मंडळी, शिर्षक वाचून गडबडून जाऊ नका. तुम्ही बरोबरच वाचले आहे. साधी भाजी खरेदी करताना २-३ ठिकाणी भावाची खात्री केल्याशिवाय महिला भाजी खरेदी सोहळा संपवत नाहीत. साडी, ड्रेस मटेरियल अशी आवडीची खरेदी असेल तर विचारायलाच नको. पण बऱ्याचदा मोठ्या खरेदीच्या निर्णयाला येतांना गडबड होऊ शकते.
पुण्यामध्ये एक विचित्र आर्थिक फसवणुकीची घटना उजेडात आली आहे. वृत्तपत्रे आणि वृत्त वाहिन्यांवरील माहितीनुसार थोडक्यात घटनाक्रम पुढीलप्रमाणे आहे :
- राधिका दाते- वाईकर यांनी पंजाब येथील एका व्यक्तीने लुनर फेडरेशनच्या माध्यमातून चंद्रावर जागा खरेदी केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीवर पाहिली. राधिका म्हणाल्या, माझे त्या वेळी नुकतेच लग्न झाले होते. लुनर फेडरेशनच्या माध्यमातून चंद्रावर एक कॉलनी उभारायचा मानस असल्याचे आम्हाला सांगण्यात आले.
- टीव्हीवरील जाहिरातीने माझे लक्ष वेधून घेतले. चंद्रावर जागा खरेदी करायची असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा, अशी जाहिरात बातमीनंतर करण्यात आली होती.
- चंद्रावर पाण्याचा मुबलक साठा असून, तेथे मानवी वस्तीस पोषक वातावरण असल्याचे संबंधितांनी सांगताच, अगदी कमी वेळात पैसे भरले, असे त्या म्हणाल्या.
- राधिका यांनी संबंधित संस्थेशी संपर्क साधला आणि एक एकर जागा खरेदी करण्यासाठी ६ नोव्हेंबर, २००५ रोजी जाहिरातीवर विश्वास ठेवत बचत करून साठवलेले सर्व ५० हजार रुपये सदर संस्थेच्या अकाउंट ला ऑनलाईन भरले.
- त्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला तुमची चंद्रावर जागा निश्चित झाल्याचे सांगण्यात आले तसेच याबाबत त्यांच्याशी पत्र व्यवहार देखील झाला होता.
- त्यानंतर काही महिने त्यांच्याशी बोलणे झाले. पण काही दिवसात हेल्पलाईन नंबर आणि फॅक्स नंबर देखील बंद झाला आहे. आता देखील त्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसून याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- माझा मुलगा कनिष्ठ महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याला भविष्यात मेडिकलला प्रवेश घेण्याची इच्छा असून पैशांची गरज आहे.
हे प्रकरण खूप जुने असल्याचे सांगत, त्यासंबंधी नेमका कुठला कायदा लागू होतो, याबाबत पोलिसांना साशंकता आहे. पैसे मिळावेत, यासाठी सहा महिन्यांपासून अर्ज करीत आहे. त्याला प्रतिसाद मिळत नाही, असे वाईकर यांनी सांगितले.
आपण यातून काय शिकलो?
- फसवणारे मिस्टर नटवरलाल फसवून गेले. ते नटवरलाल अनेक रुपात भेटत असतात.
- कधी सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करायच्या बहाण्याने दागिने लुटून नेतात
- तर कधी एका वर्षात तुमची ठेव दाम दुप्पट करून देतो म्हणून संपूर्ण ठेव गायब करतात.
- कधी स्वस्तात चैनीच्या गोष्टींचे आमिष दाखवतात,
फुकट फॉरेन ला न्यायचे आमिष दाखवतात, - तर कधी मल्टी लेव्हल मार्केटिंग अथवा शेअर मार्केट च्या नावाने फसवतात.
असे कितीतरी प्रसंग तुमच्या आयुष्यात आले असतील आणि तुम्ही त्यातून शिताफीने स्वतःची सुटका करून घेतली असेल. चला तर मग. तुमचे अनुभव आम्हाला कळवा.
“पुढच्याच ठेच मागचा शहाणा” ही म्हण आपण सर्वांच्याच फायद्यासाठी वापरुयात. अर्थसाक्षर, समृद्ध भारत घडवूया !
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2SXFOPr)