Nykaa IPO: नायका आयपीओ बाबतच्या या १० गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Reading Time: 3 minutes

Nykaa IPO

‘नायका’ आयपीओ (Nykaa IPO) मार्केटमध्ये विक्रीसाठी उपब्ध होत आहे. साधारणतः महिला वर्गाला किंवा ‘पती’ वर्गाला ‘नायका’ नेमका काय ब्रँड आहे? ही कंपनी कुठल्या क्षेत्रात काम करते? याविषयी थोडीबहुत माहिती असेल, परंतु आपण गुंतवणूकदार किंवा आर्थिक घडामोडींकडे सुज्ञपणे पाहणारे जाणकार असाल तर ‘नायका’च्या आयपीओची कुणकुण आपल्या कानी आली असेल. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी ‘नायका’ विषयी काही महत्वाची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.

हे नक्की वाचा: Upcoming IPOs: आगामी काळात ‘पेटीएम’सह हे ८ आयपीओ बाजारात दाखल होणार 

Nykaa IPO: १० महत्वाचे मुद्दे

१. कोणत्या क्षेत्रात कार्यरत?

 • नायका ही एक ई-कॉमर्स कंपनी असून तिचे मुख्यालय मुंबईत आहे.
 • सौंदर्यप्रसाधने, आरोग्य आणि फॅशन यांसंबंधीचे १२०० पेक्षा अधिक प्रॉडक्ट्स तयार करण्याचे मुख्य कार्य ही कंपनी करते.
 • विविध ई-कॉमर्स वेबसाईट्स, मोबाईल ॲप्स आणि ७६ ऑफलाईन स्टोअर्सद्वारे कंपनी आपले प्रॉडक्ट्स विकत आहे.
 • नायकाच्या स्वतःच्या वेबसाईटवर दरमहा ५.५ कोटी ग्राहक भेट देत असतात व कंपनीकडे दरमहा १.३ कोटी पेक्षा जास्त ऑर्डर्स येत असतात.
 • नायका कंपनीच्या छताखाली नायका कॉस्मेटीक्स, नायका नॅचरल्स, के ब्युटी, नायकेडी, ट्वेंटी ड्रेसेस आणि पिपा बेला या ब्रांड्सचा समावेश आहे.
 • नायका ही एक ‘युनिकॉर्न स्टार्टअप’ कंपनी आहे. १ बिलियन (१०० कोटी) डॉलर म्हणजे सध्याचा डॉलरचा भाव बघता ७५०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या स्टार्टअप कंपन्यांना “युनिकॉर्न” बिरुद लावले जाते.
 • कंपनीचे बाजारमूल्य आजघडीला ४.५ बिलियन डॉलर्स असल्याचे सांगितले जात आहे.

२. कंपनीचा थोडक्यात इतिहास:

 • फाल्गुनी नायर या महिलेने ‘इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (IIM) येथून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘कोटक महिंद्रा’ बँकेत ‘कॅपिटल इनवेस्टमेंट मॅनेजिंग डायरेक्टर’ पदी नोकरीस सुरुवात केली.
 • काम करत असताना त्यांना ‘मल्टी-ब्रांड ब्यूटी प्रॉडक्ट स्टोअर्स’चा दौरा करावा लागला. त्या स्वतः ब्युटी प्रॉडक्टच्या वापरकर्त्या नसल्या तरीही त्यांच्या एक बाब लक्षात आली की एकाच ठिकाणी सर्वच गरजेच्या गोष्टी मिळू शकतील असे एकही स्टोअर नाही.
 • याच विचारच भुंगा त्यांच्या डोक्यात घुमू लागला आणि भारीभक्कम पगाराची नोकरी सोडून, कौटुंबिक परिस्थिती सर्वसाधारण असताना फाल्गुनी यांनी आपल्या जिद्दीने २०१२ साली ‘नायका’ची स्थापना केली.
 • कंपनी चालू करून ५ वर्षे झाली तरीही कंपनीला, त्या ब्रांडला विशेष अशी ओळख मिळाली नव्हती. परंतु कंपनी ‘स्‍टीडव्‍यू कॅपिटल’ मार्फत तब्बल १०० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविण्यात यशस्वी झाली तत्क्षणी ‘युनिकॉर्न स्टार्टअप’च्या यादीत म्हणजेच ‘१ बिलियन मूल्य’ असणाऱ्या कंपन्यांच्या दर्जामध्ये कंपनीची गणना होऊ लागली.

विशेष लेख: Zomato: झोमॅटोचे बाजारमूल्य ही मोठ्या बदलाची नांदी का आहे?  

३. कंपनीचे व्यवस्थापक आणि शेअरहोल्डर्स:

 • कंपनीच्या संस्थापक, व्यवस्थापक फाल्गुनी नायर स्वतः आहेत.
 • संजय नायर फॅमिली ट्रस्ट, जे एम फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी, टीपीजी ग्रोथ, लाईटहाऊस इंडिया फंड असे एकूण २० गुंतवणूकदार या कंपनीत आहेत.
 • कतरिना कैफ नंतर आता आलिया भट या अभिनेत्रीनेही नायकामध्ये गुंतवणूक केली आहे.

४. आयपीओ विषयी महत्वाचे:

 • ‘आयपीओ’मार्फत कंपनीला ५०० मिलियन डॉलर्स म्हणजे ३५०० ते ४००० कोटी रुपये एवढी रक्कम उभी करायची आहे.
 • २ ऑगस्ट २०२१ रोजी कंपनीने या संबंधी सेबी (SEBI) कडे ‘डीआरएचपी’ (DRHP)च्या स्वरूपात अर्ज दाखल केला आहे.
 • कंपनी ‘फ्रेश इश्यू’द्वारे ५२५ कोटी रुपयांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचे आवाहन करणार आहे आणि ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) मार्फत ४३.१ दशलक्ष शेअर्स बाजारात गुंतवणुकीसाठी खुले करणार आहे.
 • कंपनीच्या एकूण गुंतवणुकीपैकी १०% समभाग विक्रीस उपलब्ध करणार आहे.

५. ‘आयपीओ’च्या विनियोगाचे नियोजन:

 • नायका फॅशनचे नवे स्टोअर्स उभे करण्यासाठी आलेल्या रकमेतील ३४ कोटी रुपये वापरले जाणार आहेत.
 • ३५ कोटी रुपये भांडवलवृद्धीसाठी वापरणार आहे.
 • १३० कोटी कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे.
 • ब्रांडच्या जाहिरातीसाठी, प्रोमोशन्ससाठी २०० कोटी रुपये खर्च करण्याचा कंपनीचा मानस आहे.

६. कंपनीचे वित्तीय व्यवस्थापन:

 • नायकाला २०२० या वित्तीय वर्षात १४३.४० दशलक्ष रुपयांचा तोटा सोसावा लागला होता.
 • परंतु कोव्हीड-१९ ताळेबंदीच्या नियमावलीत अत्यावश्यक सेवेमध्ये नसतानाही कंपनीने २०२१ च्या वित्तीय वर्षात ६१.९४ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे.
 • कंपनीचे उत्पन्न २०२० वित्तीय वर्षापेक्षा २०२१ या वित्तीय वर्षात ३८.१% रुपयाने वाढले आहे.
 • २०२० पेक्षा २०२१ सालात कंपनीला ३५.३ % अधिकच्या म्हणजे तब्बल १.७१ कोटी ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

७. कंपनीच्या सकारात्मक बाजू:

 • नायकाच्या सौंदर्यप्रसाधनांची आणि तत्सम प्रॉडक्ट्सची नॉन-मेट्रो सिटीजमध्ये जास्त मागणी असल्याचे दिसून येत आहे.
 • वित्तीय वर्ष २०२० च्या तुलनेत २०२१ सालात ५६.९% जास्त प्रमाणात श्रेणी २ आणि ३ शहरांत प्रॉडक्ट्स मागवले गेले.
 • याचा अर्थ ‘नायका’ची ब्रांड व्हॅल्यू मोठ्या आणि मोजक्या शहरांपुरती मर्यादीत राहिले नाही ही कंपनीच्या भविष्याच्या दृष्टीने फार सकारात्मक बाब म्हणता येईल.
 • ‘डीआरएचपी’ भरताना नायकाने असे प्रतिपादन केले आहे की भारताचे सौंदर्यप्रसाधने आणि सेल्फ केअर प्रॉडक्ट्सचे मार्केट २०२५ पर्यंत २ लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल, त्यापैकी तब्बल १.९ लाख कोटी रुपयाचे मार्केट काबीज करण्याची संधी नायकाला असणार आहे.

महत्वाचा लेख: IPO: आयपीओ म्हणजे काय? 

८. गुंतवणुकीचे संभाव्य धोके:

 • देशात ई-कॉमर्स नियमांच्या कायद्याचा मसुदा लिहिला गेलाय. त्यामध्ये ‘स्पेसिफिक फ्लॅश सेल’वर बंदी आणण्याविषयी नियम आहे.
 • अशाच प्रकारच्या इतरही अशा काही नियमांचा समावेश आहे ज्याचा फटका ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांच्या नफेखोरीवर बसण्याची शक्यता आहे.
 • ‘नायका’चे जरी ऑफलाईन स्टोअर्स असले तरीही कंपनीच्या प्रॉडक्ट्स विक्री आणि नकळत जाहिरातीसाठी ई-कॉमर्स वेबसाईट्स आणि ऍप्सचा मोठा वाटा आहे. 
 • त्यामुळे येणाऱ्या नियमांचा नायकालाही कळत-नकळत फटका बसू शकतो.

९. आयपीओ प्राथमिक माहिती:

 • नुकताच नायकाने सेबीकडे ‘आयपीओ’च्या परवानगीसाठी ‘डीआरएचपी’ अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अजून तरी मार्केटमध्ये आयपीओ गुंतवणुकीसाठी नेमका कधी उपलब्ध होणार? आयपीओ किमतीचा पट्टा काय असणार याविषयी माहिती उपलब्ध नाही. अधिकृत माहिती उपलब्ध होईल तेव्हा याच ठिकाणी अपडेट केली जाईल.

१०. तुम्ही काय कराल ?

 • २०२० आणि २०२१ या वित्तीय वर्षातील नफ्या-तोट्याची आकडेवारी पाहता कंपनीची वाटचाल सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.
 • परंतु ई-कॉमर्स कंपन्यांसाठीचे केंद्र सरकारचे येऊ घातलेले नवे नियम, कोव्हीड-१९ महामारीचे भविष्यातील स्वरूप या सर्वांचा कंपनीच्या वृद्धीवर काही परिणाम होणार नाही ना? याचा विचार करावा लागेल.
 • एका अर्थाने ही एक चांगली उद्योग संधी आहे, परंतु शेअर्सच्या किंमती कंपनीच्या नफ्याच्या गुलाम असतात असे जाणकार सांगतात त्यामुळे चौफेर विचार करूनच स्वतःचा निर्णय घेणे सोयीस्कर ठरेल.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: Nykaa IPO Marathi Mahiti, Nykaa IPO in Marathi, Nykaa IPO date 

Leave a Reply

Your email address will not be published.