Reading Time: 5 minutes

आयकर विभागाने अलीकडेच 22 मार्च 2023 रोजी सर्व करदात्यांना वार्षिक माहिती पत्रक (AIS) या नावाचे अँप उपलब्ध करून दिले आहे. यातील वार्षिक माहितीपत्रक म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी गेल्यावर्षी त्यावर लिहिलेल्या लेखातील तपशील आणि अँपची माहिती या लेखातून सविस्तर देत आहे.

       आयकर विवरणपत्र भरणे बिनचूक व सोपे व्हावे यासाठी गेल्या वर्षांपासून आयकर विभागाकडून फॉर्म 26 AS बरोबरच वार्षिक माहिती पत्रक (AIS) देण्यास सुरुवात झाली. आपल्या सर्व उत्पन्नाची अचूक मोजणी व्हावी हा त्यामागील उद्देश आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार या महितीपत्रकात आवश्यकता असलेले वर्षभरातील आर्थिक व्यवहार एकाच ठिकाणी आयतेच दिसत असल्याने ते तपासून काही चुक असल्यास दुरूस्ती करण्यासाठी, खात्याच्या लक्षात आणून देणे सोपे पडेल. मागील दोन वर्षी ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाली नाही. यावर्षी यात अनेक बारीकसारीक गोष्टींचा समावेश केला आहे. जरी हे करदात्यांच्या सोयीसाठी केले असले तरी यामुळे त्यामुळे करदात्यांची त्यामुळे खरच सोय होते की गैरसोय? याबद्दल आताच निश्चित अस सांगता येणार नाही. फॉर्म 26 AS जाऊन त्याऐवजी भविष्यात AIS त्याची जागा घेईल, की त्यापेक्षा ते वेगळे आहे. सध्या फॉर्म 26 AS मध्ये असणारी माहिती आणि AIS यामधून AIS हे फॉर्म 26 AS ला पूरक असून ते त्याचे विस्तारित रूप आहे असे थोडक्यात म्हणता येईल. यासाठी आपण वार्षिक माहिती पत्रक म्हणजे काय ते समजून घेऊया.

       वार्षिक माहिती पत्रक (AIS) आयकर खात्याच्या पोर्टलवर करदात्या संबधित ही माहिती असून ती फॉर्म 26 AS हून अधिक विस्तारित स्वरूपात आहे. त्यात सर्व आर्थिक व्यवहार आणि करकपात यासंबंधीची महिती आहे.

      या माहिती पत्रकात व्याज, शेरबाजारातील व्यवहार, म्युच्युअल फंडाच्या युनिटचे व्यवहार, मिळालेला डिव्हिडंड, परदेशातील व्यवहार करून मिळालेले पैसे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. जर यासंबंधात करदात्याची काही हरकत असेल जसे-

*एकच  व्यवहार दोनदा दाखवला आहे,

*व्यवहार दर्शविलेल्या आर्थिक वर्षातील नाही,

*चुकीचा व्यवहार आहे किंवा त्यात तफावत आहे तर करदाता आपले म्हणणे मांडू शकतो. अशा परिस्थितीत खात्याने काढलेली रक्कम आणि करदात्याने आपले म्हणणे मांडून काढलेली रक्कम यात तफावत असल्यास ती रक्कम पाहण्याची सोय आहे.

      वार्षिक माहिती पत्रक देण्यामागे यापूर्वी म्हटल्याप्रमाणे करदात्यांना त्याच्या वर्षभरातील सर्व व्यवहारांची एकत्रित मिळेल त्यामुळे त्यांना आपले विवरणपत्र भरण्यास मदत होईल. करदाते व आयकर विभाग यांच्यामधील किरकोळ वादग्रस्त मुद्दे कमी होतील असाच हेतू आहे.

      आयकर खात्याकडून करदात्यास आपले म्हणणे संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने कळवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून वार्षिक विवरणपत्र pdf, json, csv प्रकारात डाऊनलोड करण्याची सोय देण्यात आली आहे.

       करदात्यांच्या सोयीसाठी वार्षिक माहिती पत्रक दोन भागात विभागले एकास TIS आणि दुसऱ्यास AIS असे म्हटले आहे. हे दोन्ही जवळपास सारखेच असून TIS मध्ये सर्व माहिती सारांश स्वरूपात जिचा उपयोग करदाता विवरणपत्र भरण्यास करू शकेल तर AIS मध्ये तीच माहिती विस्तृत स्वरूपात दिली आहे. यातील AIS ची पार्ट A आणि पार्ट B अशी विभागणी करण्यात आली असून  त्यातील पार्ट A मध्ये करदात्याची वैयक्तिक माहिती जसे नाव, पत्ता, जन्मतारीख, पॅन आणि इतर माहिती असते. पार्ट B मध्ये आर्थिक व्यवहार तपशील, भरलेला कर, देशाबाहेर पाठवलेले पैसे, मुळातील झालेली/ केलेली  करकपात , रिफंडवर मिळालेले व्याज यांचा समावेश असतो.

हेही वाचा: How to use Yearly Bonus : तुमच्या वार्षिक बोनसचा फायदा कसा कराल?

AIS आणि 26 AS मधील फरक: 

       फार्म 26AS मध्ये मोठे आर्थिक व्यवहार, मुळातील झालेली / केलेली करकपात, आगाऊ करभरणा, भाड्याने दिलेल्या मशीनरीचे मिळालेले भाडे, लॉटरी शब्दकोडे यावर मिळालेले बक्षीस, अश्वशर्यतीत मिळालेले बक्षीस, मिळालेला करपरतावा, मिळालेले व्याज, गुंतवणूक इत्यादींचा समावेश होतो. तर AIS मध्ये पगार, मिळालेले घरभाडे, मिळालेला लाभांश, सेव्हिंग खात्यावरील व्याज, मुदत ठेवींवरील व्याज, अन्य ठिकाणाहून मिळालेले व्याज, आयकर परताव्यावरील व्याज, विविध सरकारी रोखे, कर्जरोखे यावर मिळणारे व्याज, परदेशातील युनिट्सवर मिळणारा परतावा, ऑफशोअर फंडावर मिळालेला परतावा, विदेशी गुंतवणूकदारांकडून मिळालेले उत्पन्न, विविध व्यवसाय संबंधित मिळत असलेले कमिशन, विविध ठिकाणाहून मिळत असणारा करमुक्त आणि करपात्र लाभांश/ व्याज, भांडवली नफा, परदेशातून मिळालेले पैसे, नॅशनल सेव्हिंग स्कीम योजनेतून घेतलेला परतावा, कोणत्याही गोष्टींबद्धल मिळालेले कमिशन, जमीन/ घर विकून मिळालेले पैसे, खाजगीरित्या व्यवहार करून मिळालेली रक्कम, व्यावसायीक खर्च, दिलेले भाडे, परदेश प्रवासासाठी केलेला खर्च, खरेदी केलेली अचल मालमत्ता, वाहन खरेदी, क्रेडिट/ डेबिट कार्डाने केलेले व्यवहार, शेअर्स/ म्युच्युअल फंड युनिटचे व्यवहार, व्यावसायिक न्यासापासून मिळालेली रक्कम, गुंतवणूक फंडातून मिळालेली रक्कम यासारख्या अनेक गोष्टी ज्या आयकर विभागास माहिती आहेत,  त्यांचा समावेश असतो. त्यामुळेच विवरणपत्र भरताना एखादा व्यवहार अनावधानाने वगळला गेल्यामुळे आयकर खात्याकडून वेगळी चौकशी नोटीस येण्याची शक्यता कमी होते. येथे अधिक तपशीलवार माहिती असल्याने विवरणपत्र भरण्याचे काम सोपे होते. यात काही तांत्रिक अडचणी आहेत, जोपर्यंत हे सर्व सुरळीत होत नाही तोपर्यंत फॉर्म 26AS आणि AIS दोन्ही मिळतं राहतील कालांतराने फार्म 26 AS मिळणे बंद होऊन फक्त AIS च मिळेल. थोडक्यात AIS ही आपली वैयक्तिक आर्थिक व्यवहारांची कुंडलीच आहे. असे असले तरी काही व्यवहार AIS मध्ये नसल्याचा वैयक्तिक अनुभव असल्याने येथे न नोंदणी झालेले अन्य व्यवहार असल्यास करदात्यांने ते स्वतः जाहीर करावेत म्हणजे निश्चिन्त राहता येईल.प्रत्येकानेच यापुढे आपले व्यवहार करताना, कुणाला काय कळतंय? या भ्रमात राहू नये.

Taxpayer AIS App : 

*हे आयकर विभागाकडून देण्यात आलेले वरील नावाचे अँप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा.

*आपला पॅन व जन्मतारीख DD/MM/YYYY या पद्धतीने टाकून नियम अटी मान्य करा.

*आपला मोबाईल क्रमांक आणि इमेल टाकून तो कन्फर्म करा त्यावर येणारे OTP टाकून नेक्स्ट वर क्लीक करा.

*तुमच्या पसंतीचा 4 अंकी पिन सेट करून कन्फर्म करा.

*आपले अँप ऍक्टिव्ह झाले आहे.

आता लॉग इन करताना –

*आपण सेट केलेला पिन टाका.

*आता Taxpayers AIS चे होम पेज त्यावर आपले पॅन कार्ड दिसेल

*त्याखाली Annual Information Statement (AIS) असे दिसेल.

*त्यावर, या स्टेटमेंट मध्ये काही व्यवहार कदाचित दिसणार नाहीत तेव्हा करदात्यांनी ते तपासून मान्य करून आवश्यक असल्यास यथोचित दुरुस्ती करून आपले आयकर विवरणपत्र भरावे असा संदेश प्रत्येकवेळी येईल (पॉप अप मॅसेज)

*असा संदेश वारंवार येऊ नये असे वाटत असल्यास दरवेळी हा संदेश पाठवू नये यावर क्लीक केल्यास नंतर असा संदेश येणार नाही

*या AIS वर क्लीक केल्यास सन 2020-2021 ते 2022-2023 या तीन वर्षाचे Taxpayer Information Summery (TIS) आणि Annual Information Statement (AIS) दिसते

*यातील TIS वर मिळालेला एकत्रित डिव्हिडंड, सेल केलेल्या शेअर/ म्युच्युअल फंड यांची मिळालेली निव्वळ किंमत समजेल आणि खरेदी केलेल्या शेअर्स/ युनिटची निव्वळ खरेदी किंमत समजेल.

AIS वर क्लीक केल्यास-

*B1 TDS/TCS information येथे मुळातून आपल्याकडून किंवा आपण कापून घेतलेल्या कराची माहिती मिळेल.

*B2 SFT Information येथे विशेष आर्थिक व्यवहारांची माहिती मिळेल.

*B3 Payment of Taxes येथे कर भरणा केलेल्या कराची, मागील थकबाकीची माहिती मिळेल.

*B4 Demand & Refund येथे मागणी केलेला कर आणि दिलेला परतावा याबाबत माहिती आहे.

*B5  Other Onformatin आयकर कायदा कलम 114/1(2) अंतर्गत आवश्यक माहिती मिळेल

     असे विविध पर्याय दिसतील, तेथे संबंधित वर्षांची त्या विषयाच्या संदर्भातली सर्व संबंधित माहिती मिळेल.

*या माहितीबद्दल आपली काही तक्रार असेल तर त्याबद्दल आपला प्रतिसाद आपण इच्छिकरित्या इथे देऊ शकतो, त्यासाठी वेगळा बॉक्स खाली आहे.

*येथे उपलब्ध असलेली  पत्रके आणि आपला प्रतिसाद डाउनलोड करण्यासाठी उजव्याबाजूस वर खाली टोक असलेला बाण आहे त्यावर क्लीक करून आपणास हवी असलेली माहिती डाउनलोड करता येईल.

*होम वर खाली डाव्या हाताला आपण येथे येऊन नेमकं काय केलं Activity History शेजारी असलेल्या चॅटवर क्लीक केल्यास ताबडतोब मिळवायची सोय आहे.

     याच पानावर (होम पेज) वरती डावीकडे असलेल्या एन्टरवर (आडव्या तीन रेषा) क्लीक केले की ऍपच्या अंतरंगात जाता येईल.

तेथे एक Menu असून त्याखाली-

*User Guide अँप कसे वापरावे याची माहिती असलेली फाईल दिसेल ती डाउनलोड करता येईल.

*Frequently Asked Questions यात अँप संदर्भातील सर्वसाधारण प्रश्न आणि त्यांची उत्तरे असतील.

*Terms & Conditions येथे नियम अटी आहेत.

*Disclaimer येथे आयकर विभागाने केलेले खुलासे आहेत.

*Contact Us 1800 103 4215 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून त्याचा संदर्भ क्रमांक (टिकेट नंबर) तयार करता येईल.

*Share App येथून अँप विविध ठिकाणी शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

*Setting येथून आपला पिन बदलता येईल. त्याच पानावर खाली होम आणि ऍक्टिव्हिटी हिस्टरी येथे जाण्याची सोय आहे.

Logout येथे क्लीक करून अँपमधून बाहेर पडता येईल.

हेही वाचा: ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

ही सर्व माहिती आपण www.incometax.gov.in या पोर्टलवरूनही मिळवू शकतो.

तेथून हवी असलेली नेमकी माहिती मिळवणे नागरिकांना गुंतागुंतीचे वाटू शकते त्या तुलनेत अँप वापरून झटपट महिती मिळवता येईल.

कोणतेही अँप हे त्याच्या वापरकर्त्यास उपयुक्त होईल अशा पद्धतीचा एक निश्चित लिहिलेला प्रोग्रॅम असतो. त्या दृष्टीने हे अँप करदात्यांच्या निश्चितच सोयीचे आहे.

आपले विवरणपत्र दाखल करण्यासाठी जी आवश्यक माहिती लागते ती सर्व माहिती या अँपवर उपलब्ध असल्याने ती मिळवण्यासाठी  करदात्यांना आता धावपळ करावी लागणार नाही

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळात असून लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावीत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutes माझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

डिजिटल रुपया म्हणजे काय ? घ्या समजून

Reading Time: 2 minutes डिजिटल रुपया म्हणजे काय आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा होईल याची उत्सुकता…

नववर्षाचा संकल्प हवा पण विकल्पासह…!!

Reading Time: 3 minutes साधारण प्रत्येकाने कधी ना कधी नवीन वर्षाचा संकल्प केला आहे. कोणी ३१…