मध्यंतरी फेसबुकवर एक ट्रेंड आला होता. यामध्ये ज्यांना मुली आहेत त्यांनी आपल्या प्रोफाइल फोटोसाठी ‘मेरी बेटी मेरा अभिमान’ असं लिहिलेली एक फ्रेम वापरली होती. अनेकांच्या प्रोफाईची फ्रेम पाहून मुलीच्या जन्माबाबत असणारी उदासीनता काही प्रमाणात का होईना पण कमी झाली असल्याचं जाणवलं. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच आहे.
गेल्या काही वर्षात वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या तुलनेत घटणारी मुलींची संख्या हा सरकारच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास १००० मुलांमागे मुलींची संख्या ८९४ आहे. यामागे अनेक कारणे आहेत.
यापैकी पारंपरिक रूढी परंपरांच्या आणि विचारसरणीमध्ये अडकलेला समाज हे एक प्रमुख कारण आहे. चुकीच्या विचारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांमध्ये दुर्दैवाने अशिक्षित किंवा अल्पशिक्षित लोकांपेक्षा उच्च्शिक्षित लोकांचे प्रमाण जास्त आहे.
तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने प्रगती करत ‘टॉप टेन’ देशांमध्ये स्थान मिळविणाऱ्या भारत देशात चुकीच्या समजुतीमुळे मुलींचे घटणारे प्रमाण ही एक शोकांतिका आहे.
मुलींच्या घडणाऱ्या जन्मदराबरोबरच मुलींना शिक्षणाच्या समान संधी मिळवून देणे, मुलींचे बालविवाह रोखणे अशी अनेक आव्हाने सरकारसमोर आहेत. यांवर उपाय म्हणून सरकारमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.
- केंद्र सरकारने १३ फेब्रुवारी २०१४ मध्ये ‘सुकन्या योजना’ सुरु केली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१४ पासून “बेटी बचाओ-बेटी पढाओ” ही योजनाही सुरु केली आहे.
- सन २०११ च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी मुलींचे जन्मदर कमी असणाऱ्या भारतातील १०० जिल्ह्यांची निवड करून सदर जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे.
- या योजनेमध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरांगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना या १० जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
- “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेच्या धर्तीवरच मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण करणे, मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतीबंध करणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यसरकारने सध्या सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करुन “माझी कन्या भाग्यश्री” ही नवीन योजना सुरु केली आहे.
- ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच दारिद्र्य रेषेच्यावरील (APL) पांढरे रेशनकार्ड धारक कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी आहे.
- सदर योजनेमध्ये “सुकन्या योजनेचे” लाभ कायम ठेवण्यात आले असून, या योजनेअंतर्गत मुलीचा जन्म झाल्यापासून ती १८ वर्षे होईपर्यंत तिला अधिकचे लाभ देण्यात येतील.
योजेनेचे स्वरूप
“माझी कन्या भाग्यश्री” या योजनेमध्ये लाभार्थीचे दोन प्रकार करण्यात आले आहेत.
- प्रकार-१: एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे.
- प्रकार-२: दोन्ही मुली आहेत आणि मातेने दुस-या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार-२ चे लाभ घेता येतील. मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास या योजनेचे लाभ मिळणार नाहीत.
लाभाचे स्वरूप
- माझी कन्या भाग्यश्री ही योजना संपूर्ण राज्यभर राबविली जाणार आहे. या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी मुलीच्या वडिलांनी महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- कुटुंबातील एक मुलगी अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
- जर एका कुटुंबात दोन मुली असतील आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आईने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असेल तरच दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र एक मुलगी व एक मुलगा असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- या योजनेअंतर्गत सुरुवातीला प्रधानमांत्री जनधन योजनेअंतर्गत आई व मुलीच्या नावे संयुक्त खाते (Joint Account) उघडण्यात येईल. यामध्ये ५०००/- रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट आणि १ लाख रुपये अपघात विमा या सुविधा मिळतील.
- शासनामार्फत मुलीच्या नावे एलआयसीमध्ये (LIC) २१,२००/- रुपयांची विमा पॉलिसी काढण्यात येईल. मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर १ लाख रुपयांची विमा रक्कम देण्यात येईल.
- मुलीच्या नावे शासनामार्फत ठेवण्यात आलेल्या रुपये २१,२००/- या रकमेतून १०० रुपयांचा विमा हप्ता प्रतिवर्षी जमा करुन यामधून मुलीच्या कमावत्या पालकांसाठी विमा पॉलिसी काढण्यात येईल. या पॉलिसी अंतर्गत-
- नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपये ३०,०००/-
- अपघाती मृत्यू झाल्यास रुपये ७५,०००/-
- अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास रुपये ७५,०००/-, एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास रुपये ३७,५००/-. या पद्धतीने विमा रक्कम देण्यात येईल.
- मुलीचे वय पाच वर्षे होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी २०००/- रुपये असे एकूण १० हजार रुपये देण्यात येतील. दोन्ही मुली असतील तर प्रत्येक मुलीसाठी रुपये एक हजार रक्कम प्रतिवर्ष जमा केली जाईल.
- मुलीच्या प्राथमिक शिक्षणादरम्यान म्हणजेच इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंतच्या टप्प्यात प्रतिवर्ष २५००/- रुपये याप्रमाणे पाच वर्षासाठी रुपये १२,५००/- देण्यात येतील. दोन्ही मुली असतील तर प्रतिवर्ष प्रत्येकी १,५००/- याप्रमाणे पाच वर्षांसाठी रुपये १५०००/- देण्यात येतील.
- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाकरिता म्हणजेच इयत्ता ६ वी ते १२ वी अशा सात वर्षांकरिता दरवर्षी रुपये ३,०००/- प्रमाणे एकूण २१,०००/- हजार रुपये देण्यात येतील. दोन मुली असतील तर प्रत्येकी २०००/- रुपये प्रतिवर्षी याप्रमाणे एकूण २८,०००/- हजार रुपये देण्यात येतील.
- मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर १ लाख रुपये देण्यात येतील. यापैकी १०,०००/- हजार रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर (Skill Development) खर्च करणे बंधनकारक आहे.
- विम्याचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असणे, तिने इयत्ता १० वी ची परिक्षा उत्तीर्ण होणे, तसेच १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहे. वयाच्या १८ व्या वर्षी मुलींना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा उद्देश मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे हा आहे.
- मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलीच्या आजी-आजोबांना ५ हजार रुपयांपर्यंतच्या किंमतीचे सोन्याचे नाणे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या मुलीस आम आदमी विमा योजनेअंतर्गत समाविष्ट शिक्षा, सहयोग योजनेअंतर्गत इयत्ता ९ वी पासून ते १२ वी पर्यंत शिकत असताना ६००/- रुपयांची शिष्यवृत्ती दर सहा महिन्यांसाठी दिली जाईल.
या योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग तसेच तालुकास्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
बक्षीस
या योजनेअंतर्गत फक्त मुलींनाच लाभ मिळणार आहेत असं नाही तर, ज्या गावामध्ये मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर एक हजारापेक्षा जास्त असेल, त्या गावास महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत ५ लाख रुपयांपर्यंतचे पारितोषिक दिले जाईल. सदर बक्षिसाची रक्कम ग्रामपंचायतीने संबंधित गावातील मुलींच्या विकासासाठी खर्च करणे बंधनकारक राहिल.
कुटुंबात मुलीच्या जन्माचेही स्वागत व्हावे आणि एक कळी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही उमलावी या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. एकंदरीत या योजनेचे स्वरूप बघता ही योजना यशस्वी होईल अशी आशा करायला हरकत नाही.
या योजनेच्या अधिक माहिती देणारी सरकारची PDF File खालील लिंकवर उपलब्ध आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक अर्जाचे नमुने डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये , सुकन्या समृद्धी योजना – भाग ३
आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय?
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.