जीवन विमा आणि आरोग्य विम्यामधील मूलभूत फरक

Reading Time: 3 minutes

क्रिकेटमध्ये बॅट्समन्स  खेळताना स्वतःच्या शरीरावर अनेक ठिकाणी सेफ गार्डस वापरून उतरतात. कारण स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचं असतं. काही दुर्दैवी घटना, अपघात व्यक्तीच्या हातात नसतात. अशावेळी त्या घटना घडल्या तर त्याचे परिणाम कमी व्हावेत म्हणून आधीपासून काळजी घेणे हेच व्यक्तीच्या हातात असतं. विमा हा गार्डप्रमाणेच काम करतो.

 • विमा म्हणजे काय? तर आपल्या सुरक्षतेची ही काळजी.  दुर्दैवी घटना घडणे न घडणे आपल्या हातात नसते, पण विमा काढल्यास पुढील परिणामांची  दाहकता कमी होतात व आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळते.
 • “लाईफ इंश्यूअरन्स आणि हेल्थ इन्श्युअरन्स” विम्यांच्या प्रकारांपैकी हे सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणता येतील. दोन्ही विम्यांमध्ये काही मूलभूत फरक आहेत.

 जीवन विमा (Life Insurance) :-

 • जीवन विमा हा नावाप्रमाणेच व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित असतो. खूप विमा कंपन्या जीवन विमा विकतात.
 • विमा विकत घेतलेल्या व्यक्तीचा जर अकस्मात मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला जेवढ्या रुपयांचा जीवन विमा घेतला असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून मिळते. यांमध्ये आणखी बरेच गोष्टी अंतर्भूत असतात.
 • साध्या शब्दांत सांगायचं तर मृत्यू झाल्यावर त्याच्या मागे त्याच्या नॉमिनीला किंवा कुटुंबाला ते पैसे मिळतात.
 • गृहस्थाश्रमातील व्यक्तीसाठी आजच्या अनिश्चिततेच्या काळात जीवन विमा म्हणजे लाईफ इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
 • जीवन विमाच्या जाहिराती टीव्हीवर दिसतात. त्या मनाला खुप स्पर्श करणाऱ्या असतात. यात विशेष भर असतो तो म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूनंतर झालेली परिस्थिती आणि जीवन विम्यामुळे झालेला फायदा.
 • जीवन विमा आजच्या काळात म्हणूनच खूप महत्त्वाचा आहे. आज धकाधकीच्या काळात, जीवन अनिश्चित झालंय. मृत्यू व्यक्तीच्या हातात नाही. त्यामुळे अकस्मात मृत्यू झाला तर त्याच्या मागे कुटुंबाची अवस्था बिकट होऊ शकते. अशावेळी जीवन विमा कामास येतो. मुलांचं शिक्षण, विवाह, रोजचं आयुष्य विमा कंपनीकडून मिळणाऱ्या पैशातून काही प्रमाणात का होईना जीवन प्रवाह सुरू राहण्यास खूप मदत होते.

आरोग्य विमा (Health Insurance):-

 • आरोग्य विमा हा आजच्या काळात अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या वेगवान काळात व्यक्तींचे स्वास्थ्य डळमळीत झाले आहे. योग्य अन्न, पाणी, हवा उपलब्ध नाही. सगळीकडे भेसळ, प्रदूषण आहे. अशामुळे लोकांचे आरोग्य बिघडतंय. यामुळे हेल्थ इन्शुरन्स घेणे महत्त्वाचे ठरते.
 • आरोग्य विमा घेतलेली व्यक्ती हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास संबंधित बिलांचे पैसे विमा कंपनी भरते. यांत इतर अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. आरोग्य  विम्यामध्ये अंतर्भूत असलेल्या व्याधींच्याच उपचाराचे बिल विमा कंपनी भरते.
 • आरोग्य विम्यात व्यक्तीच्या हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापासून औषधांपर्यंतचा खर्च विमाराशीनुसार विमा कंपनी करते. यामध्ये जवळपास सर्वच विमा कंपन्या त्यांच्याशी संलग्न असलेल्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचारांची सुविधा ग्राहकांना देतात. कॅशलेस उपचार झाल्याने रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबीयांना खूप फायदा होतो. मानसिक त्रास वाचतो.
 • आरोग्य विम्यासंबंधित एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे, समजा विमा घेणाऱ्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वा उपचारांची गरज पडली नाही तर विम्याचा कालावधी संपल्यावर व्यक्तीला त्याने भरलेल्या प्रीमियमचे पैसे परत मिळत नाही.
 • कालावधी संपल्यावर दरवेळेस विमा ‘नूतनीकरण’ करावे लागते व नूतनीकरण करताना पूर्वी क्लेम न केलेल्या पॉलिसीसाठी विमा कंपनी ग्राहकांना ‘नो क्लेम बोनस’ची सुविधा देते, ज्यामध्ये ग्राहकांना ठराविक रक्कम कंपनीकडून बोनसच्या स्वरूपात दिली जाते.

आरोग्य विमा व जीवन विम्यामधील फरक:-

१. उद्देश:

 • ‘जीवन विमा’ मृत्यूपश्चात तुमच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देतो.
 • ‘आरोग्य विमा’ जीवघेण्या आजारात मृत्यूशी लढताना तुमची आर्थिक बाजू सांभाळतो.

२. कालावधी:

 • जीवन विमा हा दहा ते वीस वर्षांच्या काळासाठी असू शकतो.
 • हा सामान्यतः एक ते तीन वर्षांचा असतो.

३. प्रीमियम:-

 • जीवन विम्यासाठी प्रीमियम हे नियमितपणे भरावे लागतात किंवा एकरकमी भरावे लागू शकतात.
 • हेल्थ इंस्युअरन्समध्ये सामान्यतः एकरकमी पैसे भरावे लागतात.

४. स्वरूप:-

 • जीवन विमा हा वैयक्तिक किंवा समूहाचाही काढता येतो.
 • आरोग्य विमा हा समूहाचा, वैयक्तिक किंवा कुटुंबासाठी असू शकतो.

५. कर सवलत:-

 • जीवन विम्यामध्ये आयकर कायदा कलम ८० सी नुसार कर सवलत मिळते.
 • आरोग्य  विम्यासाठी आयकर कायदा कलम ८० डी नुसार कर सवलत मिळते.

दोन्ही विम्याचे स्वतःचे फायदे आहेत. विविध विमा कंपनींच्या विमा पॉलिसींचा संपूर्ण अभ्यास करूनच आपल्याला हवी ती विमा पॉलिसी विचारपूर्वक निवडणे आवश्यक आहे.

हनुमान, अश्वत्थामा आदी सप्तचिरंजीवांनाच जीवन विम्याची गरज नाही. पण सर्वसामान्य माणसांना खास करून त्यांच्या कुटुंबाला मात्र जीवन विम्याची नितांत गरज आहे.

लक्षात ठेवा, ‘ विमा है सब के लिये, क्यूंकी जिंदगी नही है सदा के लिये!”

जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचतआरोग्य विमा खरेदी करण्याची 8 महत्वाची कारणे

कोणता आयुर्विमा घ्यावा? सोचना क्या,जो भी होगा देखा जायेगा !!!

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *