सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…

Reading Time: 2 minutes

सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…

“ऑनलाईन फ्रॉड कॉल!” अनेकांनी या प्रकारच्या फसवणुकीच्या बातम्या वाचल्या असतील. आधुनिक तंत्रज्ञानामुळे बँक व्यवहार सोपे झाले असले, तरी त्यासाठी बाळगाव्या लागणाऱ्या सावधगिरीमध्ये मात्र कित्येक पटींनी वाढ झाली आहे. आर्थिक व्यवहार करताना अनेकदा सर्वसामान्य लोकच फसतात. यामुळे लोकांना जागरूक करण्यासाठी हा लेख प्रपंच.

पूर्वी आर्थिक व्यवहार करावयाचे असल्यास प्रत्यक्ष बँकेत जाऊन करावे लागत. पैसे स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या खात्यात भरताना रांगेत उभं राहावं लागे, फॉर्म भरावा लागे. अशावेळी नेमकं पेन सोबत नेण्याचं विसरलं जाई. मग बँकेतील इतर लोकांना किंवा बँकेतील ‘बंदूकवाल्या काकांना’ विनंती करावी लागे. समजा आपण पेन आठवणीने नेलंच तर बँकेतील इतर आपल्यासारखेच ‘भुलेबिसरे’ लोक पेन घरी ठेऊन यायचे. अजूनही येतात.  मग ते आपल्याकडे पेन मागत. “और फिर वो पेन घुमता रहता है राऊंड अँड राऊंड ..राऊंड अँड राऊंड…”

सावधान : सिम स्वॅप फ्रॉड

पेन (pen) मानसिक  पेन (pain) वाढवते

  • बँकेतुन पैसे काढायचे अथवा भरायचे असल्यास टेबलावर गुलाबी, हिरवे, पिवळे, शुभ्र फॉर्म्स ठेवल्यापैकी नक्की कोणत्या रंगाचा फॉर्म घ्यायचा हे कळत नसे. पैसे काढण्यासाठी (Withdrawal) फॉर्म घेतला तर त्यात कुठे काय लिहायचं हे डोक्यावरून जाई. पुन्हा चला मग बंदूकवाल्या काकांकडे. ते हातातली लाकडी बंदूक सांभाळत कुठे काय लिहायचं हे सांगायचे. महिन्याच्या शेवटी, मार्च इंडिंगला तर चिकार गर्दी! तिरुपती बालाजीपेक्षाही मोठी रांग असायची. दुर्गम भागातील काही गावांमध्ये तर अजूनही असते. पावसाळ्याच्या सुरवातीला, डिसेंबर महिन्यात कर्ज घेणाऱ्या, बी बियाणंवाल्या  शेतकऱ्यांची वेगळी रांग असते.
  • या सगळ्यामुळे काही साध्या गोष्टी जसे आपल्या खात्यातील पैसे काढणे , खात्यात पैसे भरणे यांमध्ये खूप उशीर व्हायचा. पैशांसोबत आपली पिसे निघत. बँकेतील कर्मचाऱ्यांवरही वेगळा ताण येत असे  म्हणून पुढे तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत बँकेनेही तंत्रज्ञानाचा हात पकडला आणि “डिजिटल इंडिया अर्थात डिजिटल नेट बँकिंग सुरू झालं.
  • गावागावांत एटीएम मशिन्स चालू झाली. पण याच तंत्रज्ञानाने पुढे ‘मातेच्या गावांत’ म्हणायला लावणारे अनुभवही लोकांना देण्यास सुरुवात केली. क्रेडिट कार्ड, ऑनलाईन बँकेसंबंधित फसगतीचे अनुभव लोकांना येऊ लागले. याचं प्रमुख कारण म्हणजे माहितीचा अभाव.
  • याचा विचार करूनच “नॅशनल पेमेंट कॉऑपरेशन इंडिया अर्थात  एनपीसीआयने (NPCI) लोकांमध्ये जागरूकता वाढविण्यास सुरवात केली आहे. कारण आता बँकेचे व्यवहार हे जास्तीत जास्त ऑनलाईन केले जातात.

रिफंडची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आलाय? सावधान

‘ऑनलाईन फ्रॉड कॉल’ या प्रकारामध्ये लोकांना वेगवेगळ्या फोन नंबर्सवरून फोन येतो, खात्याच्या संबंधित महत्वाची माहिती मागितली जाते. कधी घाबरवलं जातं, कधी धमकी दिली जाते. कधी अत्यंत चांगल्या व्यावसायिक भाषेत बोलून खात्याची महत्वाची माहिती मिळवली जाते. 

  • “अभिनंदन सर!! तुम्ही १ करोडचं बक्षीस मिळवलं आहे. हे पैसे आपल्या खात्यात भरण्यासाठी आपले यूपीआय आयडी आणि यूपीआय पिन क्रमांक आम्हाला सांगा.”
  • “अभिनंदन मॅडम!! आम्ही आपल्या मोबाईल कनेक्शनवर तुमची क्रेडिट लिमिट वाढवतो आहे. तुम्हाला फक्त एकच करायचे आहे आम्हाला एक एसएमएस करायचा आहे.”
  • “सर तुम्ही दोन लाख जिंकले आहेत!  तुम्हाला यूपीआय आयडी वर एक रिक्वेस्ट पाठवली जाईल ती तुम्ही स्वीकारून पेमेन्ट करा.”
  • “सर तुमच्या खात्यात काही संशयास्पद हालचाली आम्हाला दिसत आहेत. आम्ही तुम्हाला ओटीपी क्रमांक पाठवला आहे, तो तुम्ही ताबडतोब आम्हाला कळवा, यामुळे तुमचं खातं सुरक्षित राहील.”
  • “मॅम तुमच्या क्रेडिट कार्डवरून काही फसगतीचे व्यवहार होत आहेत, तुम्ही लवकरात लवकर आम्हाला तुमच्या डेबिट कार्डचे पिन आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही योग्य ती कारवाई करू शकू”

अशाप्रकारच्या फोन कॉल्समुळे फसगत झाल्याच्या अनेक घटना आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत होत आहेत. म्हणूनच एनसीपीआयने ग्राहकांना सावध राहायला सांगितले आहे. अशा फोन करणाऱ्यांना फक्त तुमच्या खात्याची महत्वाची माहिती हवी असते. लोक या फोन कॉल्सला भुलतात किंवा घाबरतात. घरातील वृद्ध बऱ्याचदा याला बळी पडतात. त्यांनाही सांगावे आणि अशा फोन कॉल्सची कल्पना द्यावी.

   आयकर रिफंडचे संशयास्पद इमेल्स आणि करदात्यांची फसवणुक

“कोणतीही माहिती शेअर करायची नाही.” एक कायम लक्षात ठेवावं की कोणतीही योग्य, विश्वसनीय संस्था, बँक फोन करून कोणालाही कोणतीही माहिती विचारत नाही.  त्यामुळे सावध राहा! खबरदार राहा! उघडा डोळे बघा नीट! “शेट्टी अण्णा चोबिस घंटे चौकन्ना”.

Leave a Reply

Your email address will not be published.