Reading Time: 4 minutes

गुंतवणुकीच्या माध्यमातून श्रीमंत होणं ही वेळखाऊ आणि कंटाळवाणी प्रक्रिया आहे. त्यात जर आपल्याला काहीतरी थरार किंवा ‘एक्साईटमेन्ट’ची अपेक्षा असेल तर ती योग्य नाही. मात्र लवकर श्रीमंत व्हायची घाई प्रत्येकालाच झालेली असते. कधी एकदा जादूची कांडी फिरतेय आणि मी श्रीमंत होतो असे झालेले असते. मात्र महामार्गांवर जागोजागी लावलेली ‘अति घाई, संकटात नेई’ सूचना इथेही लागू होते. आपल्या आर्थिक उन्नतीच्या स्वप्नाला फुंकर घालून, भुलवून, परताव्याविषयी अवास्तव, फसवी आश्वासने देऊन आपल्याला अजूनच नुकसानीत घालणाऱ्या गुंतवणूक योजनांची या जगात काही कमतरता नाही. मल्टी-लेव्हल मार्केटींग किंवा पिरॅमिड योजना या त्यातल्या प्रमुख योजना.

या सापळ्यापासून सावध राहा!

 • तुमच्या ओळखीची कोणी व्यक्ती, मित्र, मैत्रीण, शेजारी, नात्यातले किंवा कार्यालयातले कोणीतरी तुम्हाला ‘एका जबरदस्त’ व्यवसाय संधीबद्दल माहिती देण्यासाठी बोलावतात.
 • व्यवसाय सोपा असतो, कसलीतरी उत्पादनं विकायची असतात. पण त्याचबरोबर अजून एक काम करायचे असते. आपल्यासारख्या अजून ४-५ जणांना हेच काम करायला राजी करायचे असते. व्यवसायात दरमहा भरघोस फायदा कसा होईल याची कोष्टकं तयार असतात आणि आपल्या खाली जोडल्या जाणाऱ्या लोकांनी केलेल्या विक्रीवर आपल्याला कमिशन मिळणार असतं.
 • आता एवढा नफा कमवायचा तर काहीतरी गुंतवणूक तर करायला पाहिजे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ‘केवळ’ ४०,०००-५०,००० फी असते. अर्थात तेवढ्या किमतीची उत्पादने लगेच मिळणार असतात. त्याचसोबत पुढल्याच आठवड्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या कंपनीच्या महासभेचे आमंत्रण मिळते.
 • आपण जरा नीटनेटके तयार होऊन त्या पंचतारांकित हॉटेलात जातो तर फाडफाड कॉन्व्हेंट इंग्रजीत बोलणारे स्मार्ट तरुणतरुणी आपल्याला ‘बिझनेस प्लान’ समजवायला बसवतात. बोलता बोलता या व्यवसायातील ‘अमक्याने कसे पहिल्याच महिन्यात २ लाख कमावले’, ‘तमक्याने कसे नवीन घर घेतले’, ‘हे करायला सुरुवात केल्यानंतर एखाद्याने कशी नोकरीच्या जोखडातून मुक्ती मिळवली’, ‘स्काय इज द लिमिट’ वगैरे गोष्टी ऐकवल्या जातात. थोडक्यात आपल्याला असे वाटू लागते की आपण किती नशीबवान की ही संधी आपल्याला मिळते आहे.
 • अशा भारलेल्या मनःस्थितीत आपल्याला मुख्य कार्यक्रमाच्या हॉलमधे नेले जाते. अद्ययावत वेशभूषा केलेली कोणी व्यक्ती उत्पादने वगैरे गोष्टींची माहिती देते आणि तेवढ्यात त्यांच्या प्रमुख पाहुण्याची एन्ट्री होते. एखाद्या सिनेस्टारच्या रुबाबात येणारी ही व्यक्ती कोण? असा प्रश्न आपल्याला पडतोय तोच आपल्याला सांगण्यात येतं की तो त्या कंपनीचा या वर्षीचा सर्वात जास्त कमिशन मिळवणारा यशस्वी मेंबर आहे.
 • हा स्टार पर्फॉर्मर सांगतो तो कसा २ वर्षांपूर्वी सायकल चालवत या कंपनीत आला होता आणि आज या कार्यक्रमाला स्वतःच्या मर्सिडीजमधून आला आहे. ‘तुम्हा प्रत्येकात एक यशस्वी उद्योजक लपलेला आहे. त्याला बाहेर येऊ द्या आणि बघा ही कंपनी तुम्हाला कुठून कुठे नेऊन ठेवते. तुमच्यातल्या प्रत्येकाकडे एक एक मर्सिडीज आलेली मला बघायची आहे!’ टाळ्यांच्या कडकडाटात जेव्हा त्याचे हे प्रेरणादायी भाषण संपते तेव्हा कधी एकदा ५०,००० भरतो आणि त्या कंपनीचा मेंबर होतो अशी आपली अवस्था झालेली असते.
 • थोड्याफार फरकाने या सगळ्या मल्टी-लेव्हल मार्केटींग किंवा पिरॅमिड योजना लोकांना गळाला लावण्यासाठी अशा क्लुप्त्या योजत असतात. कारण सतत नवीन नवीन लोकांना पैसे भरून योजनेत सामील करून घेणं यावर त्यांचा पूर्ण डोलारा अवलंबून असतो. त्यात सामील झालेल्या मेम्बरना कसल्याही सेवा किंवा उत्पादने विकून फायदा होत नसतो, तर नवीन लोकांना मेंबर बनवून पैसे मिळत असतात. त्यांची उत्पादने इतकी निकृष्ट, महागडी किंवा निरुपयोगी असतात की कोणालाच त्यांची गरज नसते.
 • उदाहरणार्थ, eBiz नावाची एक MLM कंपनी कॉम्प्यूटर लिटरसी मिशनच्या नावाखाली इंटरनेटवर फुकट मिळणारे शैक्षणिक साहित्य CD मधे टाकून प्रत्येकी रू ७५००/- ला मेंबरना विकायला लावायची, आणि अजून ३ जणांना घेऊन आलात तर त्यांच्या विक्रीवर कमिशन द्यायची. प्रत्येक मेंबरने ‘फक्त’ ५ लोकांना जोडायचं, त्यातल्या प्रत्येकाला अजून ५-५ लोकांना जोडायला मदत करायची. अशा पद्धतीने पाचाचे पंचवीस, त्याचे सव्वाशे, त्याचे सहाशे अशी वेगाने साखळी वाढत जाईल आणि एवढ्या सगळ्या लोकांच्या विक्रीवर तुम्हाला कमिशन मिळेल. हे ऐकायला छान वाटतं, पण अशा पद्धतीने खरंच जर साखळी वाढली तर अवघ्या १३ पायऱ्यांमध्ये भारताची पूर्ण जनता त्यात सामील झालेली असेल.
 • तसं बघायला गेलं तर कागदावर ‘मल्टी-लेव्हल मार्केटींग’ ही एक फार सुंदर कल्पना आहे. पारंपारिक जाहिराती किंवा ब्रान्ड ॲम्बेसेडर वर पैसे खर्च न करता एकाने दुसऱ्याला असं वैयक्तिक पातळीवर जर कुठली उत्पादनं विकली तर समाजातील प्रत्येकापर्यंत कमी किमतीत गोष्टी पोचू शकतील.
 • शाहरुख खानने टीव्हीवर सांगितले ‘अमक्या ब्रान्डची बिस्किटे खा’, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मित्रमंडळीना किंवा शेजारपाजाऱ्यांना प्रत्यक्ष सांगितले की ‘मी बिस्किटांचा हा ब्रान्ड वापरून बघितलाय, चांगला आहे, तुम्ही पण घ्या’ तर त्याचा नक्कीच जास्त उपयोग होईल. मात्र, प्रत्यक्षात कंपन्या मनःशांती देणारे लोलक किंवा स्फटिक, वजन कमी करण्यापासून कॅन्सर बऱ्या करण्यापर्यंत काहीही आश्वासनं देणाऱ्या पावडरी, उत्साहवर्धक टॉनिक, कसलीतरी सौंदर्य प्रसाधने अशी काहीही अप्रमाणित उत्पादने विकायचा प्रयत्न करतात. त्यामुळे कंपनीबाहेरच्या कोणालाच ती उत्पादने खरेदी करण्यात रस नसतो.
 • प्रत्येक नवीन मेंबरला सांगितलं जातं की तुम्ही तुमच्याखाली ‘फक्त’ ५ लोकांना जोडायचं, त्यातल्या प्रत्येकाला ५-५ लोकांना जोडायला मदत करायची. अशा पद्धतीने पाचाचे पंचवीस, त्याचे सव्वाशे, त्याचे सहाशे अशी वेगाने साखळी वाढत जाईल आणि एवढ्या सगळ्या लोकांच्या विक्रीवर तुम्हाला कमिशन मिळेल. हे सुद्धा ऐकायला छान वाटतं, पण अशा पद्धतीने खरच जर साखळी वाढली तर अवघ्या १३ पायऱ्यांमध्ये भारताची पूर्ण जनता त्यात सामील झालेली असेल. पण असं होत नसतं.
 • अशा मल्टी-लेव्हल मार्केटींग योजनांच्या तावडीत सापडलेल्या बहुतेकांचे मेंबरशिपसाठी भरलेल्या रकमेचे पूर्ण नुकसान होते. म्हणजे जे ५०,००० भरून त्याचे चार महिन्यात २ लाख करायचे होते ते सगळेच पैसे फुकट जातात. या योजनेच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ्याच लोकांना त्यातून आर्थिक लाभ होतो. त्यामुळे अशा योजनांपासून चार हात लांबच राहणे श्रेयस्कर.
 • जेव्हा ओळखीतली कोणी व्यक्ती ‘जबरदस्त’ व्यवसाय संधीबद्दल माहिती द्यायला बोलावते, तेव्हाच आपल्या मनात शंकेची पाल चुकचुकली पाहिजे. आणि त्या बिजनेस प्लानमधे नवीन लोकांची भरती एक अनिवार्य गोष्ट आहे असे दिसून आले तर मग मात्र आपल्या मनात धोक्याचा अलार्म वाजला पाहिजे.

‘श्रीमंत मी होणार’ हे चांगलेच उद्दिष्ट आहे, पण ते सुयोग्य नियोजनातून साध्य करायला हवे, घाईपायी अशा प्रलोभनांना बळी पडू नये.

– प्राजक्ता कशेळकर

(प्राजक्ता या पुणेस्थित आर्थिक नियोजन तज्ञ असून गेल्या ७ वर्षांपासून त्या आर्थिक नियोजनाची सेवा देत आहेत. प्राजक्ता यांच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा : http://pro-f.in/contact-us/ )

फसव्या विमा पॉलिसींचा सापळा,

गुंतवणूकीचे मृगजळ: हिरा ग्रूप घोटाळा,

डी-मार्ट चे फ्री कुपन मिळणारा व्हॉट्सॅप मेसेज : आणखी एक भयंकर गंभीर ऑनलाईन फ्रॉड

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutes गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.