत्या प्रकारचे घ्यायचे आहे हे माहित असणे गरजेचे आहे.
- जर तुम्हाला प्रामुख्याने किराणा, वाण सामान आणि किरकोळ खरेदीसाठी कार्ड वापरायचे असेल तर तुम्ही त्यात अधिक फायदा देणारे कार्ड निवडू शकता.
- जर आपला मुख्य खर्च औषधे किंवा इंधनावर होत असेल तर तशी कार्ड्स उपलब्ध असतात.
- थोडक्यात विविध कार्ड्सवर विविध योजना आणि सवलती असतात. मात्र आपल्या रोजच्या गरजा ओळखून तसे कार्ड घ्यावे. तसेच बरेचदा विविध प्रकारच्या खरेदीवर बक्षिसे आणि कॅश बॅक मिळण्याचे बरेच मार्ग असतात, जे वेळोवेळी तुम्हाला सांगितले जातात त्यावर थोडेसे संशोधन करणे महत्वाचे आहे.
5. विनामूल्य किंवा वार्षिक फी आकारणारी क्रेडिट कार्ड्स
- क्रेडिट कार्ड्स दोन प्रकारची असतात.
- एक – जी आजीवन पूर्णपणे विनामूल्य असतात.
- दोन – काही कार्डसाठी वर्षाला रुपये 99 पासून ते काही हजार रुपयांपर्यंत वार्षिक फी आकारली जाते.
- जर तुमच्या कार्डचा वापर अगदीच किरकोळ किंवा मूलभूत खरेदीवर होणार असेल तर विनामूल्य क्रेडिट कार्डच घ्यावे.
- मात्र वार्षिक फी आकारली जाते असे तुमचे कार्ड असेल, तर तुम्हाला बहुतांश खर्च क्रेडिट कार्डद्वारे करावा लागतो. म्हणजेच दरमहा एकूण खर्चाच्या किमान 50% खर्च तुम्ही क्रेडिट कार्ड नी केला असेल तर तुम्ही प्रिमिअम ग्राहक या कॅटेगरीमध्ये येऊन तुमच्या कार्डची फी कमी होते.
- दुसरीकडे तुम्हाला वर्षभर अनेक फायदे, बक्षिसे आणि अनेक ऑफर्स सुरू राहतात.
- जर तुम्ही हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये असाल तर रेल्वे, बस, क्रुझ लाईन्स, एअरलाइन्स, हॉटेल, शॉपिंग स्टोअर्स, इंधन कंपन्या आदींकडून अनेकदा कॅशबॅक ऑफर्स मिळतात आणि तुमच्या पैशाची चांगली बचत होते.
- या सेवांच्या नेहमीच्या वापरामुळे तुम्ही प्रीमियम मेंबर होता आणि तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळतो.
हे नक्की वाचा: मागणी न करताच क्रेडिट कार्ड आले तर काय कराल?
6. बँकेच्या मुदत ठेवीवर (FD) मिळवता येते क्रेडिट कार्ड
- आपणास हे माहित आहे का की बँकेत मुदत ठेव करुन त्याच्या बदल्यात तुम्ही क्रेडिट कार्ड मिळवू शकता? तर होय – हे शक्य आहे.
- अशा अनेक बँका आहेत ज्यामध्ये एखादी मुदत ठेव योजना स्विकारुन त्यात काही पैसे गुंतवल्यास सिक्युरिटी म्हणून त्या बदल्यात बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळू शकते. त्याला इन्स्टंट क्रेडिट कार्ड असेही म्हणतात.
- ज्या लोकांना कमी क्रेडिट स्कोअरमुळे किंवा कमी उत्पन्नामुळे क्रेडिट कार्ड मिळू शकत नाही अशांसाठी मुदत ठेव खाते उघडून त्या बदल्यात क्रेडिट कार्ड घेणे हा उपयुक्त पर्याय आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Important things of Credit Card in Marathi, Credit Card Marathi Mahiti, Credit Card in Marathi