मध्यंतरी (मी सामील नसलेल्या) एका व्हॉटसअप समुहावर, “गृहकर्ज मुदतीपूर्वी (Prepay) परत करावे का?” या मुद्द्यावर घनघोर वादविवाद झाले. त्या समूहातील माझ्या मित्राने विनंती केल्यावरुन माझा् ‘अर्थविषयक’ मासिकात आधीच छापून आलेला (प्रदीर्घ आणि बोअरिंग) लेख मी येथे चिकटवतो आहे. साधक/ बाधक मते अवश्य नोंदवावीत.
ऋणकर्ता पिता शत्रुर्माता च व्यभिचारिणी।
- स्व. डॉ. चिंतामणराव देशमुख केंद्रिय अर्थमंत्री असतानाची गोष्ट. लोकसभेत चर्चा चालू होती. मा. अर्थमंत्र्यांनी पंचवार्षिक योजनेतील उदीष्ट्पुर्तीकरीता कर्जे घेण्याचे सुतोवाच केले होते. यावर टीका करताना विरोधी नेत्यांनी आपल्या भाषणांत ‘अपत्यावर कर्ज करणारा पिता, व्यभिचारिणी माता हे शत्रूसमान समजावे’ अशा अर्थाचे वरील संस्कृत सुभाषित उद्घृत केले.
- डॉ. सी.डींचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि विद्वता याबद्दल शंकाच नाही. त्यांनी ऊत्तरादाखल कर्जामुळे अपत्याचे भविष्य घडणार असेल, तर असे कर्ज उपकारकच असते’ अशा आशयाचे प्रति सुभाषित रचूनच चर्चेचे उत्तर दिले.
- ‘कर्ज’ या संकल्पनेबद्दल सर्वसामान्यांच्या मनात एक वाईटपणाची, कधीकधी घृणास्पद भावना असते. कर्ज ही एक नकोशी, त्रासदायक गोष्ट आहे,असे संस्कार झालेले असतात.
- ‘अंथरुण पाहून पाय पसरावे’ ही म्हण किंवा ‘अग्निशेषंमृणशेषं शत्रुशेषं तथैवच।’ (अग्नी, शत्रू आणि ऋण, जरी थोडेही शिल्लक राहिले, तरी परत परत वाढून शेवटी विनाशकारक ठरतात) अशी सुभाषिते, ही याचीच द्योतक आहेत.
‘काळ बदलला, हे आजकालचे परवलीचे वाक्य बहुतेकदा खरेही असणारे, पण कर्ज या शब्दाला चिकटलेली एकतर्फी नकारात्मक, अपराधी भावना आजही तितकीशी बदललेली नाही. हाच धागा पकडून कर्ज या संकल्पनेबद्दलचे गैरसमज दूर करता आले, तर पहावे या हेतूने हा शब्द्च्छल (आणि वाचकांचा छळ).
- “आज कुणाचे एका पैशाचे देणे लागत नाही मी….” किंवा “उभ्या आयुष्यात कधी दिडकीचे कर्ज नाही घेतले…” अशी स्वाभिमानी वाक्ये ऐकतच मी मोठा झालो.
- मला या शिस्तबद्ध जीवनशैलीचा तेव्हाही अभिमान होता आणि आजही तितकाच आभिमान आहे, पुढे शिक्षणाच्या निमित्ताने अनुभवाच्या कक्षा रुंदावल्या, त्यातच अर्थकारण हा अभ्यासाचा विषय बनला आणि मग मुंबैनगरीत एक असा गुरु सापडला जो म्हणायचा “प्रसाद, जब तक सर पर बडा कर्जा नही…. मजा नही”
- अत्यंत तल्ल्ख बुद्धिमत्तेचा, स्वतःच्या व्यवसायाबद्दल अत्याधिक जागरुक, आता बडा व्यावसायिक असलेला, आमच्याच कॉलनीतील प्रविण (अर्थातच चावला, अशांचे आडनाव जोशी, साठे ई. असणे अशक्यच!) अधेमधे संध्याकाळी समोरच्या कट्ट्यावर गप्पा मारताना त्याचे अफाट तत्वज्ञान माझे गळी उतरवायचा, मी निमूट ऐकायचो, शेवटी चेकमेट झाल्यानंतर डब्यात रवानगी झालेल्या राजासारखा घरी परतायचो.
- सरतेशेवटी मधल्या आळीतील पापभिरू ब्राह्मणी मानसिकतेच्या खोडावर सिंधी व्यावहारिक दृष्टिचे कलम रुजले आणि मग “अस्मादिकांच्या आई बाबांच्या शिक्षक पतपेढीतून ६% दराने सहजी मिळणारे कर्ज घ्यायलाच हवे होते, त्याची अगदी एफडी करते, तरी ४% जास्त मिळते” हा साक्षात्कार झाला.
- येथे मला जुन्या पीढीला अजिबात दोष द्यायचा नाही. तेव्हा एकतर आर्थिक जाणिवा एवढ्या प्रगल्भ नव्हत्या, सक्षम बॅंकिंग व्यवस्था नव्हती, सहाजिकच कर्ज घेणे ह्या गोष्टीची परिमाणेच वेगळी होती. कर्ज याचा अर्थ एखाद्या परिचितांकडून, नातेवाईकाकडून वा सावकाराकडून पैसे ‘उसने’ घेणे असा होता. असे उसने घेतलेले पैसे देण्यामागे व्यावसायिक दृष्टिकोन नसे. असे पैसे कधी, कसे आणि काय मोबदल्याने परत करायचे याची स्पष्टता नसे, मग त्यातून लाचारी, ओशाळेपणा, उपकार/अपकाराच्या भावना असे साईड ईफेक्ट्स होत, पण आता तसे नाही.
- आज आपल्याकडे अतिशय प्रगत, जागतिक दर्जाची बॅंकिंग व्यवस्था आहे. कर्जे देणे हा बँकांचा प्रमुख व्यवसाय आहे, त्यांनी ग्राहकांना दिलेल्या कर्जांसंदर्भात कायदेशीर चौकट आखलेली आहे, अशावेळी कर्ज घेणे ही वेगळी बाब आहे.
- ‘A bank is a place that will lend you money only if you can prove that you don’t need it.’ असे कोणीसे उपहासाने म्ह्टले आहे, पण केवळ निकड किंवा अगतिकता म्हणून नव्हे, तर आर्थिक पातळीवर परवडणारा व फायदेशीर ठरणारा निर्णय म्हणूनही एखादे कर्ज घेतले जाऊ शकतेच की!
- खरे तर कर्ज घेणे हा एक आर्थिक व्यावहारिक आणि धोरणात्मक निर्णयही असायला हवा. माझ्या परिचयातील एक उद्योगपती याबाबत, “शहाणी माणसे पैसे वाचवतात (Savings) आणि माझ्यासारखी वेडी माणसे ते वाचविलेले पैसे (योग्यरित्या) वापरतात”, असे म्हणत असत. त्याचा अन्वयार्थ हाच आहे.
- एकदा महावीर बुद्धांना विचारले गेले की विष म्हणजे काय? बुद्धांनी अत्यंत सुंदर उत्तर दिले. “जीवनात आवश्यकतेपेक्षा अधिक असलेली प्रत्येक गोष्ट विषासमानच आहे.” मतितार्थ हाच की काय चांगले, काय वाईट हे नेहमीच स्थितीसापेक्ष असते. तद्वत कर्ज घेणे घातक, कर्ज म्हणजे नुकसान असा संकुचित, पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन असू नये.
- अर्थात याचा अर्थ उठसूट मिळेल तिथून, मिळेल तसे कर्ज घावे, बेलगाम खर्च करावा असा मुळीच नाही. ‘अंथरुण पाहून….’ या विचाराशी मी सहमत नसेनही, पण एकवेळ ते परवडेल, मात्र ‘ऋण काढून सण साजरे करणे’ हे अधिक घातक, असे माझे स्पष्ट मत आहे.
- कर्जापोटी चुकवाव्या लागणारी किंमतीपेक्षा (व्याज) त्याच्या विनियोगातून मिळणारा मोबदला वा उपयोगिता जास्त असेल, तर असे आणि फक्त असेच कर्ज फायदेशीर असते. (उदा. गृहकर्ज, पीककर्ज, शैक्षणिक कर्ज, इत्यादी.)
- याउलट चैनीच्या वस्तू खरेदीकरिता असलेल्या तात्काळ कर्ज योजना, कंपन्याकडून ०% व्याजदराचे आमिष दाखवून दिलेली कर्जे, क्रेडिट कार्ड्सवरुन घेतलेले मर्यादाबाह्य कर्ज, हे कधीही फायद्याचे ठरत नाही.
- अनेकदा कर्जाच्या परतफेडीच्या वेळी करसवलती वा सबसीडी सारखे काही फायदेही असतात. कर्जाची व्यवहारिकता तपासताना-
- कर्ज घेण्याकरिता येणारे अनुषंगिक खर्च
- द्यावा लागणारा व्याजदर
- त्याच्या विनियोगाने मिळणारे उत्पन्न/होणारी बचत
- आपली कर्ज नियमितपणे परत करण्याची क्षमता. या महत्वांच्या घटकाबरोबरच अशा फायद्यांचाही विचार करावा. असो..
गृहकर्ज – लवकर परतफेड की गुंतवणूक?
- हे सारे लिहावयाचे कारण म्हणजे परवाच माझे एक क्लाएंट श्री सरनाईक साहेवांचा दुरध्वनी आला. “मिस्टर भागवत, मी आज पुन्हा एकदा तुम्हाला न विचारता एक इन्व्हेस्ट्मेंट करतोय बरं का!” साहेबांनी थेट मुद्द्याला हात घालत त्यांच्या अधिकारी आवाजात सुरवात केली.
- ते क्लब महिंद्रा कंपनीची प्रिमियम मेंबरशीप घ्यायच्या विचारात होते. यावर मी काही बोलणार तोच “माझा आधीचा एक निर्णय तुमच्यामुळे मी बदलला होता. आठवतंय?? ही मेंबरशीप त्या बदललेल्या निर्णयाचाच परिणाम आहे बरं का!” साहेबांच्या ह्या गुगलीने मी गडबडलो, गप्प राहिलो. मग थोड्यावेळाने सर्व खुलासा झाला तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला.
- त्याचे झाले असे..पाच एक वर्षापुर्वी एका वरिष्ठ सरकारी अधिकारी पदावरुन साहेब सन्मानाने निवृत्त झाले होते. सहाजिकच त्यांना एक मोठी रक्कम ग्रॅज्युइटी, फंड आणि अनुषंगिक लाभापोटी मिळाली. त्याच्या नियोजनाच्या प्रयोजनाने आम्ही जेव्हा प्रथमच भेटलो तेव्हा गुंतवणुकीच्या बाकी पर्यायांवर माझ्याशी चर्चा आवश्यक वाटणाऱ्या साहेबांनी एक निर्णय मात्र एकतर्फी घेतला होता..”घरकर्जाच्या मुदतपुर्व परतफेडीचा!”
- निवृत्तीनंतर डोक्याला शांतता हवी, कोणतेही कर्ज नको अशी त्यांची भुमिका होती. शिवाय आता दरमहा मिळणारा पगार नसेल, मग कर्जाचा मासिक हप्ता भरणे तसे अवघडच, या पार्श्वभुमीवर दरमहा कर्जफेड करण्यापेक्षा शिल्लक कर्ज एकरकमी भरुन विषय संपवून टाकावा, असे त्यांनी ठरवले होते.
- भेटीत बाकी उहापोह झाल्यानंतर हे गृहस्थ ‘हम करे सो..’ खाक्याचे असले तरीही समोरच्याचे विचारपूर्वक ऐकतात असा आडाखा बांधून कर्जफेडीची बॅकेकडे जाणारी रक्कम हातून जाऊन द्यायची नाही ह्या विचाराने मी प्यादी पुढे सरकवू लागलो.
- “आपला निर्णय योग्यच आहे. साहेब..,” मी Customer is always right या वाक्याचे भाषांतर त्यांना ऐकवले आणि मग-
- १०.५०% हा काही खूप जास्त व्याजदर नाही.
- घरकर्जाचे ईएमआय (EMI) दिल्याने मिळणारी करसवलत पहाता दरवर्षी एक लाख रु नुसता Income Tax वाचतो
- बॅंकेने कर्ज देताना पूर्ण काळ गृहित धरुन आधीच प्रोसेसिंग वा ईतर आकारणी केली आहे
- आपण काही हे पैसे खर्च करीत नाही वा कुठे अडकवत ही नाही. अगदीच नाही पटले तर आपण कधीही कर्जफेडीचा निर्णय घेऊ शकतोच. रहाता राहिला मुद्दा दरमहा तो हप्ता देण्याचा….. असे खुलासे करीत त्यांना ‘Birla sun life frontline equity fund’ या योजनेत आपण बॅंकेला देणार असलेली रक्कम (रु 27 लाख) गुंतवावी आणि त्यातुन दरमहा ५८,०००/- एवढी म्हणजे साहेबांच्या चालू ईएमआय एवढी उचल करावी अशी योजना (जी Systematic Withdrawal Plan/’SWP’ म्हणून ओळखली जाते) सुचवली.
- अधीक माहितीकरीता सांगायचे, तर या सुविधेकरिता सुरवातीला एकदाच फॉर्म भरावयाचा असतो. पुढील महिन्यापासुन ठराविक तारखेस ही रक्कम हुकमी, अगदी पगारा/पेन्शन वा व्याजासारखी, आपल्या खात्यात जमा होत रहाते.
म्युच्युअल फंडाची SWP (सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन )
- साहेबांनी का कोण जाणे, कोणतेही अधिक प्रश्न न विचारता आणखी २७ लाख रु. नी माझ्या व्यवसायाचा आकार वाढवला.
- यानंतर आम्ही षठीसामासी भेटत राहीलो. हा SWP चा मुद्दा मी खरे तर विसरलोही होतो, पण परवा साहेबांनी मला सुखद धक्का दिला. “अहो, संपले आमचे होम लोन. पण काय आयडिया दिली तुम्ही प्रसादजी, कमाल केलीत” बाजार जणू मीच चालवतो या थाटांत साहेब म्हणाले.
- “१० लाखापेक्षा अधिक शिल्लक आहे हो त्या बिर्ला का कोण.. त्या खात्यात.” साहेबांना फंडचे नाव तोडपाठ असेल, हे अपेक्षित नव्हतेच… आणि साहेब आपला किमान ४/५ लाख रुपये इन्कमटॅक्स सुद्धा वाचलाय”
- आता मी फॉर्मात आलो होतो. “येस. म्हणूनच म्हटले या पैशांची ऐश करुया, मस्त टूर्स करुया. आमच्या मॅडम म्हणत होत्या पुन्हा तुमचा सल्ला घ्या म्हणून, पण मी ठरवलेय, आता यावर चर्चा नको. माझा निर्णय पक्का…” असे म्हणून मला परत धन्यवाद देऊन साहेबांनी माझा निरोप घेतला.
- बाजाराची उत्तम स्थिती बघता साहेबांना ‘उम्मीद से दुगना’ फायदा झाला हे खरेच, तरीही त्यांना सुचविलेला पर्याय हा बहुतेकदा फायदेशीर ठरतो, हा माझा स्वानुभव आहे. बाजाराची स्थिती भलेही कमी जास्त अनुकूल वा कधी प्रतिकूल असली, तरीही दीर्घकाळांत बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उत्तम ईक्विटी फंडसच्या योजना प्रचलित व्याजदरांपेक्षा अधिक परतावा देतात, ही वस्तुस्थिती आहे.
होम लोन टॉप-अप का वैयक्तिक कर्ज?
स्पष्ट करतो की लेखांतील कोणतीही कंपनी वा फंडांचे उल्लेख हे शिफारस म्हणुन केलेले नसून, केवळ प्रातिनिधिक व आकलन सुलभतेकरिता आहेत. ‘Frontline Equity’ या योजनेसारखाच उत्तम परतावा देणा-या किमान २/३ अन्य योजनाही मी नक्कीच सांगू शकेन. महत्वाचे हे आहे की ‘उद्या हा आज किंवा कालसारखाच असेल’ ह्या सर्वमान्य गृहितकावर विश्वास ठेवून गुंतवणुक योजना आखल्यास, आपण बॅंकेला केलेल्या एकूण परतफेडीपेक्षा अधिक पैसे विनासायास मिळवणे अगदी शक्य आहे.!!
शेवटी एवढेच सांगेन, नटसम्राट नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांच्या तोंडचे “जगावं या दुनियेच्या…की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर..” हे प्रख्यात स्वगताच्या चालीवरील ‘बघावं या बाजारात पैसे गुंतवून…की फेडून टाकावं या गृहकर्जाचं ओझं..’ ह्या दोघांचेही निदान माझ्यापुरते मिळालेले उत्तर आहे……..
जगावं… बघावं…..फेकू नये…… फेडू नये.!!!
ऋण व्याजदराने गृहकर्ज?
– प्रसाद भागवत
9850503503
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.