आर्थिक संकटांचा पुनर्विचार
संभाव्य आर्थिक संकटे (Financial crisis) या विषयावरील मागील एका लेखात नोकरी किंवा व्यवसाय करीत असताना येऊ शकतील अशा संभाव्य आर्थिक संकटावर थोडक्यात विचार करून काही उपाययोजना सुचवल्या होत्या. संकटे इतकी अचानक येतात की त्यावर काही विचार करण्यासही पुरेसा वेळ मिळत नाही.
कोविड १९ हे एक महाभयंकर संकट असून त्याची थोडीशी जाणीव आपल्याला होयला १५ मार्च उजाडायला लागली. त्यापूर्वी दोन महिने आधी कोणी याबाबत सांगितले असते तर सर्वांनी त्याला मूर्खांत काढले असते.
नोकरी जाईल याची सारखी भीती वाटते? मग हे वाचा…
गेल्या कित्येक वर्षात सर्व जगास इतक्या मोठ्या प्रमाणावर वेठीस धरले जाईल असे संकट न आल्याने सर्वजण गाफील होते. त्यामुळेच आता यापुढे कदाचित याहून मोठेही संकट येऊ शकते त्यामुळे आपली आर्थिक घडी पूर्ण कोलमडू शकते त्यादृष्टीने आपल्याकडे असलेल्या पर्यायी योजनेसह आपण सज्ज असले पाहिजे. आपला आर्थिक प्रवाह काही संकटे बिघडवू शकतात, ती अशी-
आर्थिक संकटे (Financial crisis)-
- नोकरी सुटणे, धंद्यातील नुकसान.
- भागीदारीत बेबनाव, नादारी.
- नैसर्गिक आपत्ती, युध्द, जाळपोळ, दंगल.
- कर्ज काढून विवाह.
- घटस्फोट.
- जोडीदाराचा त्यातही कमावत्या जोडीदाराचा किंवा कौटुंबिक सदस्याचा मृत्यू.
- कुटुंबातील सदस्याचे गंभीर आजारपण, अपघात.
- उच्च शिक्षणासाठी करावा लागणारा खर्च.
- स्वेच्छा / सेवा निवृत्ती.
- मित्र नातेवाईक यांना करावी लागणारी, टाळता न येणारी मदत.
- कधीच विचार केला नसलेले कोविड १९ सारखे नवीनच संकट.
ही आर्थिक संकटे मुद्दामच विस्ताराने दिली नाहीत
दिवस असे की कोणी माझा नाही….
आपली आर्थिक ध्येये लक्षात ठेऊन गरजा आणि निकड यांची सांगड घालत असताना अशी काही आकस्मित आर्थिक संकटे (Financial crisis) येऊ शकतात. यावरील उपायही आपल्याला माहिती आहेत.
- अत्यावश्यक खर्चाची अतिरीक्त तरतूद ठेवणे.
- भागीदारी व्यवहार पारदर्शी ठेवून वेळीच उपाय योजणे.
- नैसर्गिक आपत्तीकरिता पुरेसे विमासंरक्षण घेणे.
- योग्य प्रमाणात खर्च करणे, चैनीवर नियंत्रण ठेवणे.
- जोडीदाराचा आत्मसन्मान राखणे, नातेसंबंध बळकट करणे.
- कुटूंबातील प्रत्येक सभासदाचा पुरेशा रकमेचा जीवनविमा घेणे.
- प्रत्येक सदस्याचा आरोग्यविमा, अपघातविमा घेणे.
- उच्च शिक्षणाच्या खर्चाची योजना बनवणे, यासाठी असलेल्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेणे.
- दीर्घायुष्याचा विचार निवृत्तीची योजना बनवणे.
- अकस्मित निधीची तरतूद करणे.
- वेगवेगळ्या अनपेक्षित संकटांना तोंड देण्यास सज्ज असणे.
वेगवेगळी संकटे त्यावरील उपाय यांची ही यादी वाढवता येईल. सर्वसाधारणपणे सर्व सुरळीत चाललेले असताना यातील बारकावे लक्षात येत नाहीत. असे म्हणतात की जगातील ९० % संपत्ती १०% लोकांकडे आहे त्यांच्या दृष्टीने ही संकटे नाहीतच. तेव्हा या व्यक्ती सोडून सर्वानीच आपल्या अलीकडील फज्जा उडालेल्या आर्थिक नियोजनाचा विचार करताना काही गोष्टी विचारात घेणे जरूर आहे.
आपत्कालीन निधी – आणीबाणी निधी (Emergency Fund)
- व्याजदर वाढतील या भ्रमात राहू नये. ते कमी होतील अथवा आहेत त्या ठिकाणी कायम राहतील.
- महागाई कमी होईल असे कोणी किती सांगितले तरी ती कमी होणार नाही. रुपयाचे मूल्य कमी होत असल्याने अप्रत्यक्षपणे त्यात भरच पडणार आहे.
- बँकेत ठेवलेल्या ठेवी, त्यावर असलेल्या विम्यामुळे मर्यादित अर्थानेच सुरक्षित आहेत. त्यामुळेच त्या विभागून ठेवाव्यात.
- डेट फंडातून पूर्वीप्रमाणे परतावा मिळण्याची शक्यता नाही तसेच त्यांची सुरक्षितता कमी झाली आहे. तर इक्विटी फंडातून मिळणाऱ्या परतव्यावर वेळोवेळी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सोन्याचा गुंतवणुकीसाठी विचार करताना ई टी एफ, ई गोल्ड, सोव्हर्जिन बॉण्ड यांना प्राधान्य द्यावे. डेरीव्हेटिव्हीज प्रकारच्या गुंतवणुकीस सखोल ज्ञानाची आवश्यकता आहे यात सर्वाधिक धोका असून मुद्दल पूर्णपणे जाण्याबरोबर त्याहूनही अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
- शेअर्समध्ये धोका असला तरी नजीकच्या काळात त्यास कोणताही ठोस पर्याय नाही. बाजाराचा कल पाहून ज्या क्षेत्रांत नजीकच्या भविष्यकाळात मागणी वाढण्याची शक्यता आहे त्याच क्षेत्रात गुंतवणुकीवर भर द्यावा. यावरील कोणत्याही तीव्र प्रतिक्रिया टाळाव्यात. हमखास फायद्याचे दावे करणाऱ्यापासून दूर राहावे.
- आपल्या पूर्वीच्या गुंतवणुकीतून अनपेक्षित परतावा मिळत असल्यास गरज असो अथवा नसो त्याचा फायदा काढून घेऊन त्यातून भांडवल निर्मिती करण्यावर भर द्यावा. काही अपवाद म्हणून यातून वगळता येतील.
- चुकांतून शिका, त्याच त्याच पुन्हा करण्यात काही अर्थ नाही.
बुडणाऱ्या बँकांपासून गुंतवणूकदारांनी घ्यायचा बोध
- नफा तोटा याविषयी असणाऱ्या भ्रामक कल्पना डोक्यातून काढून टाकाव्यात. खरेदी करून विक्री किंवा विक्री करून खरेदी असा व्यवहार पूर्ण केल्यावरच नफा किंवा तोटा होतो. असे न करता होणारा नफा तोटा हा फक्त कागदी असतो.
- उत्पन्न व खर्च याची सांगड घालण्यासाठी आपल्या गरजा मर्यादित ठेवणे आणि उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधणे याला पर्याय नाही. काळाच्या कसोटीवर उतरलेली काही पारंपरिक मूल्य पुन्हा स्थापना करणे गरजेचे आहे.
- प्रतिष्ठेविषयीच्या आपल्या खोट्या समजुती बदलणे गरजेचे आहे. केवळ ज्ञानानेच प्रतिष्ठा वाढते हे लक्षात ठेवा. उदा. कार्ड वर असलेली खर्च मर्यादा ही आपल्याला दिलेली सोय आहे याचा अर्थ ती पूर्णपणे वापरावी असा होत नाही यामुळे आपल्या प्रतिष्ठेत अजिबात भर पडत नाही.
- गुंतवणुकीच्या नोंदी व्यवस्थित ठेवून त्याचा अटी, वारसनोंद, पुढील हप्ते भरण्याच्या तारखा, मुदतपूर्ती तारखा यांची माहिती सुरक्षित ठेवावी. इच्छापत्र बनवावे त्यात संपत्तीचा वाटा कमी अधिक करायचा असेल अथवा त्रयस्थ व्यक्तीस काही वाटा द्यायचा असेल तर स्पष्ट शब्दात कारणांसह त्याची नोंद करावी. गुंतवणूक संदर्भातील अनावश्यक कागदपत्रे संग्रही ठेवल्यास काही वर्षांनी गोंधळ उडण्याची शक्यता असते तेव्हा अशी अनावश्यक कागदपत्रे वेळोवेळी नष्ट करावीत.
लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल
आर्थिक नियोजनाचे रूढ मापदंड ठरलेले असून त्यात आपल्या परिस्थिप्रमाणे कमी जास्त बदल करावे, यातील किमान प्राथमिक गोष्टी सर्वाना माहिती असाव्यात. त्यातील कालबाह्य गोष्टींचा त्याग करून तसेच होणारे विविध बदल लक्षात घेऊन गुंतवणुकीच्या नव्या कल्पक मार्गांचा शोध घेणे जरुरीचे आहे. याची विश्वासार्ह माहिती देणारा Financial Education चा प्रमाणपत्र अभ्यासक्रम National Institute of Securities Markets (NISM) यांनी सुरू केला असून अत्यंत अल्पखर्चात सर्वाना उपलब्ध आहे. आर्थिक नियोजन करताना, कोणतीही एजन्सी नसलेल्या आणि फी आकारून व्यवसाय करणाऱ्या स्वतंत्र वित्त सल्लागाराची जरूर असल्यास मदत घेता येईल.
– उदय पिंगळे
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Financial Crisis Marathi Mahiti, Aarthik sankat in marathi