आताची पिढी अर्थसाक्षरतेच्या अभियानामुळे आपल्या निवृत्तीचे नियोजन योग्यरीत्या करते आहे. एसआईपी मधून आपल्या 20-25 वर्षांपासून येणाऱ्या निवृत्तीसाठी मोठा निधी म्युच्युअल फंड च्या माध्यमातून उभा करत आहेत. आपण अशा लोकांचा विचार करू जे गेल्या 6-8 वर्षात निवृत्त झाले आहेत किंवा पुढील 6-7 वर्षात निवृत्त होणार आहेत. हि अशी पिढी आहे जे गुंतवणुकीच्या बाबतीत जराही जोखीम न घेता निश्चित परतावा देणाऱ्या बँकेच्या एफडी , पोष्टाच्या योजना किंवा जीवन बिमाच्या एन्डॉवमेंट प्लॅन्स किंवा मनी बॅक प्लॅन्स मध्ये गुंतवणूक करीत आले.
त्यात बहुतेक लोकांची पूर्वीची आर्थिक परिस्थिती, घरात असलेली 2-3 किंवा जास्त मुलं त्यांचा घरांची, शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी त्यांना जोखीम न घेण्यासाठी बंधन घालत राहिली. आताची नवीन पिढी छोट्या कुटुंबात समाधानी राहते, त्यामुळे त्यांचे खर्च कमी होतात, त्यांच्या घराची जबादारी त्यांच्या पालकांनी पार पडलेली असते. त्यामुळे नवीन पिढी जोखीम घेऊन तरुणवया पासून एसआईपी किंवा शेअर मार्केट अशी जास्त परतावा देणारी पण जास्त जोखीम असलेली गुंतवणूक करू शकतात.
वर उल्लेख केलेली जी पिढी आहे ज्यांचा वयोमान साधारणतः 54 तो 66 दरम्यान आहे व ज्यांना चांगली मासिक पेन्शन कशी मिळू शकेल याचा आढावा घेऊ. ह्या पिढीने आपली बहुतेक गुंतवणूक हि बँक एफ डी, पोस्ट ऑफिस किंवा विमा योजना अशात केलीली आहे. या अशा योजना आहेत ज्यात निश्चित परतावा मिळतो, मात्र परताव्याचा दर हा देशाच्या आर्थिक परिस्थितीशी थेट प्रमाणात असतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर देशाची आर्थिक परिस्थिती जस जशी मजबूत होत जाईल, त्या प्रमाणात व्याज दर खाली येतील.
15 वर्षांपूर्वी व्याज दर हे साधारण 13-14% आसपास होते, आज ते 7% च्या आसपास आहेत. 15 वर्षांपूर्वी आपल्या देशाची आर्थिक परस्थिती चांगली नव्हती, आज आपण जगातील 5 व्या क्रमांकाची अर्थसत्ता आहे आणि येणाऱ्या 8-10 वर्षात भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर पोहचेल. याचाच अर्थ आजचे जे व्याज दर आहेत ते येणाऱ्या काळात खाली जाण्याची शक्यता जास्त आहे.
अशावेळी आपले निवृत्तीवेतन जर व्याज दर निगडित मालमत्ता वर्गात असतील, तर आपल्याला व्याजातून मिळणारे उत्पन्न कमी कमी होत जाईल मात्र महागाई हि दर वर्षी वाढत राहील. तसेच निवृत्तीनंतर आपले वय जसे वाढत जाईल तसे औषधांवरचा खर्च हि वाढेल. मग अशावेळी निवृत्तीधारकांनी आपले मासिक उत्पन्न वाढवण्यासाठी काय करावे.
नक्की वाचा – Mutual Fund SIP : कधी करावी ‘एसआयपी’ मध्ये गुंतवणूक ?
त्यामुळे अशा परिस्थितीत ठेवींवरच्या व्याजापेक्षा थोड्या अधिक प्रमाणात आणि नियमित उत्पन्नासाठी इक्विटी जास्त असलेल्या इक्विटी हायब्रीड फंड योजनांकडे गुंतवणूकदारांनी लक्ष दिले पाहिजे. निवृत्तीच्या काळात खरे उत्पन्न (मिळणारे व्याज – महागाई दर) वाढविण्यासाठी हायब्रीड योजनेतून “सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लान” (एस डब्ल्यू पी) चांगला उपयोग होईल. मात्र, अल्प मुदतीमध्ये बाजारातील चढ उतारा मुळे जर भांडवलात तात्पुरती घट झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता हवी. याशिवाय हायब्रीड फंड योजनांचे इतरही फायदे आहेतच.
- एकाच योजनेतून डेट (कर्जरोखे) आणि इक्विटी (शेअर्स) योजनेचे फायदे (म्हणजे स्थिरता आणि वृद्धी) मिळू शकतात. उत्तम ऍसेट ऑलोकेशन साठी जास्त योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागत नाही,
- फंड व्यवस्थापक नियोजित “ऍसेट ऍलोकेशन” कायम ठेवण्यासाठी दरमहा “रिबॅलन्सिंग” करीत असल्याने गुंतवणूकदाराला त्याकडे लक्ष ठेवावे लागत नाही. डेट व इक्विटी भागाच्या विक्रीवर “एक्झिट लोड” द्यावा लागत नाही,
- नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी या योजना अतिशय उपयुक्त ठरतात.
- “रिबॅलन्सिंग”साठी जेव्हा फंड व्यवस्थापक डेट किंवा इक्विटी भागाची विक्री करतात, त्यावरील अल्प मुदतीचा भांडवली लाभ कर हा म्युच्युअल फंडासाठी शून्य असतो.
निश्चित व्याज देणाऱ्या मालमत्ता वर्गाबरोबरच , म्युच्युअल फंडाच्या कमी जोखीम वाल्या योजनांचा समावेश आपल्या मालमत्ता वर्गामध्ये केला पाहिजे. ज्यांना खूप कमी जोखीम घ्यायची आहे, त्यांनाही म्युच्युअल फंडाची इक्विटी सेविंग कॅटेगरी किंवा डेट हायब्रीड फंडाचा चा समावेश करावा, जे थोडी जास्त जोखीम घेऊ शकतात त्यांनी बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड कॅटेगरी किंवा इक्विटी हायब्रीड फंड कॅटेगरी चा समावेश आपल्या मालमत्ता वर्गात करावा. म्युच्युअल फंडाच्या ह्या अशा प्रकारच्या योजना आहेत ज्या नियमित उत्पन्न बरोबरच भांडवलवृद्धीसाठी मदत करतात. ह्या योजनांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
1) इक्विटी सेविंग फंड कॅटेगरी मध्ये साधारण 30-35 % गुंतवणूक हि शेअर बाजारात होते व बाकीची गुंतवणूक डेट / आर्बिट्राज अशा खूप कमी जोखीम असलेल्या अशा साधनांमध्ये होते. शेयर बाजार चंचल जरी असला तरी ह्या कॅटेगरी मध्ये त्याचा हिस्सा कमी असल्याने योजनेची जोखीम कमी होऊन जाते. ह्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर हि कमी लागतो.
2) डेट हायब्रीड फंड कॅटेगिरी मध्ये सुद्धा साधारण 25-30 % गुंतवणूक ही शेयर बाजारात होते , त्यामुळे जोखीम ही कमी होऊन जाते. ह्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर जास्त कर लागतो.
3) बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड कॅटेगरी मध्ये योजनेच्या फंड मॅनेजर ला डेट किंवा इक्विटी चे प्रमाण बाजाराचा चढ उताराप्रमाणे कमी जास्त करण्याची मुभा असते. जेंव्हा शेअर बाजार पोषक असतो तेंव्हा जास्त गुंतवणूक हि शेयर बाजारात होते व जेंव्हा शेअर बाजार पोषक नसतो तेंव्हा खूप कमी गुंतवणूक शेअर बाजारात होते. तज्ज्ञ फंड मॅनेजर च्या योग्य व्यवस्थापनाने आपल्याला शेअर बाजाराचा चांगला लाभ करून घेता येतो.
4) इक्विटी हायब्रीड फंड कॅटेगरी मध्ये शेयर बाजारातील गुंतवणूक हि साधारण 65% तो 75% असते त्यामुळे ह्यात जोखीम थोडी जास्त असते मात्र जास्त परतावा मिळविण्याची शक्यताही जास्त असते.
5) मल्टि ऍसेट फंड कॅटेगरी मध्ये फंड मॅनेजर किमान 3 निरनिराळ्या ऍसेट मध्ये गुंतवणूक करीत असतो. उदा. डेट + इक्विटी+ कमोडिटी (सोने / चांदी इतर ) ह्या योजनांच्या गुंतवणुकीमध्ये विविधता असल्यामुळे ह्या योजना कमी चंचल / अस्थिर असतात.
वर माहिती दिलेल्या 5 प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर दरमहा नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी एस डब्लू पी (सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन) सेवेचा लाभ घ्यावा.एकरकमी किंवा “सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान” द्वारे (एसआयपी) ठराविक रक्कम हायब्रीड फंड योजनेत जमा करून त्यातून निवृत्तीच्या काळात रक्कम काढून घेता येते, ज्याला सिस्टीमॅटिक विड्रॉवल प्लान (एस डब्ल्यू पी) म्हणतात. दरमहा किती रक्कम काढावी, हे गुंतवणूकदाराने ठरवायचे असते. (पूर्वीची कामगिरी बघता साधारणपणे वार्षिक 9 % रक्कम काढणे सहजशक्य आहे.).
उदाहरण द्यायचे झाल्यास जर गुंतवणूकदाराने रु. 10,00,000 गुंतवले व दर महिन्याच्या 10 तारखेला रु. 7500 एस डब्लू पी केली तर गुंतवणूक दाराला नियमित उत्पन्न चालू होते. गुंतवणूकदार एसडब्लूपीची रक्कम केंव्हाही बदलू शकतो. ज्या वर्षी म्युच्युअल फंड 9% पेक्षा जास्त परतावा देतात तेंव्हा एसडब्लूपीमधून काढलेल्या रकमेच्या वरची रक्कम आपली मूळ गुंतवणुकीत जमा होते, मात्र जर 9% पेक्षा कमी परतावा असेल तर आपले भांडवल थोडे खाली जाण्याची शक्यता असते. मात्र मागील इतिहास पाहता दीर्घ मुदतीमध्ये आपले भांडवल खाली जाण्याची शक्यता नगण्य असते. हायब्रीड फंडातून मासिक लाभांश घेण्याचाही पर्याय असतो. मात्र 1 फेब्रुवारी 2018 च्या बजेट प्रमाणे डिविडेंड वर डिविडेंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स लागतो. त्यामुळे डिविडेंड पर्यायपेक्षा ग्रोथ पर्यायातून एसडब्लूपी जास्त आकर्षक ठरते. (योजनेने दिलेला मागील परतावा हा म्युच्युअल फंड योजनेतील पुढील काळातील परताव्याची शाश्वती देत नाही).
आपण लिहून दिलेल्या तारखेला हि रक्कम म्युच्युअल फंडाकडून आपल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल. एसडब्लूपी मधून नियमित घेतलेले उत्पन्न हे जास्त करप्रभावी असते, कमी कर भरावा लागतो.
म्युच्युअल फंडाचा मागील इतिहास जर आपण पहिला तर वर उल्लेखलेल्या 4 हि कॅटेगरी ने चांगला परतावा दिला , म्हणजेच आपण 8-9% Per Annum नियमित उत्पन्न घेऊन सुद्धा आपल्या मूळ गुंतवणुकीत चांगली भांडवलवृद्धी झाली.
नोव्हेंबर 2016 म्हणजेच नोटबंदी लागू झाल्यानंतर ह्या हायब्रीड फंड योजनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. त्यात मुख्यत्वे जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे, जे एस डब्लू पी मार्फत दर महिन्याला ठराविक रक्कम आपल्या गुंतवणुकीतून घेत आहेत.
ज्यांना शेयर बाजाराची धास्ती वाटते त्यांनी हायब्रीड फंडांपेक्षा हि कमी जोखिमेचा “क्रेडिट ओप्पोर्टच्युनिटी फंडाची“ निवड करावी. मागील इतिहास पाहता ह्या फंडामध्ये दीर्घ मुदतीमध्ये बँक FD च्या साधारण 2–3 % जास्त परतावा मिळतो.
ह्यातली जोखीमेची बाजू म्हणजेच , बाजारातील चढ उतारामुळे अल्पकाळात आपल्या मूळ गुंतवणुकीत जर थोडी घट झाली तरी हि न घाबरता दीर्घकालीन गुंतवणुकीतून आपल्याला धनवृद्धीचा चांगला लाभ होतो. नियमित उत्पन्न तसेच भांडवलवृद्धी झाल्यामुळे येणाऱ्या काळात महागाई वाढली तरीही आपल्याला त्याची काळजी वाटणार नाही.
जेष्ठ नागरिकांना महागाई वर मात करणाऱ्या निवृत्ती वेतनासाठी शुभेच्छा !!
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हि बाजार जोखिमेचा अधीन असते, योजने संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा
धन्यवाद,
निलेश तावडे
लेखक हे 20 वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत होते सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत.
[email protected]
9324543832