सणावार म्हणजे सोने खरेदी असं एक समीकरण आपल्या देशात शतकानुशतकं चालत आलं आहे. त्यातही खास करून ठराविक मुहूर्तांवर म्हणजेच अक्षय तृतीया, दसरा, गुरु- पुष्यांमृत योग, अशा शुभ दिनी सोनं खरेदीला अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृती म्हणा किंवा हौस, परंपरा म्हणा किंवा गुंतवणूक; सोने कितीही महाग झाले तरी अशा शुभ मुहूर्तांवर आवर्जून सोनं खरेदी केली जाते.
सोनं खरेदी खरच आवश्यक आहे का?
- सोनं आयात करणाऱ्या देशांमध्ये भारत देश आहे अग्रेसर आहे. जगभरातील सोनं आयातीच्या एकूण एक तृतीयांश सोनं एकटा भारत देश आयात करतो. परंतु, याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो हे फार थोड्या लोकांना माहिती असेल.
- सोने खरेदीची अनेक करणे आहेत.परंतु सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सोन्याकडे आपपत्तीकालीन निधीची सोय म्हणजेच अडी-अडचणींना उपयोगी पडणारी गुंतवणूक अशा अर्थाने बघितले जाते.
- सोन्यामधील गुंतवणूक उत्तम परतावा देते का नाही, हे सोने खरेदीच्या स्वरूपावर किंवा प्रकारावर ठरत असतं. सोन्याचे दागिने उत्तम परतावा देतातच असं नाही कारण एकतर त्यामध्ये घट धरली जाते तसेच दागिन्यांसाठी मजुरीही द्यावी लागते. याउलट, शुद्ध सोनं (सोन्याचं बिस्कीट, बार) जास्त परतावा देतं. शुद्ध सोनं हे सामान्यतः १ ग्रॅम,२ ग्रॅम,५ ग्रॅम, १० ग्रॅम, इत्यादी वजनांमध्ये उपलब्ध असते. तसेच यासाठीची घडवणावळ तुलनेने कमी असते.
गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोनं हा पर्याय निवडावा का?
- सुवर्ण खरेदी आपल्या संस्कृतीचा / परंपरेचा भाग आहेच शिवाय सोने व सोन्याचे दागिने हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. हौशीला मोल नसते. परंतु जर आपली हौस आपल्या गुंतवणुकीचा उत्तम पर्याय बनू शकत असेल तर दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. यासाठी गरज आहे ती तुमचा दृष्टिकोन बदलण्याची.
- सोनं खरेदीसाठी पारंपरिक पर्यायांचा विचार करण्यापेक्षा आधुनिक पर्यायांचा विचार केल्यास, तुमची हौस आणि गुंतवणुकीचं कठीण गणित तुम्ही सहज सोडवू शकाल.
- पारंपरिक पर्यायांचा सर्वात मोठा तोटा म्हणजे ‘धोका’. या धोक्याच्या शक्यतेमुळेच सोने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले जाते. यामध्ये पुन्हा लॉकरच्या भाड्याचा खर्च करावा लागतो.
- आधुनिक पर्यायांमध्ये सोन्याची ‘फिजिकल कस्टडी’ खरेदीदाराकडे नसल्यामुळे इथे पारंपरिक पर्यायांमधील महत्वाचा धोका कमी होतो.
सोने खरेदीचे आधुनिक पर्याय कोणते?
- ईटीएफ गोल्ड (ETF Gold):
- गोल्ड ईटीएफमध्ये स्टॉक एक्सचेंजमधून सोने खरेदी करू शकतात. यासाठी ग्राहकांचे डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते असणे आवश्यक आहे.
- गोल्ड ईटीएफच्या खरेदी आणि विक्रीसाठी सामान्यतः ०.२५% ते ०.५% दरम्यान ब्रोकरेज फी भरावी लागते. तसेच फंड व्यवस्थापनासाठी ०.५ ते १% शुल्क भरावे लागते.
- गोल्ड ईटीएफ एसआयपी (SIP) मधूनही खरेदी करता येतात.
- गोल्ड फंड:
- इतर म्युच्युअल फंड योजनांप्रमाणेच गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक केली जाते.
- कमी रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी गोल्ड फंड हा चांगला गुंतवणूक पर्याय आहे. तर अधिक रकमेची खरेदी करणाऱ्यांनी ईटीएफ गोल्ड हा पर्याय निवडावा.
- ई-गोल्ड:
- राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (NSEL) द्वारे डिमटेरियलाइज्ड स्वरूपात सोन्याची खरेदी करू शकता.
- ई-गोल्ड अल्प प्रमाणात विकत घेतले जाऊ शकते आणि ठराविक कालावधीनंतर ते त्या वेळेच्या सोन्याच्या किमतीमध्ये विकण्याचा अथवा सोन्यामध्ये रुपांतरित करण्याचा पर्याय ग्राहकांकडे असतो.
- तसेच, तुम्ही घेतलेल्या सोन्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे ‘एनएसईएलची’ असल्यामुळे ई-गोल्डचा ग्राहक अगदी निश्चित राहू शकतो. सोने गुंतवणुकीचा हा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे.
- सोव्हरीन गोल्ड बॉंड्स (SGB):
- सोव्हरीन गोल्ड बॉंड्स (एसजीबी) सरकारकडून इशू केले जातात. सोन्याच्या किमतीवर याची किंमत ठरते. या बॉण्ड्सची खरेदी विक्री दुय्यम बाजारातदेखील (Secondary Market) केली जाते. यावर व्याजदेखील मिळते.
- सोने जवळ बाळगण्याची जोखीम पत्करण्यापेक्षा हे बॉण्ड्स खरेदी करणं जास्त सुरक्षित आहे.
- इक्विटी गोल्ड फंडः
- इतर योजनांपेक्षा ही योजना थोडी वेगळी आहे. इथे सोन्यामधील गुंतवणूक ही सोन्याच्या किमतीवरून ठरत नाही. हे फंड ‘इक्विटी-आधारित फंड’ असल्यामुळे या गुंतवणुकीमध्ये ‘इक्विटी जोखीम (Equity Risk)’ आहे.
- यामध्ये थेट सोनं खरेदी न करता सोनेखाण (Gold Mining companies) आणि विपणन (मार्केटिंग)) यांच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.
- सोन्याशी संबंधित भारतामध्ये एकही सूचीबद्ध (लिस्टेड) कंपनी नाही. म्हणूनच, यासंबंधित सारे व्यवहार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केले जातात.
या अक्षय्य तृतीयेला मुहूर्त करा नव्या खरेदीचा – नव्या गुंतवणुकीचा!
टीम अर्थसाक्षरतर्फे अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!
सुवर्ण संचय योजना भाग १,
सुवर्ण संचय योजना भाग 2,
सोन्याच्या प्रचंड साठ्यातील पैसा फिरेल कसा ?,
सुवर्ण गुंतवणुकीचे ‘डिजिटलायजेशन’
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.