एवढासा तो फोन पण त्याने आपल्या आयुष्यात केलेल्या बदलाचे नवे अनुभव आपण दररोज घेत आहोत. हे बदल जेवढे महत्वाचे आहेत, तेवढेच त्याचे अर्थशास्त्रही महत्वाचे आहे. त्यामुळेच मोबाईल फोनचे उत्पादन आणि विक्रीला जगात अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. ॲपल ही या क्षेत्रातील दिग्गज अमेरिकन कंपनी. कंपनीची अनेक उत्पादने असली तरी तिला फोनपासून मिळणारा महसूल सर्वाधिक आहे. जगात सर्वाधिक महसूल असलेली ही कंपनी असून तो २०२२ ला ३९४ अब्ज डॉलर इतका होता. म्हणजे भारताच्या जीडीपीच्या एक दशांश! यावरून ही कंपनी आर्थिकदृष्ट्या किती मोठी आहे, हे लक्षात येते.
गेल्या १८ आणि २० एप्रिल रोजी ॲपल कंपनीचे स्टोअर अनुक्रमे मुंबई (जोओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉल, बीकेसी) आणि दिल्लीत (साकेत) सुरु झाले. त्याची दररोज चर्चा होते आहे आणि हे स्टोअर पाहण्यासाठी भारतीय तरुणांची गर्दी ओसंडून वाहते आहे. अॅपलची उत्पादने वापरणाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या घटनेला एवढे महत्व का दिले जाते आहे? त्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे? त्याचा आणि भारताच्या आर्थिक प्रगतीचा खरोखरच काही संबंध आहे काय? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांविषयी एकमत होणे, अवघड आहे. मात्र या घटना आणि तिचे महत्व आपण आता टाळू शकत नाही.
ॲपलच्या स्टोअरचे महत्व काय?
प्रथमतः या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ यात. या घटनेला एवढे महत्व का दिले जात आहे, या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. ते म्हणजे आर्थिक उलाढालीच्या निकषांत जगातील कायम पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असलेली कंपनी भारताकडे विशेष लक्ष देते, याचा अर्थ भारतात तिचा ग्राहक वाढत चालला आहे. अॅपलने २०२१ नंतर उत्पादन सुरु केले. सुरवातीस भारतात एक टक्का अॅपल फोनची निर्मिती होऊ लागली, ती गेल्या दोन वर्षात सात टक्क्यांवर गेली आहे. अॅपलची बाजारपेठ सारे जग असले तरी ज्या देशात तिचा खप सातत्याने वाढत चालला आहे, त्यात आता भारताचा समावेश झाला आहे. उत्पादन आणि स्टोअर अशा उभारणीत भारतीय तरुणांना रोजगार मिळतो आहे. अगदी मुंबईतील स्टोअरचाच विचार करावयाचा तर तेथे १०० तरुण काम करणार आहेत. अशा अनेक कारणांनी या घटनेला महत्व आहे. भारताची लोकसंख्या आणि भारतात वाढत चाललेला मध्यम तसेच उच्च मध्यमवर्ग – याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. एवढी विस्तारणारी बाजारपेठ आज जगात दुसरी नाही. शिवाय अतिशय कौशल्यपूर्ण असे मनुष्यबळ भारतात आहे, असा संदेश अॅपलच्या उत्पादनामुळे जगभर गेला आहे. आताआता तर युरोपमधील काही देशांत अॅपल फोन भारतातून जाऊ लागले आहेत. यातून भारताची निर्यात तर वाढते आहेच, पण भारतात कशाची निर्मिती होऊ शकते, यासंबंधी प्रतिमाही उजळली आहे.
‘मेक इन इंडिया’ धोरणाचे यश
ॲपलचे भारतात होत असलेले उत्पादन आणि थेट कंपनीचे सुरु झालेले स्टोअर, यामुळे आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट साध्य झाली आहे, ती म्हणजे भारताने जाणीवपूर्वक सुरु केलेल्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाचे हे यश आहे. परकीय गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्रात अनेक बदल करून चीनने गेली दोन दशके विस्मयकारक भौतिक प्रगती साधून घेतली आहे. याकाळात भारत आपली धोरणे बदलू शकला नाही. पण गेल्या काही वर्षात ईज ऑफ ड्यूइंग बिजिनेस सारखी धोरणे राबविण्यात आली, तिचा फायदा आता मिळू लागला आहे. विशेषतः कोरोनाची साथ आणि चीनची वादग्रस्त भूमिका, यामुळे चीनविषयी जगात अविश्वास निर्माण झाला आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन देणारा दुसरा देश नव्हता, ती जागा भारत घेऊ शकतो, हे भारताने दाखवून दिले आहे. सॅमसंग आणि अॅपलचे प्रकल्प भारतात सुरु झाले, हा त्याचा पुरावा आहे.
उत्पादनात थेट चीनशी स्पर्धा
ॲपलचे स्टोअर सुरु होणे, ही प्रक्रिया एवढी सोपी नाही. त्यासाठीचे प्रयत्न २०१६ सालीच सुरु झाले होते. ज्याचे उत्पादन करावयाचे आहे, त्याचे ३० टक्के सुटे भाग भारतातच तयार झालेले असले पाहिजे, असा नियम आहे. तो बदलण्यास नकार दिल्याने असे स्टोअर सुरु करण्याचा विचार अॅपलने सोडून दिला होता. अखेर २०१९ ला सरकारने नियम बदलल्यानंतर हालचाली सुरु झाल्या. रेड टेपिझममध्ये उद्योगांची उभारणी अडकणे, याचीच आपल्याला सवय होती, पण अडवणूकीची ही धोरणे आता परवडणार नाहीत, हे सरकारला कळाले असल्याने ‘मेक इन इंडिया’ धोरणाला गती आली आहे. गेल्या सहा महिन्यात वाढलेली निर्यात ही त्याचीच प्रचीती आहे. अजूनही अॅपलचे सर्व फोन भारतात तयार होत नाहीत, पण त्याची सुरवात लवकरच होईल, असे कंपनीने जाहीर केले आहे. याचा अर्थ अॅपलच्या उत्पादनाचा चीनकडील काही वाटा भारताला मिळू लागणार आहे. निर्यात आणि रोजगारवाढीसाठी देशाच्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा किमान २५ टक्के असला पाहिजे. हे उद्दिष्ट्य २०२५ पर्यंत साध्य होईल, असे मानले जात आहे. अॅपल उत्पादनात वेगाने होत असलेली वाढ हे त्या दिशेने जाणारे पाउल आहे.
ॲपलचे वेगळेपण आणि मार्केटिंग
भारतात अॅपलची ही दोन स्टोअर चालतील का, हे पाहण्यासारखे आहे. कारण सर्वच अॅपल उत्पादनाच्या किंमती अधिक आहेत. पण या कंपनीने अशी काही तंत्र शोधून काढली आहेत की ती इतर कंपन्यांच्या यंत्रांमध्ये मिळत नाहीत. त्यामुळे एकदा अॅपलचा वापर करणारा माणूस नंतर तीच उत्पादने वापरू लागतो. शिवाय अॅपलची उत्पादने किती वेगळी आणि सुरक्षित आहेत, याचे कंपनीने इतके मार्केटिंग केले आहे की त्याला तोड नाही. मुंबईच्या स्टोअरमध्ये दररोज तीन ते चार हजार ग्राहक येतील, असा विश्वास कंपनीने पहिल्याच दिवशी व्यक्त केला आहे. अॅपलचे सीइओ टीम कुक यांनी यानिमित्ताने भारताचा दौरा करून कंपनीच्या दृष्टीने भारताचे महत्व अधोरेखित केले आहे. पारंपारिक अर्थाने जगण्यास काय लागते, असा विचार करावयाचा तर अॅपलचे एकही उत्पादन त्यात बसणार नाही. पण नव्या काळाचा महिमा पहा, अशी यंत्रेच आता आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग आणि आपल्या अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक झाली आहेत.
मुंबईतील ॲपल स्टोअरची वैशिष्टे
- जगात अमेरिका, ब्रिटन, चीन आणि सिंगापूरनंतर भारतात,
- भारतातील सेवेला २५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने सुरवात
- दोन मजले मिळून २० हजार चौरस फुट जागा
- १०० कर्मचारी, जे एकूण २५ भाषा बोलू शकतात.
- पर्यावरणाचा विचार करून बांधलेले स्टोअर, १०० टक्के हरित उर्जेचा वापर
- ‘टुडे अॅट अॅपल’ उपक्रमाद्वारे उत्पादने वापरण्यासंबंधीची मोफत वर्ग