Niyo Bank
आजच्या लेखात आपण निओ बँक (Niyo Bank) या संकल्पनेबद्दल माहिती घेऊया. असं समजूया की या जगाचे दोन भाग आहेत. एक तुम्ही आम्ही राहतो ज्याला आपण आपलं खरं जग समजतो. तिथे माणसांची गर्दी, विविध ऋतू, काळ-वेळ, मनातल्या भाव भावना असं सगळं आहे आणि दुसरं म्हणजे आभासी जग, जिथे इंटरनेटचं मायाजाल आहे, विविध किरणांचा गोतावळा आहे. अचानक जर आपल्याला समजलं, की आपलं हे राहतं जग, हे खरं नसून प्रचंड गुंतागुंतींचं जाळं आहे आणि त्याच्यावर यंत्रांचे नियंत्रण आहे तर?
हे नक्की वाचा: DigiLocker: तुम्हाला डिजीलॉकर बद्दल माहिती आहे का?
दि मॅट्रिक्स
- तर काय मंडळी चक्रावलात ना? सन १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दि मॅट्रिक्स’ हा चित्रपट व त्यानंतर काही काळाने प्रकाशित झालेले त्याचे पुढील भाग याच संकल्पनेवर आधारित आहेत.
- निओ शब्दावरून मला पाहिली आठवण झाली ती वरील चित्रपटाची. या चित्रपटातली सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या आणि निओ या टोपणनावाने हॅकिंग करणाऱ्या नायकाला या जगात काहीतरी अनाकलनीय असल्याचे भास होत असतात.
- त्याची त्रिणीटी नावाची हॅकर मैत्रीण त्याला याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी मार्फीयस मदत करू शकेल असे सांगते. त्याची व निओची भेट झाल्यावर निओला आपण सर्वजण आभासी जगात रहात असून येथे यंत्रांनी मानवांवर नियंत्रण मिळवले आणि त्यांना लागणाऱ्या ऊर्जेसाठी ते मानवी शरीराचा वापर करीत आहेत.
- खऱ्याखुऱ्या जगातील आता फक्त एकच शहर अस्तित्वात असून ते वाचवण्यासाठी एजंट स्मिथशी लढावे लागेल. या लढ्यात निओ सहभागी होऊन खडतर प्रशिक्षण घेऊन आपल्यासह सर्वांची सुटका करून आभासी जगातून खऱ्या जगाकडे येण्यास निघतात.
- त्याचा आणि निओ बँकेचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही केवळ निओ नावावरून या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या.
महत्वाचा लेख: FinTech: तुम्हाला फिनटेक बद्दल माहिती आहे का?
निओ बँका
- यापूर्वी आपण फिनटेक उद्योगांची माहिती करून घेतली आहे. यातील फिनटेक हा शब्द Finance व Technology या दोन शब्दांपासून तयार झाला आहे.
- निओ बँका हे वेगळ्या प्रकारचे सेवा देणारे स्टार्टअप असून त्यांनी जगभरात बँकिंग उद्योगात खळबळ माजवली आहे.
- तंत्रज्ञानाचा वापर करणारी तरुण पिढी हे त्यांचे ग्राहक आहेत. भारताची लोकसंख्या व त्यातील तरुणांची संख्या यामुळे जगातील सर्वात मोठी बाजारपेठ येथे उपलब्ध झाली आहे.
- सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा जसे- बचत, गुंतवणूक, पैशांचे हस्तांतरण, कर्ज देणे या सुविधा त्यांच्यामार्फत कमी वेळेत आणि तत्परतेने केल्या जातात. तेव्हा या निओ बँका म्हणजे काय? त्यांचे प्रकार, त्याच्यापासून ग्राहकांना होणारे फायदे याविषयी अधिक जाणून घेऊयात.
- आमची कुठेही शाखा नाही हे ब्रीदवाक्य असलेल्या पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने ॲप अथवा डिजिटल माध्यमातून व्यवहार करण्याची सोय देण्याची व्यवस्था म्हणजे निओ बँक. खऱ्या अर्थाने शाखा नसलेली ही डिजिटल बँक आहे. अनेक प्रकारच्या वित्तीय सेवा या त्यांना पारंपरिक बँकेपेक्षा किमान खर्चात आणि त्वरित मिळतात.
- निओ बँक या फिनटेक स्टार्टअप कंपन्या आहेत. सेवाक्षेत्रांत त्यांची गणना करता येईल. जगभरात अशा कंपन्या अस्तीत्वात असून त्याची विभागणी तीन प्रकारात करता येईल.
- स्वतःचा बँकिंग परवाना नसलेल्या निओ बँका- या फिनटेक कंपन्या मान्यताप्राप्त बँकेबरोवर भागीदारी करार करून त्याच्या आणि आपल्या सेवा सुविधा ग्राहकांना देतात.
- पारंपारिक बँकांच्या स्वतःच्या निओ बँक– अधिकाधिक ग्राहक आपल्याकडे यावेत या हेतूने अनेक बँकांनी स्वतःच उपकंपन्या स्थापन केल्या असून त्याद्वारे निओ बँक सुविधा आपल्या ग्राहकांना देतात.
- स्वतःकडे बँकिंग परवाना असलेल्या निओ बँक: याच्याकडे बँकिंग परवाना आहे पण शाखा काढण्याऐवजी आपल्या ग्राहकांना निओ बँक सुविधा देतात.
- जगभरात स्वतःचा परवाना असलेल्या निओ बँक अत्यंत कमी आहेत. बहुतेक सर्व निओ बँक पहिल्या दोन प्रकारातच आहेत.
निओ बँकांची कार्यपद्धती
- निओ बँक पारंपरिक बँकांच्या तुलनेत बँकिंग सेवा सुलभ लवचिक पद्धतीने देतात. ग्राहक हा त्यांचा केंद्रबिंदू आहेत त्यांना अनुकूल आणि वैयक्तीक सेवा ग्राहकांना देतात. तंत्रज्ञान हा त्यातील महत्वाचा भाग आहे.
- त्यांच्याकडे जमा होत असलेली ग्राहकांच्या माहितीचे वर्गीकरण, पृथक्करण करून ग्राहकांची मानसिकता जाणण्याचा या बँका प्रयत्न करतात. विशिष्ठ प्रसंगात ग्राहक कसा वागेल याचा त्या अंदाज बांधतात.
- ग्राहकांच्या समाधानपूर्तीबाबत जगभरातील निओ बँक ग्राहक अधिक समाधानी असल्याचे विविध सर्वेक्षणात आढळून आले आहे.
- पारंपरिक बँकांकडे तंत्रज्ञात बदल करून ते लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत अधिक विकसित तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने वारंवार असे बदल करण्यापेक्षा फिनटेक कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने सेवा घेऊन ग्राहकांना देणे लाभदायक होते. त्यामुळेच नवनवीन कल्पना घेऊन येणाऱ्या फिनटेक कंपन्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
- सध्या निओ बँका पारंपरिक बँकांहून जवळपास दुप्पट प्रमाणात वेगवेगळ्या सेवा आपल्या ग्राहकांना देत आहेत.
- यात खाते उघडून डिपॉझिट बनवणे, देशांतर्गत व परदेशात पैसे पाठवणे, विविध बिले भरणे, कर्ज देणे या नियमित सुविधांसह आभासी डेबिट कार्ड देणे, विनामूल्य क्रेडिट कार्ड देणे, पिन सेट करणे, खर्च मर्यादा निश्चित करणे, गुंतवणुकीसंबंधी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन देऊन अशी गुंतवणूक करण्याची सोय अल्प मूल्य आकारून किंवा विनामूल्य देणे, खर्चाबद्दल कॅशबॅक देणे, काही क्रेडिट पॉईंटस देऊन ते वटविण्याची सोय उपलब्ध करणे, डिपॉझिटवर अधिकदराने व्याज देणे यासारख्या मूल्यवर्धित सुविधा देत असल्याने त्यांची लोकप्रियता वाढत आहे.
विशेष लेख: Freak Trade: विचित्र व्यापार उडवी हाहाकार
निओ बँक व डिजिटल बँक
- निओ बँक व डिजिटल बँक याच्या व्यवहार पद्धतीत खूप साम्य असल्याने अनेकांना त्या सारख्याच वाटतात.
- डिजिटल बँकिंग सुविधा ही बँकेने स्वतः यंत्रणा उभारून आपल्या ग्राहकांना ही सुविधा दिली असून निओ बँक सेवा ही स्वतःच्या उपकंपनी मार्फत अथवा नवीन स्टार्टअप मार्फत उपलब्ध करून दिलेली असते हा यातील महत्वाचा फरक आहे.
- या सेवा देणाऱ्या फिनटेक कंपन्या थेट रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखाली नसल्या तरी त्यांच्या संदर्भात कोणतीही तक्रार उद्भवली असता त्याची जवाबदारी ही त्याच्याशी संबंधित बँकेची आहे. त्याचप्रमाणे ठेवीदारांना मिळणारे 5 लाख रुपयांपर्यंतचे अधिकतम सुरक्षा कवच (DICGC) यातील ठेवींना उपलब्ध आहे.
- या सर्व सेवा वाजवी दरात अथवा विनामूल्य मिळत असल्याने तसेच त्या जलद गतीने होत असल्याने ग्राहकांना उपयुक्त व पर्यावरण पूरक आहेत.
- याशिवाय बँका अशा कंपन्यांची निवड कठोर निकषांवर करून त्यांच्या सेवेचे मूल्यमापन वेळोवेळी करीत असतात.
सध्या देशात निओ बँक सेवा देणाऱ्या २७ कंपन्या असून त्यातील ८ जणांचे वेगळे पेमेंट प्लॅटफॉर्म आहेत. यामुळे ग्राहकांना आपल्या व्यवहारास पूरक पर्याय निवडणे शक्य झाले आहे. ठेव आणि कर्ज यावर प्रचलित दराहून वेगळा स्पर्धात्मक दर मिळू शकतो, जे ग्राहक तंत्रज्ञानस्नेही आहेत त्यांनी निओ बँकेकडून अशा सेवा घेण्यास कोणतीच हरकत वाटत नाही.
– उदय पिंगळे
टीम अर्थसाक्षरतर्फे सर्वाना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
web search: Niyo Bank Marathi Mahiti, Niyo Bank in Marathi, Niyo Bank mhanje kay